भस्मबीज - भाग २०

Submitted by नितनवे on 5 September, 2026 - 13:57

भस्मबीज - भाग १९

पूर्वभाग
देवप्पाच्या घरातील भस्मशैल हस्तगत करण्याचा कल्लेश्वरचा प्रयत्न संरक्षक मंत्रांमुळे फसतो, पण तो आता वेगळा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतो. अभिजितची कुळशपथ पूर्ण झाल्यानंतर उरलेले कुळाचार आणि त्यानंतरचे कठोर एकेचाळीस दिवसांचे मंडल व्रतम त्याची खरी परीक्षा ठरणार असते, तर जूनची अंतिम रात्र जवळ येत असल्याने वेळही कमी असतो. दुसरीकडे, मल्लीला गेली तेहतीस वर्षे चंद्रिकेसाठी सहन केलेल्या अमानुष विधींची आणि स्वतःच्या वेदनेची जाणीव तीव्रतेने होते. नेहाला पडलेल्या भयानक स्वप्नात एका अघोरीने स्त्रीच्या आत्म्याला कैद केल्याचे दिसते आणि तो आत्मा गुहेतील एका विशिष्ट खडकाकडे निर्देश करतो; जागी झाल्यावर नेहा ते तपशील विसरण्यापूर्वी फोनमध्ये नोंदवू लागते.
************************************************************************************************************************

भस्मबीज - भाग २० - परतीचा प्रवास

सकाळी नेहा नाश्त्याच्या टेबलावर आली तेव्हा तिचा चेहरा थकलेला, डोळ्यांखाली काळी वर्तुळं स्पष्ट दिसत होती.
आजींनी तिच्याकडे बघताच काळजीने विचारलं, "नेहा, बरं वाटत नाहीये का? रात्रभर झोप नाही झाली वाटतं."

"मला काल रात्री एक स्वप्न पडलं. आणि ते... ते स्वप्न मला वाटतं, तुम्हा सगळ्यांना सांगायलाच हवं." नेहाने सगळ्यांकडे बघत म्हणाली.

सगळे टेबलाभोवती स्तब्ध बसले, आणि नेहाने सांगायला सुरुवात केली एकेक तपशील, जसा तिला आठवत होता तसा, कुठलाच भाग न गाळता.

"मंत्र मला स्पष्ट ऐकू आला," ती म्हणाली, आणि तिने तो जसाच्या तसा म्हणून दाखवला, "ॐ ह्रीं क्रीं फट् प्रेतराज्ञ्यै, कालरात्र्यधिष्ठात्र्यै नमः..."

आजींचा चेहरा त्या शब्दांसरशी पांढराफटक पडला. "हे... हे अघोरी विद्येतले शब्द आहेत, नेहा. इतके स्पष्ट, इतके अचूक तुला कसे आठवले?"

"मला माहीत नाही, आजी. पण ते माझ्या मनात कोरल्यासारखे आहेत, अजूनही."

तिने पुढे सांगितलं, पिशाच्च आकृत्यांचं ते वर्तुळ, त्या मृतदेहातून उठलेला आत्मा, तिची ती याचना, "माझी जिवंतपणी जेवढी विटंबना झाली तेवढी पुरे, मला आता सोडा."

मामांचे डोळे भरून आले. "लीला असंच काहीतरी बोलली असेल का, त्या शेवटच्या क्षणी?"

नेहाने त्यांचा हात धरला. "कदाचित, मामा."

पुढे तिने तो बंधन-मंत्र सांगितला आणि मग तो सर्वांत महत्त्वाचा भाग. "शेवटी, बंधन आवळलं जात असताना, त्या आत्म्याने माझ्याकडे बघितलं," नेहा म्हणाली, आवाज आता कापत होता. "आणि माझ्या मनात तिचे शब्द उमटले 'तिथे, आम्ही सगळ्या तिथेच आहोत. आमची हाडं... तिथेच...' आणि तिने एका दगडाकडे बोट दाखवलं. गुहेच्या डावीकडे, विचित्र चिरा असलेला, मोठा कातळ होता."

देवप्पांना हे सगळं कळवावं, असं सगळ्यांचं एकमत झालं.
************************************************************************************************************************
निघायच्या दिवशी स्वाती, नेहा आणि अभिजित देवप्पाच्या घरी गेले. नेहाने गेल्यागेल्या त्या स्वप्नाबद्दल देवाप्पाला सांगितले. देवप्पा बराच वेळ शांतपणे ऐकत राहिला. सांगून झाल्यावर तो म्हणाला, "नेहा, बहुधा त्या आत्म्यांना कळलं असावं कि तूच त्यांना मदत करू शकते त्यामुळेच ते तुझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत"

त्यानंतर देवप्पाने आतल्या खोलीतून एक छोटी पेटी काढली, त्यातून काळ्या दोऱ्याचे काही गंडे बाहेर काढले. प्रत्येकावर एक छोटी, तांब्याची पेटी बांधलेली, आत काहीतरी मंत्रलिखित कागद असावा.

त्याने दोन गंडे स्वातीच्या हातात दिले. "हे मुलांसाठी, दोघांच्या मनगटावर किंवा दंडावर बांध."

"हा, तुझ्यासाठी" देवप्पाने आणखी एक तिच्या हातात दिला. "तूही आता या लढाईचा भाग आहेस, स्वाती.”

अभिजितने नेहाकडे बघितलं, मग देवप्पाकडे. "आणि नेहासाठी?"

देवप्पाने क्षणभर नेहाकडे बघितलं, आणि काहीच न बोलता, ती पेटी बंद केली.

मग देवप्पा तिच्याशी कन्नडमध्ये बोलू लागला. जलद, हळू आवाजात, अभिजित आणि स्वातीला त्यातला एकही शब्द कळेना.

देवप्पाचे बोलणे ऐकून नेहाने घाबरून दोन्ही हात तोंडावर धरले. देवप्पाने तिला इशाऱ्याने भावना आवरायला सांगितल्यासारखे वाटले. नेहाने काही प्रश्न विचारले, तेही कन्नडमध्येच. देवप्पाने उत्तरं दिली, त्याचा चेहरा गंभीर, पण शांत होता. संभाषण जेमतेम दोन-तीन मिनिटं चाललं, पण अभिजितला ते खूप मोठं, खूप महत्त्वाचं वाटलं.

"देवप्पा," अभिजित म्हणाला, "नेहालाही गंडा द्या. तिलाही स्वप्नं पडतायत, तीही या सगळ्यात तितकीच गुंतलेली आहे. तिचंही रक्षण व्हायला हवं."

देवप्पाने त्याच्याकडे बघितलं, "तिला त्याची गरज नाही, अभिजित," तो हळू आवाजात म्हणाला.

"काय म्हणालात?" अभिजितने आश्चर्याने विचारलं.

"तिला गरज नाही," देवप्पा पुन्हा म्हणाला, “जा आता. वेळेवर पोहोचायचंय तुम्हाला."

देवप्पाच्या चेहऱ्यावरचा ठामपणा बघून, अभिजितने आणखी प्रश्न विचारायचं टाळलं.

गाडीत परत बसताना, त्याने नेहाकडे बघितलं. ती खिडकीबाहेर बघत होती, चेहऱ्यावर कुठलीच भावना न दाखवता, पण तिच्या डोळ्यांत काहीतरी होतं, जे अभिजितला वाचता येईना.

स्वातीने अखेर विचारलं, "नेहा, देवप्पा काय म्हणाले तुला?"

नेहाने खिडकीबाहेर बघितलं, मग स्वातीकडे वळून एक कसनुसं हसून म्हणाली. "सांगू शकत नाही, स्वाती. देवप्पांनी स्पष्ट सांगितलं की हे कुणालाच सांगायचं नाही, अगदी तुम्हालाही नाही."

अभिजितने आरशातून तिच्याकडे बघितलं, त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि चिंता दोन्ही. "पण नेहा, आपण सगळे एकत्र आहोत या लढाईत. असं काही लपवणं..."

"मीही तेच म्हणाले, सर," नेहा म्हणाली, "पण देवप्पांनी ठामपणे नकार दिला. म्हणाले, 'योग्य वेळ येईल, तेव्हा आपोआप कळेल. आत्ता नाही.'"

अभिजितला हे उत्तर पटलं नाही. 'तिला गरज नाही’. तो विचार त्याच्या मनात घर करून राहिला, संपूर्ण प्रवासभर...पण का?

गाडी घाटातून हिरव्यागार डोंगररांगांतून पुढे सरकत चालली होती. खिडकीतून मागे सरकणारं ते डोंगराळ कर्नाटक बघताना अभिजितच्या मनात एक विचित्र भावना दाटून आली. जणू तो एका वेगळ्याच जगातून परत येत होता.

लांबचा प्रवास होता जवळपास बारा-तेरा तासांचा. मध्येच त्यांनी एका ढाब्यावर थांबून जेवण घेतलं, पेट्रोल भरलं, आणि संध्याकाळ होईपर्यंत गाडी मुंबईच्या दिशेने धावतच राहिली.

संध्याकाळच्या सुमारास गाडी पुण्याजवळ नऱ्हे ब्रिजच्या त्या नेहमीच्या वाहतूक-कोंडीत अडकली. दोन्ही बाजूंनी गाड्यांची रांग, हॉर्नचा गोंगाट, आणि हळूहळू सरकणारी वाहनं.

अभिजित शांतपणे गाडी पुढे सरकवत होता. तिघेही थकलेले, घराच्या ओढीने अस्वस्थ होते. अचानक, डाव्या बाजूने एक भरधाव एसयूव्ही गर्दीतून वाट काढत घुसली, आणि त्या घाईत तिने अभिजितच्या गाडीच्या बाजूला जोरात घासलं. एक कर्कश, धातूचा आवाज, आणि गाडीच्या दरवाजावर एक लांब ओरखडा उमटला.

"अरे!" अभिजितने पटकन ब्रेक दाबला, गाडी थांबवली.

समोरची ती एसयूव्हीही थांबली. तिच्यातून तीन तरुण उतरले; तोंडात विमल, लाल डोळे, वाढलेली दाढी आणि चालण्यात एक उद्दाम बेफिकिरी.
"अय भाडखाऊ, गांजा मारून गाडी चालावतूस का?" त्यांच्यातला एक जण, सर्वांत उंच, अभिजितच्या गाडीजवळ येत ओरडला.

अभिजितने खिडकीची काच खाली केली, "तुमचीच गाडी माझ्या गाडीला घासून गेली. चूक तुमची आहे." त्याचा आवाज शांत, पण ठाम होता.

"काय म्हणलास!" तो तरुण गाडीच्या दारावर हात आपटत ओरडला. "उतर खाली, दाखावतो तुला चूक कुणाचीय! लय माज आलाय का तुला बांडगुळ्या?"

स्वातीने घाबरून अभिजितचा हात धरला. "अभिजित, नको. सोडून दे."
नेहाचा श्वास अडकला. "सर, कशाला उगाच..."

पण अभिजित आधीच दार उघडून बाहेर पडला होता.

अभिजित त्या तिघांसमोर येऊन उभा राहिला, त्याची उंची सामान्यच होती, बांधाही तसाच, पण त्याच्या उभं राहण्यात, त्याच्या नजरेत आता एक विलक्षण निर्भीडपणा होता. जो त्या तिघांनाही क्षणभर गोंधळात टाकणारा होता.

"बोल," अभिजित म्हणाला, धारदार नजर पण आवाज शांत. "काय दाखवायचंय?"

अभिजितच्या त्या अनपेक्षित शांततेने तो उंच तरुण क्षणभर अडखळला, पण मग स्वतःला सावरत अभिजितच्या शर्टाची कॉलर धरायला पुढे झेपावला.
काय झालं, हे नेमकं कुणालाच कळलं नाही पण त्या तरुणाचा हात अभिजितच्या शर्टापर्यंत पोहोचण्याआधीच, अभिजीतने त्याच्या फाडकन मुस्काटात पेटवली होती. तो फटका बसताच त्याच्या तोंडातला विमल बाजूच्या तरुणाच्या पांढऱ्या शर्टवर उडून लाल रंगाची पिचकारी उडाल्यासारखी डिझाईन तयार झाली. फटका इतका जोरदार होता की तो तरुण गाल धरून वेदनेने ओरडत गुडघ्यावर कोसळला.

बाकीचे दोघे गोंधळून एकमेकांकडे बघत राहिले. पण नेमक्या त्याच वेळी, मागच्या एका गाडीतून आणखी दोन-तीन जण उतरले त्यांच्यातल्या एकाच्या हातात कोयता चमकत होता. "काय झालं रे, ए पिंट्या?" तो कोयतावाला ओरडत पुढे आला, त्याचे साथीदार धावतच त्याच्यामागे आले.

"दादा, ह्या भाडखाउनी नंद्याला निबार हाणलाय." त्या पांढऱ्या शर्टवाल्याने अभिजितकडे बोट दाखवत सांगितले.

स्वातीने खिडकीतून हे बघितलं, आणि तिचं काळीज थडथड उडू लागलं. "अभिजित! मागे ये!"

नेहाने पटकन फोन काढला, पोलिसांना फोन लावायला.

पण अभिजितने मागे वळून बघितलंच नाही. तो त्या कोयतावाल्याकडे वळला, त्याची नजर स्थिर आणि श्वासही तितकाच शांत होता जणू समोर धारदार शस्त्र नव्हे, नुसती काठी होती.

तो तरुण कोयता उगारून धावला, "तुझ्यातर आयला तुझ्या, थांब तुझी मस्तीच काढतो मी!"

अभिजितने त्याचा वार येताच, अत्यंत सफाईने बाजूला सरकत त्या तरुणाचं मनगट पकडलं आणि उलट दिशेने वळवलं. कोयता खणकन जमिनीवर पडला, आणि तो तरुण वेदनेने किंचाळत मागे झुकला.

बघणाऱ्या गर्दीत एक खळबळ उडाली. आजूबाजूच्या गाड्यांतले लोकही आता खाली उतरून बघू लागले होते, फोन काढून व्हिडिओ करत होते.

तिसरा तरुण, जो आतापर्यंत मागे उभा होता, त्याने हे बघून पुढे यायचं धाडसच केलं नाही. तो घाबरून मागे सरकला.

अभिजितने त्या पडलेल्या कोयत्याला लाथ मारून लांब उडवलं, आणि त्या सगळ्यांकडे बघत म्हणाला, "निघताय आता इथून का अजून काही दाखवायचं राहिलंय?"

त्यांनी एकमेकांकडे बघितलं, आणि मग, कुठलाही पुढचा वाद न घालता, घाईघाईने त्यांच्या गाडीत बसून तिथून निघून गेले. त्यांच्यातला तो उंच तरुण होता त्याच्या कानातून आता रक्त वाहत होतं.

जणू काहीच घडलंच नाही अश्या अविर्भावात अभिजित गाडीजवळ परतला. स्वाती त्याच्याकडे बघत राहिली, तिच्या डोळ्यांत आश्चर्य, भीती, आणि एक विचित्र अभिमान एकाच वेळी दाटलेला. "अभिजित... हे तू... तू कसं केलंस हे?"

अभिजितने तिच्याकडे बघितलं, आणि क्षणभर, त्याच्याही डोळ्यांत एक सूक्ष्म गोंधळ उमटला जणू त्यालाही स्वतःला नीट कळत नव्हतं.
"माहीत नाही," तो गाडीत बसत म्हणाला, "प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे माझं शरीर स्वतःच हलत गेलं. जणू मला विचार करायची गरजच पडली नाही."

नेहाने त्याच्याकडे बघितलं, तिच्याही मनात तीच अस्वस्थ जाणीव होती. हा बदल आता फक्त स्वभावापुरता उरला नव्हता, तो शरीरात आणि कृतीतही उतरू लागला होता.
गाडी पुन्हा सुरू झाली, वाहतुकीच्या त्या कोंडीतून हळूहळू वाट काढत मुंबईच्या दिशेने धावू लागली.
रात्री उशिरा, मुंबईच्या वेशीत गाडी शिरली, तेव्हा तिघांचेही चेहरे थकव्याने ओढलेले होते, पण अभिजितच्या मनात आता एक वेगळीच अधीरता होती... मुलांना भेटायची.

त्याने गाडी चालवतच फोन काढून अनन्याला लावला.

"अनन्या, आम्ही जवळजवळ पोहोचलोच! नेहाला घरी सोडून पंधरा-वीस मिनिटांत घरी येऊ."

पलीकडून तिचा उत्साही, झोपाळलेला आवाज आला. "खरंच? बाबा, लवकर या! अथर्व तर आधीच झोपला होता, पण मी त्याला उठवते!"

घरी पोहोचल्यावर, दार उघडताच अथर्व आणि अनन्या दोघेही धावत आले. अथर्व थेट अभिजितच्या कमरेला बिलगला, अनन्याने स्वातीला घट्ट मिठी मारली.
"किती बारीक झालात दोघं!" स्वाती त्यांच्या चेहऱ्यांवरून हात फिरवत म्हणाली, तिचे डोळे भरून आले होते.

"तुम्हीच जास्त बारीक दिसताय," अनन्या हसत म्हणाली, पण तिची नजर अभिजितवर स्थिरावली आणि क्षणभर, त्या नजरेत एक सूक्ष्म गोंधळ उमटला.

"बाबा, तुम्ही... तुम्ही वेगळे दिसताय," ती हळूच म्हणाली.

अभिजितने तिच्याकडे बघितलं, आणि क्षणभर त्याला कळेना काय उत्तर द्यावं. "वेगळे कसे?"

"माहीत नाही नेमकं," अनन्या म्हणाली, कपाळाला आठ्या घालत, त्याच्या डोळ्यांत, त्याच्या उभं राहण्याच्या पद्धतीत काहीतरी शोधत. "पण... जास्त शार्प. जास्त... मॅचो. एकदम अल्फा."

अभिजित हसला, "gen z आणि त्यांची भाषा!" तिच्या डोक्यावरून हात फिरवत. "चला, आत जाऊया. खूप काही बोलायचंय, पण आधी सगळे विश्रांती घेऊया."
************************************************************************************************************************
दुसऱ्या दिवशी सकाळी, नाश्ता झाल्यावर, अभिजितने सगळ्या कुटुंबाला हॉलमध्ये बोलावलं. अनन्या आणि अथर्व सोफ्यावर बसले, स्वाती अभिजितच्या शेजारी.

"मुलांनो," अभिजित सुरुवात करत म्हणाला, "मला अजून जवळपास अडीच-तीन महिने कर्नाटकातच थांबावं लागणार आहे."

अथर्वचा चेहरा उतरला. "तीन महिने? पण मग तुम्ही या तीन महिन्यात घरी कधीच येणार नाही का?"

"येईन, अधूनमधून प्रयत्न करेन," अभिजित म्हणाला, "पण नियमित नाही, हे मान्य करावंच लागेल."

"तुमची परीक्षा संपली की, आई तुम्हाला घेऊन सुप्याला आजी-आजोबांकडे जाईल," अभिजित म्हणाला. "तिथे तुम्हाला मज्जा येईल, आणि मलाही निश्चिंतता राहील की तुम्ही सुरक्षित आहात."

"सुरक्षित?" अनन्याने लगेच तो शब्द पकडला. "मुंबईत आम्ही सुरक्षित नाही का?"

अभिजित आणि स्वातीने एकमेकांकडे बघितलं, हा प्रश्न टाळणं आता अवघड झालं होतं.

तसं नाही, बाळा," स्वाती लगेच म्हणाली, आवाज शक्य तितका सहज ठेवत. "पण सुप्यात आजी-आजोबा असतील, तुमची नीट काळजी घेतली जाईल."

अनन्या काही क्षण गप्प राहिली, तिची नजर अभिजितवरून स्वातीकडे, मग परत अभिजितकडे फिरत राहिली जणू ती दोघांच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म भाव वाचायचा प्रयत्न करत होती.

"ठीक आहे," ती अखेर म्हणाली, आवाजात एक प्रौढ स्वीकृती, तिच्या डोळ्यांतला तो प्रश्न पूर्णपणे विरला नव्हता.

पुढच्या दोन आठवड्यांत घरात एक विचित्र, संमिश्र वातावरण राहिलं. एका बाजूला परीक्षेची तयारी, रोजचं आयुष्य पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न, आणि दुसरीकडे, प्रत्येकाच्याच मनात ती येऊ घातलेली ताटातूट.

अभिजित रोज संध्याकाळी घरी लवकर येऊ लागला, मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करत. अभ्यासात मदत, संध्याकाळी एकत्र फिरणं, जुन्या फोटोंचे अल्बम काढून बघणं.

नेहाही अधूनमधून घरी येत राहिली, स्वातीशी, मुलांशी अधिक जवळीक साधत जणू ती आता या कुटुंबाचाच एक भाग बनू लागली होती.

एका संध्याकाळी, अनन्या तिच्या खोलीत अभ्यास करत असताना, अभिजित तिच्याजवळ येऊन बसला.

"कसा चाललाय अभ्यास?" त्याने विचारलं.

"ठीक आहे," ती म्हणाली, पुस्तकातून नजर न काढता. मग, काही क्षणांनी, तिने पुस्तक बाजूला ठेवलं आणि त्याच्याकडे वळली. "बाबा, खरं सांगा तुम्ही कशापासून तरी पळताय का? की कशाच्या तरी मागे जाताय?"

अभिजित थिजला, तिच्या त्या अनपेक्षित, अचूक प्रश्नाने.

"असं का विचारतेयस?" त्याने आवाज स्थिर ठेवायचा प्रयत्न करत कसंबसं विचारलं.

"माहीत नाही," अनन्या म्हणाली, खांदे उडवत, पण तिचे डोळे अजूनही त्याच्यावर खिळलेले. "फक्त... तुमच्या डोळ्यांत आता एक वेगळीच गोष्ट दिसते. भीतीसारखी, पण त्याहून जास्त... तयारीसारखी. It feels like you’re getting ready…ike you’re preparing yourself for something”

त्याच्या मुलीच्या त्या असामान्य निरीक्षणशक्तीने अचंबित होत अभिजितने दीर्घ श्वास घेतला, "तू खूप हुशार आहेस, अनन्या," तो हळू आवाजात म्हणाला. "इतकी की कधीकधी मला भीती वाटते."

"भीती? कशाची?"

तो काही क्षण गप्प राहिला, मग तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, "काही नाही, बाळा... लवकरच सगळं कळेल तुला. वचन देतो."

अनन्याने त्याच्याकडे बघितलं, आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान नाही, तरी एक तात्पुरती स्वीकृती उमटली जणू ती जाणून होती, आत्ता आणखी खोदून विचारण्यात अर्थ नाही.
************************************************************************************************************************
एका शनिवारी संध्याकाळी, स्वाती आणि अनन्या शेजारच्या सोसायटीत एका लग्नकार्यक्रमाला गेल्या होत्या. अभिजित ऑफिसच्या एका तातडीच्या कामासाठी बाहेर होता. अथर्व एकटाच घरी राहिला होता, टीव्हीवर त्याचा आवडता कार्यक्रम बघत.

रात्री साडेआठच्या सुमारास, अचानक टीव्हीचा आवाज विचित्र होऊ लागला जणू सिग्नल खराब झाला होता, पण चॅनेल बदलूनही तोच त्रास कायम राहिला, एक खरखरता, कर्कश आवाज जो हळूहळू शब्दांसारखा वाटू लागला.

अथर्वने गोंधळून रिमोटने टीव्ही बंद केला. खोलीत शांतता पसरली पण ती शांतता विचित्रपणे जड होती. आणि मग त्याला जाणवलं घड्याळाचा टिकटिक आवाज थांबला होता. त्याने भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितलं. काटे स्थिर होते, सात वाजून बेचाळीस मिनिटांवर थांबलेले पण खरी वेळ साडेआठ होती.

तो हळूच उठला, स्वयंपाकघराकडे पाणी प्यायला गेला. फ्रिज उघडताना त्याला जाणवलं, आतला उजेड नेहमीपेक्षा अधिक निळसर, थंड वाटत होता.

त्याने पाण्याची बाटली काढली, ग्लासात ओतली आणि ग्लासातलं पाणी बघून तो थिजला. पाणी ढवळत होतं. स्वतःहून, कुठलाही स्पर्श न होता, त्यात एक हलकासा भोवरा तयार होत होता.

अथर्वने ग्लास खाली ठेवला, हात थरथरत होते. त्याने मागे वळून बघितलं; हॉल नेहमीसारखाच रिकामा होता.

पण त्याला जाणवलं, कुठूनतरी एक मंद, संथ श्वासाचा आवाज येतोय...त्याचा स्वतःचा नाही, आणि खोलीत दुसरं कुणीच नव्हतं.

तो आवाज हळूहळू जवळ येत होता त्याच्या स्वतःच्याच मागून, अगदी मानेजवळून. त्याने प्रचंड हिंमत करून मागे वळून बघितलं. काहीच नव्हतं.

पण त्याच क्षणी, त्याच्या खांद्यावर एक थंड, ओलसर स्पर्श जाणवला जणू कुणीतरी बर्फासारखं थंड बोट त्याच्या शर्टावरून हळूच फिरवत होतं. अथर्व किंचाळला, धावत त्याच्या खोलीकडे गेला, दार बंद केलं, कडी लावली. त्याने दारावर पाठ टेकवून, धापा टाकत, फोन काढला ;आईला फोन लावायचा प्रयत्न केला, पण नेटवर्कच नव्हतं, "नो सिग्नल" असं स्क्रीनवर दिसत होतं. दाराच्या फटीखालून, हळूहळू, एक थंड हवेचा झोत आत येऊ लागला आणि त्यासोबत, तोच संथ श्वासाचा आवाज, आता दाराच्या अगदी पलीकडूनच.

"अथर्व..." एक आवाज कुजबुजला, दाराच्या फटीतून, इतका जवळ की अथर्वला तो त्याच्याच कानाशी वाटला. "तुझी ताई कुठे आहे? ती नेहमी तुझ्याजवळ का असते?"

अथर्वचं हृदय बेभान धडधडू लागलं. "जा इथून!" तो ओरडला, आवाज कापत.

"मी तिला न्यायला आले होते, पण आज ती इथे नाहीये," तो आवाज पुढे म्हणाला, आता जवळजवळ हसल्यासारखा. "आज फक्त तूच आहेस."

दाराची कडी हळूहळू, स्वतःहूनच, फिरू लागली. अथर्वने दाराला दोन्ही हातांनी धरलं, प्राणपणाने रोखायचा प्रयत्न केला आणि नेमक्या त्याच क्षणी, बाहेरच्या मुख्य दाराची बेल वाजली.

तो आवाज, ती थंड हवा, ती कडीची हालचाल सगळं एका क्षणात थांबलं. अथर्व थरथरत्या पायांनी दार उघडून बाहेर आला. हॉल पूर्णपणे सामान्य होता, घड्याळ पुन्हा टिकटिक करत होतं, बरोबर वेळ दाखवत. बेल पुन्हा वाजली. त्याने कि-होल मधून बघितलं; स्वाती आणि अनन्या होत्या. दार उघडताच अनन्याने त्याचा फिकट, घामेजलेला चेहरा बघितला, आणि तिचा चेहराही गंभीर झाला. "अथर्व, काय झालं तुला?"

अथर्व तिला बिलगला, रडू लागला आणि त्या क्षणी, स्वातीला जाणवलं, तिचा हलगर्जीपणा नडला होता. ते गंडे मुलांना बांधलेच नव्हते...ती ते विसरली होती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह....
नुसते बांधायला विसरली होती की गंडेच कुठे विसरली होती ?

नवीन प्रतिसाद लिहा