धृवतारा

पाहता पाहता असा संपला खेळ सारा
राहिला न वेळ, ना राहिला मेळ न्यारा

माझ्यातल्या मलाही उरला नाही थारा
पडता प्रतिबिंब क्षणात तडकला पारा

श्वासातून कंपला उरातला वादळवारा
स्पर्शून किनारे उसळला सागर खारा

आश्रयास स्पंदनेही शोधतसी निवारा
उफाळून आला शब्दावाचुनी कोंडमारा

दिवस रविकिरणांचा निरर्थक पसारा
सांजवेळी हुंदक्यांचा श्वासांवर पहारा

उठला तेव्हा चांदण्यावर निःशब्द शहारा
अकस्मात जेव्हा ओघळला अढळ धृवतारा !

-माणिक