Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
bee
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » bee « Previous Next »

एक घर आसपास

जेंव्हा मला आपले एकटे राहणे अपरिहार्य आहे असे वाटले त्यावेळी मी घर बघायला सुरवात केली. होतो त्या घरात अगदी जीव गुदमरुन जात असे. शेवटी धुमसत धुमसत का होईना माझ्या मनानी घर शोधायचेच असा निर्णय घेतला. ह्यापुर्वी कधीच एकटे राहण्याची वेळ माझ्यावर आलेली नव्हती. कधी कुणाशी वाद जरी होत नसले तरी भावबंध जुळतील असेही मला कधी वाटले नाही. तर कधी ह्याच्या अगदी विरुद्ध. पटत जरी नसले तरी त्यांचा माझ्या आसपास असण्याचा केवढा तरी आधार वाटायचा. पण असला आधार तरी काय कामाचा जो मला अधिकाधिक कमकुवत करीन. घरात लहान असल्यामुळे आणि सतत आई नाहीतर बहिणीचा पदर धरून राहण्याची सवय इतकी जडली होती की बाहेरच्या जगात त्यांच्याविणा पाऊल टाकणे खचितच मला खूप कठिण गेले.. खास करून भावनिक दृष्ट्या. माझ्यापेक्षा लहानलहान मुले रात्री बेरात्री शीसूला एकटी जात त्यावेळी मला बाहेरच्या मिट्ट काळोखाची खूप भिती वाटायची. एकदा तर बाजूच्या रिकाम्या क्वार्टर मध्ये खेळता खेळता काळोख भरून आला आणि मला माहितीच पडले नाही. कुणीतरी मग त्या घराची कडी बाहेरून बंद केली आणि माझे घर अगदी लागूनच असतानाही मी जोराची आरोळी ठोकली. आईने ती ऐकली आणि माझ्या कानात फ़ुंकर घालत मला पोटाशी कवटाळले. तिच्या कुशीत शिरताना मला क्षणात सुरक्षितता जाणवली. हे आज आठवले की मला वाटते आपण किती खंबीर झालो आहोत. कित्येक दिनं मास वर्ष आपण एकटेच घालवितो कुणाचा कसलाच आधार नसताना. जेंव्हा मी घर बघायला सुरवात केली त्यावेळी जवळपास सगळी agent मंडळी माझ्या ओळखीची झाली होती. मला नेमके कसले घर हवे होते हे त्यांना कळत नव्हते आणि मलाही आपल्याला नक्की कसे घर हवे आहे ते सांगता येत नव्हते. खरे तर मला घरातले घरपण हवे होते जे नविन घरात नक्कीच नसते. ते विकत घेता येत नाही, ते निर्माण करावे लागते. फ़ोनवर ह्या agents पैकी कुणी माझा आवाज ऐकला की ते लगेच मला ओळखत आणि नाही सध्या तरी घर नाही असे सांगत. मला जेवढीकाही घरे दाखविल्या गेली त्या रिकाम्या घरात शिरताना माझ्या अंगावर सरसरून काटा उभा रहायचा. एकदा नविन घर बघताना वरुन खाली पाल माझ्या डोक्यावर फ़िरत होती. तिला पाहून मी ते घर स्विकारणे वेगळे पण आपण एकदाचे कधी इथून बाहेर पडतो असे वाटले होते. कितीतरी चांगली घरं मी बघितली असतील पण त्या रिकाम्या किंवा चिनी - मलय वस्तुंनी भरलेल्या घरात आपण राहूच शकणार नाही हे मला लगेच उमजायचे. मग हताश मनानी आहे त्या घरात जावून माझ्या बंदीस्त खोलीत विचारमग्न स्थितीत अंग झोकून द्यायचो आणि आपल्याला कधी हवासा आशियाना गवसेल ह्याचा विचार करत बसायचो. शेवटी शेवटी आहेत त्यांच्यासोबत जीव इतका विटला होता.. इतकी उबग आली होती त्यांच्यासमवे राहण्याची की परत एकदा घर की तलाश सुरू केली पण तोच अनुभव. इथल्या काही मराठी मंडळींना विचारपूस करून पाहिली पण त्यांच्याकडे एकतर कुणी paying guest म्हणून ठेवले जात नसे आणि जिथे असे असायचे तिथल्या खोल्या आधीच भरून जात असत. माझ्या मनानी एकदम कच खाल्ली होती. शेवटी एक अगदी अखेरचा प्रयत्न म्हणून माझ्या आॅफ़ीसमधील एक व्यक्ती घर खाली करून लंडनला कामानिमित्त्य जाणार होती. ते भारतीयच होते आणि त्यांचे घर सरकारी असल्यामुळे फ़र्निचरपण त्यांचेच होते. शिवाय असा नियमही होता की आपण आपले घर कुणाला transfer करू शकतो. मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या घरातील खास भारतीय वातावरणानी माझे मन लगेच प्रसन्न झाले आणि तिथल्या तिथे मी स्वप्न बघू लागलो.. इथे आपले हे सामान असेल.. तिथे ते असेल.. इथे हे ठेवू अन तिथे ते. एक दिवस विचार करून मी त्यांना होकार दिला. त्यांचे जुनेपुराने फ़र्नीचर विकत घेतले आणि ऐन श्रावण महिना होता म्हणून घरात सत्यनारायणाची पूजा करून गृहप्रवेश केला. ते भारतीय जोडपे काल संध्याकाळी सोडून गेले तर मी लगेच सकाळी तिथे पोचलो. शेजारच्या तमिळ बाईला खूप आश्चर्य वाटले त्याचे. आमची लगेच गट्टी पण जमली. नंतर ह्याच घरात आमचे कविता वाचनाचे कार्यक्रम झाले, मित्रांना house-warming ची पार्टी देऊन झाली. पहिल्याच दिवशी मी अगदी बेड रूमचे दार सताड उघडे ठेवून अंधारात गाढ झोपी गेलो. बेडरूममधेच देवघर ठेवले. आपल्याला रात्री झोप लागेपर्यंत निरांजन तेवत ठेवायचे इतके तेल ओतून माझी पूजा होते. त्या प्रकाशाचा मला कितीतरी आधार वाटतो. एकदा एक मित्र मला म्हणालाही बेडरूममध्ये देवघर नको जेंव्हा एक खोली रिकामी आहे. त्यावेळी त्याला काय समजवून सांगावे म्हणून मी जाऊ दिले. रोज सकाळी उठलो तर सिंक मध्ये मुंग्याची रांग असते. तिथे बोटानी टकटक केले तर पाच मिनिटात त्या आपल्या घरात शिरतात. समोरच्या हिरव्यागार झाडावर कावळ्याचे घरटे आहे. पण ती येतात कधी आणि जातात कधी काहीच पत्ता लागत नाही. क्वचितप्रसंगी कावळीन पिलांना भरवताना दिसते. ऐरवी साळूंक्यांचा कलकलाट असतो. बाकी सगळे काही शांत शांत असते. मध्येच इथे कधी कधी मोकळ्या जागेवर चायनीज नाटके होतात. त्यात भांड्यांची बरीच आदळ - आपट होते. आत्ता नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या योगाच्या गुरजींनी मी कुठे राहतो ह्याची विचारपूस केली त्यावेळी सध्या तरी मी एकटाच राहतो अजून दोनाचे चार हात व्हायचे आहे असे उत्तर दिले. ते म्हणाले एकटे राहणे चांगले असते योग्याला. मी मनात म्हंटले चांगले की वांगले हे माहिती नाही पण प्रेमाचे जर कुणीच सोबतीला नसले तर मग आपलपोटी स्वातंत्र्य बरे. गेल्या रविवारी कधी नव्हे तो एकाचा कामानिमित्य फ़ोन आला.. की घर हवे आहे तीन माहिन्यांसाठी. तेंव्हा मी लगेच नकार दिला. नंतर वाईटही खूप वाटले पण आपले अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि आपल्यासारख्या मनकवळ्या लोकांनाही नाईलाजास्तव खोटेनाटे बोलावे लागते. असो.. चौदा वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर मला Home sweet home!!!!! लाभले हे महत्त्वाचे.
भारतीय घराचे स्फ़ुट..

माणसाच्या मुलभुत गरजांमधे तशा सर्वच गरजा धडपड करुनच प्राप्त होतात. अन्न वस्त्राची बरोबरी करण्या इतपत सक्षम होणार्‍या कित्येकांना घर उभे करण्यासाठी मात्र तपातूनच जावे लागते. उभ्या आयुष्यात कित्येकांचे हे स्वप्न साकार देखील होत नाही. कित्येक घरांची नावे 'स्वप्न - साकार', 'श्रम - साफ़ल्य' ठेवलेली असतात. ती वाचली की वाटते, तसे घर होणे हे बहुतेकांचे एक फ़ार मोठे स्वप्न साकार होण्यासारखे आहे आणि आयुष्यभराच्या श्रमाची साफ़ल्यता त्यात आहे. 'भाड्याचे घर अन् खाली कर' अशी एक म्हण मराठी भाषेत प्रचलित आहे. अशी बेघर होण्याची वेळ येऊ नये म्हणून पै पै जोडून मनुष्य आपले बिर्‍हाड उभारतो. जिथे भाड्याचे घर दोन तीन खोल्यांचे असते तिथे हक्काचे घर म्हणजे एक पसाभर नाहणीची जागा किंवा ह्या उलट जिथे टिचभर खोलीत अर्धाउप्पर संसार पार पडलेला असतो तिथे हक्काचा बंगला तयार होतो. मात्र घर झाल्याचे सुख फ़ार असे वेगळे नसते. घर बदलताना किंवा साधे आठेक दिवस बाहेर जाताना कुटुंबवत्सल स्त्री आधी पणती तेवत ठेवून मगच घराला कुलुप लावते. बालपणी, एखाद दोन वर्ष राहून बदली झाली की सरकारी घर सोडून जाणारे संसारीक जोडपे ज्या जागेनी आपल्याला निवारा दिला तिचे आभार पणती लावून, त्या जागेवर माथे टेकवून मानत असत. घराचे आभार मानण्याची ही पद्धत मनात घर निर्माण करुनच गेली.

ईथल्या Jurong Bird Park मधे एक सोनपिवळा पक्षी आहे. मादी नरासाठी एक सुरेल गाणे म्हणते. ती म्हणते, आधी तू घर बांध मग मी तुझी प्रेयसी होऊन तुझ्याकडे येईन. त्यामुळे नर पक्षी आधी घरटे विणतो मग त्याला मादीप्रेम लाभते. ही अट मनुष्यजातीत असती तर पुरुषांना म्हातारपणच जवळ आले असते आपली राणी मिळवण्यासाठी. अर्थ चित्रपटातील पुजा नावाचे पात्र, शेवटपर्यंत तिला तिचे घर लाभत नाही. जिथे चित्रपट संपतो तिथे तिला तिची योग्य वाट जरी मिळालेली असते पण घर नाही. इजाजत मधील मायाचा, ती घर सोडून गेल्यावरही, घरातील सर्व गोष्टींवरचा तिचा स्पर्श कायम असल्यासारखा घरातील स्त्रीला वाटत राहतो. अखेरीस ते घर अनाथ रिक्त होऊन दोघींचेही होत नाही. इंदिरा संतांच्या एका कवितेत गळणार्‍या घराला, घरातील होती नव्हती भांडी अपुरी पडतात आणि अशा वेळी पावसावरचा कवयित्रीचा लटका राग एक सुंदर पाऊसगीत घेऊनच येतो. इथे झाडांची फ़ुले, फ़ांद्या, पाने तोडायला बंदी आहे. तरीही दिवाळीच्या दिवशी सर्वांसमक्ष मी आंब्याच्या चार डहाळ्या टाचेवर उंच उड्या मारून तोडल्याच. कोण बघत आहे आणि कोण काय म्हणेल मला ह्याची तमा नव्हती. घरी पोचल्यावर एक सुस्कारा टाकला. सुतळी घेतली आणि सर्व दारांना तोरण बांधले. आंब्याची कोवळी कोवळी आणि लांब लांब पाने वार्‍याच्या झुळकेने उडताना त्यांचा मधुर गंध घरात दरवळला आणि क्षणात एक चैत्यन्याची लहर माझ्या देहात पसरली.

जवळच्या परिसरातील चिनी वातावरण बघुन माझे लक्ष मी जेंव्हा घरातल्याच वस्तुंवर वळवतो तेंव्हा हरेक वस्तू रूप - रंग - गंधाला अस्सल भारतीय असावी असे मला मनापासून वाटते. म्हणून घरात, श्रीगणेशाची ज्वालामुखीच्या काळ्याकभिन्न आणि सछिद्र पाषाणूतून घडवलेली एक मुर्ती मी प्रवेशदाराशीच ठेवली आहे. एकदा मुर्तीला वाहीलेल्या फ़ुलापानांचे निर्माल्य गोळा करताना सुपारी, विड्याची पाने, अक्षता, वाळलेली दुर्वा, जास्वंदाचे फ़ुल खूप काही गोळा केले पण ती कोरी करकरीत मुर्ती बघवेना मग ते सर्व निर्माल्य तसेच तिथे राहू दिले. त्यातून केवढा तरी भारतीयपणा प्रकट होतो हे तेंव्हा मला कळले. एकदा वृषालीकडे मी नाटकाच्या तालमिला गेलो. चिनी आणि पाश्चिमात्त्य वस्तुनी मढवलेले ते घर मला बघवेना. इतक्यातच स्वैपाकघरात कांद्याचे शिंकडे मी बघितले आणि चेहर्‍यावर आपलेपणा झळकला. तेंव्हापासून माझ्याही घरात मी कांद्याचे शिंकडे आणण्याचा विचार करतो आहे. तेवढाच घराचा भारतीयपणा वाढेल. कुठल्याशा तरी नाटकाच्या नेपथ्यात सर्व फ़ुलदाण्या फ़ुलांसहीत भारतीय वाटत नव्हत्या. इतक्यात कुठून तरी खरीखुरी झेंडूची फ़ुले मिळाली आणि ती फ़ुले फ़ुलदाणीत ठेवताच सर्व नेपथ्याचा चेहरामोहरा जणू बदलून गेल्यासारखा वाटला.

नाही म्हणता म्हणता मी युरपच्या प्रवासात बर्‍याच वस्तू विकत घेतल्या. त्या वस्तू माझ्या घरात सुशोभित दिसतील अशी त्यावेळी एक भावना होती. पण शेवटी मी त्या सर्व वस्तू घरी अकोल्याला घेऊन गेलो. त्या वस्तू इतक्या नाजूकसाजूक आणि कोमलमुलायम होत्या की त्या भारतात आणताना पावलापरिस मला त्यांची काळजी वाटायची. त्या फ़ुटतील तडकतील तर नाही ना. एकदाचे घरी पोचल्यानंतर एकेक वस्तू मी बाहेर काढली आणि दुसर्‍याच दिवशी एक भले मोठे कपाट तयार करायला टाकले. आज ते कपाट परदेशातील वस्तूंनी खच्चून भरलेले आहे. पण मला मात्र माझे घर भारतीय वस्तूंनी नुसते भरलेलेच नाही तर भारतीयपणाने भारलेले देखील हवे आहे!

बालकवींचा श्रावणमास.. बारोमास..

मध्यावर आलेल्या शरद ऋतुच्या गुलाबी थंडीला आणि निळ्याभोर अभ्ररहीत आकाशाला खोलवर भरून आलेल्या हृदयाने निरोपाचे उसासे टाकत कसाबसा टाटा करून पहिल्यांदाच सिंगापोरला आगमन केले त्यावेळी ह्या चिमुकल्या बेटावर हिरवीकंच, पावसाने सुस्नात न्हावून निघालेली आणि शतसुर्य झळकतील अशी पानापानात चकाकणारी आकृतीबंध झाडे बघून आपण श्रावण महिन्यात पदार्पन केले की काय असे मला वाटले. त्यात ऊनपावसाची सारखी रदबदली सुरू होती. रस्ते निसरडे नव्हते हवा मात्र कुंद होती. सादळ वातावरणात देखील तांदळाचे कुरकुरीत मुरुक्कु विकणारी एक स्थानिक तमिळ कन्या भेटली. रात्रीच्या वेळी आकाशात शरदाच्या टपोर दुधाळ चांदण्या नव्हत्या.. बहुतेक ढगामागे दडल्या असतील पण नंतर कळले त्या निऑनच्या प्रकाशात लुप्त झाल्या आहेत कारण आजवर कधीच अगदी अवसेच्या रातीदेखील तारकांनी खच्चून भरलेले आकाश मी इथे पाहिले नाही. थंडीतून बाहेर पडून थेट वर्षाऋतु अनुभवत होतो. दाहक वैशाख मागे कुठे तरी हरवला अशी गमतीदार कल्पना डोक्यात येत होती. प्रवास करताना वाटेत कुठेतरी चुकार शेंगा नि चुकारच लालभडक फ़ुले वागविणारा गुलमोहोर दृष्टीस आला की ह्या गमतीदार कल्पनाचे कटू वास्तवात रुपांतर होई कारण चिनी संस्कृतीला तर दूरच पण इथल्या निसर्गालाही मी माझ्या हृदयात अजून स्थान दिले नव्हते. देशी थंडीमुळे भुरकट झालेली त्वचा, काळवंडलेले कोपर, उललेले ओठ विदेशी हवेतील ओलाव्यामुळे पुन्हा एकदा आपल्या पुर्वरुपात येत होती. अवेळीच होणारा हा बदल न्ह्याहाळताना उगाच मला धूक्याची शाल पांघरणार्‍या आणि कोवळ्या गव्हाळ उन्हाची ऊब देणार्‍या पौषाची आठवण होत होती कारण गोणपाट नाही तर पोत्यावर बसून कुडकुडणार्‍या देहाचे सरंक्षण करण्यासाठी ऊन खात बसण्याचा पौष हा खास महिना. दवाने भिजलेला वाळका काडीकचरा नि विझू विझू होत जाणारी धुराने डोळ्यात पाणी आणणारी त्याची शेकोटी नकोशी झालेली असते तो महिना. बाजारहाट करताना मटाराच्या शेंगा इथे मिळत नाही हे ऐकून जिभ हळहळली. इथे प्राजक्त फ़ुलत नाही.. तो दिसतही नाही ही उणिव खट्टू करून गेली. इथे काय मिळते त्यापेक्षा काय नाही मिळत ह्याची यादी तयार होत होती. मग न मिळणार्‍या गोष्टीवर पर्याय शोधणे, अनुभवी देशी लोकांशी ओळखी करून त्यांची जीवनशैली अंगीकारणे आणि आजवर आपण जसे जगत आलो त्या शैलीत खूपसे बदल, वर तेही मनाविरुद्ध, करून घेणे एकदमच एकाचवेळी अंगावर आले. कुठेतरी आपली संस्कृती जोपासण्याची अस्मिता दुखावल्या गेली. आगंतुक म्हणून नवखेपणा तेवढ्यापुरता बरा वाटला खरा पण चार दिनकी चांदणी म्हणतात त्याप्रमाणे नंतर काही दिवसातच आपली माती अन् आपलीच माणसं ह्यांची गरज भासू लागली. इथे आणि बारोमास पावसाळा म्हंटल्यानंतर एक छत्री घरी, एक ऑफ़ीसात आणि एक सोबत न्याव्या लागणार्‍या बॅगेत अशा एकूण तीन छत्र्यांचा बंदोबस्त करावा लागला. त्यात इथल्या छत्र्या दिसायला सुंदर जरी असल्या तरी वार्‍याच्या एका झोताने उलट्या तिलट्या होऊन मोडून पडणार्‍या. काही चुकुन गाडीत किंवा ट्रेनमधे विसरून राहणार्‍या. काही कुणी उसण्या घेऊन परत न केलेल्याही आहेतच. अर्थात कैक छत्र्यांशी माझा पाला पडला.

to be continued..

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner bee Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators