संवाद - सावनी शेंडे-साठये

संवाद- सावनी शेंडे साठये
मुलाखतकार- पूनम छत्रे
विशेष आभार- प्रणव मायदेव

Sawani-Photo.jpg

सावनी शेंडे साठये- शास्त्रीय संगीतातले एक प्रस्थापित नाव. खूप लहान वयात शास्त्रीय संगीतात मोठी मजल मारली आहे त्यांनी. देशात, परदेशात अनेक मैफिली गाजवल्या आहेत. सध्याच्या झटपट प्रसिद्धीच्या काळात जाणीवपूर्वक शास्त्रीय संगीताचा त्यांनी अभ्यास केला आहे आणि त्याच्या प्रसारासाठी त्या खूप काम करत आहेत. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि खयाल गायकीमधे त्यांनी परिश्रमपूर्वक नाव कमावलं आहे. त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या, भजनाच्या अनेक सीडीज आणि कॅसेटस् सुद्धा निघाल्या आहेत. लहान वयात मोठं यश पाहूनही, त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि साधेपणामुळे त्या चटकन समोरच्याला आपलसं करतात. त्यांच्याशी आपल्या दिवाळी अंकासाठी संपर्क साधला असता, त्यांनी कुठलेच आढेवेढे न घेता वेळ दिला. दीड तास त्यांच्याशी दिलखुलास गप्पा झाल्या..

तुमच्या घरातच गाणं आहे.. त्या पार्श्वभूमीविषयी काही सांगता का?

माझी आजी कुसुमताई शेंडे ही शास्त्रीय संगीताची गायिका. वडील डॉ. संजीव शेंडे हे शोभा गुर्टूंचे शिष्य- ठुमरी, दादरा ते त्यांच्याकडे शिकले. या दोघांमुळे घरात कायम गाणं चालूच असायचं. लहानपणापासून आम्ही हे बघत होतो. साधारण मी चार वर्षाची होते तेव्हापासून मी आजीकडे तिचे शिष्य शिकायला यायचे तिथेच बसून रहायचे.. अगदी मांडी घालून.. एकापाठोपाठ शिष्य येऊन जायचे पण मी मांडीही न बदलता त्यांचं गाणं ऐकायचे. मला खूप आवडायचं ते ऐकायला. मग घरच्यांनाही असं वाटलं की हिला खरी आवड दिसते. मी सहा वर्षाची असताना मला बाबा म्हणाले ’तू रोज ऐकतेस आजीचं गाणं, तू आज गाऊन दाखव बरं सरगम’. आणि त्यावेळी मी चक्क एकापाठोपाठ एक तीन-चार बंदिशीच म्हणल्या. घरचे सगळे अवाक् झाले एकदम, की काहीही न शिकवता, नुसतं ऐकून ही इतकं चांगलं गातीये.. आणि तेव्हापासून मग आजीकडे खर्‍या शिकवणीला सुरुवात झाली.

तुम्ही वीणा सहस्त्रबुद्ध्यांकडेही गाणं शिकला आहात. त्यांच्याकडे कधीपासून गाणं शिकायला सुरुवात केलीत?

आम्ही आजीची एकसष्ठी केली होती.. साधारण दहा वर्षाची असेन मी तेव्हा. मोठा समारंभ होता, बरेच मान्यवर आले होते त्याला. त्यात वीणाताईही होत्या. तेव्हा घरचा आहेर म्हणून मी त्या समारंभात आजीसाठी गायले होते. तेव्हा माझी गाण्यातली समज वीणाताईंना खूप आवडली आणि हा त्यांचा मोठेपणा की त्या स्वत:हून आजीला म्हणाल्या की ’मला सावनीला गाणं शिकवायला आवडेल’. अश्या रीतीने मग त्यांच्याकडे गाणं शिकणं सुरु झालं.

तुमच्या आजी या किराणा घराण्याच्या गायिका आणि वीणाताई ग्वाल्हेर घराण्याच्या. मग तुमच्या गाण्यात कोणत्या घराण्याचा प्रभाव जास्त पडतो?

नाही, तसं घराणं सिस्टीम मी खूप मानत नाही. घराणं तुम्हाला एक शिस्त देतं एक्सप्रेशनसाठी, पण तेवढंच. मला असं वाटतं की संगीताला मर्यादा असू नयेत. त्यामुळे जरी माझी बैठक किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याची असली तरी मी अमूक एका घराण्याचं असं गात नाही. आणि सुदैवानी मला घरच्यांनीही कधी आडकाठी केली नाही कधी की तू अमूक एक घराण्याचंच गाणं गायलं पाहिजेस, ऐकलं पाहिजेस.. सर्व प्रकारचं चांगलं संगीत ऐकायची मुभा होती. हां, माझ्या गाण्यातून कदाचित काही ट्रेट्स जाणवतील, पण ते बेसिक संस्कारांमुळे. अमूक एक गायकी अशी मी गात नाही.

संगीताची तुमची शिकवणी खूप लहान वयात सुरु झाली, पण करीयर म्हणूनही हेच करायचे हे कधी ठरले?

मला गाणं इतकं आवडत होतं, ऐकायला, शिकायला की मनात कुठेतरी आपोआपच ठरलं होतं की हेच आपल्याला कायम करायला आवडेल.. याचा कंटाळा आपल्याला आयुष्यभर हे केलं तरी येणार नाही. पण यावर शिक्कामोर्तब झालं ते नववीत असताना. कारण आमच्या घराण्यात जसे गायक आहेत तसेच डॉक्टरही आहेत. माझे वडील स्वत:, माझे आजोबा आणि माझे पणजोबा डॉ. घारपुरे.. त्यामुळे दोन्ही करणं शक्य होतं. पण मनाचा कल ओळखून, संगीत हेच करायचं असं ठरवून मुद्दाम अकरावीला कॉमर्सला प्रवेश घेतला आणि एम.कॉम. केले. सुदैवानी आम्हाला कोणाला काही सिध्द करायची गरज नव्हती, त्यामुळे हे सहज शक्यही झाले. आणि गाणं घरातच असल्यामुळे पाठींब्याचा काही प्रश्नच नव्हता.

तुमची पहिली मैफिल कधी आणि कुठे झाली?

दिल्लीला राष्ट्रपती भवनात पं. विष्णू दिगंबर पलुसकर संगीत समारोह असतो दर वर्षी सवाई गंधर्व सारखा. मी बारा वर्षाची असताना तिथे गायले. माझ्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी, पं. जसराज असा एक खूपच मोठा ग्राफ़ होता. पण त्या महोत्सवात माझं खूप कौतुक झालं. दिल्लीच्या रीपोर्टस मधे 'चाईल्ड प्रॉडीजी' असा उल्लेख झाला. तो पर्यंत मी मैफिलीत गात होते, पण यानंतर खर्‍या अर्थानी मैफिली सुरू झाल्या. पुष्कळ जणांचं असं मत असतं की खूप तयार झाल्याशिवाय स्टेज गाठायचं नाही. हे जरी असलं तरी आमच्याकडे पिढीजात आलेलं संगीत आणि त्यावेळेपर्यंत माझी झालेली तयारी बघून लोक मला बोलावत गेले. मीही कधी असं म्हटलं नाही की ’आत्ता नको, नंतर करूया’, किंवा आजीनीही कधी म्हटलं नाही की ’अजून होऊदे’. उलट सगळ्यांचं असं मत होतं की तुम्ही त्यातूनच शिकता. एकीकडे अखंड रियाज चालू ठेवायचा आणि त्याच वेळी लोकांसमोर तुम्ही आलात तर ते जास्त फ़ायदेशीर ठरतं. पण इथे तुमची पार्श्वभूमी फार महत्त्वाची ठरते. काय होतं की लहान वयात एक्स्पोज झालं की तुम्ही जमिनीवर न रहाण्याची शक्यता असते आणि मग पुढे जाऊन काहीच होत नाही. पण आमच्या घरचे इतके फर्म आहेत, की ती शक्यता आमच्याबाबतीत नव्हती.

खयाल गायकीसाठी तुम्ही विशेष प्रसिद्ध आहात. त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा..

mainly मी शास्त्रीयसंगीत कलाकारच आहे, पण मी माझ्या मैफिलीत उप-शास्त्रीय पण गाते. ठुमरी, दादरा हे प्रकार आपल्याला महाराष्ट्रात फारसे ऐकायला मिळत नाहीत. त्यात बरेच प्रकार आहेत. कजरी, होरी, सावनी.. याबरोबर मला कबीर, मीराबाई यांची भजनं गायलाही खूप आवडतं. किंवा आत्ता मी एक कार्यक्रम केला त्यात तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांची पूर्ण नव्या चालीची भजनं मी गायली. या रचना मी स्वत: स्वरबद्ध केल्या आहेत. थोडक्यात, सर्व प्रकार प्रेक्षकांना ऐकायला मिळतात. पण मी लाईट म्युझीक गात नाही. मी माझं क्षेत्र ठरवलंय- शास्त्रीय आणि उपशास्त्रीय.

एखाद्या मैफिलीत काय गायचं आहे हे कसं ठरवता?

शास्त्रीय काय गायचं याचा एक विचार असतो. सहसा पहिला राग हा मी जो ठरवलेला असतो, माझ्या आवडीचा असतो तो घेते, आणि तो प्रचलित राग असतो. म्हणजे लोकांनाही असं वाटत नाही की हिने वेगळं का गायलं? मग दुसर्‍या रागापासून लोकांचा कल पाहून तुम्ही वेगळं काही गाऊ शकता. कधीकधी फर्माईश येते की ’कलावती’ घ्या.. कलावती, बसंत, बिनाषड्ज हे काही राग इतके गोड आहेत की लोकांना ते नक्कीच आवडतात. मग ठुमरी, दादरा असतो.. पण मला असं नेहेमी वाटतं की तुम्ही काही वेगळं गात असाल तर लोकांना ते आधी एक्सप्लेन करा. भूप, बागेश्री, यमन हे सगळ्यांनाच माहिती असतात. पण त्रिवेणी, बसंतकेदार किंवा जनसंमोहिनी यासारखे राग लोकांना जास्त ऐकायला मिळत नाहीत. मग तुम्ही एक्सप्लेन करा लोकांना. मी तर शब्दांसकट एक्सप्लेन करते. त्यामुळे लोकांनाही असं वाटतं की आपण या गाण्यात आहोत.. त्यांचीही इन्व्हॉल्वमेंट होते.

म्हणजे तुम्ही तुमच्या वेबसाईटवर म्हणल्याप्रमाणे 'लाईव्हली क्लासिकल कॉन्सर्ट 'वर भर देता...

हो, कारण त्याने प्रेक्षक कनेक्ट होतो. शब्दही मी असे निवडते की जे लोकांना सहज कळतील. काही प्राचीन शब्द ब्रिजभाषेत असतात जे खरंच लोकांना कळत नाहीत. ’हम दिल दे चुके सनम’ मधे ’अलबेला सजन आयो रे’ ही अहिरभैरव रागातली खूप पारंपारिक बंदिश आहे.. त्यात ’मंगल गाओ चौक पुराओ’ सारखे शब्द आहेत. मग मी मुद्दाम सांगते की ’चौक पुराओ’ म्हणजे रांगोळी काढणे.. तर ’मंगल गाओ चौक पुराओ’ म्हणजे ती रांगोळी काढून तिच्या सजणाचं स्वागत करतीये.. अश्या गोष्टी सांगितल्या की लोक खूप आनंद घेतात गाण्याचा. किंवा वेगळा राग असेल तर हा कशाच्या जवळ आहे, किंवा अमूक एका रागात काय केलं की हा राग होतो हे मी आवर्जून सांगते. मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताला संवाद साधणं जास्त महत्त्वाचं आहे. शास्त्रीय संगीत रंजक असलं पाहिजे. ’आज माझा हेच गायचा मूड लागलाय, किंवा आज मला अतिअवघड असाच एखादा राग गायचाय’ असं तुम्ही म्हणलात, तर मग तुम्ही लोकांसमोर तरी का येता? असं करायचं असेल तर तुम्ही एकटेही गाऊ शकता, त्यासाठी मैफिलीत यायची गरज नाही.. पण याचा अर्थ असाही नाही की तुम्ही लोकांना आवडेल तेच गायलं पाहिजे. तुम्हाला जे आवडेल ते, पण लोकांनाही आनंद देऊन गायलात तर ते सगळ्यांनाच आवडतं.

प्रत्येक मैफिलीची तयारी कशी करता? लोक, किंवा आज कुठे गाणार आहात त्याप्रमाणे आज काय सादर करणार आहात हे बदलतं का?

हो, आज अमूक ठिकाणी मैफल आहे, तर आज अनवट राग नको घ्यायला, नेहेमीचेच घेऊया. किंवा कोणाकोणाची खास फर्माईश असते की आज कंसचे प्रकार ऐकवा. प्रोफेशनल लेव्हलला तुम्ही या सगळ्यासाठी तयारच पाहिजे. सहसा मी माझ्या डोक्यातला आराखडा बदलत नाही, पण काही वेळेला असं लक्षात येतं की लोकांना नेहेमीच्या पठडीतलंच आवडतं असं कळतं. किंवा कधीकधी असंही लोक म्हणतात की तेचतेच ऐकून कंटाळा आला, आज यमन गाऊ नका.. आधीच्या दोन-तीन मैफिलीत इतर गायकांनी यमनच गायलाय आणि तेव्हा तर नेमका तुम्ही यमनच गायचा योजलेला असतो! पण अश्या वेळी तुम्ही अडून राहू शकत नाही. आपण गाण्यात वेगेवेगळे प्रयोग करत असतो..

कधी असं झालंय का की ते प्रयोग फसलेत किंवा लोकांपर्यंत ते नीट पोचले नाहीत?

-असं होतं ना, पण प्रोफ़ेशनल गायकाला ते भान ठेवावंच लागतं. मी पूरीया धनश्री गातेय.. मनात मी योजलंय की गाताना एक ठराविक फ्रेज मी अशी घेणार आहे, त्यात बरंच काम करणार आहे. शेवटी स्टेजवर गेल्यावर काय होतं की तुम्ही ती फ्रेज तशी घेताही, पण ती लोकांच्या फारच वरून जाते, लोकांना कळतच नाही. मग तुम्ही तीच फ्रेज अजून दोन-तीन वेळा घेता, असं वाटतं की थोडा जोर दिला तर लोकांना कळेल, पण तरी नाही कळत लोकांना, मग तुम्हाला मूळ रुटीनकडे वळावं लागतं. कारण बर्‍याच वेळेला प्रेक्षक हा शास्त्रीय ऐकायला आवडतं म्हणून येतो, तो तितका ब्रेनी किंवा क्रीम असेलच असं नाही. त्यांना कदाचित तुमची वेगळी, तरीही रागात असलेली फ्रेज कळेलच असं नाही. मग अश्यावेळी तिथे अडकायचं नाही, पुढे जायचं. पण हे त्या तिथे, अगदी आयत्यावेळीच ठरवावं लागतं. कित्येक वेळा असं होतं की केवळ माझ्या तबला आणि पेटीवाल्यालाच कळतं की मी वेगळं काहीतरी केलंय, कारण ते लोक त्यातले गाढे असतात.. ते फार सुंदर दाद देतात, पण प्रेक्षकांना आपण वेगळं काहीतरी केलंय हे नाही कळत.. अश्या वेळी वाटतं की अरे, हे यांना कळायला हवं होतं, पण ते तिथेच ठेवून पुढे जायला लागतं.

म्हणजे गाताना भान विसरून चालत नाही का?

गाताना कधीकधी भान विसरायला होतं ना. एखादा सूर असा लागतो की त्या बंदिशीत तुम्ही पूर्ण गुंगून जाता, पण तुम्ही प्रोफ़ेशनल असाल तर तुम्हाला ट्रॅकवर यावंच लागतं, तितकं भान तुम्हाला ठेवावच लागतं. ती बंदिश पूर्ण, तुमच्या मनासारखी सादर झाली, तुम्हाला आणि प्रेक्षकांना त्याचा पूर्ण आनंद मिळाला की त्यातून बाहेर पडून पुढच्या बंदिशीकडे वळणंच श्रेयस्कर असतं, कारण शेवटी गाणं म्हणजे परफॉर्मिंग आर्ट आहे. नाहीतर पुढच्या रागातही पहिल्याच रागाची छटा दिसू शकते.

परफॉर्मींग आर्ट आणि परफॉर्मन्स मधे काय फरक आहे?

कोणतीही कला हे एक परफॉर्मींग आर्ट आहे, त्याचं सौंदर्य शोधणं, त्याचा पुरेपूर आस्वाद घेणं आणि ते लोकांपर्यंत पोचवणं ही कला आहे. परफॉर्मन्स हा तुमच्या बाह्य स्वरूपाबद्दल असू शकतो. कित्येक जण म्हणतात की तुमची हेअरस्टाईल खूप छान आहे, तुमचा ड्रेस सुंदर आहे, पण याचा तुमच्या गाण्याशी काहीही संबंध नाहीये. आमच्याकडे हेच शिकवलं गेलंय की तुम्हाला त्रासिक चेहरे करून गायची काहीही आवश्यकता नाही, आणि खरं तर तसं होतंही नाही. तुम्ही जर गाण्याचा आनंद घेत असाल तर तुमचा चेहरा त्रासिक कधीच नाही होणार. ईव्हन तुम्ही कशानी डिस्टर्बही नाही होणार. कित्येक ठिकाणी कार्यक्रम करताना माईक सिस्टिम सदोष असते, माईकची शिट्टी येते, पण त्यासाठी तुम्ही तुमचा मूड का खराब करून घ्यायचा? तुम्ही अश्या गोष्टींनी डिस्टर्ब होत असाल तर तुम्ही काय गाणार? आणि जे प्रेक्षक तुमचं गाणं ऐकायला आले आहेत त्यांच्यावर हा अन्यायच आहे ना! आम्हाला असं कटाक्षाने शिकवलं गेलंय की तुम्ही फ़क्त गा, गाताना कोणत्याही प्रकारचे नखरे करू नका. आणि परफॉर्मन्स म्हणाल तर तो लोकांसाठी असतो, मग त्यात 'प्लेयिंग टू द गॅलरी सारखे प्रकार येतात, की लोकांना आवडतं म्हणून एकच तान दहा वेळा घ्यायची आणि वाहवा मिळवायची. असे गिमिक्स मी कधीच नाही करणार, की लोकांना आवडतं तसंच आणि तेच मी गाणार, आणि असं करता करता मग कुठेतरी माझं गाणं मागे पडतं, जे मला नकोय व्हायला.

सध्याच्या टॅलेंट हंट स्पर्धांबद्दल काय मत आहे तुमचं?

आत्ता सध्या जे चालू आहे ते फारच उथळ आहे. त्या मुलांमधे टॅलेंट आहे, शिकलेली आहेत, पण चिकाटी नाही. इतकी वर्ष आपल्याकडे लोकांनी अक्षरश: तपश्चर्या केलीये एकेक सूर लागण्यासाठी.. तो सूर, त्याचा गाज घोटलाय.. आणि असं केल्यानंतर जो सूर लागतो तो केवळ अद्वितीय असतो. ती उंची गाठण्यासाठी लोक झटलेले आहेत. आणि इथे यांना एका आठवड्यात सांगतात की पुढच्या आठवड्यात अमुक सुधारणा करा आणि एका आठवड्यात त्यांना असं वाटतं की सुधारणा होईल! अशी एका आठवड्यात सुधारणा होत असती तर लोकांनी इतकी वर्ष का मेहनत घेतली असती? बाथरूम-सिंगर्स कॉंपिटीशन अश्यासारखी स्पर्धा होत असेल तर काय लेव्हल राहिली? गाणं मागे पडून आता प्रेझेंटेशनवर नको इतका भर दिला जातोय. मला नाही वाटत लता मंगेशकरांनी किंवा रफींनी कधी कपड्यांकडे लक्ष देऊन गाणं गायलं असेल. तेही पार्श्वगायकच होते आणि आताची स्पर्धाही पार्श्वगायनासाठीच आहे. पण सध्या सगळे ठोकताळेच बदलले आहेत.

तुम्हाला कधी सुगम संगीताकडे वळावसं वाटलं नाही का?

नाही, कारण अगदी पहिल्यापासून मला शास्त्रीयचीच आवड आहे. रूट लेव्हलला जाऊन, अगदी पहिल्यापासून तो राग गाणं यात पूर्णपणे आमचीच इमॅजिनेशन असते. मला वाटलं तर मी राग गंधारपासून गाईन, मला वाटलं तर आज निषादपासून गाईन.. तो राग मला दिसतो तसा गाईन.. त्यामुळे त्यात प्रचंड क्रिएटिव्हीटी आहे.. इथे मीच कंपोजर आहे.. मीच तो राग फुलवणार, नटवणार, त्याचा विस्तार करणार, विश्राम घेणार.. हे स्वातंत्र्य मला आवडतं. शास्त्रीय संगीतामधे तुम्ही थोडे प्रवाहाच्या विरुद्ध असता. तुम्हाला स्वत:चा बॅलन्स ठेवून, प्रेक्षकांसाठी पार्श्वभूमी तयार करून, त्यांना बरोबर घेऊन गावं लागतं. त्यात पेशन्स आणि टॅलेंटचा खरा कस लागतो, कारण प्रेक्षक तयार नसतो, तो तयार करावा लागतो. खरंतर सुगम हेही तितकंच अवघड आहे कारण तीन मिनिटांत सगळ्या भावना पोचवायच्या असतात लोकांपर्यंत. ते एक वेगळंच शास्त्र आहे, त्यातही खूप मेहनत आहे. पण मी असं ठरवलं आहे की आपला ट्रॅक सोडून गायचे नाही. त्याने लोकांना तुमची कदर रहाते. आज मला माहीत आहे की माझ्या प्रेक्षकांची माझ्याकडून काय अपेक्षा आहे. आणि जो पर्यंत माझा प्रेक्षक खूष आहे, तोवर मला आहे तिथून हलायचं कारण नाही. मीही निश्चिंत आहे की मी जे विचार माझ्या गाण्यातून मांडतीये ते लोकांना पटत आहेत.

तुम्ही शास्त्रीय संगीतावर लेक्चर्स घेता, त्यामधे तुम्ही कशावर भर देता?

काय झालंय, की काही लोकांमुळे उगीचच असं चित्र तयार झालंय की शास्त्रीय संगीत हे अतिशय क्लिष्ट आहे, जड आहे, ते शिवधनुष्य कोणाला पेलणार नाही. तुम्ही अशीच कोणत्या आर्टफॉर्मची ओळख करून दिली तर लोक त्यापासून दूरच जातील. शास्त्रीय संगीत हे जितकं अवघड आहे, तितकंच ते सुंदर आहे, मन:शांती देणारं आहे. आणि तुम्ही ते लोकांना सोपं करून समजावू शकता. बेसिक जर लोकांना सोपं करून सांगितलं तर त्यांची गोडी वाढते. आत्ताच मी आणि संजीव अभ्यंकर मिळून नांदेडला लेक्चर डेमॉन्सट्रेशन घेतलं. सुमारे दोन हजार लोक होते. सगळे वयानी लहान, तरूण आणि उत्साही होते. छान वाटला तो अनुभव खूप. शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने ते एक मोठं पाऊल होतं. लेक्चरमधे मी ’हा राग असा आहे, तो तसा आहे’ असं न करता ’बघा हं, या रागात कसं केलंय’ असं म्हणून गाऊन त्यांच्यासमोर दाखवते. आता लोक विचारतात खयाल गायकीमधे तुम्ही सारखे समेवर काय येता? अश्यावेळी मी उदाहरण देते की पुणे शहर हा एक राग मानला तर दिवसभरात तुम्ही अनेक ठिकाणी जाता ती झाली रागातली कॉबिनेशन्स. पण तुम्ही पुण्याला सोडत नाही, तसंच तुम्ही रागाला सोडत नाही. आणि दिवसभर फिरून झाल्यावर तुम्ही संध्याकाळी जसे घरी येता, तसंच राग गाऊन तुम्ही समेवर येता प्रत्येक वेळेला. हे असं सांगितलं की पटकन लक्षात येतं, आणि आवडतंही. अशानी काय होतं की ज्या लोकांचा संगीताशी फारसा संबंध नाही, तेही त्याकडे आकर्षित होतात.

तुम्ही जो यु.एस.ए चा दौरा केलात त्याचा अनुभव कसा होता आणि तिथल्या श्रोत्यांचा प्रतिसाद कसा होता?

पहिल्यांदा मी १९९८ मधे यु.एस.ए आणि कॅनडाला गेले होते.. चाळीस कॉन्सर्टसचा दौरा होता आणि मागच्या वर्षी दोन महिन्यांची टूर होती. महाराष्ट्र मंडळात आणि अमराठी मंडळांमध्येही कार्यक्रम होते. थँक्स टू रविशंकरजी आणि झाकीरभाई, त्यांनी वाद्यसंगीतामधे खूप काम केलेलं आहे. तिथल्या प्रेक्षकांनाही गायनापेक्षा पेक्षा वाद्यसंगीतातलं जास्त कळतं कारण त्यात भाषेचा अडथळा येत नाही. शास्त्रीय संगीताच्या दृत बंदिशीत चारच ओळी असतात, त्यापलिकडे त्यात काव्य नाहीये, त्या शब्दांच्यापलिकडे आपल्याला तो राग त्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे. हे त्याही लोकांना आता कळायला लागलंय की शब्द कमी असले तरी मुख्यत: प्रोजेक्ट होतोय तो राग, आणि रागाला सीमा नाहीत. त्यामुळे तेही लोक आता गायकीकडे वळायला लागले आहेत. परदेशी लोक येऊन खूप छान छान प्रश्न विचारतात. मी यमन गायला तर विचारतात की आम्ही विलायतखाँसाहेबांचा यमन ऐकलाय सतारीवर, किंवा जसराजजींचा ऐकलाय, मग तुमचा वेगळाच आहे, किंवा तुम्ही ही फ्रेज घेतलीत ती अशी कशी? आणि आपली लोकंही आता शास्त्रीयकडे वळायला लागली आहेत. पण तिथे एका शास्त्रीय रागानंतर तुम्ही उपशास्त्रीयकडे वळता, पण ते ठीक आहे. हळूहळूच त्यांच्यात मुरणार आहे ते. त्यासाठी सॅन फ्रान्सिस्को मधेही मी लेक्चर डेमॉन्सट्रेशन घेतलं. काय होतं की ते संस्कृतीच्या बाहेर असल्यामुळे परदेशात बाहेरची आक्रमणं खूप आहेत. त्यामुळे शास्त्रीय संगीताची जागरुकता निर्माण करण्यासाठी तिकडे ते खूप रंजक करून गावं लागतं. मी जेव्हा दौर्‍यावर होते तेव्हा क्लासिकलचे ऑलरेडी दहा जण यु.एस.ए. मधे होते वेगवेगळ्या ठिकाणी. मला असं आठवतंय की जसराजजींशी माझं बोलणं झालं होतं फोनवर तेव्हा ते म्हणाले होते ’सावनी, एक बात याद रखना, हमे क्लासिकल आगे लेके जाना है, अच्छा काम कर रही हो तुम, मैं यहाँपे हूँ, तुम वहाँपे परफॉर्म करो’. हा त्यांचा मोठेपणा की ते असं म्हणाले, पण ही आमची सांघिक जबाबदारी आहे, सगळ्यांचाच थोडा थोडा सहभाग आहे शास्त्रीय संगीत पुढे नेण्यासाठी.

’संगीत’ हा विषय असतो कॉलेजमधे शिकायला. तर गाणं शिकताना त्याचा किती उपयोग होतो?

संगीतविषयक ज्ञान तुम्हाला मिळतं, रागाचे स्वर, व्यंजनं, वर्ज्य समजतात. पण तितकंच पुरेसं नाहीये. तुम्हाला ’गायक’ व्हायचं असेल तर तुम्हाला गुरुकुल पद्धतीने शिकण्याशिवाय पर्याय नाही. योग्य शिक्षक मिळणं फार महत्त्वाचं आहे. तो प्रोफेशनल गायकच असला पाहिजे असंही काही नाहीये. कित्येक गुरु असे आहेत की जे स्टेजवर कधी आले नाहीयेत, पण त्यांच्याकडे खूप ज्ञान असतं आणि ते जरूर मिळवावं. नुसती थीयरी मिळवणं उपयोगाचं नाहीये कारण शेवटी सादरीकरण फार वेगळं पडतं. एम.ए. (संगीत) झालेल्या एखाद्याला साधा ’सा’ लावायची वेळ आली तरी तो ’सा’ थरथरतो, तिथे एम.ए. असूनही त्याचा गाण्यासाठी काही उपयोग नाहीये. शेवटी गाण्याची व्याख्याच आहे की ती ’प्रस्तुत करण्याची’ कला आहे. नुसतं पुस्तकी ज्ञान असून काहीच उपयोग नाहीये. तेव्हा योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखालीच खरं गाणं शिकायला मिळेल.

नवीन मुलं जी शिकत आहेत त्यांना काय सांगावसं वाटतं?

पहिला म्हणजे गुरुंना मान द्या, त्यांना नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे त्याचा आदर करा. वीणाताईंकडे आम्ही जायचो, तेव्हा ’यमन झाला असं वाटतंय, आता दुसरा राग घ्यायचा का’ असं विचारायला देखील दोनदोन महिने जायचे. कारण असं आम्ही म्हणलं की लगेच त्या म्हणायच्या ’म्हणजे तुला यमन कळला का?’ की आमची तोंडं बंद! एखादा राग पूर्ण कळेपर्यंत आयुष्य संपेल. तेव्हा ही थोडी जाणीव पाहिजे. थोड्या यशावर हे लोक खूप भाळून जातात, पण हे यश आहे का हे मुळात समजायला हवं. काहीजणांचे आवाज खूप सुंदर आहेत, नैसर्गिक देणगी आहे, पण त्याला पॉलिश नाहीये, आणि पुढे जायची इच्छाही. ’मी जे गातीये ते छानच गातीये’ असं म्हणालात की तुमची प्रगती संपलीच. प्रत्येक परफॉर्मन्स नंतर तुम्ही स्वत:ला इव्हॅल्यूएट केलंत तर लगेच समजतं की आज आपलं गाणं कसं झालं? आमच्याकडे तर प्रत्येकवेळी आधी ’कुठे चुकलं, कुठे अजून चांगलं झालं असतं’ हेच आधी येतं. कित्येक वेळा बाबांना आम्ही सांगतो की ’आज काय चांगलं झालं ते आधी सांगा ना’! अशी सतत उलटसुलट चर्चा सुरु असते. ’मी सुंदर गायले’ असं मी कधी म्हणूच शकणार नाही, कारण संगीत हे तुमच्यापेक्षा खूप मोठं आहे. यू कॅंट काँकर इट. ही कला मला आत्मसात झालीये असं मी कधीच नाही म्हणू शकत आणि ही जाणीव कोणीतरी त्यांना करून द्यायला पाहिजे. कारण ही प्रसिद्धी जितक्या झटपट मिळते, तितकंच झटपट लोक त्यांना विसरतात सुद्धा!

तुम्ही आणि तुमची बहिण बेला - दोघी मिळून गाण्याचा कार्यक्रम करता. त्याचा फॉरमॅट कसा असतो?

मी आणि बेला ’संगीत सरिता’ नावाचा कार्यक्रम करतो. यात यमन ते भैरवीपर्यंत कोणतेही दहा राग घेतो आम्ही. साधारण कार्यक्रमाची रूपरेषा अशी असते की यमननी सुरुवात केली तर पाच ते सात मिनिटं, सरगम, तान, एक छोटी दृत लयीची बंदिश असं मी गाते आणि बेला मग त्याच रागातलं ’चंदनसा बदन’, किंवा ’एहसान तेरा होगा मुझपर’ अशी अवीट गोडीची जुनी गाणी गाते. जर मी तोडी गायला तर बेला त्याला ’तोडीस तोड’ असे ’रैना बीती जाये’ घेते.. असा बॅलन्स घेतो आम्ही. आणि श्रोत्यांना ते खूप आवडतं. आम्हाला असे फिडबॅक आले आहेत की लोक म्हणतात की आता एखादं गाणं लागलं की लगेच राग कळतो. लोक अभिमानानी सांगतात की हे गाणं ना अमूक एका रागातलं आहे. आणि खूप छान वाटतं असं ऐकलं की. एका अर्थानी शास्त्रीय संगीताचा प्रसारच होतो या कार्यक्रमातून. तसाच ’सगुण-निर्गुण’ हा भजनांचा कार्यक्रमही आम्ही करतो.

आवाज नेहेमी फ्रेश लागावा यासाठी तुम्ही खाण्यापिण्याची काही पथ्यं पाळता का?

अगदी खरं सांगायचं तर काहीच पथ्य नाही पाळत. पण कोणतीच गोष्ट अती खात नाही. आईसक्रीम खाल्लं की एकाच वेळी चार कप असं नाही, पण रोज एक कप आईसक्रीम मी खाऊ शकते. प्रोग्रॅम असेल तर मात्र नाही. असं साधारण पथ्य असतं, खूप काही नाही. सुदैवानी आत्तापर्यंत ’हे खाल्लं की आवाज बिघडतो’ असं झालेलं नाही. खरंतर आम्हाला अगदी उलट अनुभव येतो. एखाद्यावेळी बाहेरगावी गेलो आणि आयोजकांकडे जेवण असेल तर ते अगदी आवर्जून सांगतात की ’लोणचं तुम्हाला वाढलेलं नाहीये हं, तेलकट होईल म्हणून’ किंवा ’खरं तर जेवणानंतर आईसक्रीमचा बेत होता, पण तुम्हाला चालणार नाही, म्हणून खीरच केली’. अश्यावेळी वाटतं ’अरेरे’ किंवा त्यांना सांगावसं वाटतं की ’अहो, चाललं असतं आम्हाला’!!

तुम्ही रियाज कधी आणि किती करता? त्याचं काही तंत्र असतं का?

आपल्या व्होकल कॉर्डस् या अतिशय नाजूक असतात. आम्हाला मेडिकल बॅकग्राउंड असल्यामुळे प्रत्येक बाबतीत अगदी शास्त्रशुद्ध विचार होतो. आजोबा तर व्होकल कॉर्डसचं चित्रंच काढायचे. त्या नाजूक कॉर्डस् आपण किती ताणायच्या यालाही बंधन आहे. रोज आठ तास रियाज केलेले लोक आहेत, पण पन्नाशीनंतर त्यांचा आवाज खरखरतो. झेपेल इतकाच रियाज करावा. सुरवातीला नाही अर्थात. आधी खूप रियाज हा करावाच लागतो, पण तुम्हाला स्लो डाऊन कुठे आणि कधी व्हायचं आहे हे ही समजायला हवे. मला वाटतं की रोज दिड तास क्वालिटी रियाज केला तरी खूप आहे. रियाजाचे बरेच प्रकार आहेत. सुरेलपणा टिकवण्यासाठी सकाळी शुद्ध स्वरांचा रियाझ करतात. एक रियाज असतो जो तुम्ही गुरुंकडे शिकून आलात त्याचा सराव. एक असतो ज्यात तुम्ही तुम्हाला जे चांगलं येतं तेच तुम्ही पुन्हा घासूनपुसून पॉलिश करता. आणि एक असतो ज्यात तुम्हाला जे येत नाही तेच तुम्ही दोन तास गाता ते पक्कं करण्यासाठी. या वेगवेगळ्या स्टेजेस मधून आलात की मग दिड तास रियाज पुरतो. माझं आजीकडे अजूनही शिक्षण चालूच आहे. उलट आता आमच्यात देवाणघेवाण जास्त छान होते. मधे आम्ही एक कार्यक्रम केला ’सगुण निर्गुण’. ही एक नवीन कल्पना आहे. प्रचलित आणि नवीन अभंगरचना यांचा सुरेल संगम आपल्याला या कार्यक्रमात ऐकायला मिळतो. मग अश्या नव्या प्रयोगांच्या मागे लागलं की त्याचा रियाज.

तुम्ही गाणं शिकवता पण?

नाही, सध्या तरी नाही शिकवत, आणि अगदी लगेचच्या काळात तरी नाही शिकवणार. पण पाच-सात वर्षांनी शिकवायला लागेन कारण मला त्याची खूप आवड आहे. आणि गुरुकुल पद्धत अश्या रीतीनी चालू रहाणंही गरजेचं आहे.

सध्या नवीन काही करताय का?

एक पुस्तक येतंय बंदिशींचं. आजीच्या आणि माझ्या अश्या वेगवेगळ्या रागात बांधलेल्या बंदिशी आहेत. एक थोडं नवीन काव्य जे लोकांना अगदी सोप्या भाषेत समजेल. सुमारे पन्नास बंदिशी आहेत. हे साधारण या वर्ष अखेर किंवा जानेवारीत येईल.

अलिकडेच तुमचं नाव ’सावनी शेंडे साठये’ असं वाचतोय.. तर श्री. साठयांबद्दल सांगाल?

निखिल आणि मी शाळेपासून एकत्र. वर्गमित्र. पण मधे अकरा वर्ष काहीही संपर्क नव्हता.. मला मित्र-मैत्रिण हा प्रकार खूप आवडतो. तर मी आमच्या शाळेतल्या बॅचचं रीयुनियन अरेंज केलं होतं. तेव्हा आमची पुन्हा भेट झाली. पुन्हा मोठा ग्रुप जमला. असं भेटता भेटता एक दिवस त्याने विचारलं. घरी जाणं-येणं होतंच कारण निखिलचे वडीलही डॉक्टर आणि माझे बाबाही. त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. आणि मुख्य म्हणजे व्यक्ती आवडणं! मला तो प्रश्न कुठेच नव्हता. आमचं ट्युनिंग खूप छान जमतं. गाण्याला पूर्ण स्वातंत्र्य आणि माणसंही इतकी छान मिळाली आहेत की मी खूप आनंदात आहे. मला असं घर हवं होतं जिथे कलेचा आदर केला जातो, फ़क्त संगीतच नाही तर साहित्य, चित्रकला, सगळ्याचाच. आणि मला इथे खूप स्वातंत्र्य आहे. गाणं आधी. असं कधीच होत नाही की गाणं बाजूला ठेवून तू घरी थांब. आता विचार करताना असं वाटतं की अरे, यासाठीच तर आपण रीयुनियन घडवून आणलं की काय! निखिललाही गाण्याची प्रचंड आवड आहे. लहानपणापासूनच त्यानेही अनेक कार्यक्रम अटेंड केले आहेत. आणि त्याच्या क्षेत्रात बिझी असूनही तो माझ्या गाण्याची तांत्रीक बाजू सगळी सांभाळतो. शक्यतो प्रत्येक कार्यक्रमाचं रेकॉर्डींग करणे, मग ते एडीट करून, लेबल करणे.. हे सगळंच. त्यामुळे त्याबाबतीत मी आता निश्चिंत आहे.

तुमच्या इतर आवडी काय आहेत?

मला बागेची खूप आवड आहे. सीरॅमिकचे पॉट्स,लॅंडस्केप पेंटींग करते. मला वाचनाचीही प्रचंड आवड आहे. मित्रमैत्रिणी जमवणं आणि चांगल्या आठवणींना उजाळा देणं हेही खूप आवडतं. आणि मुख्य म्हणजे माणसं जोडण्याची आवड. या सगळ्या कला एकमेकांशी रिलेटेड आहेत. तुमची सौंदर्यदृष्टी चांगली असली की ती गाण्यातही उपयोगी पडते. आपल्या कलेपेक्षा इतर कलांमधे काय चाललंय याबद्दल कलाकारानी जागरूक रहाणं महत्त्वाचं आहे. त्यानी कल्पनाशक्तीला खतपाणी मिळतं. जसं मी बागेत एखादी रचना केली, तशी सुरांची आम्ही कायमच रचना करत असतो, किंवा कोणत्या रागांची संगती करायची हेही तुम्ही एरवी वापरणार्‍या रंगसंगतीतून समजते.. अश्या खूप एकमेकांशी संबधीत गोष्टी आहेत या.

तुम्ही एक उत्तम कवियत्रीही आहात. तर या छंदासाठी कधी वेळ मिळतो?

असं काही ठरवून नाही.. कधीकधी बंदिशीच बांधल्या जातात, कधी एखादा लेखही लिहिते. ’जीवनावर्तन’ आणि ’बैठक’ असे लेख छापून आलेत. किंवा लेक्चर्स असतात त्याचं एक पूर्ण वेगळं काम असतं. असं सर्व प्रकारचे लेखन सुरू असतं.

आग्रह केल्यानंतर सावनीजींनी त्यांची एक छोटी कविता आपल्या मायबोली दिवाळी अंकासाठी दिली आणि त्यानेच आमच्या गप्पांचा सुरेख शेवट झाला.

जीवनाच्या पूर्णत्वाकडे नेणारा षड्ज
तर एकीकडे अपूर्णता भासवणारा निषाद
खूप जवळ तरी दूर अंतरावरचे हे ’सा’ व ’नी’
या दोघांमुळेच मी ’सावनी’!