संवाद - विष्णू मनोहर

संवाद -भारतातील सुप्रसिध्द पाकतज्ञ श्री. विष्णू मनोहर
मुलाखतकार - सुमती वानखेडे
संकल्पना - कामिनी केंभावी

Vishnu_Manohar_1.jpg

Fine arts ची पदवी घेतल्यावरही केटरिंग ह्या क्षेत्राकडे का वळावंसं वाटलं? नेमकी आवड कशामुळे निर्माण झाली?

मी मुळात कलाकार आणि वडीलही चित्रकार, त्यामुळे त्यांच्यासारखं व्हावंसं वाटायचं आणि सातवी-आठवीत असतानाच 'कमाई' करावी अशी प्रगाढ इच्छा असल्यामुळे इकडे वळलो असेन. त्यावेळी मी रामदासपेठेच्या सोमलवार शाळेत शिकत होतो. शाळेत जायला निघालो, की वाटेत दोन-तीन मंगलकार्यालये लागायची. त्यावेळी तिथलं स्टेजवरचं डेकोरेशन बघताना आपणही ते करावं असं सतत वाटायचं. मग तिथे स्टेज डेकोरेशनचं काम मिळतं का याची चौकशी करायची, त्यांनी 'हो' म्हटलं की, सहाव्या तासानंतर शाळेला दांडी मारून घरी यायचं आणि स्टेजचा मागचा पडदा, त्याच्या माळा, वधू-वरांची नावं - त्यांची अक्षरं असं सारं थर्मोकोलचं मॅटर तयार करून पैसे मिळवायचे. ही नववी-दहावीपासून कामाला झालेली सुरूवात. मग ते काम आटपलं की 'जेऊन जा' असं कोणीतरी म्हणायचं. त्यामुळे 'जेवण' हा विषय मनात घर करून राहिला आणि केटरिंग च्या कामाला सुरूवात झाली. ही कामं करीत असताना या व्यवसायात प्रस्थापित झालेल्या काही व्यक्तींकडून अपमानही सहन करावा लागला. ती धग मनात तेवत ठेवूनच या क्षेत्रात नाव कमावण्याची जिद्द मनात जागृत होऊन हा प्रवास पुढे सुरू झाला. दहावीत असताना एका मित्राच्या आईला विश्वासात घेऊन त्यांच्याकडील लग्नाचं काँट्रॅक्ट यशस्वीपणे पार करून दाखविलं. Ideal Typing Institute मधलं मला मिळालेलं हे पहिलं काम. घरच्यांची फारशी इच्छा नसली तरी मोठ्या भावाने - प्रवीणने प्रोत्साहन दिलं, तसेच मोतीवाले केतकरांनीही घरच्या लोकांजवळ तारीफ केल्यावर खर्‍या अर्थाने कामाला सुरूवात झाली. त्यानंतर मग वेगवेगळ्या meetings, seminars, Institute of Engineers ची कामं अशी पायरी पायरीने कामाला गती मिळाली.

तुमचे वडील - चित्रकार, आई - गायिका त्यामुळे 'कलाकारी' ही तुमच्या रक्तातच आहे असे म्हणता येईल. वडिलांना त्यांच्या व्यवसायात कधी मदत केलीत का?

खरंय... तेव्हा अभिनय करावा असं खूप वाटायचं. त्या दृष्टीने दहावीनंतर पुण्याच्या Film Institute ला admission पण घेतली. शाळेत असताना - गणपतीच्या वेळी नाटकाच्या तालमी बघण्याचा - नाटक करण्याचा नाद ... आख्खं नाटक तोंडपाठ असायचं. पण घरच्या काही अडचणींमुळे Film Institute सोडावी लागली. त्यानंतर Food and Craft Institute मध्ये तीन महिन्यांचा कोर्स केला. करियर आणि पैशाच्या दृष्टीने चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. सोबतीनं केटरिंगचा व्यवसायही सुरूच होता. वयाच्या २२ - २३ व्या वर्षी मी स्वतःच्या कमाईनं घर घेतलं. गाडीचं आकर्षणही खूप होतं. 'गाड्यांवरून हात फिरवत गेल्यास गाडी मिळते' असं कुणीतरी म्हटलेलं तेव्हा खरं वाटायचं. खरं तर या गोष्टीचा अर्थ 'ती सुप्त इच्छा मनात जागृत होऊन पूर्ण होणे' असा गृहित धरायला हवा. त्यावेळी मी महिंद्रची जीप एक लाख दहा हजाराला घेतली अन् गंमत म्हणजे विकली तेव्हा मला तिचे एक लाख बावीस हजार मिळाले. केटरिंगचे काम सुरू केल्यावर त्यातले बारकावेही शिकलो. निरनिराळे हलवाई, मिठाईवाले ह्यांच्याकडे जाऊन, त्यांच्या कामाचं निरिक्षण करून मी सारं शिकलो. भोवती केटरिंगचं काम आपल्याला तेव्हाच परफेक्ट करता येईल जेव्हा आपण स्वतः ते शिकू, आपल्याला दुसर्‍याला तेव्हाच रागावता येईल की जेव्हा आपण त्या कामात परफेक्ट असू. शिकण्याची आवड होतीच, शिकता शिकताच घडत गेलो.

हे सारं करीत असतानाच बाबांनाही त्यांच्या पेंटिंगच्या कामात चित्र रंगवायला मदत करायचो. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, बाबांची जी अनेक चित्र प्रदर्शने झालीत, त्यातलं 'आकल्प' हे एक होतं. आकल्प म्हणजे कल्पनेच्या पलिकडचं. त्यातली कल्पना होती - निसर्गाकडून निसर्गाकडे. म्हणजे प्लायवूडच्या तुकड्यातून रंग - पेन्सिल वगैरे साहित्य न वापरता घडवलेली कलाकृती... पानं, फुलं, शेंगा, बिया अशी सामग्री वापरून तयार केलेली कलाकृती. पण पुढे ते continue करायचं मात्र राहून गेलं. ही एक खंत मला कायम आहे.

कुठले पदार्थ करायला मनापासून आवडतं? कुठले पदार्थ स्वतःलाही खायला आवडतात?

साधे पारंपारिक पदार्थ करायला मनापासून आवडतं. कारण त्यात एक skill असतं. स्वतःला खायला आवडणारे पदार्थ म्हणजे भाजलेले कबाब व पनीर पासून तयार होणारे पदार्थ. त्यातही रसमलाई विशेष आवडते. पण लोकांना खाऊ घालताना गरम पदार्थ हा गरमच करून खाऊ घालावा या मताचा मी आहे.

असं कधी घडलंय का.. की, एक पदार्थ करायला गेलात आणि दुसरंच काहीतरी झालं?

झालंय ना... सुरूवातीला एकदा व्हेज कोफ्ता तयार करत असताना तो नेमका किती कडक करायला हवा या गोष्टीचं ज्ञान नव्हतं. शंभर एक लोकांचं जेवण होतं. तेव्हा तो कोफ्ता रश्श्यात पार मिसळून गेला. मग वेळेवर करायचं तर काय? तेव्हा बाजूच्या दुकानातून पनीर आणलं. त्याचे तुकडे केले, deep fry केले आणि ते त्या कोफ्त्याच्या रश्श्यात टाकले आणि त्या पदार्थाला नाव दिलं - 'पनीर इन् कोफ्ता करी'!

खूपदा 'मेजवानी'चं शूटिंग करताना, बॅक किचन उपलब्ध नसताना उरलेल्या पदार्थातूनही एक वेगळं भन्नाट काहीतरी तयार होतं, जे कधी कधी मलाही अपेक्षित नसतं. हा पण अनुभव फार छान असतो.

आजवर कुठले कुठले कार्यक्रम आपण सादर केलेत? कार्यक्रम करताना 'जोडीदार' म्हणून कोणाशी जास्त जुळलं?

Rotary Club मध्ये बायकांना रेसिपी शिकविण्यापासून सुरूवात झाली. UCN channel वरून खर्‍या अर्थाने shows ना सुरूवात झाली. त्यावेळी माझ्यासोबत दोन सहनिवेदक असायचे. त्यानंतर एकट्यानेच live programs बरेच केलेत. लोकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद - त्यांची दाद अन् त्यासोबत काम - असं ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असायचं. त्यानंतर सह्याद्री चॅनेल वर 'हॅलो सखी', विविध भारतीवर 'चूल्हा चौका', मुंबई येथे रेडिओ मिर्चीमधून 'सीधे तवे से', असा हा प्रवास. त्यानंतरचा E-TV वरील 'मेजवानी - रंगतदार रेसिपीज्' हा आत्ताचा कर्यक्रम. चार निवेदक आजवर सोबत होते. पण त्यातल्या त्यात कविता लाडशी माझं छान tuning जमलं. आपल्या सहनिवेदकलाही कामाची माहिती असावी ही अपेक्षा नक्कीच असते.

कुठल्या कार्यक्रमामुळे जास्त प्रसिद्धी मिळाली तसेच आणखी कुठल्या नवीन कल्पना अंमलात आणल्यास हे कार्यक्रम अधिक दर्जेदार होतील असं तुम्हाला वाटतं?

लोकल लेव्हलला जे कार्यक्रम झालेत, जसे कॉर्न फेस्टिवल, पनीर फेस्टिवल, पराठा फेस्टिवल, सावजी - वर्‍हाडी फूड फेस्टिवल, Animal Food Festival असे विविध कार्यक्रम केलेत. तसेच सादरीकरण झालेली शहरं म्हणजे नागपूर व्यतिरिक्त भोपाळ, चंद्रपूर, वणी, हैद्राबाद, पुणे, मुंबई, नाशिक, लातूर, कोकण तसेच नेपाळ, दुबई इत्यादी ठिकाणीही झाले आहेत. काही वेगळे प्रयोग पण मी केलेत. घरी असलेल्या दोन dogs साठी वेगवेगळ्या रेसिपी बनवताना सुचलेल्या कल्पनेतून कस्तूरचंद पार्कला प्राण्यांचा festival show अन् food festival असे दोन कार्यक्रम चार वर्षांपूर्वी केलेत.

'स्वादयात्रा' नावाचा एक कार्यक्रम करावयाचा विचार आहे. त्यातली कल्पना अशी की, एक बॅग घेऊन निघायचं, पूर्व- पश्चिम-उत्तर-दक्षिण जसं सुचेल तसं भटकायचं... जंगलात जायचं... तिथले लोक काय खातात, कसं बनवतात, त्याची चव कशी, आपल्याला तो पदार्थ कुठल्या प्रकारे करता येईल, ह्या सर्वांचा अभ्यास करायचा. त्यातून नवीन रेसिपीज लोकांना देता येतील. कारण प्रत्येकाची पदार्थ बनवायची पद्धत वेगवेगळी असते. त्यातून खूप काही शिकता येण्यासारखं असतं. Sky is the limit. एक धुरंधर बाईंचं शंभर वर्षं जुनं कुकरीवरचं पुस्तक आहे. त्यात दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स् मधून बरंच काहि शिकण्यासारखं आहे.

आपली पाककलेवरची कुठली कुठली पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.... अजून कुठल्या प्रकारचं लेखन करावंसं वाटतं?

पाककलेवरची आजवर प्रकाशित झालेली पुस्तके आहेत - 'Secrets of Indian Gravy' - 'भारतीय करीचे रहस्य' - हे पुस्तक मराठी भाषेतून प्रसिध्द झाले आहे आणि हिंदी व इंग्रजी भाषेतून प्रकाशनाच्या वाटेवर आहे. 'Let us Toffu Be Baby Corny' तसेच 'Creative Recipes' आणि आत्ता प्रकाशित झालेले पुस्तक म्हणजे श्रीकल्प प्रकाशनाचं 'Delicious मेजवानी'. तसेच वेगवेगळे कार्यक्रम करताना - मुख्यतः विकेंड मेजवानीमध्ये महाराष्ट्राची सुगरण शोधताना त्यात सहभागी झालेल्या स्त्रियांचे अनुभव - जसं कुणाला वाटतं की ह्या कार्यक्रमामुळे घरच्यांना मी खरंच किती सुगरण आहे हे निदान कळेल तरी. असे विविध अनुभव भावबद्ध करायचे आहेत. तेही पुस्तक आपल्याला लवकरच बघायला मिळेल.

ह्या क्षेत्रातले आणखी कुठले अनुभव तुम्हाला सांगावेसे वाटतात?

ह्यात महत्त्वाचं एकच सांगावसं वाटतं की सुरूवातीच्या काळात एका व्यक्तीकडे माझे पैसे तुंबले असताना 'तू आता आमच्याकडे प्लेट पुसण्याचे काम कर, तरच तुला पैसे मिळतील' असं जर त्या व्यक्तीनं मला हिणवलं नसतं, तर कदाचित या क्षेत्राकडे मी एवढ्या हिरीरीने वळलोही नसतो, त्यामुळे त्या व्यक्तीला मी धन्यवादच देतो. दुसरं म्हणजे विकेंड मेजवानीच्या वेळी 'मला तुमच्या हाताला हात लावायचा आहे, तुमचा हातगुण मला येऊ देत' असं सांगणारा अनुभव जेव्हा येतो, तेव्हा मन भरून येतं.

केटरिंगच्या व्यवसायात तुम्ही चित्रकलेचा छंद कितपत जोपासला?

ह्या छंदाचा म्हणा वा शिक्षणाचा मला उपयोग झाला तो presentation करताना. पदार्थ कितीही चांगला असला तरी तुमचं presentation जर वाईट असेल, जसे, प्लेट्स चांगल्या नसतील, किंवा जागा चांगली नसेल, टेबल्स च्या मागे background चांगली नसेल तर अशा वेळी कलात्मकतेची जोड त्याला असावी लागते. जसं, बाजूला एखादं छोटसं फूल, स्वच्छ पाणी, स्वच्छ काटे - चमचे अन् मुख्य म्हणजे serve करणारी व्यक्ती हसरी, प्रसन्न असेल तर जेवण थोडं उन्नीस-बीस असलं तरी ह्या गोष्टी खूपशा बाबी सावरून घेतात.

एवढ्या मेहनतीने तुम्ही उभा केलेला हा केटरिंगचा व्यवसाय... हा 'वसा' पुढे कोण नेणार असं कधी वाटतं का?

पुढली पिढी ह्यात येणं कठीण आहे कारण या व्यवसायात खूप मेहनत आहे. म्हणून मी एक ठरवलं आहे की आता एक छान नाव झालेलं आहे, ह्या नावाला एक छान नवीन रूप द्यायचं. कारण दुसरं एखादं प्रॉडक्ट काढलं, तरी त्यात मेहनत आलीच, त्यामुळे आता असं डोक्यात आहे की एक three-star किंवा five-star हॉटेल काढायचं, ज्यात वेगवेगळे विभाग असतील. एकच माणूस हे छान सांभाळू शकतो. जर तुमच्याकडे मनापासून काम करणारी माणसं सोबतीला असतील आणि सद्य-परिस्थितीत well-educated staff मिळतो. तसंच एक hotel management चं कॉलेज काढायचं आहे, की जिथून चांगला staff तयार झाला पाहिजे. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकावर भर देऊन प्रत्यक्षात तयार झालेले विद्यार्थी ह्यावर माझा अधिक भर आहे, कारण मी स्वतः स्वतःचं स्वतः शिकत गेलो आणि घडत गेलो. एकेक पदार्थ करताना किती लोक आहेत, काय आवड आहे, कसे लोकं येतील, कुणाकडे कार्यक्रम आहे, कुठल्या पदार्थांना प्राधान्य राहील या सार्‍या गोष्टींचा अभ्यास मी स्वतः केलेला आहे आणि लोकांकडून suggestion format भरून घेऊनही माझ्या कामात सुधारणा करतो, ही पण माझी एक सवय आहे. कुठल्या वेळी कुठले पदार्थ serve करायचे ह्याचाही अभ्यास करणे जरुरी असते. वेळ कोणती, प्रसंग कोणता, लोक कसे ह्या सर्वांचाच अभ्यास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आता एक छान हॉटेल, एक छान कॉलेज आणि चांगले विद्यार्थी तयार करणे हे पुढलं ध्येय आहे.

Factory Outlet हा एक concept माझ्या डोक्यात आहे. माझ्या विद्यार्थ्यांनी तिथेच बनवलेलं जेवण, तिथेच serve केलेलं जेवण. तुमचीही पार्टी होईल, माझीही मुलं शिकतील, त्यांना काम मिळेल, त्यातून पैसा मिळेल, अशी कल्पना माझ्या डोक्यात आहे. Packaging हा पण विषय डोक्यात आहे. जसे, वेगवेगळ्या प्रकारची लोणची.

केटरिंगच्या व्यवसायात पाय रोवू इच्छिणार्‍यांना मार्गदर्शनपर असं तुम्हाला काय सांगावसं वाटतं?

सर्वप्रथम मी हेच म्हणेन की जे काय तुम्ही करता आहात ते मनापासून करा, लोकांना मनापासून द्या. कारण आज जरी तुमच्याकडे महिन्याला १०-१५ लग्नघरच्या ऑर्डर्स् आल्या असतील अन् ते तुमच्यासाठी जरी नेहमीचंच असेल तरी त्या व्यक्तीच्या दृष्टीने त्याच्या आयुष्यातला तो पहिलाच प्रसंग असतो अन् एकदाच होतो. पैसे थोडेफ़ार कमी जास्त झाले तरी चालतील, पण काम चांगलंच व्ह्यायला हवं. दुसरं म्हणजे तुम्ही दुसर्‍यांना तेव्हाच रागावू शकता, जेव्हा तुम्ही त्या कामात स्वतः निपुण असता. Perfection हे या व्यवसायात असणं फार गरजेचं आहे. गुणवत्ता ही आपल्या कामात असायलाच हवी.

नवीन projects कुठले करावेसे वाटतात? राहून गेलेलं असं आणखी काय आहे?

राहून गेलेलं असं की, मला I.A.S. व्हायचं होतं. मला प्रशासकीय सेवेत जावंसं वाटायचं. लोकांसाठी खूप कामं करावीत असं मनापासून वाटायचं. पण आता ते शक्य नाही. आता तसं कॉर्पोरेटर होऊ शकतो पण लांडीलबाडी करणं रुचणार नाही. पोलीस इन्स्पेक्टर व्हायची खूप इच्छा होती. 'नायक' सिनेमा खूप आवडतो मला.

अभिनयाची आवड आधीपासून आहेच. आधी डायरेक्टर व्हायचं फार वेड होतं. गणपतीच्या कार्यक्रमात script writing, acting, direction असा सारा one man show असायचा. एक छोटी video film पण मी तेव्हा केली. 'काबूम' नावाची एक animation film येते आहे. डिसेंबरमध्ये रिलीज होईल. दोन सिनेमांचं पण डोक्यात आहे. तसेच आजवर मी चार मराठी सिनेमे केले आहेत - 'झुंझ एकाकी', 'वाटेवरचा सोबती', 'हंबरडा', आणि 'हर होलीनेस'. हर होलीनेस मध्ये मी तृतीयपंथी पुरूषाची भूमिका केलेली आहे.

आणखी एक सांगायचं असं की, दृक्-श्राव्य माध्यमाद्वारे 'सुनके खाना बनाओ' असा एक कार्यक्रम अमीन सयानी आणि मी मिळून केला. नुसत्या शब्दांद्वारे किचनपर्यंत जाणे, हा अनुभव छान होता. भारतातील ह्या क्षेत्रातील ही पहिली ऑडिओ कॅसेट चार वर्षांपूर्वी आम्ही बनवली आहे.

छंद कुठले?

गाणं... गायला खूप आवडतं, driving करायला आवडतं... समुद्र खूप आवडतो. समुद्रावर फिरायला, समुद्राचा खळखळाट ऐकायला फार आवडतं. जगजीत सिंग माझा आवडता गायक आहे.

समाजाचं आपण काही देणं लागतो... किंवा आपलं काही उत्तरदायित्व आहे असं तुम्हाला वाटतं का?

हो. १०० टक्के. मागे जेव्हा राजस्थान मध्ये पाण्याचा दुष्काळ पडला तेव्हा मी विचार केला की आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो? पैशाची मदत मागायची म्हटलं तर भिडस्त स्वभाव आड येतो. काम करायचं तर होतं. तसं तिथे पाणी उपलब्धही होतं पण १००-१५० किलोमीटर अंतरावर. ते आणणार कोण, तिथे मदत देणारे आहेत पण पोचवणार कोण? मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्यापासूनचं काम तिकडे होतं. तिथे एक-दीड महिना काम केलं. त्यानंतर लातूरच्या भूकंपाच्या वेळी मला मध्यस्थ म्हणून सरकारकडून बोलावण्यात आलं. त्यावेळी १०-१२ computers मला देण्यात आले. मी येथून काही लोकांना घेऊन गेलो पण जातीवादाचा प्रश्न तिथेही उपस्थित झालेला पाहून मन खंतावलं, गोरगरीब, श्रीमंत, दलित असल्या भांडणाचा कंटाळा आला. तिथेही लांडीलबाडी, चोर्‍या, पैसे खाण्याची वृत्ती अशा गोष्टी निदर्शनास आल्या. तरीही तिथं मी दीड-दोन महिने काम केलं.

थोडं तुमच्या परिवाराबद्दल...

आमचं एकत्र कुटुंब आहे. आम्ही तीन भाऊ, माझ्या दोन वहिन्या, माझी पत्नी - अपर्णा, आई, बाबा, मुलं अशी सारी मिळून-मिसळून रहातो. त्यामुळे बाहेरगावी कामाला असताना घरी कसं... ही चिंता मला भेडसावत नाही. कारण महिन्यातून वीस दिवस तरी मी बाहेर असतो. इथे आमचा animation studio आहे. तिथं पंचवीस लोकं सोळा मशीनवर काम करतात. विद्यार्थ्यांना शिकवणं आणि त्यांच्याकडून films बनवून घेणं असं काम तिथं होतं. आतापर्यंत भक्त प्रल्हाद, नवनाथोंकी कथाएँ, शबरीची बोरे, फेरीवाला अशा चार-पाच films निघाल्या आहेत. 'काबूम' ही नव्वद मिनीटांची film येतेच आहे.

पुढल्या जन्मात काय व्हायला आवडेल?

राहिलेली सारी स्वप्ने पूर्ण करायला पुन्हा विष्णू मनोहर म्हणूनच जन्माला यायला आवडेल. पुढल्या जन्मात प्रशासकीय सेवेत जायला आवडेल, लोकांची सेवा करायला आवडेल, एक छान राष्ट्र घडवायला आवडेल. राजकारणी लोकांकडे सारी पॉवर असतानाही ती काम का करत नाहीत ते कळत नाही. एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर रोडच्या मधली झाडं वाढवताना deep irrigation method का वापरत नाहीत, हा प्रश्न मला नेहमीच पडतो.

'मायबोली' बद्दल आपलं मत...

'मायबोली' बघितली आहे. खूप छान, innovative आहे. माझा पिंड मुळात खाण्याकडे झुकणारा असल्याने आधी तिकडे वळलो. बटाट्यावरच्या अनेक रेसिपी तिथे मी बघितल्या. आवडलं. 'मायबोली' साठी मुलाखत द्याल का म्हणून विचारलं, ते फार आवडलं.

आमच्या 'मायबोली'करांसाठी एक छान रेसिपी द्या.

पोळीचे बेसन रोल
हा प्रकार करायला अतिशय सोपा आणि जेवणाला alternative असा म्हणावा लागेल. या रेसिपीसाठी साहित्य अतिशय कमी लागते.

साहित्य
पोळ्या ४ ते ५
चण्याच्या डाळीचे पीठ ३ चमचे
आंबट ताक अर्धी वाटी
हिंग चवीनुसार
हळद पाव चमचा
मोहरी पाव चमचा
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर दोन चमचे

कृती
ताकात चण्याच्या डाळीचे पीठ, हिंग, हळद, चवीनुसार मीठ घालून घट्टसर भिजवावे. हे मिश्रण पोळी पसरून त्यावर लावावे. असे तयार केलेले रोल वाफवून घ्यावे. नंतर त्याचे बाकरवडीप्रमाणे तुकडे करून त्यावर हिंग, मोहरी, हिरवी मिरची, आवडत असल्यास-लसूण याची फोडणी घालून सर्व्ह करावे किंवा रोल शिजल्यानंतर त्याला तेलात डीप फ्राय करून किंवा परतून सॉस बरोबर खायला द्यावे.

Vishnu_Manohar_2.jpg

०-०-०-०-०-०-०