अधूनमधून मला मिनिमलीझमची हुक्की येते. वाटतं, आपले ऋषी-मुनी नाही का एका हातात कमंडलू, दुसऱ्या हातात कुबडी, अंगावर एक वस्त्र आणि अगदी चैनच म्हणायची झाली तर आसन म्हणून एखादं मृगचर्म एवढ्या मोजक्या भांडवलावर वर्षानुवर्ष साधना करत. पण ऋषी-मुनींचं ‘अपरिग्रह’ हे तत्त्व, वाचायला-ऐकायला छान आणि सोपं वाटलं तरी प्रत्यक्षात अंगीकारायला मात्र महाकठीण असतं.
मग कधीकधी छोटे प्रयोग करून बघायचो. घरापासून दूर, एकटा होतो तेव्हा एकाच भांड्यात सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं काही निभावून न्यायचं तंत्र मी आत्मसात केलं होतं. कुणाला ही पराकोटीची कंजूषी वाटली तर कुणाला निव्वळ विक्षिप्तपणा. त्या काळी ‘वर्क फ्रॉम होम’ असली संकल्पना फारशी प्रचलित नसल्यानं, लॅपटॉपलाही ताठ मानेनं झुगारून डेस्कटॉपची निवड केली. त्यामुळं पाठीवर उगाचच्या ओझ्याचा आणि उरलेलं काम घरी येऊन पूर्ण करत बसायचा ‘पेन’ न घेता, खिशाला फक्त पेन लाऊन तेवढ्याच ताठ मानेनं हापिसात जाता यायचं. मधनंच कधीतरी फोन किंवा पाकीटही न घेता, जेमतेम बसच्या तिकिटापुरता खुर्दा खुळखुळवत गावभर भटकून यायचो. खिशात पैसा आणि हातात फोन नसताना आजूबाजूचं जग जरा जास्त स्पष्ट आणि वेगळं दिसायचं…
अशीच एकदा अचानक लहर आली आणि या थोड्याफार अनुभवांची शिदोरी आणि गरजेपुरतं सामान पाठीवरच्या सॅकमध्ये कोंबलं. राजा भर्तृहरींसारखं, ‘शय्या भूमितलं दिशोऽपि वसनं ज्ञानामृतं भोजनम्’ (म्हणजे भूमी हेच अंथरूण, दिशा हेच वस्त्र अन् ज्ञानामृत हेच अन्न) अशा उच्च कोटीचं मिनिमलिझम पेलायची अजून तरी योग्यता आलेली नव्हती. त्यामुळे थोडे जास्तीचे कपडे, एक उबदार जॅकेट, काही झटपट शिजणारं अन्न आणि आणीबाणीच्या वेळी लगेच बोकाणा भरता येतील असे थोडे भूकलाडू अन् तहानलाडू घेतले. माळ्यावरचा धूळ खात पडलेला तंबू काढला. माझी आवडती, सुरवंटासारख्या हिरव्यागार रंगाची अन् तशाच आकाराची मऊसूत स्लीपिंग बॅग घेतली आणि स्वतःच्याच कोशात काही दिवस काढावे म्हणून गावं-गर्दीपासून जरा दूर, हिमालयातल्या कुठल्याश्या पर्वतराजींत जाऊ म्हणून निघालो.
पण अशा वेळी सर्वप्रथम मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे, नक्की जायचं कुठं? पर्यटकांच्या गजबजाटाला ‘अंगठा’ दाखवायचा असेल तर एक त्यातल्या त्यात खात्रीलायक ‘थम्ब रुल’ पाळावा लागतो आणि तो म्हणजे मोटारगाडीसाठी वाट नसलेलं पण आपल्या पायांची मात्र पुरेपूर ‘वाट’ लावणारं, एखादं दुर्गम ठिकाण निवडणं. अर्थात, एवढ्यावर भागेलच असंही नाही. ऐन हंगामात गेलात, तर इतक्या आडरानात सुद्धा तुमच्या तंबूला रीळ बहाद्दारांच्या शामियान्यांचा गराडा पडेल. त्यांनाही गुंगारा द्यायचा असेल तर हंगाम चालू होण्याआधीच पाठीवर पडशी टाकावी आणि चालू लागावं.
‘गाव तिथं यष्टी’ हे महाराष्ट्र परिवहन मंडळाचं घोषवाक्य इतरही बऱ्याच राज्यात लागू पडतं. त्यामुळं तिथल्या यष्टीची चौकशी करून ठेवावी. याचे बरेच फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणायचं तर खासगी गाडीच्या खर्चाच्या तुलनेत आपल्या खिशातले बरेच ‘पैसे वाचतात’. दुसरं म्हणजे, अनुभवी ड्रायव्हरच्या हातात गाडीचं सुकाणू असल्यामुळे सुरक्षित प्रवास होऊन ‘जीव वाचतो’. आणि तिसरं सांगायचं झालं तर, प्रवासात स्थानिक लोकांचं राहणीमान आणि स्वभाव जवळून ‘वाचता येतो’!
गजबजलेली शहरं मागे पडून यष्टी घाट चढू लागली, की हिमालयातली, जरा कमी उंचीवरची चील आणि देवदार वृक्षांची हिरवीगार जंगलं दिसू लागतात. खिडकीतून गार वाऱ्याच्या झुळका येऊ लागल्या, की आंबून गेलेलं शरीर हलकं होतं, पापण्या जड होतात आणि अगदी गाढ झोप लागते. काही वेळानं कुठल्या तरी ढाब्यावर यष्टी थांबते. वारुळातून मुंगळे बाहेर पडावेत तसे प्रवासी बाहेर पडतात आणि ढाब्यातल्या बाकांना जाऊन भिडतात. गरमागरम दाल चावल, समोसे, आलू परांठे असं काहीबाही ओरपून मग आरामात चहा भुरकत बसतात. तेवढ्यात यष्टीच्या कर्कश्श हॉर्ननं सगळ्यांची तंद्री भंगते. सगळ्यांना पोटात भरून यष्टी परत धावू लागते अन् भरल्या पोटानं प्रवासी पुन्हा पेंगु लागतात.
प्रवाशांना आपापल्या गावी पेरत पेरत यष्टी तिच्या शेवटच्या मुक्कामी पोहोचते तेव्हा बरीच हलकी झालेली असते. आपल्या खांद्यांवर परत आपलं ओझं घेऊन आपण मात्र जड होतो. खांद्यावरचं ते ओझं पुढचे काही दिवस मिनिमलिझमचं महत्त्व आपल्याला पावलोपावली पटवून देणार असतं.
एवढ्या उंचीवर, राय, कैला आणि तोष यांसारखे प्रचंड पाईन वृक्ष दाटीवाटीनं उभे असतात. ओळख पटवता आली तर वाटेवर एखादा नेझा स्वतःजवळच्या महागड्या चिलगोज्यांची दिलदारपणं पखरण करताना दिसू शकतो. या काळपट हिरव्या रंगाच्या भाऊगर्दीतही मधूनच पांढरट- तपकिरी सालीचा भोजपत्र वृक्ष आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवून देतो. प्राचीन काळी, कागदाचा शोध लागण्यापूर्वी ग्रंथ, वेद, उपनिषदं, मंत्र आणि शास्त्रं ही याच झाडांच्या अगदी पातळ पण चिवट सालींवर म्हणजेच ‘भूर्जपत्रावर’ लिहिली जायची. या वृक्षात निसर्गतःच असलेल्या तेलाचं अंगभूत कवच, सालींना कुजण्या-किडण्यापासून वाचवायचं. त्यामुळं यावर कोरलेलं ज्ञानाचं संचित चिरंतन राहिलं.
दाट जंगलं हळूहळू मागे पडतात. खडकाळ डोंगरातून अन् मोकळ्या हिरव्यागार कुरणांतून वाट वरवर पुढे सरकत राहते.
आषाढ आला की दुर्गम दऱ्याखोऱ्यांतल्या, बर्फानं आखडलेल्या खिंडी हळूहळू मोकळ्या होऊ लागतात. कडाक्याच्या थंडीनं आळसावलेले ओढेही, उन्हं धरू लागली की नव्या जोमानं खळाळत पळू लागतात. अशातच मोठमोठे कळप हाकारत घाटवाटांवरून मेंढपाळांची ये-जा सुरू होते. पूर्ण ताकदीनिशी उसळणारे ते ओढे पार करताना मेंढ्या-बकऱ्यांची एकच धांदल उडते. पाण्याला बिचकून काठावरच अडून बसलेल्या एखाद्या मेंढीच्या बुडावर रट्टा मारत मेंढपाळ तिला पलीकडल्या काठावर पिटाळतात. ते बघून बाकीच्याही एकमेकींना ढुश्या देत धिटाईनं पाण्यात शिरतात. एवढ्या गदारोळात अगदीच लहान असलेल्या पिल्लांना मात्र मेंढपाळ अलगद कडेवर उचलून घेतात आणि एकदाचा ओढा पार होतो.

पौराणिक कथेनुसार खरं तर आषाढात भगवान विष्णू काही महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात; पण त्याउलट इथे मात्र तब्बल सहा-सात महिन्यांची गाढ झोप काढून, बर्फाची दुलई बाजूला सारत, तरतऱ्हेची असंख्य चिमुकली गवतफुलं बाहेर डोकावतात आणि आळोखेपिळोखे देऊ लागतात. ‘खूप सारी फुलं’ म्हटलं की बहुतेकांच्या नजरेसमोर नेटकेपणानं सजवलेल्या ट्युलिप्सची नखरेल बाग उभी राहते. पण इथे निसर्गाच्या मांडीवर फुलणारी रानफुलं उगाचच कसला दिमाख दाखवत नाहीत. खरं सांगायचं तर लाडाकोडात वाढलेल्या त्या ट्युलिप्सच्या बागांपेक्षा, डोंगरदऱ्यांत जागोजागी अगदी सहज फुललेले रानफुलांचे हे ताटवे कांकणभर सरसच वाटतात.
उन्हं कलू लागली की पाण्याची सोय बघून तंबू उभारावा लागतो. मानवी वस्तीची खूण म्हणून कुठेतरी गुराख्यांनी तात्पुरती रचलेली चौकोनी दगडी वरवंड दिसते. त्यातले चुलीसाठी वापरले गेलेले दगड करपून काळेकुट्ट झालेले असतात. आजूबाजूला राख विखुरलेली असते. सभोवतालचे पर्वत, दगडधोंडे इतके चिडीचूप बसून असतात की पाण्याच्या खळखळाटाचीसुद्धा अगदी छान सोबत वाटावी. बर्फ वितळून वाहणारे लहान-मोठे झरे आणि ओढे, पाण्याची मात्र अजिबात ददात पडू देत नाहीत. थोडी सपाट आणि गवताचा पातळसर थर असलेली कोरडी जागा सापडणं म्हणजे तर अगदी पर्वणीच! एकदा का तंबू व्यवस्थित लाऊन झाला की लगेच स्वयंपाकाची लगबग करावी लागते. ‘अंधार पडायच्या आत जेऊन घ्यावं’ हे एरव्ही धाब्यावर बसवलेलं ‘शास्त्र’ इथे मात्र मुकाट्यानं पाळावं लागतं. बोचरं थंडगार पाणी, अंगाला झोंबणारा वारा आणि त्यात भर म्हणून अगदीच बेतास बात साधनसामुग्री…या सगळ्यांत उदरभरणाची सोय करणं म्हणजे खरोखरीच एखादं कठीण ‘यज्ञकर्म’! एवढा आटापिटा करून रांधलेल्या अगदी साध्या अन्नाचा ‘वदनी कवळ घेताच’, भुकेल्या पोटाला ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असल्याची पुरेपूर खात्री पटते.
पण असं यज्ञकर्म प्रत्येक वेळी साधतंच असं नाही. कधी अचानकच सोसाट्याचा वारा रोरावत येतो. पावसाच्या हलक्या सरी पडू लागतात. अजस्र हिमालयाच्या छायेत पावसाच्या थेंबांचा बर्फ व्हायला वेळ लागत नाही. अशा वेळी कसाबसा तंबू उभारायचा आणि असल्या हवेचा आधीच अंदाज बांधून सोबत ठेवलेल्या भूकलाडूंवर किंवा चण्या-फुटाण्यांवर भागवायचं.
दिवसभरात अंगाला सवय नसलेले अनंत कष्ट झालेले असतात. विस्मृतीत गेलेला एखादा अवयव सुद्धा अशा वेळी त्याचं अस्तित्व अगदी ठणकावून जाणवून देतो. त्याकडे जाणूनबुजून कानाडोळा करावा तर दुसरीकडं लक्ष गुंतवायला इथं फोन, इंटरनेट वगैरेचं मायाजाल नसतं. तसं म्हणायचं तर त्याचीही गरज लागत नाही कारण तंबूची झापं लावून जरा कलंडलं की लगेच डोळा लागतो. तंबूशी झटापट करून मध्यरात्रीपर्यंत वाराही शांत होतो. जवळ आहे नाही ते अंगाभोवती गुरफटून घेऊन जरा कुठे अंगात हवीहवीशी ऊब आलेली असते. पण तरीही थंडीच्या कृपेनं रात्री एकदा तरी लघुशंकेसाठी मोठ्या कष्टानं का होईना तंबूबाहेर पडावंच लागतं. शहर-गावांच्या कृत्रिम झगमगाटापासून मैलोन् मैल दूर, चौदा-पंधरा हजार फूट उंचीवर, निरभ्र आभाळात यावेळी एक वेगळंच विश्व उलगडत असतं. पिठूर चांदणं नशिबानं बऱ्याचदा अनुभवलंय पण आकाशगंगा उघड्या डोळ्यांनी एवढी स्पष्ट बघता येणं म्हणजे अहोभाग्यच! लुकलुकणाऱ्या तारांगणात एखाद्या रुपेरी नदीसारखं वाहणाऱ्या त्या तारकासमूहाला ‘मिल्की-वे’ म्हणण्यापेक्षा आपण कौतुकानं ठेवलेलं ‘मंदाकिनी’ हे नाव केवढं तरल अन् जिवंत वाटतं.
उन्हं अंगावर येईस्तोवर लोळत पडू नये या नियमाची मात्र इथे सक्ती नसते. भल्या पहाटे तंबूवर आणि आसपास सर्वत्रच ‘पाला’ पडलेला असतो. थंडीत दव गोठलं की एक अतिशय पातळ रुपेरी थर तयार होतो, त्याला स्थानिक लोकं पाला म्हणतात. सकाळी लवकर उठायची अगदीच खोड असेल तर जरा फटफटलं की बाहेर पडायचं. जवळच्या बर्फाळ ओहोळात हिंमत झालीच तर तोंड धुवायचं आणि बाटलीभर पाणी भरून आणायचं. एवढं गारेगार पाणी वापरून चहा करायचा म्हणजे संयमाची परीक्षाच. त्यामुळं चहाचं आधण ठेऊन आरामात बसायचं. अवचितपणं कळपातून फुटलेली एखादी ‘कपिला’ हिरव्यागार कुरणावर चरता चरता… कुतूहलापोटी, “कंच्या गावचं पावनं?” अशी वास्तपुस्त करायला येते; तिला मूठभर चणे चारावेत. तोवर चहाचं आधण उकळू लागतं. अशा वेळी त्या वाफाळत्या चहाचा घोट, पुण्यानं चहाला दिलेलं ‘अमृततुल्य’ हे नाव अगदी सार्थ करून जातो.
जरा वेळानं डोंगरांमागनं सूर्य डोकावतो. सकाळच्या त्या तिरकस सूर्यकिरणांशी ‘पाला पडला’ की इतका वेळ गारठवून टाकणारा ‘पाला’ पटकन् पळ काढतो. ढगांच्या पांघरुणाखालनं आजूबाजूची उंच शिखरंही उन्हानं एव्हाना जागी होतात. एवढ्या उंचीवर आणि अतिशय तीव्र उतारांवर हिरवळही अभावानेच असते. आता इथून पुढे दगडधोंड्यांशिवाय काय असेल असा विचार येतो न येतो तोच उतारावरच्या फिकट रेघोट्यांवर काही लहान मोठ्या ठिपक्यांची हालचाल दिसते. हिमालयन भरल मेंढ्यांचा एक लहानसा कळप पोटासाठी भटकायला निघालेला असतो. डोळे गरगरतील इतक्या उंचीवर आणि साधा तोल सांभाळायलाही अवघड अशा कडेकपाऱ्यांमध्ये लीलया वावरण्यात भरलचा हातखंडा… नव्हे, नव्हे, ‘पायखंडा’ असतो. उभ्या कातळावरून, घसाऱ्यावरून, टणाटण पडणाऱ्या त्यांच्या उड्या पाहिल्या की बघणाऱ्याला सपाटीवर उभं असूनही भोवळ यावी. भरलसारखाच इथला आणखी एक मूळ रहिवासी म्हणजे हिमालयातलं तपकिरी अस्वल. आपली लांबलचक हिवाळी झोप काढून झाली की पोट भरायला फळं, कंदमुळं धुंडाळताना हे दुरून दिसू शकतं. एरव्ही शाकाहारी असलं तरी क्वचित एखादी सामिष मेजवानी म्हणून जमिनीवरच्या भरलवर किंवा जमिनीखालच्या लहानश्या मरमॉटवरसुद्धा ताव मारतं. हे तसं स्वभावानं लाजाळू खरं, पण वाटेवर याच्याशी जर चुकूनमाकून गाठभेट झाली तर मात्र काही खरं नाही. पाचशे साडेपाचशे पौंडांचं हे अवाढव्य धूड बर्फात दोन पायांवर कधीतरी उभं राहिलं की पावलांच्या त्या ठश्यातून महाकाय ‘येती’ची गूढ दंतकथा जन्माला येते.
याच पर्वतांच्या टाळूवरनं पलीकडच्या दरीत जाणाऱ्या खिंडी असतात. जून महिना सरला तरीही कधीकधी इथं हिवाळ्यात साचलेला बर्फ शड्डू ठोकून बसून राहतो. अशा परिस्थितीत खिंडी ओलांडणं मोठं जिकिरीचं होऊन बसतं. पण इथवर मजल मारल्यामुळे हुरूप दुणावलेला असतो. त्यात भर म्हणून रात्रीची तुकड्या-तुकड्यातली झोप, वाफाळता ‘अमृततुल्य’ चहा, जराशी क्षुधाशांती, आणि कोवळ्या उन्हातून मिळालेली थोडी सोलर एनर्जी आपल्याला परत रिचार्ज करते. त्यामुळे हाताशी वेळ असेल तर जिवाशी अजून थोडा खेळ म्हणून खिंड लढवायला निघावं. निसर्गानं आपल्याला थोपविण्यासाठी वाटेवर ठिकठिकाणी सुरुंग पेरलेले असतात. भुसभुशीत माती, घसरणाऱ्या, चपट्या दगडगोट्यांतून जाणाऱ्या चिंचोळ्या पाऊलवाटा आणि या सगळ्यांत जास्त दगाबाज म्हणजे या वाटांना आडवे जाणारे, अतिशय निसरडे असे गोठलेले ओढे. त्यामुळं इथं आपलं पाऊल वाकडं पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. धापा टाकता टाकता मागे वळून पाहिलं तर खोल दरीत आपला तंबू मोहरीच्या दाण्याएवढा दिसतो.
आपल्यातली सगळी हवा काढून घेतल्यावर अखेर खिंडच आपल्याला गाठते. उन्हानं उजळलेल्या शुभ्र बर्फातून खिंडीचे काळेकभिन्न पहारेकरी डोकावत असतात. इतक्या प्रचंड आरशांमधून परावर्तित होणारा प्रखर प्रकाश, काळया चष्म्यामागचे डोळेही मिचमिचे करून टाकतो. इथली हवा विरळ असते, भरपूर दमछाक झालेली असते. त्यात भर म्हणून क्षितिजावर काळया ढगांची एखादी मोठी तुकडी अचानक हल्ला करायच्या पवित्र्यात जमू लागते. यांनी इथेच गाठलं तर आणखीन एक खिंड पावन होईल हे ध्यानात ठेऊन परतीची पावलं उचलावीत. मात्र या डोंगरांवर प्रत्येक पाऊल ठेवताना नेहमी नम्रपणे मान तुकवून चालावं. छाती पुढे काढून उर्मटपणं चाललात तर हिमालय लगेच आपल्याला बळजबरीनं साष्टांग दंडवत घालायला लावतो.
पैलतीरी पोहोचलो, की हातीपायी धड ठेवल्याबद्दल निसर्गाचे आभार मानावेत, निरोप घ्यावा आणि गाशा गुंडाळून माघारी निघावं. परतीच्या वाटेवरल्या दगडधोंड्यांशी आपली आधीच ओळख झालेली असते. आता ते तेवढे बोचत नाहीत. बर्फाळ ओढ्यात पावलं आधीइतकी सुन्न होत नाहीत. निसर्गानं आपल्याला आपलंसं करून घेतलेलं असतं. गेले काही दिवस झोपायला अंगाखाली गुबगुबीत गादी, डोक्याखाली उशी नसते. ‘खायला कोंडा अन् निजेला धोंडा’ इतकी दैना झाली नसली तरी कुठलाही ऐशोआराम मिळालेला नसतो. रोजची सवय असलेल्या आंघोळीलाही नाईलाजानं चाट दिलेली असते. तरीही आत कुठेतरी एक, नेहमीपेक्षा वेगळं समाधान असतं.
मजल-दरमजल करत आपण गावात, माणसांत परत येतो. लहानसं गाव असलं, तरी तिथलं आयुष्य मात्र आपल्या रोजच्या व्यापात मग्न असतं. कुठल्या तरी किराणा दुकानासमोर टेम्पो थांबलेला असतो आणि शहरातून भरून आणलेली पोती, खोकी उतरवून घ्यायची मालकाची लगबग चाललेली असते. एखाद्या कोपऱ्यावरच्या चहाच्या टपरीवर रोजच्यासारखा गप्पांचा फड रंगलेला असतो. कुठे चिंचोळ्या रस्त्यावर अचानक दोन गाड्या समोरासमोर येतात पण कसलेले चालक एकमेकांना खाणाखुणा करत अजिबात खरचटू न देता मोठ्या शिताफीनं गाड्या बाजूला काढतात. शहराकडे जाणारी शेवटची यष्टी पकडायला एक-दोघे हातातल्या पिशव्या सावरत घाईघाईनं निघालेले असतात. पलीकडच्या वळणावरनं पांढरा धुरळा उडवत, घरघरत यष्टी येताना दिसते. चेहऱ्यावर वयाइतक्याच सुरकुत्या पडलेले एखादे वृद्ध आजोबा घराच्या ओसरीवर निवांत बसून इतरांची धावपळ बघत स्वतःची करमणूक करून घेत असतात.
नदीकाठच्या कुठल्याश्या साध्या हॉटेलात मुक्कामाची सोय होते. आंघोळीला गरम पाणी मिळतं. अंगावर त्या कढत पाण्याचे दोन तांब्ये पडले की सगळा साचलेला थकवा, अंगावरच्या धुळीबरोबर वाहून जातो. साधंच पण गरमागरम आणि पोटभर जेवायला मिळतं, उबदार अंथरुण-पांघरूण मिळतं. तसं पाहिलं तर या आपल्या नेहमीच्याच साध्या गोष्टी; मात्र यावेळी जिवाला कित्येक पटींनी तृप्त करतात. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे पुन्हा एकदा कळतं अन् बिनघोर झोप लागते.
घरी परतल्यावर सॅकमधल्या सामानाची आवराआवर करतांना कळतं की अगदी अत्यावश्यक म्हणून कोंबलेल्या काही वस्तूही अगदी जशाच्या तश्याच परत आलेल्या आहेत. ‘जर-तर’च्या चिंतेचं गाठोडं छातीवर आणि त्या ओघानं पाठीवरही इतके दिवस उगाचच वागवलेलं असतं. महर्षी पतंजली योगसूत्रात लिहितात, ‘अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथन्तासंबोधः’. जरा हलक्याफुलक्या भाषेत सांगायचं तर अनावश्यक संचय करणं सोडलं की संचित विरघळतं, अस्तित्वाचं भान येतं अन् चित्त हलकं होतं.
थोडक्यात काय तर कसलंही ओझं जितकं कमी तितका कुठलाही प्रवास सुखाचा होतो!




















अप्रतिम लेख, फोटो आणि चित्रं.
अप्रतिम लेख, फोटो आणि चित्रं. तडक हिमालयात फिरायला निघावंसं वाटलं.
केवळ अप्रतिम
केवळ अप्रतिम
अप्रतिम लेख, फोटो आणि
अप्रतिम लेख, फोटो आणि चित्रांमुळे अजूनच उठाव आलाय.
नुकताच हिमालयातून परत आलोय त्यामुळे अजूनच जास्त भावलं आणि सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहीलं.
फोटो पाहून अन् लेख वाचून डोळे
फोटो पाहून अन् लेख वाचून डोळे आणि मन निवले.
खूप छान लेख ; तुमच्या इतर लेखांसारखाच!
अशा अनवट ठिकाणी कधी flash flood ची भीती वाटत नाही का ?
<<< थोडक्यात काय तर कसलंही
<<< थोडक्यात काय तर कसलंही ओझं जितकं कमी तितका कुठलाही प्रवास सुखाचा होतो!>>> आयुष्याच्या प्रवासाचेही असेच असते
फोटो मस्तच आहेत. निसर्गाची कमाल. पूर्ण लेखही तितकाच अप्रतिम झाला आहे.
AI चित्रे सुद्धा मस्त जमून आली आहेत.
थोडक्यात काय तर कसलंही ओझं
थोडक्यात काय तर कसलंही ओझं जितकं कमी तितका कुठलाही प्रवास सुखाचा होतो!>>> आयुष्याच्या प्रवासाचेही असेच असते Happy>>>> खरंय
केवळ अप्रतिम! लेख , एआय चित्रे आणि फोटो बद्दल तर काही बोलायलाच नको सगळंच छान जमून आलंय .
मी हिमाचल आणि कुमाऊं मध्ये
मी हिमाचल आणि कुमाऊं मध्ये तब्बल १६ वर्षे आनंदात काढली आहेत.... पहाडांत काय सुख आहे ते अनुभवलं आहे, तुम्ही जे लिहलंय त्याच्याशी बरेच कि रिलेट कर्ञ शकतो, वाचताना नॉस्टॅल्जिक झालो... वाह
धाकली परिव्रज्या मानवली की
धाकली परिव्रज्या मानवली की भरपूर.
अनुमोदना, बारंबार.
नेहेमीप्रमाणेच
नीटनेटके,
प्रत्यक्ष अनुभवाने समृद्ध लेखन,
सुंदर भाषा
आणि फोटो = ❤️
रानफुलांचे फोटो कोलाज तर ❤️❤️
तुमचा पंखा उगाच नाही मी किल्लेदार 👊
यंदाच्या लेखात फोटोप्रमाणेच
यंदाच्या लेखात फोटोप्रमाणेच AI चित्रे सुद्धा खूप सुंदर उतरली आहेत, कोणते secret app वापरले ?
तुमच्या यष्टी + वाचन वर्णनाची भुरळ पडली, अनेक महिने Himbus चा प्रत्येक व्हिडियो/ रील वेड्यासारखा बघत असे. सेम एक चीनी बंदा आहे त्याच्याही तिबेटमधल्या यष्टी वाल्या रील्स.
सुनिती - लगेच जा
सुनिती - लगेच जा


रेव्यु - <<<<मी हिमाचल आणि कुमाऊं मध्ये तब्बल १६ वर्षे आनंदात काढली आहेत>>>> काय सांगता. भाग्यवान आहात.
हर्पेन - कुठे गेला होतात ?
विवेक - काही पॉइंट्सला फ्लॅश फ्लडची थोडी भीती असते खरी पण हवामानावर अवलंबून आहे.
ऋन्मेऽऽष, मंजूताई - <<<<थोडक्यात काय तर कसलंही ओझं जितकं कमी तितका कुठलाही प्रवास सुखाचा होतो!>>>> आयुष्याच्या प्रवासाचेही असेच असते - नेमकं हेच अध्यारूत आहे
अनिंद्य - अहो सिक्रेट काय त्यात. Gemini PRO वापरलेय. Non pro पण सेम क्वालिटी पण थोडं स्लो आहे इतकंच.
Himbus चे व्हिडिओज इंटरेस्टिंग दिसतात. बघावे लागतील. चिनी कोण? डीटेल्स द्या. तिबेट माझ्या बादलीयादीत आहे, गुगल अर्थने बऱ्याचदा जाऊन येतो...
आणि हो...लोकांची गर्दी नसली की परिव्रज्या मानवतेच
वाह!!
वाह!!
वाह!!!
वाह!!!!!!!
कमाल माणूस आहात.
पुरेपूर जगताय
खूप सुंदर लेख. फोटो आणि
खूप सुंदर लेख. फोटो आणि चित्रं पण कमाल आहेत!
तुम्ही ग्रेट आहात. याआधीचेही लेख वाचले आहेत, पण प्रतिक्रिया दिल्या का आठवत नाही. वाचताना एकदम गुंगून जायला होतं नेहमीच.
ज ब र द स्त.
ज ब र द स्त.
मायबोली उघडली आणि तुमचा लेख दिसला.
आधी बरेचदा स्क्रोल केला. मग तो वाचून काढला.
मग परत वाचून काढला.
फोटोंना छान म्हणू की AI इमेज ला की लिखाणाला ?
प्रश्नच पडलाय.
नेहमीप्रमाणे बहारदार. वाचून बघूनच लगेच इथे जावे असे वाटायला लागले आहे.
रानफुलांचे कोलाज अप्रतिम.
असेच फिरत रहा आणि नवनवीन ठिकाणांचे प्रवास वर्णन लिहित रहा.
तुमचा अनुभव आणि लेख, दोन्ही
तुमचा अनुभव आणि लेख, दोन्ही उत्कृष्ट!
तुमच्यासारखंच करावं अशी इच्छा आहे पण हिम्मत नाही.
आणि हो, "लोकांची गर्दी नसली की परिव्रज्या मानवतेच" हे १०० टक्के खरंय.
सुंदर! मोहक!
सुंदर! मोहक!
सुंदर लेख आणि तितकेच सुंदर
सुंदर लेख आणि तितकेच सुंदर फोटो आणि चित्रं