जिज्ञासा

'जि
ज्ञासा' विषयी सांगण्यापूर्वी थोडी माझी ओळख करुन देते. मी स्मिता दीक्षित. मी गेली वीस वर्षे मतिमंदांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे. मतिमंद मुलांना शिकविण्याचे विशेष शिक्षण घेण्यापूर्वी मी बालवाडी शिक्षिका म्हणून तीन वर्षे काम केले. घरातच बालवाडी सुरू केली होती. बालवाडीचा वर्ग घेताना काही वेगळे करता येईल तर करावे असे वाटत होते. त्यासाठी अंधशाळा, मूकबधीर शाळा यांमध्ये काम करता येईल का हे पाहिले, पण तशी संधी मिळाली नाही. त्याचवेळी मतिमंद मुलांसाठी कोल्हापूरमध्ये नव्याने एक शाळा सुरू होत होती. आवडीने शिकवणार्‍या शिक्षकांची त्यांना गरज होती. तिथे संधी मिळाली. यासाठी एक वर्षाचे 'डिप्लोमा टीचर इन मेंटली हॅंडीकॅप्ड' हे ट्रेनिंग 'पुणे कामायनी' येथे पूर्ण केले. पुढच्याच वर्षी मतिमंद मुलांना प्रत्यक्ष शिकवायला सुरूवात केली. हे करीत असताना वेगवेगळ्या पातळीवरील मतिमंदांना सतत नुसते लेखन, वाचन आणि कार्यशिक्षण देण्यापेक्षा त्यांच्या पातळीनुसार, क्षमतेनुसार त्यांना शालेय (पाठ्यपुस्तकातील) शिक्षण देणेही महत्त्वाचे आणि गरजेचे वाटले. कारण 'मूल मतिमंद आहे म्हणजे त्याला काहीच करता येणार नाही' असे नाही तर त्याला शिकविलेल्या कृती तो आपल्या क्षमतेनुसार कमी-अधिक प्रमाणात आणि कमी-अधिक वेळेत करेल. त्याच्याकडे आहे ती क्षमता त्याला वापरायला शिकविणे गरजेचे वाटले म्हणून स्वत:ची शाळा सुरू केली – 'जिज्ञासा'.

Jidnyasa1.jpg

'जिज्ञासा' ची सुरुवात करताना चार – पाच वर्षे शिकविण्याचा अनुभव आणि ज्ञान उपयोगी पडले. याचा उपयोग करूनच सुरुवातीला Mild & Moderate गटातील मतिमंदांना शिक्षण देण्याचे ठरविले.

कोणताही गाजावाजा न करता शाळा सुरू झाली. पण त्यामुळे येणारे पालक शंका घेऊ लागले. हा एक प्रयोग तर नाही? कसली जाहिरात नाही, पाठीशी कोणी राजकीय व्यक्ती नाही आणि फक्त एक-दोनच विद्यार्थी! त्यामुळे याला शाळेचे स्वरूप येईल का? आणि शाळा काढली तर किती दिवस चालेल? अनेक प्रकारच्या शंका! पण हळूहळू दोनाचे चार चाराचे आठ विद्यार्थी होत वर्ग चालू झाले.

सुरुवातीला विद्यार्थ्यांची संख्या जरी दोन-चारच होती तरी त्यांच्यासाठी प्रथमपासून वेळापत्रकाची आखणी व त्यानुसार सर्व शैक्षणिक कार्यक्रम, सहली, स्पर्धा, खेळ, पालक संवाद, इ. चालू ठेवले. हळूहळू मुलांमधील प्रगती पाहून आणि व्यवस्थित आखलेल्या कार्यक्रमांमुळे पालकांमधे विश्वास आला आणि विद्यार्थी संख्या वाढू लागली. सध्या सुमारे शंभर विद्यार्थी 'जिज्ञासा' मध्ये विविध गोष्टी शिकत आहेत.

'जिज्ञासा' साठी सरकारी अनुदान आणि सरकारी जमीन मिळविण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागले. सुमारे एक तपाच्या अथक प्रयत्नांनंतर २००४ पासून शालेय अनुदान मिळायला लागले. तोवर विनाअनुदानच काम चालू होते.

सर्व सहकारी शिक्षकांचे यात मोलाचे सहकार्य मिळाले. तुटपुंज्या पगारावर त्यांनी आठ-दहा वर्षे अत्यंत उत्तम काम केले. शिक्षकांच्या बहुमोल सहकार्यामुळे मुलांनीही उत्तम प्रगती दाखविली. शाळेत स्पोर्टस् क्लबची सुरूवात झाली. यातून आमचे क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळणारे खेळाडू तयार झाले. सायकलिंग, स्विमिंग या खेळात विद्यार्थ्यांनी आणि आमच्या ऍथलीट्सनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतही भाग घेतला. नुसत्या क्रीडा स्पर्धाच नाहीत तर मुलांच्या कला-गुणांना वाव देणार्‍या सांस्कृतिक स्पर्धा, व्यवसाय कौशल्य स्पर्धा यांमध्येही मुलांनी चांगले यश मिळविले.

'जिज्ञासा'नेही मुलांच्या विविध क्षमतांच्या विकासासाठी पाककला स्पर्धा, अनुभव-कथन, काव्यवाचन, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविणे, प्रश्न-मंजूषा स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेतल्या. दोन ऑक्टोबरच्या निमित्ताने दरवर्षी अशा विविध अनुभव देणार्‍या स्पर्धांचे राज्य स्तरावर आयोजन केले.

jidnyasa2.jpg

मुलांच्या वाढत्या वयाबरोबर त्यांना व्यवसाय शिक्षणाची संधीही जिज्ञासा उद्योग केंद्रांमार्फत दिली गेली. आज या उद्योग केंद्रात पाकशास्त्राबरोबरच शिवणकाम, खडू-मेणबत्त्या, पणत्या, मण्यांच्या राख्या, कागदी पिशव्या, फिनेल तयार करण्याचे शिक्षण दिले जाते. या सगळ्या शिक्षण-प्रशिक्षणांतून संस्थेचे काही विद्यार्थी आज स्वतंत्रपणे विविध कामे करीत आहेत. महिना चारशे ते एक हजार रुपये कमवीत आहेत.

सहा वर्षांखालील मुलांना शिकण्याची संधी मिळावी या दृष्टीने सद्या बाल विकासालयही सुरू केले आहे. यामध्ये सहा वर्षाच्या आतील मुलांसाठी Pre School ट्रेनिंग दिले जाते. याच बरोबर Speech Training, Physiotherapy, Occupational Therapy इ. ची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते.

एकूणच मतिमंद मुलांच्या शिक्षणात देखील मुलांना खूप काही शिकविता येते हे कायम लक्षात ठेवून त्यांना शिकविण्याचा आमचा अधिक प्रयत्न असतो. त्यातून त्यांचे पुनर्वसन व्हावे हाही प्रयत्न असतो. ज्यांचे समाजात पुनर्वसन होऊ शकणार नाही त्यांना कमीतकमी Self Help Skills मध्ये स्वावलंबी बनविण्याचा व Under Supervision काम देण्याचा प्रयत्न असतो.

संस्थेच्या भावी योजना

• १८ वर्षांवरील मतिमंदांसाठी विविध उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा सुरू करणे.
• १८ वर्षांवरील मतिमंदांसाठी शेती आणि शेतीपूरक योजनांसह निवासी सुविधा सुरू करणे.
• शिक्षक प्रशिक्षण- Special Education Teacher Training Course सुरू करणे.
• काँप्यूटर सेंटर सुरू करणे.
• मुलांसाठी अद्ययावत जिम्नॅशियम व थेरपी सेंटर सुरू करणे.

हे झाले 'जिज्ञासा' विषयी. याला पूरक म्हणून जिज्ञासाबरोबरच 'शामकमल' नामक संस्थाही आता सुरू केली आहे. या 'शामकमल' द्वारे गरजू महिलांसाठी (मग त्या आर्थिक दृष्ट्या गरजू असोत वा सामाजिक); म्हणजे स्वप्रतिमा जपण्यासाठी सर्वच बाबतीत स्वावलंबी होवू इच्छिणार्‍या आणि त्याचबरोबर आपला काही वेळ समाजकार्यासाठी देऊ इच्छिणार्‍या महिलांना मार्गदर्शन केले जाते. आणि त्यांना विविध प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी 'कमला केंद्र' चालविले जाते. या केंद्रामार्फत सध्या एक चपाती केंद्र चालू आहे. घरगुती स्वरूपाच्या चपात्या इथे बनविल्या व विकल्या जातात.

या केंद्रामार्फत महिलांसाठी विविध योजनांची आखणी चालू आहे. सध्या वृद्धांसाठी विरंगुळा केंद्राची स्थापना केली असून त्याद्वारे वृद्धांसाठी मेडिकल चेकअप, सहली, व्याख्याने इ. चे आयोजन करण्याचा मानस आहे. भविष्यात वृद्धांसाठी आणि त्यातल्या त्यात स्मृतिभ्रंश आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्धांसाठी सर्व सुविधांनी युक्त वृद्धाश्रम सुरू करण्याची योजना आहे. तसेच एक उत्तम महिला केंद्र म्हणून कमला केंद्राचा विकास करण्याचा मानस आहे.

संपर्क- सौ. स्मिता विशाल दीक्षित
केदार, प्लॉट नं. ७, दत्त कॉलनी, रेसकोर्स, कोल्हापूर – ४१६ ०१२
फोन नं. ९८५००६०९०३
(सोलापूर येथील संस्कृती प्रतिष्ठान आयोजित 'श्रीमती महाराष्ट्र' पुरस्कार -२००४,
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित स्थानिक 'हॉटेल व्हिक्टर पॅलेस पुरस्कार'-२००७)

-स्मिता दीक्षित