श्वना!....

"झा
लेत"? (झेंडू मधल्या झ चा उच्चार)
"भिजवलेत"? (जवान मधला ज चा उच्चार)
"टॅम हाय"?
निरनिराळ्या वेळी येणार्‍या अशा निरनिराळ्या हाकांचा मालक म्हणजे 'श्वना'! नाव ऐकून गोंधळ होतोय ना? अहो होणारच! कारण असे कुणाचे नाव मी सुद्धा अजून पर्यंत ऐकलेले नाहीये. मग हा श्वना कोण? ऐकायचंय तर ऐका!

बाणकोटचा बाल्या सरळ मुंबईत आला तो आमच्या गावात म्हणजे मालाडला(मुंबई). तो इथे आला म्हणण्यापेक्षा आणला गेला. मला काही कळायच्या आधीपासूनच तो आलेला होता म्हणजे माझ्यापेक्षा चांगलाच मोठा होता (तरीही सगळे त्याला एकारांतीच हाक मारायचे). त्याचे लग्न झालेले होते. एकदोन मुलेही होती; पण हे सगळे कुटुंब गावीच असायचे. क्वचित प्रसंगी दोनचार दिवस मुंबईला येत तेवढेच. आम्ही ज्या चाळीत राहात होतो त्या चाळीच्या मालकांकडे हा घरगडी म्हणून होता. पण फावल्या वेळात आणि मालकांच्या परवानगीने वाडीतल्या एकदोन घरांतील धुणी-भांडी करत असे.

सकाळी त्याच्या दोन फेर्‍या होत असत. एक- दहाच्या सुमारास कपडे धुण्यासाठी. "भिजवलेत"? ह्या त्याच्या हाकेने त्या घरातल्या गृहिणीला साद घातली जात असे. मग साधारण एक-दीडच्या सुमारास जेवणं "झालेत"? अशा तर्‍हेची साद असायची आणि रात्री साडेआठ-नवाच्या सुमाराला "टॅम हाय"? अशा त्याच्या साद घालण्याच्या वेळा आणि पद्धती ठरलेल्या होत्या. जेमतेम पावणे पाच फूट उंच,काळा कुळकुळीत पण तुकतुकीत रंग, रापलेला तरीही हसमुख चेहरा, अंगमेहनतीची कामे करून झालेली पिळदार पण कृश (मांसल नसलेली) शरीरयष्टी असणार्‍या ह्या श्वनाचा अंगात जाळीचा बनियन आणि कमरेला निळ्या रंगाची अर्धी चड्डी असा बारा महिने तेरा काळचा गणवेश होता. त्यात क्वचित बदल असे तो खूप थंडी असेल तेव्हाच. तो म्हणजे डोक्याला मफलर बांधणे इतकाच. धुण्या-भांड्याला थोडा अवकाश आहे असे कळले की मग खिशातून विडी-काड्यापेटी काढून त्याचे अग्निहोत्र सुरु व्हायचे. ह्याचे खरे नाव 'यशवंत' असे होते; कधीमधी तो, आधीची हाक ऐकू गेली नाही असे वाटले की "यशवंता आलाय" असे ओरडायचा. आम्हा मुलांना त्याचा उच्चार 'श्वना' असाच ऐकायला यायचा. कदाचित तो त्याच्या बोलण्यातला अथवा आमच्या ऐकण्यातला दोष असावा, पण आम्ही मुले त्याला 'श्वना' च म्हणायचो आणि त्याबद्दल त्याची कधीच तक्रार नसायची.

आमच्या चाळीच्या पुढे मोठे अंगण होते आणि त्यात एक मोठे बकुळाचे आणि चिंचेचे झाड होते. श्वना भांडी अंगणात त्या झाडांखाली बसून घासायचा. त्याचे ते भांडी घासणे पण 'खास' असायचे. मी तर त्याच्या समोर बसून त्या सगळ्या क्रिया मंत्रमुग्ध होऊन पाहत असे. मधेमधे त्याच्याशी गप्पा देखील मारत असे. माझे बघून कधी तरी वाडीतली इतर मुलेही तिथे येत. श्वना आमची थट्टा मस्करी करायचा आणि आम्हालाही ते आवडायचे. भांडी आणि पाण्याची बादली घेऊन श्वना अंगणात आला की मी त्याच्या जवळ जायचो. एका हातात भांड्यांचा डोलारा सावरत (मारुतीने द्रोणागिरी कसा उचलला होता त्या स्टाईलीत) आणि दुसर्‍या हातात पाण्याने भरलेली बादली. अशा अवस्थेत श्वनाचे ते दंडाचे आणि पोटर्‍यांचे फुगलेले स्नायू पाहिले की मला तो साक्षात बजरंगबलीच वाटायचा. प्रथम तो सगळ्या भांड्यांवर थोडेथोडे पाणी शिंपडून ती ओली करायचा. मग त्यातलीच एखादी छोटी वाटी नीट घासून घेऊन ती एका पायाच्या टाचेखाली ठेवायचा. नंतर मग नारळाची शेंडी पाण्याने ओली करून आणि तिला माती फासून भांडी घासायला सुरुवात करायचा. त्यातही एक विशिष्ट पद्धत होती. सुरुवातीला चिल्लर चमच्या-वाट्यांपासून सुरुवात करून सर्वात शेवटी तो ताटं घासायचा. मोठी भांडी घासताना तो थोडा जोर लावत असे. तो जोर लावतेवेळी जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मला त्याच्या त्या टाचेखाली वाटी ठेवण्याचे रहस्य कळले. त्यामुळे कमी जोर लावून भांडे लवकर स्वच्छ घासले जाई. भांडी विसळताना तो उलट्या क्रमाने विसळायचा. म्हणजे आधी मोठी आणि पसरट ताटं, मग पातेली, मग तांबे, पेले, वाट्या, कालथे, डावले-चमचे वगैरे. त्यामुळे व्हायचे काय की विसळलेली भांडी एकात एक नीट रचता यायची आणि उचलून नेण्यात सहजता यायची. माझ्या त्या बालपणी स्टेनलेस स्टीलचा नुकताच जन्म झालेला होता त्यामुळे बहुसंख्य घरातून अजूनही तांब्या-पितळ आणि ऍल्युमिनियम (जर्मन असेही काही लोक म्हणत) ह्या धातुंची भांडी वापरली जात. श्वनाने घासलेली ती भांडी इतकी लखलखीत असत की आपला चेहराही त्यात मी पाहून घेई. भांडी घासण्यातही शास्त्र असते हे मी त्याच्याकडून शिकलो.
shwana-large.jpg

श्वना कपडे कसे धुवायचा हे कधी पहायला मिळाले नाही कारण तो ते मोरीत धुवायचा. अशावेळी लोकांच्या घरात जाणे शक्य नव्हते. श्वना आमच्याकडे काम करत असता तर कदाचित ते देखील कळले असते. माझी आई स्वावलंबनाची पुरस्कर्ती असल्यामुळे तिने असल्या कामासाठी कधी गडी वापरले नाहीत; पण श्वना कपडे वाळत कसा घालायचा हे मात्र पाहायला मिळायचे. कारण अंगणातल्या दोर्‍यांवरच सगळ्यांचे कपडे वाळत पडायचे. धुऊन घट्ट पिळलेले कपडे बादलीत घालून श्वना अंगणात आला रे आला की मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहात असे. प्रत्येक कपडा नीट झटकून आणि उलगडूनच तो दोरीवर अगदी व्यवस्थितपणे वाळत घालत असे. अहो छोट्या कपड्यांचे ठीक आहे पण त्याकाळी बायका नऊवारी लुगडी, आणि पुरुष धोतरे देखील नेसत. मग ती कशी तो वाळत घालत असेल हा सुद्धा एक प्रश्नच आहे नाही का? त्याचेही शास्त्र श्वनानेच मला शिकवले(म्हणजे निरिक्षणातूनच मी ते शिकलो). त्या बादलीतलच तो ती लुगडी आणि धोतरे एकेक करून हळूहळू उलगडत असे आणि त्यांची चौपदरी घडी घालून, नीट झटकून मगच दोरीवर वाळत घालत असे. हे करताना चुकूनही कधी लुगड्याचा अथवा धोतराचा एखादा भाग बादलीच्या बाहेर गेलाय असे होत नसे इतकी त्याच्या कामात कमालीची सफाई होती.

श्वना कोकणी बाल्या असल्यामुळे साहजिकच नारळाच्या झाडांवर चढण्यात पटाईत होता. कमरेला कोयता अडकवून अगदी खारूताईच्या सहजतेने तो बघता बघता वर पोचत असे आणि नारळ पाडून झाले की लीलया खाली येत असे. आम्हा मुलांना त्याची खूप गंमत वाटायची. त्याकाळी आमच्या आजूबाजूला इतकी झाडी होती, वनराई होती की त्यामुळे साप वगैरेंचे असणे हे नैसर्गिकच होते. अशा परिस्थितीत साप मारण्याचे काम हे मुख्यत: श्वनावरच असे. तेव्हा साप हा माणसाचा मित्र वगैरे कल्पना लोकांपर्यंत पोचलेल्या नव्हत्या. त्यामुळे साप दिसला रे दिसला की तो मारायचा इतकेच माहित असल्यामुळे आम्ही मुलं जाऊन त्याला सांगत असू की मग तो हातात असेल ते काम सोडून हातात त्रिशुळ घेऊन यायचा(मालकांनी हा त्रिशुळ खास श्वनाच्या सांगण्यावरून बाळगला होता). त्यावेळी श्वनाचे रूप बघण्यासारखे असायचे. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचे तेज विलसत असायचे. आम्हाला तो खूप शूर वाटायचा. श्वनाचे साप मारण्यातले प्राविण्य इतके कमालीचे होते की त्याचा वार क्वचितच फुकट जात असे. तो त्रिशुळ अशा तर्‍हेने चालवी की त्रिशुळाच्या मधल्या टोकाने नेमका सापाच्या डोक्याचा वेध घेतला जायचा. मग सापाला तसाच त्रिशुळाने टोचलेल्या अवस्थेत मिरवत मिरवत आम्हा मुलांसह ती मिरवणूक सबंध वाडीत फिरत असे. मला तर सापांबद्दल जाम भिती वाटायची, पण तरीही आमच्या गप्पात सापाचा विषय हमखास यायचा. कधीतरी श्वनाकडे हा विषय काढला की मग त्याची रसवंती सुरु व्हायची. मग कोणता विषारी, कोणता बिनविषारी हे तो सांगायचा. त्यात 'नानेटी' नावाचा एक पट्टेवाला साप असतो आणि एकाला मारले की लागोपाठ सात नानेट्या कशा बाहेर येतात. त्या सगळ्यांना मारले नाही तर मग तो डूख ठेवतो आणि आपल्याला चावतो... वगैरे गोष्टी ऐकल्या की आमची सगळ्यांची पाचावर धारण बसे. आता त्या गप्पा आठवल्या की माझेच मला हसू येते. सापांबद्दल किती चित्रविचित्र कल्पना आणि गैरसमजुती आम्ही बाळगून होतो तेव्हा.

गौरी गणपतीला श्वना गावी जायचा तो मात्र दिवाळी करूनच यायचा. वर्षातली ही सुट्टी सोडली तर त्याने कधी सुटी घेतली नाही. संध्याकाळी अंगावर एक शर्ट चढवून एका विशिष्ट ठिकाणच्या अड्डयावर थोडा वेळ समव्यवसायी गाववाल्यांबरोबर तासभर गप्पा मारल्या की त्याचा दिवसभराच्या कामाचा शीण दूर होत असे. कधीमधी देशी दारूची आचमनं देखील चाले, पण ते सगळे एका मर्यादेपर्यंतच होते. असेच जीवन कंठताकंठता श्वना म्हातारा कधी झाला तेही कळले नाही कारण त्याच्या दृष्यरुपात कोणताच फरक पडलेला नव्हता. फरक पडलाच होता तर त्याच्या शारीरिक क्षमतेवर. नियमित विडी ओढण्यामुळे छातीचे खोके झाले होते. आताशा त्याने वाडीतील कामे देखील सोडून दिली होती. कसेबसे मालकांचे काम तो करत होता. असाच एकदा गणपतीला तो जो गेला तो पुन्हा कधीच आला नाही. आपल्या गाववाल्यांबरोबर "आता मुंबईला पुन्हा कधी येणार नाही" असा निरोप धाडला आणि त्यानंतर त्याच्याबद्दल काहीच कळले नाही.

आज श्वना जर जिवंत असलाच तर त्याने वयाची सत्तरी नक्कीच ओलांडलेली असेल.कसा असेल तो आता? त्याला आमची आठवण येत असेल काय? कुणास ठाऊक! त्याला आठवत असेल नसेल ठाऊक नाही पण त्याने माझ्या बालपणात जे रंग भरले होते ते मी कधीच विसरणार नाही.

-प्रमोद देव