Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 27, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » कथा कादंबरी » सॉफ्टकथा - २ » Archive through April 27, 2007 « Previous Next »

Sanghamitra
Friday, April 27, 2007 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑनसाईटवरून आलेल्या एका अत्यंत दुर्बोध मेलला मी जीव तोडून री करत होते.
"आज कीबोर्डची स्ट्रेस टेस्ट चालू आहे वाटतं?" भान विसरून कीबोर्ड बडवत असल्यामुळे मी दचकले.
मागे संयुक्ता उदास चेहर्‍याने उभी होती. एकमेकींच्या चेहर्‍यावरचे हे असे भाव बघायची आम्हाला सवय आहेच.
"काय झालं आता?" तरी मी खर्‍या उत्सुकतेनं विचारलंच. कारण भाव तेच असले तरी कारणं जनरली रंगतदार असतात.
"हे बघ." संयू हात हलवायचा प्रयत्न करत म्हणाली.
आता तिच्या हातातल्या निळ्या ट्र्यावल ब्यागेकडे माझं लक्ष गेलं.
"कुठे निघालीस?" आता मी जरा घाबरले. इतकं ऑफिसातून परस्पर प्रवासाला जाण्यासारखं काय असेल? कुठले नातेवाईक वगैरे...
"अगं बोल की"
"हं...(उसासा) मी कुठली कुठं जातेय?" आता एक निराश हसू.
तिने सावकाश हातातले ओझे खाली ठेवले आणि शेजारची खुर्ची ओढून ती बसली.
" बघ ना गं. माझ्या प्रोजेक्टमधला तो मंगल पांडे आहे ना त्याचंय हे सामान. "
मंगल पांडे म्हणजे संयूचा झिपर्‍या मिशाळ टीममेट. त्याचे घर तिच्या घराजवळ आहे.
"अय्या पण मंगल पांडे ऑनसाईटला आहे ना. " इति मी.
"हो तेच ना त्याच्यासाठी दिलंय त्याच्या आईने. "
"ओह. कोण नेणार आहे ते?"
" तुझ्या टीममधला चिमणी" चिमणी हा साधारण दिड हिप्पोपोटॅमस इतका ऐवज आहे पण सतत तोंडात सिग्रेट त्यामुळे चिमणी.
"ओके. मग? दे की. "
" हो चाललेय. वैताग आलाय गं सारखे हे असले उद्योग करून. हे जाणार तिकडे. ग्रीन मनी मिळवणार.
आणि आम्ही यांच्या ब्यागा कल्याणहून धडपडत इथवर आणायच्या. वर ते मोदक खायचे."
मोदक म्हणजे किसेस नावाची चॉकलेट्स.
बरं मी काय म्हणते हे सगळे इतके वैतागवाडी आहे तर थोडे दाखवावे की आडून आडून. पण नाही कुणी विचारायचा अवकाश.
ही स्वतःहून सगळी माहिती काढते. कोण चाललंय. कधी चाललंय. जाणारा नग किती चांगला आहे?
(म्हणजे लष्कराच्या किती भाकर्‍या नेऊ शकेल.)
"तुला काय गरज होती मी पाठवते म्हणायची?" मी निरर्थक प्रश्न केला.
"नाही गं. तो म्हणत होता की फार महत्वाचं आहे. त्याच्या कसल्या गोळ्या आहेत आयुर्वेदिक. पोटदुखीसाठीच्या.
त्याच्याशिवाय त्याचं चालत नाही म्हणे."
आता मात्र मी ब्यागेकडे निरखून पाहिले.
" प्लीज हं रसा आता उघडायला नको लावू."
" नाही पण इतक्या गोळ्या?" मला खरंच कुतुहल वाटायला लागलं होतं.
"नाही गोळ्या नाहिच्चेत त्यात."
"मग?"
"बाकीचंच सामान आहे वाटतं."
" म्हणजे न उघडता तुला कसं कळलं त्यात गोळ्या नाहियेत ते?"
" त्याच्या आईने सांगितलंय. "
"त्याच्या आईने असं सांगितलं की 'आमचा मंगलने कशी गम्मत केली, गोळ्या नव्हत्याच पाठवायच्या. हेहे ' असं?"
"नाही गं बाई. गोळ्या पण पाठवायच्यात पण त्या मिळाल्या नाहीत म्हणे. उद्या देणार आहेत आणून.
आता चिमणी माझ्यावर वैतागणार आहे जाम. मी त्याला सांगितलेलं की फक्त गोळ्याच न्यायच्यात."
राग आणि हताशा दोन्हीचं मिश्रण चेहर्‍यावर थापून संयू उठली.
"नाही थांब. मला सांग यात काय आहे नक्की मग?"
" नेहमीचंच गं आपलं. पापड, कुरड्या, भोकराचं लोणचं, जानवं, कुंकू, पंचांग, पंचे आणि शिकेकाई"
संयूने एकदम उडप्याच्या हॉटेलातल्या वेटरसारखी यादी सांगितली.
" आणि आता चिमणी वैतागणार आहे. गोळ्या होत्या म्हणून तयार झालेला." निळी बॅग पुन्हा खाली ठेवत संयू म्हणाली.
"मग आता?"
"बघू. ते बघ चिमणी आला. मी जाऊन येते. मग सांगते तुला." संयू वधूपित्याच्या आतुरतेने चिमणीकडे निघाली.
मी माझा अर्धवट लिहून झालेला रीप्लाय पूर्ण करायला घेतला. तर आता तो त्या ऑनसाईट मेल इतकाच दुर्बोध वाटायला लागला.
हे सगळं मी का लिहीत होते? श्या. आता एक स्ट्रॉन्ग लाटे घशात लोटल्याशिवाय डोके चालणार नव्हते.
मी लाटेचा लोटा घेऊन माझ्या जागेवर परत आले तर संयू तिथेच उभी होती. आणि पाठमोरीसुद्धा चिंताक्रांत वाटत होती.
"बोला. काय प्रगती? " मी मशीन अन्लॉक करत विचारलं.
" चिमणी म्हणाला ठिक आहे"
" मग काय प्रॉब्लेम आहे?"
" नाही तो नाही म्हणेल असं expect केलेलं मी. त्यामुळं मला जरा विचित्र वाटतंय.एनीवेज. हुश्श. चल चारला टपरी"
अशा प्रकारे निळ्या बॅगेची सुखरूप बोळवण करून संयूमधला वधुपिता निश्चिंत मनाने आपल्या जागेकडे प्रस्थान करता झाला.
दोन दिवसांनी चिमणी तिकडे पोचणार होता. तो पोचला असावा. एकदा तिकडे पोचलं की सगळ्या टिवल्याबावल्या बंद होतात.
कामाशिवाय लोक काही बोलत नाहीत. त्यामुळे मला चिमणीची काही खबर नव्हती.
मग एक दिवस संयू परत साधारण तोच चिंताक्रांत चेहरा घेऊन आली.
"बोला" मी.
"रसा घोळ झालाय गं."
"हं ते समजलं. पुढे सांग."
"मंगल पांडेचं मेल आलंय. त्याला म्हणे सगळं सामान मिळालं नाहीये."
मला वाटलेलच धूर्त चिमणी इतक्या सहज हो म्हणाला म्हणजे काहीतरी घोळ असणार.
" म्हणजे चिमण्यानं ती बॅग दिलीच नाही मंगल ला?"
"नाही गं बॅग पोचलीय पण..
भोकराचं लोणचं गायब आहे. पापडांना कुंकू लागलंय. कुरडयांना शिकेकाईचा वास लागलाय. त्यामुळं मंगल चिडलाय. पण तो चिमणीला काही बोलू शकत नाहीये. म्हणून मला मेल केलंय फ्रस्टेट होऊन. आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोळ्या.. "
"गोळ्या? आता काय गोळ्या घालणार असं म्हणाला मंगल?"
"नाही गं त्या पोटदुखीच्या गोळ्यांबद्दल नव्हतं का सांगितलं मी? त्यासाठीच तर..." 'वही वो पल था जब मै हां कह बैठी थी' छाप भाव पुन्हा तिच्या चेहर्‍यावर सरकून गेले.
"हं काय झालं त्यांचं?"
"त्या मिळाल्याच नाहीयेत म्हणे. चिमणी विसरलाच त्या न्यायच्या"
"वा. धन्य आहे. म्हणजे अजून मूळ पोरगी बोहल्यावर नाहीच चढली" आता अजून काय बोलणार?
त्यामुळे संयू यावेळी फक्त गोळ्या या एकाच पोरीला उजवायसाठी स्थळ शोधायला लागली.
दोन दिवसांनी लंचच्या वेळी पुन्हा एक नवीन चिंता.
"अगं चिमणी वैतागलाय माझ्यावर"
"हो तो वैतागणारच की. एवढे सामान न्यायचे आणि वर मंगल बोलला असेल काहीतरी."
"नाही. एकतर तिथं कस्टमवाल्यांनी भोकराचं लोणचं नेता येणार नाही म्हणून काढून टाकायला सांगितलं.
तर ते टाकताना त्याच्या जॅकेटवर त्या लोणच्याच्या तेलाचे डाग पडलेत. शिवाय कस्टमने उरलेल्या सामानाची पण कसून जांच केली. आणि वर मंगल म्हणतोय ते एक ठीक आहे पण पापड कुरडयांचं काय?"
"तू मंगलला सांग माझ्यापाशी रडू नको. एकतर यांची कामं करा आणि वर हे ऐका" मला तर कामं न करताच सगळं ऐकावं लागत होतं संयूकडून.
हो मी आता कुण्णाऽऽऽचं काऽऽऽही(हवर पण ण इतकाच जोर होता पण तो लिहीता येत नाहीये.) पोचवणार नाही अशी संयूने प्रतिज्ञा केली.
पुढच्याच आठवड्यात मंगल ऑफिसात भेटला. आता मात्र संयूला चक्कर यायची बाकी होती. प्रोजेक्टचे शटर डाऊन झाल्याने ३ महिने आधीच परत आला म्हणे.
"तू जाम शिव्या घालायच्यास ना त्याला?" मी संयूला उसकवलं.
"जाऊ दे गं त्या गोळ्या तरी पाठवायच्या वाचल्या " म्हणजे बाई अजूनही गोळ्या पाठवायच्या तयारीत होत्याच.
आता संयूच्या चेहर्‍यावर जरा शांतता आली. मुलगी सुखाने नांदत असल्यासारखी.
एक आठवडा सुखाने गेला न गेला तोच...
पुन्हा चिंता समोर उभी राहीली.
"बोला आता काय?"
"मंगल पुन्हा नवीन प्रोजेक्टसाठी ऑनसाईटला चाललाय"
"बरं मग तू कशाला चिंता करतेयस? आता यावेळी त्याचं काही पाठवू नको"
"नाही गं मला चिमणीचं मेल आलंय. की मागच्या वेळी मी त्याचं आणलं होतं ना तसं माझं थोडंसं सामान मंगलला घेऊन यायला सांग म्हणून. त्याचा भाऊ ऑफिसात आणून देईल म्हणे."
आता संयू वधुपित्याऐवजी अयशस्वी लग्न ठरवणार्‍या (आणि दोन्ही पार्टींकडून ऐकून घेणार्‍या) मध्यस्थासारखी मंगलला शोधत होती.

समाप्त


Saee
Friday, April 27, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजा आली:-) एकदम खुसखुशीत लिहीतेस:-) मला खुपच आवडतं तुझं लिखाण.. तुझं नावसुध्दा.
तुझ्या पात्रांची नावंही भारी असतात.


Psg
Friday, April 27, 2007 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त सन्मी! :-)
हे तुझ्या ऑफिसमधे कालच घडल्यासारखं लिहिलयस. आणि 'समाप्त"च्या बोर्डसाठी खास धन्स! :-)


Lukkhi
Friday, April 27, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा,

सुरेख गोष्ट... अगदी कुठल्याही office मध्ये घडेल अशी, पण पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत उत्सुकतेने वाचली, आणि नंतर पुन्हा एकदा वाचली. भाषा आणि narration सुरेखच. एकही शब्द कमी अथवा जास्त नाही... एवढी चांगली कथा वाचायला मिळाल्याबद्दल धन्यवाद


Sneha21
Friday, April 27, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा छान आहे ........पुढिल लेखनासाठी शुभेछा

Saanchi
Friday, April 27, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच जमली आहे कथा. Wish you best luck for SOFTstory part 3

Kmayuresh2002
Friday, April 27, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मे,सही गं.. मजा आली वाचताना.. तुला मायबोलीवर परत बागडताना पाहुन छान वाटतय.. :-)

Ashwini
Friday, April 27, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, मस्त लिहिलं आहेस. आवडलं.
पण मी वाट पाहात होते दिविशची entry आता होईल, मग होईल म्हणून..
~D :-)

Asami
Friday, April 27, 2007 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फक्कड बाज बसलाय एकदम. आज HG वर lottery लागलीये. दोन धमाल कथा :-) }

Supermom
Friday, April 27, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा,
एकदम बेष्टच. मस्त लिहिलंयस.


Maitreyee
Friday, April 27, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त च गं सन्मि! लय खास:-)

Disha013
Friday, April 27, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त खुशखुशीत आहे कथा!
मोदक,मंगल पांडे,चिमणी,वधुपिता.......


Princess
Friday, April 27, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी, दिशाने perfect शब्द वापरलाय... एकदम खुसखुशीत... जमुन आलिये अगदी.

Prajaktad
Friday, April 27, 2007 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनीशी सहमत! दिविश मलाही आठवला. softkatha-1 मुळे संयु , चिमणी लक्षात होते.मस्त जमलिय कथा.

Farend
Friday, April 27, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, एकदम आवडली कथा. त्या चॉकोलेट्स ना इथेही बरेच मराठी लोक मोदकच म्हणतात :-) आणि इकडे लाटे, मोका आणि ती कडवट कॉफी पीत असले तरी भारतात तरी अजून चहा पितात असे वाटायचे, आता तेथेही लाटे वगैरे आलेले दिसतेय.

Farend
Friday, April 27, 2007 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉफ्टकथा-१ ची लिन्क कोठे आहे?

Runi
Friday, April 27, 2007 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, बढिया....मजा आ गया. एकदम छान. तुझी सॉफ्ट्कथांची लेखमाला अशीच चालु ठेव, आणि जरा लवकर लवकर लिहीत जा न गं,
रुनि


Runi
Friday, April 27, 2007 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह ते लाटे म्हणजे latte का, मला जरा उशीरा चमकलं ते फारएन्ड्ची प्रतिक्रिया वाचुन, मी त्याला लाते म्हणते त्यामुळे कदाचित पटकन कळले नाही.

Abhi_
Saturday, April 28, 2007 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मे, मस्तच गं!! ..

Sanghamitra
Saturday, April 28, 2007 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स लोक्स.
अश्विनी,प्राजक्ता इतक्या महिन्यांनंतर तुम्हाला दिविश आठवला ही पावतीच आहे माझ्यासाठी. (तेंव्हा आता भाग तीनसाठी तयार रहा.:-))
फरेंडा ही घे लिंक
/hitguj/messages/119403/119754.html?1168597188
(या लिंकचे पण देव २ मधे झकास मराठी भाषांतर होतेय. उच्चार न करता येण्यासारखे)
रूनी अगं चहाला पर्याय नाही. लाटेची लाट फक्त सॉफ्टवेअर आणि कॉल सेन्टर्स पर्यंत आलीय. आणि तरीही ऑनसाईटला गेले की लोक बायकोपेक्षा जास्त कुणाला मिस करतात तर चहाची टपरी असं खरंच मला एका टीममेटने सांगितलं. :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators