कारखान्याची गोष्ट ( गूढ कथा --दिवाळी अंकात प्रकाशित )

Submitted by मुरारी on 15 November, 2020 - 20:41

कारखान्याची गोष्ट

नव्याने स्किम मध्ये उभ्या राहिलेल्या त्या अनेक इमारती असलेल्या सोसायटीची ती पहिलीच दिवाळी होती. शहरे भरली, मग उपनगरे ,आता त्याच्याही आत आत जाऊन निसर्गाच्या सानिध्यातल्या जाहिराती करुन नागर वस्ती उभी राहायला लागली. मुळची जंगले, शेते, पाणठळ जागा, मसणवाट, नुसत्याच्या रिकाम्या ओसाड जागा सगळे साफ झाले, उत्तुंग टाॅवर उभे राहीले, दुकाने, हाॅटेल्स,माॅल्स
सगळीकडे झगमगाट आला, मूळच्या बुऱ्या वाईट निर्यास करणाऱ्या शक्तीच्या वरची ही दुनिया. लांबून राहायला आलेले लोकं, त्यांना इथे २०-२५ वर्षांपूर्वी काय असावे याची काय कल्पना?

सूर्यकिरण एनेक्स पण त्या रेल्वेमार्गालगतच्या नव्याने उभ्या राहिलेल्या अनेकशे नविन सोसायट्यांसारखीच एक. पुर्वी इथे सगळी लांबवर पसरलेली भाताची शेते होती.मधुनच सापासारखी जाणारी बारीकशी रेल्वेलाईन, पश्चिमेला परत शेते त्यापुढे खाडीचे अथांग पाणी, त्याही पलीकडे लांबवर दिसणाऱ्या हिरवट टेकड्या.खाडीवर मावळणारा सूर्य फारच सुंदर दिसायचा, सूर्यकिरण च्या डेव्हलपर ने अशाच मोक्याच्या जागी ही इमारत उभारली होती, गच्चीतुन भोवताल सुरेखच दिसायचा.

जवळजवळ दोनशे कुटुंब तिथे राहायला होती. पहिलीच दिवाळी असल्याने प्रवेशद्वारावरच मोठा आकाश कंदिल उभारलेला होता, आतल्या गार्डन, स्विमिंगपुल, प्ले एरिया सगळीकडेच भव्य रोषणाई केलेली होती, सगळी मुले फटाके उडवण्यात दंग होती. आया त्यांना सावरायला पळत होत्या, मोठी मुले फोटो काढण्यात गप्पा मारण्यात गुंग होती, एकूण उत्साहाचेच वातावरण होते.
बी विंग च्या गच्चीवर पण असाच एक कंपू फराळ आणि गप्पा मारण्यात दंग होता, तसे प्रत्येकाचेच छोटे छोटे गट पडलेले होते, सगळेच नविन शेजारी असल्याने नुकत्याच ओळखी होत होत्या, सोसायटी मिटिंग मध्ये नविन नविन बेत रचले जात होते, पहिलीच दिवाळी दणक्यात सुरु झाल्याने सगळेच खुष होते.
पण असे उत्सव साजरे करायचे म्हणजे कोणतरी लिडर लागतोच ते काम पाटील नी स्वतः वर घेतलेले होते.
साधारण सत्तरीचे पाटील म्हणजे उत्साहाने फसफसलेले रसायन, त्यांची बायको पण तशीच, दोघे सदॆव अॅक्टिव असायचे, प्रत्येक सण, उत्सव, गणपती असो, नवरात्र असो सगळे त्यांच्याकडे दणक्यात साजरे व्हायचे, दर शुक्रवार शनिवार गच्चीत आसपासच्या लोकांना घेऊन गप्पा मारणे हा तर पाटीलांचा आवडता छंद, बाकीच्यांना पण पाटील आवडायचे, हसतखेळत वातावरण असायचे, शिवाय पाटील हे एकमेव असे होते जे पूर्वीपासून याच गावात वाढलेले होते. बाकी सगळेच कुठून कुठून बाहेरून आलेले. त्यामुळे पाटीलांकडे इथल्या प्रत्येक गोष्टीचा इतिहास तयार असायचा, विकेंडला कधीकधी एखादे लाईट ड्रिंक, सोबत मिसेस पाटिल नी तळलेले मासे, गप्पांना उधाण यायचे. सगळेच मग नविन उत्साहाने नविन आठवड्याला तयार व्हायचे.
आजही नेहमीचा कंपू, पाटील, कुलकर्णी , सावंत, मुर्ती, बर्वे,कांबळे,नायक आणि एक दोन गच्चीवर फराळ झोडत आणि फटाक्यांची आतिषबाजी बघण्यात रमलेले होते.
पाटील काका याचे सगळे श्रेय तुम्हाला, नायक म्हणाला. तुम्ही इतके अँक्टिव्ह नसता तर लोक स्वतः हुन आलीच नसती, तुम्ही घराघरात जाऊन सगळ्यांना ओढून आणलेत ,पण इट पेज आॅफ, एक धक्का लागतो फक्त ,आता सगळे स्वतः हुन एंजाॅय करतायेत.
पाटीलांनी प्रत्युत्तरादाखल फक्त हातातला ग्लास वर केला आणि चिवड्याचा बकाणा भरला. बोलत बोलत बर्वे आणि कांबळे गच्चीच्या पश्चिमेस आले ,एका आकाशात फुटलेल्या मोठ्या फटाक्याने सभोवताल उजळुन निघाला आणि रेल्वेलाईन पल्याडच्या खाडीपाशीचा एक जुना कारखाना त्या उजेडात क्षणभर दोघांना दिसला आणि क्षणात अंधारात गुडुप झाला.

"बर्वे तुम्ही कधी रेल्वेलाईन क्राॅस करुन पलिकडे गेला आहात काहो? " कांबळेने सहज विचारले,
गणपती विसर्जनाला गेलेलो की, छान घाट बांधलाय, खाडी बाजूलाच असल्याने तिथे काही बांधकाम होण्याची शक्यता नाही, आपल्याला हा व्यु कायम मिळणार.बर्वे चकली तोडत म्हणाले
अहो घाट बराच मागच्या बाजूला, हा आत्ता तो लांबचा कारखाना पाहिलात का? बंद. ,पडझड झालेले बांधकाम आहे, त्यावरचे ते एक्झाॅस्ट चे पूर्वीचे फॅन मुंडकी ओळीने लावल्यागत वाटतात, बाजुची भलिमोठी चिमणी, मला जाम आकर्षण आहे त्याचे पण माहिती मिळत नाही, ती जागा रेल्वेची असल्याने जाऊही देत नाहीत.संध्याकाळच्या वेळी माझ्या बेडरुम मधून तो कारखाना मी पाहतो, काहीतरी अनैसर्गिक जिवंतता जाणवते, भलेमोठे गर्डर, जुन्या मशिनरी, तुटलेले बाॅयलर्स जुनाट बाहेर येणार्या रेल्वेलाईन्स, एखाद दुसरा जुनाट मालडबा, पण याहीपलिकडे काहीतरी जाणवते, काय तेही सांगता येत नाही, असे वाटते तिथे अजूनही कोणाचा तरी वावर असावा,बर्याचदा मी अगदी दुर्बिण घेऊनही पाहिलेले आहे ,पण कोणीही दिसलेले नाही, साधे कुत्रे, किंवा इतर प्राणी पक्षी कोणीही दिसलेले नाही,तो सगळा भाग बाहेरील जगापासुन अनटच्ड वाटतो.

हे एकून बर्वे एकदम सावरून उभे राहीले,
कांबळे अहो काय सांगता काय, seems interesting! !!
मग आपण पाटलांनाच विचारू की ,रेल्वेतुनच रिटायर झालेत, सगळी कुंडली मिळेल तुम्हाला.
ओ पाटील, या जरा इकडे, बर्व्यांनी हाक मारताच पाटील उठून आले . पाटिलांसोबत बाकी मंडळी पण जमा झाली. कारखान्याचा विषय निघताच पाटलांचा चेहरा जरा कठिण झाला, नेहमीचे हास्य मावळले,
तरी घसा खाकरत त्यांनी सांगितले, अहो त्या भंगार पाॅवर हाऊस चा कुठे विषय काढायचा, काही नाही तिथे. बंद आहे अनेक वर्षे
तेवढ्यात पाटलांचा मुलगाच म्हणाला, बाबा, आजोबा होते ना इथे कामाला, पाटलांची नजर तोवर दुर अंधारात कारखान्यापाशी पोहोचलेली होती.
होते खरे. . . काय की तो विषय जरा भयानक आहे.
मग कांबळे म्हणाले की पाटील सांगा की जरा, ती वास्तू मला विचित्र वाटते. इतकी डिप्रेस्ड इमारत माझ्या पाहण्यात अजुन आलेली नाही.
बाकी सर्वांनी आग्रह केल्यावर मग पाटील म्हणाले, ठिके एक काम करु सगळे जेऊन खाऊन वर या, उद्या सुट्टीच आहे तशीही रात्री गप्पा मारु.फटाक्यांच्या गदारोळात सगळे मेंबर पांगले. फक्त पाटील एकटे शुन्यात बघत उभेच राहिले.
११ च्या दरम्यान सगळी मंडळी गाद्या मॅट्स घेऊन वर आली सोबत पुन्हा ड्रिंक्स आणि खायचा बेत होताच. थंडी सुरेख चढली होती.
फटाक्यांचा आवाज थंडावला होता, एखाद दोन चुकार मध्येच फुटुन दिवाळी जागवत होते. सगळे जमले आणि पाटीलांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.

कारखान्याची गोष्ट

त्यावेळी हे शहर नव्हते, गाव होते अगदी लहान खेडे, रेल्वे स्टेशन म्हणजे काय तर एक सिंगल निमुळता प्लॅटफॉर्म. तुम्ही आता बघताय तसे भव्य स्टेशन नव्हते. पण गावाला महत्व या पाॅवर हाऊस मुळे होते. स्पेशल त्यासाठी हे स्टेशन बांधले. समुद्रामार्गे येणारा कोळसा खाडीतुन इथे आणायचा त्यापासून वीज निर्मिती करून ती रेल्वे वापरायची. लहानसे युनिट होते पण महत्वाचे होते. अधिकार्यांसाठी टेकडीवर बंगले होते, आणि कामगारांसाठी अगदी स्टेशन लगत लहान लहान घरे. बाकी सगळी शेते आणि जंगले , एकही बिल्डिंग नव्हती.
माझे बाबा, बाॅयलर सांभाळायचे ,तेही कामगारच पण थोडी वरची लेवल. ते त्यांच्या इंग्रज बाॅस च्या मर्जीतले होते.आसपास सगळी शेते, आमची घरे ओळीने मग मध्ये रेल्वे लाईन त्या पलिकडे कारखाना.

कारखान्यातील कोळशाने अख्ख्या गावावर काळी राख पसरून जायची, पण आम्हाला काहीच विशेष वाटायचे नाही. सकाळ संध्याकाळ रात्र त्रिकाळ मोठा भोंगा वाजायचा . तिन्ही पाळ्यांमध्ये काम चालायचे.
माझे बाबा दुपारी जेऊन कारखान्यात जायचे, घराबाहेरुन त्यांना टाटा करायचो, ते मग रेल्वे लाईन क्राॅस करायचे तिथे उभे राहून बाळ्या अशी हाक मारायचे, परत टाटा करायचे आणि खाली उतरून हळूहळू दिसेनासे व्हायचे. रात्री ते येईपर्यंत मला झोप यायची नाही.भोंगा वाजला की मी पायरीवर बसून त्यांची वाट बघायचो,आई पण सोबत असायची. साधारण अकरा च्या दरम्यान रोज एक मालगाडी नियमित धडधडत जायची ती गेली की . समोरच्या बाजुला बाबा आणि त्यांचे दोन तिन मित्र हातात कंदील घेऊन दिसायचे, तिथुन ते परत बाळ्या म्हणुन हाक टाकत, मी इथुन बाबा म्हणुन ओरडे, रेल्वे लाईन क्राँस करुन मग एकमेकांचा निरोप घेउन , घरी येत. जेवताना मला कारखान्यातल्या गोष्टी सांगत. आमचे लहानसे सुखी कुटुंब होते पण त्याला नियतीची दृष्ट लागली. एक दिवस संध्याकाळच्या वेळी मी शेतात असाच फिरत होतो,आणि तेवढ्यात भयंकर कानठळ्या बसवणारा आवाज आला, काही कळायच्या आत काळ्या राखेचा ज्वालामुखी आकाशात फुटला. आणि आगीचे लोळ दिसायला लागले.जोरजोरात भोंगे वाजायला लागले. मला कळेनाच मी धावत घरी आलो, भयानक गर्दी जमलेली होती, सगळे गावकरी आरडाओरडा करत होते. कारखाना आगीच्या ज्वाळांंमध्ये लपेटलेला होता.
मला आई भाऊ कोणीही दिसेनात मी फक्त एका पायरीवर हतबल रडत बसुन राहीलो. बाबांच्या आठवणीने पोटात ढवळायला लागले आणि शुद्ध हरपली.

जाग आली तेव्हा रात्र दिसत होती. समोर कारखाना तसाच धुमसत होता, पण आता जवळ आई होती भाऊ पण होता, आईची अवस्था रडून बिकट झालेली होती. आम्ही तसेच थरथरत बसुन रात्र काढली.

तब्बल दोन दिवसांनी आग आटोक्यात आली, शेकडो माणसे दगावली होती, बाॅयलर्चेच स्फोट झालेले होते. माझे बाबाही त्यातच दगावले मग तो कारखाना मग बंदच पडला, काही रक्कम सरकारने दिली. आमच्यावर आभाळच कोसळले.

आईने MIDC मध्ये एक लहान नोकरी करायला सुरुवात केली.मी शाळा आणि रेल्वे कँटीन मध्ये नोकरी केली. कसतरी करून दिवस रेटत राहिलो.
पण अजुनही मला रात्रीची झोप येईनाशी झाली,अकरा वाजले, की पायरीवर बसुन राहायचो.पुर्वी जिथे पिवळ्या लाईट्स ची रोषणाई असणारा कारखाना दिसायचा तिथे आता फक्त अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. धुक्याची चादर पसरलेली म्हणा किंवा अधुन मधून लहान लहान आगी पेटायच्या म्हणा, सतत एक धुरकट वलय दिसायचे. खाली जमिनीत फाँस्फरस च्या टाक्या बनवलेल्या होत्या, त्यातून हिरवट गॅस बाहेर पडत राहायच्या
अकराची मालगाडी अजुनही धडधडत जायची. समोर माझे वडिल दिसतात का ही वेडी आशा असायची.

अशीच वर्षे लोटली परीक्षा देत देत मी आता रेल्वेतच नोकरीला लागलो. स्टेशन मास्तर म्हणून. दिवस रात्र अशा दोन्ही शिफ्ट लागायच्या, स्टेशन वरून तो कारखाना अजुन स्पष्ट दिसायचा. रेल्वेलाइनीपलीकडे उतार होता, खाली मोकळी जमिन तिथुन अर्धा किलोमिटर अंतरावर कारखाना. त्यावर्षी अजुन एक घटना घडली.
त्याने अख्खे आयुष्य बदलून गेले.
मी असाच ड्युटी वर होतो, आणि सकाळचा पेपर वाचत बसलेलो, आज होणार उल्का वर्षाव. रात्री ११-२ यावेळेत. ५०० वर्षातून येणार्या संधीचा फायदा घ्या.घडाळ्यात पाहिले १०:३० वाजले होते.गंमत म्हणुन मी फलाटाच्या एकदम कडेपर्यंत चालत गेलो, इथे अता दिवे नव्हते. वर मोकळे आकाश होते, सहज नजर पुन्हा कारखान्याच्या दिशेने गेली. तिच भयाण गोठलेली शांतता आणि हिरवट गँस चा तिखटसर वास
हळूहळू चक्क आकाशात काही उल्का पडताना दिसू लागल्या, माझ्यासाठी नवीनच होते. मी डोळे विस्फारून बघायला लागलो, एक चमकता बाण तर सरळ एकदम खालती येऊन त्या कारखान्यावरच पडला, वीज कोसळते तसा आवाज झाला, मी घाबरुन मागे पळत शेड मध्ये आलो. छातीत धडधडत होते. तसाच बसुन राहिलो. १२ वाजता माझी शिफ्ट संपली हँडोवर केले आणि मी घरी यायला निघालो, घर काय पाच मिनिटावर, फलाट संपला, लाईन क्राॅस केली की समोर आमची बैठी घरे
फलाटाच्या कडेला आलो आणि थबकलोच . कारखान्यात अंधुक उजेड दिसत होता, कसलेतरी अस्तित्व. मी डोळे चोळुन पुन्हा पाहिले. कसलातरी उजेडच होता,हिरवट, आग नव्हती लागलेली,हा अतिशय मंद उजेड होता. मी पुन्हा पुन्हा बघत होतो. अजुन एक मेंदुला धक्का बसला, ट्रॅकपलिकडे झाडित कोणीतरी उभे होते,लवलवलणारे काहीतरी, तिथेही हिरवट प्रकाश पसरलेला होता. मी हातातील बँटरीचा झोत तिथे टाकला तर कोणीच दिसले नाही, पण झाड सळसळत होती ( वार्याने?) भितीने मी पटापट घरी आलो, दार लावुन घेतले , अख्खी रात्र विचित्र गेली डोळ्यासमोर कारखान्यात पडणार्या उल्केचे चित्र येत होते.
सकाळी उठलो अंगात ताप भरलेला होता, आई आणि भाऊ गावाला गेलेले होते, मी एकटाच होतो. मग सुट्टी टाकली आणि पडुनच राहिलो, मग चांगली झोप लागली ती थेट संध्याकाळी ४ ला जाग आली. तेव्हा टिव्ही मोबाईल काहीच नव्हते. लाईट पण दिवसातले जेमतेम २-३ तास असायचे बाकी मेणबत्ती आणि कंदीलावरच काम.
उठून चहा करुन घेतला. जेवायची तयारी केली. आणि पुन्हा पडून राहिलो. ८ च्या दरम्यान जेऊन घेतले आणि रेडियोवर बातम्या एकल्या कालच्या उल्कावर्षावाची बातमी होतीच. ती एकली आणि पुन्हा भिती दाटून आली , कालचे दिसलेले आकार . रेडियो बंद केला आणि बाहेर बसुन राहिलो. समोर लांब अंधारात कारखाना होताच. काहीच सुचत नव्हते काय नक्की आपल्याला दिसले. दिवसभर झोपल्याने आता झोप येत नव्हती, बल्बच्या प्रकाशात म काहीतरी वाचत बसलो. रात्री दिवे गेले मग वाचनही बंद झाले, गरम व्हायला लागले,उठून दार उघडले, आणि पायरीवर बसलो. बाहेर चांदणे पसरलेले होते. दूरवरून इंजिनाचा आवाज एकायला यायला लागला,मालगाडीची वेळ, दोन मिनिटात धडधडत तो अजस्त्र ६०-७० डब्यांचा साप अंधाराला कापत निघुन गेला. उडलेली धुळ खाली बसली, आणि मग ते झाले,
मला'बाळ्या'?? अशी हाक ऎकु आली. तो आवाज माझ्या ओळखीचा होता, ते बाबा होते, पण आवाजात आता खुपच बदल झाल्यासारखा वाटत होता, कोणीतरी चिडवुन, वेंगाळत बोलवल्यासारखे, परत हाक एकु आली,आणि मागुन हसल्यासारखी खसखस. मी हादरलो. भितीच्या लाटा अंगावरुन जायला लागल्या, हे कसे शक्य आहे,
समोर रेल्वे लाईन पल्याड कोणतरी उभे होते, अंगावरच्या चिंध्या वार्यावर फरफरत होत्या, वर केशरी चंद्राचे बिंब, समोरील आकार हात पुढे करून बोलवत होता. जांभळट वलये फिरत होती, तो आकार स्पष्ट नव्हता धुरकट , मला बोलवत होता.
बाळ्या. .
मी उठून हळूहळू समोर चालायला लागलो, समोरून ते खदखदकत मला बोलवत होते. एक मन सांगत होते हे तुझे बाबा नाहीयेत मागे फिर, पण अवयवांवर माझा काहीच ताबा नव्हता, ती जांभळी वलये, ते धुके, तो केशरी चंद्र. . . गुढ लाटा मला बोलवत होत्या, मी एक एक पाऊल टाकत पुढे निघालो.
तेवढ्यात कोणीतरी मागुन मला खेचले. मी भानावर आलो, शेजारचे आण्णा होते. त्यांनी खेचले आणि ओरडून विचारले अरे काय जीव द्यायला निघालास का काय, का झोपेत चालत होतास ,
मागे फिर
मी मागे आलो, ते रात्रपाळी संपवून घरी येत होते, मी असा रेल्वे लाईन वर उभा बघुन ते घाबरले. कसतरी त्यांना समजवुन मी घरी आलो. चांगलाच सणकुन ताप भरलेला होता.
दुसर्या दिवशी सरळ तालुक्याला जाऊन डाॅक्टर गाठला. त्याने तिथे सरळ झोपवुन सलाईन चढवले इतका अशक्तपणा आलेला होता.
डोक्यात हजारो विचार एकत्र सुरु होते, हा काय प्रकार आहे, मला भास होतायेत? की वेड लागले आहे? पण हे इतके वर्ष जाणवले नाही त्या उल्कापातासोबतच या घटना सुरु झाल्या कुठली अनैसर्गिक शक्ती तिकडे वावरतेय , अवकाशातून कुठुन आली, तिला माझ्या भुतकाळाचे ज्ञान कसे, काहीच समजत नव्हते कसलीच लिंक लागत नव्हती.
याला उत्तर एकच स्वतः जाऊन शहानिशा करणे. हा एक भयानक मार्ग होता पण असे भितीत जगण्यापेक्षा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावलेला बरा. घरी आलो आणि एक दोन दिवस रात्री फक्त नजर ठेवायचे ठरवले काहीही झाले तरी घराबाहेर पडायचे नाही. रात्री ११ च्या आसपास दारात बसलो.खिडकीला एक घट्ट दोरखंड बांधला, तो स्वतः लाही बांधून घेतला. मालगाडी नेहमीप्रमाणे निघून गेली,आणि समोरच्या काळोखात पुन्हा कोणतरी हातात कंदिल घेउन लवलवायला लागले.
ये बाळ्या ये.
पुन्हा जांभळी वलये तिथुन निघून माझ्यापर्यंत यायला लागली. चिंध्या ,धुरकट मानवी आकार,वार्यावर लयीत डोलायला लागला, मी उभा राहून चालायला लागलो.पण यावेळी दोरखंडाने त्याचे काम बजावले, दारात अडकून धडपडलो आणि भानावर आलो, समोरचा देखावा तसाच डुचळमत होता, संभ्रमाच्या लाटांची भरती येत होती.
कसातरी आत शिरलो आणि दार लावुन टाकले. हा नक्की भास नव्हता, हे खरे घडत होते. उद्या यावर विचार करायचा ठरवुन मी झोपुन गेलो.
सकाळी उठल्यावर बाजारात जाऊन काही खरेदी केली, एक जाडजूड काठी विकत आणली. एक ६ सेल्स चा पाॅवरफुल टाँर्च,एक जोरात आवाज करणारी स्काऊटची शिटी.अजून काही बारीक सारीक सामान.येताना गावातल्या मारूतीच्या देवळात जाऊन त्याला सगळी गोष्ट मनोमन सांगितली, आणि बळ देण्याची प्रार्थना केली. अमानवीय टेरीटरीमध्ये आज शिरकाव करणार होतो, हनुमंताचे बळ हवेच. त्याच्या पायाजवळ पडलेले एक फुल आणि रुईचे पान उचलून खिशात ठेवले आणि घरी आलो. दुपारी हलके जेऊन चांगली झोप घेतली. मनात आता खळबळ येऊन चालणार नव्हते, मुद्दाम पॊर्णिमेचा रात्र निवडली होती, म्हणजे निदान नैसर्गिक प्रकाश थोडी साथ करेल.
सूर्यास्त झाला आणि मी तयारीला लागलो. काठीच्या टोकाला घरातला एक कोयता बांधून त्याचा भाला तयार केला.शिटी गरज पडल्यास मदत घेता येईल म्हणुन खिशात ठेऊन दिली. देवळातून आणलेले पान आणि फुल एका कापडात बांधून त्याची पुडी केली ती एका दोर्यात ओवून गळ्यात माळेसारखी घातली, हा मानसिक आधार फार महत्वाचा होता.रात्र धुक्याची चादर घेऊनच आली, खाडीवरुन धुक्याचे लोटच्या लोट आसपास पसरायला लागले, शेते दिसेनाशी झाली. मी एक कडक काँफी करून प्यायलो आणि देवाचे नाव घेऊन बाहेर पडलो. फलाटावरचे लुकलुकणारे दिवे मागे पडले, रेल्वे लाईन क्राॅस करुन मी पश्चिमेला गवतात उतरलो. गवत वार्याने सळसळत होते, धुक्याच्या लाटांमध्ये कारखाना हरवून गेलेला होता. हवेत गारवा असूनही मी घामाने डबडबलेलो होतो. हातातल्या टाँर्च ने इकडे तिकडे पाहिले खाली जायला एक पाऊल वाट होती. सगळीकडे अनैसर्गिक शांतता होती, साधे रातकिडेही ओरडत नव्हते, जणु काही हे जग वेगळेच आहे. माझ्या धडधडणार्या हृदयाचा आवाज मला ऎकु येत होता. खाली सगळीकडे दगडीकोळशाची जमिन होती, रेल्वेची खडी पसरलेली होती, ३०-४० फुट खाली उतरलो, आता मागे काही दिसत नव्हते, ना रेल्वे ट्रॅक ना माझे घर. इतके धाडस मी का केले हा प्रश्न मला अजुनही पडतो. बहुतेक वडलांना बघायची, त्यांचा आवाज ऎकायची सुप्त इच्छा मला इथवर खेचुन घेऊन आली होती.
वातावरणातील गारठा जबरदस्त वाढलेला होता. हातातल्या काठीवरची मुठ घट्ट केली आणि पुढे सरकलो . जसजसा कारखाना जवळ यायला लागला, त्याची भव्यता मला समजायला लागली. हजारो भग्न यंत्रे त्या चंद्रप्रकाशात चमकत होती. जुने मालगाडीचे गंजलेले डबे, तुटलेले यंत्राचे भाग, तारा, जुने सडलेले टायर,अजुन बरेच काही विखुरलेले होते, अजस्त्र कारशेड, लोखंडी गंजलेले खांब, मानवी हस्तक्षेप न झाल्याने झाडे वेली आता सगळीकडे वाढलेल्या होत्या. मनात देवाचे नाव घेत टाँर्च चा फोकस इकडे तिकडे टाकत पुढे सरकत होतो, कोणतरी समजा त्या उजेडात माझ्याकडे बघताना मला दिसले असते तर? एखादी आकृती, आकार, एखादे जनावर ? खचितच माझे प्राण गेले असते. पण ही वादळापुर्वीची शांतता होती. मी पुर्ण त्या पट्ट्यात पोहोचलो आणि एका जुन्या बसक्या बांधकामातुन मला तो हिरवा अंधुक प्रकाश दिसायला लागला. केबिन होती बहुतेक ती, पांढर्या रंगाची. जसजसा मी जवळ जायला लागलो कसलितरी गुणगुण एकु यायला लागली, विचित्रच वर्णमाला कधी न एकलेल्या. मध्ये हसल्यासारखा आवाज, मध्येच आचके दिल्यासारखे काहीतरी आवाज. हळूहळू त्या केबिनपाशी आलो दरवाजा नवव्हताच, आत बँटरी मारली न जाणो काय दिसेल, आत काहीच नव्हते, सगळीकडे धुळ, माती, राडारोड पडलेला होता तुटक्या खुर्च्या , टेबले, पण अजूनही खालि जायला आत पायर्या होत्या, तो हिरवट प्रकाश तिथुन झिरपत होता. तिखटसर वास आता उग्र होत होता. काय करायचे समजत नव्हते थोडासा अात सरकलो आणि कोणतरी मोठ्याने आचका दिला आणि बॅटरी बंद पडली, मी भयाने जोरात ओरडलो. कोणे. . समोर या . . हातातली काठी जोरात आजूबाजूला फिरवायला लागलो. खालुन हिरवा प्रकाश येतच होता.
अाजुबाजुला काहीही दिसत नव्हते बाहेर जायचा मार्ग सुद्धा कळेना. खालुन एक हाक ऎकु आली, ये बाळ्या ये, हिहीही
खाली बंकर सारखा भाग होता, मी एक एक पायरी उतरुन खाली आलो, तेवढ्यात हातातला टाँर्च सुरू झाला, एकदम प्रकाशाचा झोत आला आणि समोरचा देखावा दिसला, मेंदूच्या नसा भयाने तुटतील की काय असे वाटायला लागले. त्या लांब बंकर मध्ये दोन्ही बाजूने ओळीने शंभराच्या वर माणसे बसलेली होती, माणसे सांगाडे काय म्हणायचे, अंगावर कारखान्यातले पूर्वीचे युनिफॉर्म, आता फक्त चिंध्या उरलेल्या, चेहर्यावर मास नाही, नुसतेच हिरवट डोळे, गळ्यातुन आचके देत ती लडबडुन माझ्याकडे बघायला लागली. त्यातला एकजण धडपडत उठून माझ्याकडे यायला लागला, मी तसाच उलटा फिरुन पळायला लागलो.
मागुन "आलो आलो आलो "करत आवाज यायला लागला, ,कोणतरी खदखदुन हसत होते,
मध्येच व्वाॅफ वाॅफ् करुन धापा टाकल्यासारखा, भेसुर रडण्याचा आवाज.भेलकांडत मी बाहेर आलो , वर धुक्यामुळे परत कुठे जायचे समजत नव्हते, लांबवर एक सिग्नल दिसत होता म्हणजे तिथे ट्रॅक असणार, त्या दिशेने पळत सुटलो, आजुबाजुने भयंकर कोणीतरी मागावर होते, गरम वाफा मारत होत्या, जळलेल्या कापडांचा वास सुटलेला होता, ती वास्तू भयंकर पछाडलेली होती हे नक्की. शेवटी जिथून मी उतरलेलो तिथे आलो, वर चढायला आता जमतच नव्हते, घसरुन खाली येत होतो, मागुन आवाज वाढत चाल्ला होता. तसाच रेटा लावुन वर चढलो आणि कोणतरी माझा पाय पकडला. आता मागे बघणे भाग होते, हातातील काठी मारायच्या उद्देशाने मागे पाहिले, एक सांगाडा झटापट करत होता. चेहर्याची कुठेतरी ओळख पटली, ये बाळ्या ये. . .
आतल्या चेतनेने भितीवर मात केली, तुम्ही माझे वडिल नाही, तुम्ही जे कोण असाल ही भ्रष्ट नक्कल थांबवा ,शेवटचा उपाय म्हणुन गळ्यातला ताईत ( ज्यात मारूतीच्या देवळातील फुले आणि रुईचे पान होते) तो काढुन त्या आकारावर फेकला, फेकता क्षणीच त्याने पेट घेतला आणि माझ्यावरची त्याची पकड सुटली. तसाच ओरडत मी रेल्वे लाईन क्राॅस करुन घरात शिरलो. थरथरकापत आधी देवासमोर हात जोडुन उभा राहिलो. श्वास ताब्यात आला आणि मग एक मोठा मग भरुन कडक काँफी घेतली. आता मी सुरक्षित होतो, ते जे काय होते त्याची हद्द तो कारखाना होता.
अनेक अभागी जीव त्या आगीत होरपळून अचानक गेलेले होते, त्या सर्वांचे संकल्प, इच्छा, आकांक्षा, सर्वच तिथे त्या ऊर्जेने बंदिस्त झाल्या होत्या. देह नसल्याने त्याला वाट मिळत नव्हती, पण अचानक जो उल्का वर्षाव झाला त्याने, अंतरिक्षातुन असे काहीतरी इथे आणुन टाकले की, इतके वर्ष बंद उर्जा मुक्त झाली उधळली गेली, जसे पार्टिकल्स मुक्त झाले तर अणुबाॅब सारखा विध्वंस होतो,तसलाच प्रकार इथे झाला , त्या रेडीयस मध्ये ही ऊर्जा उधळली गेली, त्याला विकृत स्वरूप आले.
ते कोण होते, कुठुन आले ,काय झाले हे काहीही कळायचा मार्ग नाही
नंतर मी गावातल्या आतल्या भागात राहायला गेलो, पुन्हा इथे आत जाण्याचे धाडस केले नाही, नंतर रेल्वेने सुद्दा तिथे भिंत बांधून तो भाग प्रतिबंधित केला.
आत्ता मुलाने इथे जागा घेतली म्हणून राहायला आलो या उतारवयात मी कुठे जाणार?
इतके वर्षांची अशी ही कारखान्याची गोष्ट! !!!!
पाटील काकांनी गोष्ट संपवली आणि सगळेच एकदम तंद्रीतुन जागे झाल्यासारखे झाले. सगळ्यांनी उठून कारखान्याच्या दिशेने नजर टाकली. कोणालाच काही दिसले नाही. केवळ अंधार दाटलेला होता . सगळे हळूहळू निरोप घेऊन खाली निघुन गेले ( मनातून तिकडे कधीच न बघण्याचा निश्चय करुन)
आता रे्लवे तिथे मोठे कारशेड उभारणार आहे म्हणे, अर्थात ते बाहेरच्या मोकळ्या भागात. तो कारखाना असाच उभा आहे आत अनेक गुपिते साठवून !!!!

---- समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तूफान

बास, वेगवान मांडणी आणि जबरदस्त वातावरण निर्मिती.
तुमची कथा आली की मनोरंजनाची गॅरंटी हमखास , याचा पुढचा भाग हवा
पण इथे आता रात्र आहे, आणि मला हे वाचून झोप लगेलसे वाटत नाही Sad

छान रोचक मांडणी.
मायबोली वाचकांसाठी पार्ट २ जमला तर नक्कीच लिहा... किंवा छोटी सीरीज सुद्धा चालेल.
नवीन कारशेड बनल्यावर येणारे अनुभव आणि त्याच्या विरोधात केले गेलेले उपाय ह्यावर अमानवीय शक्ति विरुद्ध अनीस स्ट्रैटजी जुगलबंदीचे काही एपिसोड्स सुद्धा नक्कीच बनू शकतात.

उत्कंठावर्धक लिहिली आहे. तुम्ही धारपांचे फॅन आहात असे गृहित धरतो. कथेची सुरूवात नि मूळ संकल्पना धारपांच्या सूत्रांशी खूप साम्य दाखवतो.

मस्त आहे. मला पण तो हिरवा प्रकाश वगैर वाचुन धारपांच्या पुस्तकाची आठवण आली. धारपांच्या पुस्तकात बरेचदा पाल्हाळी़क वर्णन अति होत आणि संवाद कमी. इथे तसे झाले नाही त्यामुळ आवडली.

चांगली जमलीय कथा!
कथा फार पूर्वीच सुचलेली होती https://www.maayboli.com/node/50043 >>> अर्रे ! काय योगायोग! आत्ता कथा वाचताना हेच फोटो डोळ्यापुढे आले होते! कारखान्याचे वर्णन वाचताना आठवलं अरे कोणीतरी मागे माबोवर अशाच एका जागेचे फोटो फीचर टाकले होते, अन नंतर तुमचे पोस्ट वाचले. ते फोटो तुमचे होते हे आठवत नव्हते मात्र. आयडी वेगळा होता का?

कथेची मांडणी. शैली वातावरण निर्मिती मस्त !

ट्विस्ट म्हणण्यापेक्षा काहीतरी ठोस कथाबीज हवे होते असे वाटते. ईतके छान वाचूनही एक पुर्ण कथा वाचल्याचा फिल मिस झाला असे वाटले.

Pages