मी... कोकणवासी ?

Submitted by मनीमोहोर on 9 November, 2026 - 03:45

सोशल मीडियावर "कोकण" ह्या विषयावर मी खूप लिहिते हे माबो कराना नवीन नाही. पण त्यामुळे सर्वांना वाटत मी कोकणातलीच आहे, खरं काय आहे त्याची ही इंटरेस्टिंग गोष्टनक्की वाचा. .

मी... कोकणवासी ?

आमच लग्न झालं त्या काळात लग्नानंतर जायचे पॉप्युलर डेस्टिनेशन म्हणजे बंगलोर उटी म्हैसूर , ज्यांना ते परवडत नसे ते मग महाबळेश्वर ला जात. पण आम्ही मात्र बंगलोर किंवा महाबळेश्वर ला न जाता कोकणातच गेलो होतो आमच्या घरी.

पावसाचे दिवस असल्याने वरच्या वाटेने गेलो म्हणून कोल्हापूरला एक दिवस मुक्काम करावा लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पोष्टाच्या एष्टी ने निघालो गावाला. पोष्टाची गाडी म्हणजे ती गावागावातल्या पोस्टात जाऊन डाक घेत घेत जाते त्यामुळे प्रवासाला नेहमीपेक्षा खूप जास्त वेळ लागतो. पण दुसरी गाडीच नव्हती त्यामुळे पर्याय नव्हता. असो. बावडा घाटात ढग खाली आले होते, चार फुटांवरचं ही दिसत नव्हतं. ठोम पाऊस लागला होता आणि वायपर मोडलेले होते एष्टीचे. पुढे कोकणात ही खूप पाऊस होताच. रस्त्यात पाणी ही साठलं होतं ठिकठिकाणी. पण ड्रायव्हर दादांनी सुखरूप पोचवलं आम्हाला तिनी सांजेला गावात . मग एक कच्च्या पायऱ्यांची घाटी चढून आणि एक उतरून आणि एक अगदीच लुकतुक्या साकव पार करून पोचलो घरी. आगारात प्रचंड फुललेल्या गुलबक्षी , पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या गुलबाक्षीने जणू माझं ह्या नवीन घरात स्वागत केलं होतं.

तेव्हाच कोकण खूप वेगळं होतं. लाईट होते पण एकदा गेले की आठ आठ दिवस येत नसत. सारवणाची जमीन होती घरात. सगळा स्वयंपाक चुलीवरच व्हायचा, स्टो अगदीच इमर्जन्सीसाठी राखून ठेवलेला असे. सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना अधिक रिजिड होत्या. तिन्ही त्रिकाळ पंगती वाढून जेवणं होत असत. कुळथाच पिठलं आणि भात हेच प्रमुख अन्न. गावात दुकानं नव्हती ,दारात वाहनं नव्हती आणि खिशात पैसा ही जेमतेमच त्यामुळे परिसरात पिकत तेच खायचं आणि परिसरातल्या नैसर्गिक गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करायचा हीच जीवनशैली होती. बाह्य जगाशी संपर्कात राहण्याची साधने म्हणजे कधीतरी सिग्नल मिळणारा रेडिओ आणि दोन दिवसांनंतर येणारे वर्तमानपत्र.

तर जिथे आर्थर सीट पॉईंट बघायचा तिथे घाटी चढून आम्ही गेलो सड्यावर. टिपिकल पावसाळी हवा होती. पाऊस रिमझिम पडत होता. पावसाळाच असल्याने जिकडे तिकडे हिरवागार होतं. हिरवागार गवत चरताना होणारा गुरांच्या गळ्यातील घंटांचा आवाज सभोवतालच्या शांततेत फारच गोड वाटत होता. सड्यावरून खालची शेती सुंदर दिसत होती. वरचा व्हाळ झुळुझुळू वाहत होता. पाणी स्फटिकासारख शुभ्र ,व्हर्जिन आणि गार होतं. तिथल्या खडकावर पाण्यात पाय सोडून बसले होते ते अजून आठवतं. मिस्टर मला आमच्या आंब्याच्या बागा दाखवत होते. मला त्यातलं कळत काही नव्हतं पण माहेरी सुईच्या अग्रा एवढी जमीन ही नव्हती त्यामुळे मनात कुठेतरी छान मात्र वाटत होतं ते सगळं बघताना आणि ऐकताना.

लोकांना वाटत मी कोकणातली पण खरी गोष्ट म्हणजे लग्न होईपर्यंत मी हे कोकण एकदा ही बघितलं नव्हतं. माझं द्न्यान म्हणजे गो नी आणि श्री नांच्या कादंबऱ्या वाचून मिळवलेलं. त्यामुळे माझ्यासाठी हे सगळं अगदी नवीन आणि अपरिचित होतं. आमचे वडील नोकरदार , कायम बदल्या आणि भाड्याची घरं. घरात फक्त शिक्षणाचं वातावरण. उलट हे घर म्हणजे पिढिजात बागायती आणि शेती.. घरात वीस एक सख्खी चुलत पण गुण्या गोविंदाने नांदणारी माणसं आणि दहाबारा गडी माणसं. तीन गोठे गुरांनी भरलेले. घर ,राहणी, भाषा, सण वार सगळ शेती आणि बागायती भोवती फिरणारं.

सोशल मिडियावरची एखादी व्यक्ती प्रत्यक्ष भेटली तर विचारते "कोकणातून कधी आलात ? ठाण्यात किती दिवस मुक्काम? किंवा परवाच एक फोन आला होता, " तुम्ही मुंबईला आलात की कोकणातल्या खास रेसिपी आम्हाला शिकवा " असा. म्हटलं "अहो, मी मुंबईतच असते." आहे की नाही गंमत. माझी नोकरी मुंबईला त्यामुळे मी कोकणात फार काही राहिलेली नाहीये पण बघता क्षणी ह्या कोकणाच्या आणि घराच्या प्रेमात पडले आणि म्हणून जेव्हा संधी मिळेल तेव्हा नजरेने टिपत गेले सगळं. ती भाषा, ते टिपिकल शब्द आणि माझ्या बोलण्यात असणारा तो हेल ही सगळी माझी लग्नानंतरची कमाई आहे.

आता मी इतकी अस्सल कोकणातली झाले आहे की जगाच्या पाठीवर कुठे ही गेले तरी वाटतं हे छान आहे पण आमच गाव ह्यापेक्षा ही छान आहे. म्हणून आता लग्नानंतर आम्ही दुसरीकडे कुठे न जाता कोकणात गेलो याची खंत वगैरे न वाटता उलट छानच वाटत. परवा सुनबाई स्वित्झर्लंड ला जायचा प्लॅन करत होती म्हटलं " एवढ्या लांब कशाला जायचं त्यापेक्षा पावसाळ्यात नाडणला जा." अर्थात तिने माझं ऐकलं नाही तो भाग वेगळा. पण तिकडे गेल्यावर नातू तिथल्या गायींना “गंगू , धनु “ अशा हाका मारत होता आणि तिथला राखण्या झाला होता "रमेश काका " हाहाहा अश्या तऱ्हेने आमचं नाडण प्रेम पुढच्या पिढीतही झिरपत आहे हे बघून खूप छान वाटत.

हेमा वेलणकर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर
शब्दचित्रच.... आणि किती सहजसुंदर लिहिलंय.. अगदी हृदयाच्या गाभार्‍यातून आलेला स्वच्छ सुंदर सूर, माझे बालपण सुध्दा असेच अलिबाग, पेण, पनवेल, आणि महाडला गेले आहे आणि आज देखील कोकण माझ्या लेखन डोकावते अन एका सुंदर काळात घेऊन जाते

व्वा हेमाताई. आपलं कोकण आहेच असं. तुम्ही वर्णन केलं आहें तो काळ साधारण 60 च्या दशकातला असेल. सगळ्या गावात एस्टी अजून पोचायची होती, लाईट येतील की नाही हे माहीत नव्हते, लाल मातीचे रस्ते होते. पण जो त्या कोकणात जन्माला आला किंवा ज्याचे ऋणानुबंध तेव्हा जुळले ती व्यक्ती कोकणचीच झाली आणि आजन्म त्या कोकणाच्या प्रेमात पडली.

ज्यांना आपल्या घरात राहून कोकण बघता अनुभवता आलं तेच खरे कोकणी. त्यांनाच कोकण समजलं. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांतून केवळ पर्यटनासाठी होम स्टे वगैरेत राहतात ते वेगळं कोकण.
आमचंही कुणी नव्हतं पण आम्ही एकेका गावात दोन तीन दिवस राहून अनुभवलं. पर्यटकांना मी एवढंच सांगेन की फक्त आपल्याच कुटुंबाची सहल करा. दोन तीन कुटुंबे एकत्र गर्दीने जाऊ नका.
लेख आवडला.

मलाही ऋतुराज.बहुतेक ममोंनी विमान प्रवासाच्या लेखात उल्लेख केला होता कोकणाच्या पहिल्या भेटीचा.
छानच लिहिलं आहे ममो. पण इतकं कमी का? मुंबई/ठाण्यात राहतानाही मनात कोकण रुजलेलं असण्याचे दैनंदिन आयुष्यातले अनुभव वाचायला आवडतील अजून Happy

छान !!!
कोकणाने आपलंसं केलं यातच जन्माचं सार्थक झालं, असं मानणारा मी; आणखी काय लिहू !!

नवीन प्रतिसाद लिहा