सैनिक

तीन वर्षांपूर्वी डिसेंबरमध्ये भारतात गेलो होतो तेव्हाची गोष्ट आहे. काही कामासाठी कराडला गेलो होतो आणि संध्याकाळी परत कोल्हापूरला यायला म्हणून बसची वाट पहात एस. टी. स्थानकावर उभा होतो. रविवार होता. बरीच गर्दी होती आणि बराच वेळ कोल्हापूरला जाणारी एकही बस आली नव्हती. शेवटी एक बस आली आणि ती पुरती थांबायच्या आधीच लोकांची दाराखिडक्यांशी झोंबाझोंबी चालू झाली. काही चतुर लोकांनी दारातल्या गर्दीतून घुसून जागा पकडायचा त्रास वाचावा म्हणून खिडक्यांमधूनच सीटवर पिशव्या टाकून जागा पकडायला सुरुवात केली. पण बसमध्ये तरुणांचा एक ग्रुप होता, त्यांनी त्या लोकांचा हा प्रयत्न हाणून पाडायला सुरुवात केली. त्यांनी सरळ त्या पिशव्या बाहेर टाकल्या, त्यामुळे त्या चतुर लोकांना निमूटपणे दारातून आत ये‌ऊन जागा पकडण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

मी त्या गर्दीतून कसाबसा आत शिरलो. बसायला जागा मिळायचा प्रश्नच नव्हता, पण पुढची बस कधी ये‌ईल याची खात्री नसल्यामुळे मी उभ्यानेच प्रवास करायचं ठरवलं. एका सीटच्या जवळ दाटीवाटीनं उभा राहिलो. त्या सीटवर दोघंजणं बसले होते. ते त्या तरूणांच्या ग्रुपमधलेच दोघं होते. खिडकीजवळ बसलेला तरूण फारच खुशीत होता. तो मधूनच गाणं गायला लागायचा नाहीतर त्याच्या शेजारी बसलेल्या तरूणाशी कुस्तीचे दोन हात केल्यासारखं करायचा.

थोडा वेळ झाला. बसनं आता चांगला सूर धरला होता. ते दोघं थोडे आतमध्ये सरकले आणि त्यांनी मला बसायला जागा करून दिली. दिड तास उभ्यानं प्रवास करण्यापेक्षा थोडं अडचणीत बसणं परवडण्याजोगं होतं, म्हणून मी त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या शेजारी बसलो.

खिडकीजवळ बसलेल्या तरूणाचं माझ्याकडं जास्त लक्ष नव्हतं. तो आपल्याच तंद्रीत होता. पण माझ्या जवळ बसलेल्या तरूणानं मी कोण, काय करतो वगैरे प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी त्याला सांगितलं की मी अमेरिकेत केमिकल इंजिनियरींग मध्ये उच्च शिक्षण घेतो. तो म्हणाला,"सुदैवी आहात तुम्ही! तुम्हाला इतकं शिकायची संधी मिळाली". मग त्याने केमिकल इंजिनियरींग म्हणजे नक्की काय वगैरे विचारायला सुरुवात केली. या प्रश्नाचं नीटसं उत्तर मलाही अजून कळलेलं नाही, पण मी त्याला काहीतरी सांगितलं. त्यानं विचारलं,
"आपल्या घरातल्या वस्तू जास्त वेळ टिकाव्या म्हणून आपण जी केमिकल्स वापरतो, त्यांचे आपल्यावर काही वाईट परिणाम होऊ शकतात का?"
"कोणत्या वस्तू?" मी विचारलं.
"सगळ्याच. खायच्या प्यायच्या गोष्टी, कपडे, नेहमी वापरायचे पदार्थ..."
हा फारच जनरल प्रश्न होता आणि मी पण जास्त खोलात न जाता उत्तर दिलं,
"जर एक विशिष्ट प्रमाणाच्या आत ही केमिकल्स वापरली तर काही वा‌ईट परिणाम व्हायचं काही कारण नाही..."
"पण हे प्रमाण ठरवतो कोण? आणि दरवेळी हे प्रमाण पाळलं जातं याची काय खात्री?"
आमचं संभाषण माझ्या आणि माझ्या व्यवसायाभोवती फिरायला लागलं तसा मी अस्वस्थ झालो आणि विषय बदलायच्या हेतूनं त्याला विचारलं,
" तुम्ही काय करता?"
" मी आर्मी मध्ये असतो," तो म्हणाला.
इंडियन आर्मी! मला भेटलेला हा पहिलाच सैनिक होता.

"सध्या तुमचं पोस्टिंग कुठं आहे?"
"जम्मू बॉर्डरवर"
"तुम्ही तिथं केव्हापासून आहात?"
"१९९८ पासून," तो म्हणाला.
"मग कारगिल युद्धाच्या वेळी तुम्ही तिथेच होता का?"
"नाही. तेव्हा माझं ट्रेनिंग चालू होतं..." तो म्हणाला.
"मग आत्ता काय सुट्टीवर आलात का?"
"होय. तीन आठवड्याच्या सुट्टीवर. पुण्यापर्यंत रेल्वेनं आलो आणि मग ही बस पकडली," तो म्हणाला.

थोडा वेळ असाच शांततेत गेला. शेजारी बसलेल्या या सैनिकाबद्दल मला उत्सुकता वाटत होती. 'Saving Private Ryan' पासून ’बॉर्डर’ पर्यंत अनेक युद्धपट बघून सैनिकांची एक प्रतिमा माझ्या मनात तयार झालेली होती- देशासाठी, मित्रांसाठी प्राण पणाला लावणारे, निधड्या छातीचे...खरे सैनिक कसे असतात? ते या चित्रपटांतल्या हिरोंसारखंच वागताबोलतात का?

मी त्याला विचारलं, " तुम्हाला लहानपणापासून आर्मी मध्येच जायचं होतं का?"
"हो...माझी तीच इच्छा होती," तो म्हणाला.
"सीमेवर काम करण्याची भीती वाटत नाही का तुम्हाला?" मी विचारलं.
"कसली भीती?" तो म्हणाला.
"अं...बंदुकीच्या गोळीची," थोडा वेळ विचार करून मी म्हणालो.

तो हसला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "मित्रा, आम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतो. जेव्हा बंदुकीची गोळी कारखान्यात तयार होते, तेव्हा तिच्यावर कुणाचंतरी नाव लिहिलेलं असतं. ते नाव जर तुझं असेल तर तू स्वत:ला वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाहीस. बुलेटप्रुफ जॅकेट घाल किंवा हेल्मेट घाल, ती गोळी तुझा जीव घेणारच असते. मग घाबरायचं कशाला?"

दिसायला तो पोरसवदा होता, पण अचानक मला तो मोठा वाटायला लागला.

मी म्हणालो," ते खरं आहे, पण आम्ही लोक असं सोयीस्करपणे समजून चालतो की मृत्यूची आणि आमची गाठ आम्ही म्हातारे झाल्याशिवाय पडणार नाही. पण तुम्ही तर दररोज आजूबाजूला मृत्यू बघत असता. मग उद्या आपल्याला मरण आलं तर काय, असा विचार ये‌ऊन तुम्हाला भीती वाटत नाही का?"

त्यानं मला विचारलं, " मला एक सांग, माणसाला भीती कशाची वाटते?" मी काही बोललो नाही तसा तो म्हणाला, " माणसाला भीती अंधाराची वाटते. जी गोष्ट आपल्याला नीट माहित नाही त्याची भीती आपल्याला जास्त वाटते. तुझ्या गावातलं एखादं रान आठव. समजा तुला कुणी त्या रानाभोवती दिवसा एक फेरफटका मारुन यायला सांगितलं तर तू सहज जा‌ऊन येशील, कारण दिवसा त्या रानाचा प्रत्येक कानाकोपरा तुला साफ दिसत असतो. पण तेच जर कुणी तुला रात्री त्या रानात जायला सांगितलं तर तू तितक्याच सहजपणे जाणार नाहीस, कारण तुला ते रान नीट दिसणार नाही. आमच्या साठी मरण म्हणजे त्या रानात दिवसा जाण्यासारखं आहे, कारण आम्हाला ते नेहमीच आजूबाजूला दिसत असतं. मग कशासाठी घाबरायचं?"

बसचा एकसुरी आवाज येत होता. बहुतेक प्रवासी झोपले होते. एक जांभळ्या रंगाचा दिवा सोडला तर बसमधले बाकी सगळे दिवे बंद होते. त्याचा सावळा, घामेजलेला चेहरा त्या मंद प्रकाशात चकाकत होता.

खिडकीत बसलेला त्याचा मित्र पुन्हा जोरात गाणं म्हणायला लागला. काहीतरी ’गावाला जायाचं, जायाचं’ असे त्याचे बोल होते. तो हसून म्हणाला,
"बंदा खुश हो रहा है! एका वर्षानं आम्ही गावाला चाललोय..."

"तुम्ही पण खुश असाल. एक वर्ष म्हणजे काही कमी वेळ नाही," मी म्हणालो.

तो थोडा वेळ गप्प बसला. मग म्हणाला, " हे वीस दिवस कसे पटकन निघून जातील! सुट्टीचे शेवटचे दोन-तीन दिवस अगदी नकोसे वाटतात. घरातल्या बायका गोडधोड खायला करतात, पण त्या दोन-तीन दिवसात घास घशाखाली उतरतच नाही. गळ्यात काहीतरी अडकून बसल्यासारखं वाटतं. शेवटच्या दिवशी तर पायात बेड्या घातल्यासारखंच वाटतं. घरातून पाय काही केल्या निघत नाही. पुन्हा आमची बायको, मुलं, आ‌ई, बाबा आम्हाला भेटणार का नाही हेच माहित नसतं. त्यांना तरी काय सांगणार? आम्ही परत आर्मीमध्ये येतो, पुन्हा रुटीन चालू होतं, पण जीव घरच्यांमध्ये अडकलेला असतो. कुठलं पदक, कुठला सन्मान नाही मिळाला तरी चालेल, पण फक्त घरच्यांची पुन्हा भेट व्हावी असं सारखं वाटत राहतं," त्याचा आवाज कापत होता.

पण लगेचच तो हसला आणि म्हणाला, "पण एक सांगू, आम्ही सैनिक लोक फार सुदैवी आहोत, फार फार सुदैवी!"

मी प्रश्नार्थक चेहर्‍यानं त्याच्याकडं पाहिलं.

तो म्हणाला, " बघ ना, आमची सगळ्यात मोठी खुशी आणि सगळ्यात मोठं दु:ख आम्हाला एका महिन्यात अनुभवायला मिळतं. एका वर्षाचं आयुष्य आम्ही एकाच महिन्यात जगून घेतो. आमचं हसू आणि आमचं रडणं सगळं एका महिन्याभरापुरतंच! सुखदु:खाची इतकी तीव्रता तुम्हा लोकांना थोडीच अनुभवायला मिळते! तुम्ही वर्षभर हसत रहाता, वर्षभर रडत रहाता...तुमच्या भावना आमच्यासारख्या तीव्र, आमच्यासारख्या शुद्ध थोड्याच असतात! अशा भावना आम्हाला अनुभवायला मिळतात म्हणून आम्ही सुदैवी आहोत!"

मला चित्रपट अभिनेता आमिर खानचे शब्द आठवले. भारतीय सैनिकांच्या एका कॅम्पमध्ये काही वेळ घालवून आल्यावर तो म्हणाला होता, "I had gone there to make them happy, but they are already happy there!"

तो सैनिक माझ्या मनात अजूनही घर करून बसलाय!

-अनामिक