Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
रौशनी..२

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » ललित » रौशनी..२ « Previous Next »

Visoba_khechar
Wednesday, June 06, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग १ वरून पुढे सुरू.रौशनी या माझ्या व्यक्तिचित्राला इथे प्रसिद्धी दिल्याबद्दल मायबोली व्यवस्थापनाचे अनेक आभार..

'कोण कुठली रौशनी! मी का जावं तिच्याकडे?' असा विचार करून मी मन्सूरकडे दुर्लक्ष केलं. पण त्यानंतर दोनतीनदा मन्सूरने रौशनी बोलवत असल्याचं पुन्हा सांगितलं. शेवटी 'च्यामारी बघू तरी एकदा ही भानगड तरी काय आहे?' असा विचार करून एके दिवशी मी त्या रौशनीला भेटायला जायचा विचार पक्का केला.

रात्रीचे १० वाजले असावेत. मी मन्सूरला सोबत घेऊन बारच्या बाजुलाच असणार्‍या चाळीमध्ये रौशनीला भेटायला निघालो. त्या चाळीत जाण्याची माझी पहिलीच वेळ! दोन्ही बाजूला परकरपोलकी घातलेल्या, चेहेर्‍यावर रंगरंगोटी केलेल्या वेश्या उभ्या होत्या. त्यातल्या बर्‍याचश्या रंगरुपाने दिसायला केवळ भयानक होत्या. गलीच्छ होत्या. काळ्याकुट्ट देहावर, चेहेर्‍यावर मेकपची पुटं चढवलेल्या! रंगीबेरंगी भडक कपडे घातलेल्या! चेहेर्‍यावर आचकट विचकट भाव अन् हसू! कोण कुठल्या या मुली? इथे कश्या आल्या असतील? कुणी आणल्या असतील? किती रुपायाला विकल्या गेल्या असतील? छे! सगळेच नुसते प्रश्न...! उत्तर एकाचंही माहीत नाही!

मला त्या मुलींची किळसही आली आणि एकिकडे दयाही आली! पाच पंचवीस पन्नास रुपयांकरता फालतूतल्या फालतू, अत्यंत थर्डरेट माणसांसमोर पाय फाकवायचे? आणि त्यानंतर होणार्‍या फक्त यंत्रासारख्या हालचाली! कॉटवर आडवं पडून पाय फाकवणारं फक्त एक यंत्र! आणि यांच्याकडे येणारी गिर्‍हाइकं? ती एवढी भुकेली असतील?? काहीही करून कसंही करून स्त्रीशरीर मिळाल्याशी कारण! आपण नेहमी म्हणतो, 'की काय रे माणूस आहेस की जनावर?' हे म्हणण्यामागे माणसाकडून जनावरापेक्षा निश्चित काहीतरी वेगळ्या अपेक्षा असतात. अहो पण कुत्र्यामांजरांच्या संभोगातदेखील एक वेळ शृंगार सापडेल, प्रेम सापडेल! पण इथे मी खरोखरंच माणसातली जनावरं बघत होतो. कारण माझ्या आजुबाजूला गिर्‍हाइकांचीदेखील वर्दळ, येजा सुरू होती. माणूसरुपी जनावराचा आणि एका माणूसरुपी पाय फाकवणार्‍या यंत्राशी पाच पंचवीस रुपायांच्या बोलीत ठरलेला व्यावहारिक संभोग! तो म्हणणार, 'चल लेट जा. बहुत नखरा कर रहेली है', आणि ती म्हणणार, 'चल, जल्दी कर. आज धंदा कम है साला, जादा टाईम मत ले. धंदे का खोटी मत कर!'

मंडळी, हे सगळंच खूप कठीण होतं. भयानक होतं!

पण मला त्या मुलींची, त्या माहोलची, त्या गिर्‍हाइकांची किळस का येत होती? मी यांच्यापेक्षा वेगळ्या सोसायटीतला, वेगळ्या समाजातला होतो म्हणून??

माझ्या समाजात किंवा माझ्यापेक्षा उच्चभ्रू समाजात नवरा सहा सहा महिने बोटीवर असतो, तुफान पैसा कमावतो. आणि इथे त्याची धर्म(!)पत्नी स्वतःच्या पॉकेटमनीकरता, वरखर्चाकरता पाच, दहा, पंधरा, पंचवीस हजारांची रक्कम घेऊन (तिच्या सुंदरतेनुसार, कमनीयतेनुसार!) अज्ञात ठिकाणी हेच काम करते की! अश्याही आहेतच की काही स्त्रीया! पण त्यांचा कुठे बाजार नसतो! बरीचशी कामं एसएमएस द्वारा चुपचाप होतात! बर्‍याचवेळा मध्यस्थांमार्फत ही कामं होतात, किंवा पेजथ्री मधल्या पार्ट्यांमधून एकमेकांशी ओळख तरी असावी लागते, मैत्री व्हावी लागते! मग कदाचित पैशांचाही प्रश्न येत नाही. सगळंच उच्चभ्रू आणि हायफाय लेव्हलवर चालतं!!

पण तरीही त्यापैकी एखादी बाई समोर आली की नकळत माझ्या तोंडून कदाचित, 'हॅलो मॅडम, हाऊ आर यू?' हेच शब्द बाहेर पडणार! मंडळी, तेव्हा मात्र मला त्या बाईची किळस नाही येणार! कारण ती छान दिसते, पॉश राहते! 'तिचा नवरा सहा सहा महिने बोटीवर असतो ना, अहो मग काय करणार? शेवटी माणूस आहे आणि माणसालाही काही भुका असतात, गरजा असतात!' असा सोयिस्कर विचार मी करणार! 'च्यामारी आपल्यालाही या बाईबरोबर चान्स मिळाला तर काय मजा येईल!' हाही विचार माझ्या मनात येऊ शकतो. पण तेव्हादेखील मी माणूसच असतो बरं का! जनावर नसतो!

मंडळी, माझा एक करोडपती पंजाबी क्लाएंट आहे. बिझिनेस एथिक्स म्हणून मी त्याचं नांव नक्कीच घेऊ शकत नाही. साला भगवान आहे तो आपला! मंडळी, हा माणूस मुळचा चंढीगढचा. पण कामधंद्याकरता नेहमी फिरतीवर असतो. तुफान पैसा कमावतो. त्याचे शेअर्सचे सगळे व्यवहार मी पाहतो. तो एकदा दोन तीन महिन्यांच्या परदेशवारीकरता गेला होता. आल्यावर त्याने मला फोन केला. त्याला त्याच्या शेसर्ससंबंधी मला नित्याची माहिती द्यायची होती, माझ्या फीचे पैसेही त्याच्याकडून घ्यायचे होते.

'अरे तात्यासेठ, कैसा है? एक काम करना तात्या, मै आज शामतकही बंबईमे हू, बाद मे मुझे दिल्ली जाना है. तुम अंधेरीमे फलाना हॉटेलमे मुझे ये ये टाईमपे मिलना. फुरसतमे बात करेंगे. बियर पियेंगे!' असा आमचा फोन झाला.

आपल्याला काय हो, धंदेसे मतलब! मी ठरल्यावेळी अंधेरीला असलेल्या त्या पॉश होटेलात त्याला भेटायला गेलो. स्वागतकक्षात चौकशी करून तो उतरलेल्या खोलीपाशी गेलो, दारावर टकटक केली. माझ्या पंजाबी क्लाएंटने आतून दार उघडलं. 'आओ तात्या, बैठो. स्टेटमेन्ट लाये हो?' मंडळी, मी आत जाऊन क्षणभर उडालोच! आतल्या डबलबेडवर मराठी वाहिन्यांतून, चित्रपटांतून काम करणारी एक प्रसिद्ध प्रतिथयश नटी बसलेली होती! तीदेखील माझ्याकडे पाहून फिल्मी पद्धतीने हसली. त्या पंजाबी माणसाने आमची एकमेकांशी ओळख करून दिल्यावर आम्ही एकमेकांना 'हाय हॅलो' केलं!

'बैठ तात्या. बियर पियेगा?' या प्रश्नाने मी भानावर आलो. पाच दहा मिनिटातच हिशोबाची स्टेटमेन्टस मी त्याच्या हवाली केली, माझे पैसे घेतले अन् तेथून निघालो. तो मला सोडायला खोलीच्या बाहेर आला. मला राहवेना. मी त्याला म्हटलं, 'साब, ये मॅडम तो बहोत फेमस है. आप उन्हे कबसे जानते है?'

अरे जानपेहेचान किस बात की? एक बार टीव्हीपे चॅनल सर्फींग करते हुए मैने देखा इसको. सिरियल लाईनके एक आदमीसे पता किया. साला पैसा फेकनेका! बस! तुझे चाहिये क्या बोल?!!' असं म्हणून तो गडगडाटी हसला आणि खोलीत परत गेला. मी माझे पैसे नीट जपून खिशात ठेवले आहेत याची खात्री करत तेथून रवाना झालो!

ती मालिकानटी मला पॉश वाटली. मी तिच्याशी लाळगळूपणा करत हाय हॅलोही केलं. कारण ती सुरेख होती, पॉश होती, स्वच्छ होती!! पण रोशनीच्या चाळीत उभ्या असलेल्या बायका मात्र मला गलिच्छ वाटत होत्या!!

साला दुनियेचा न्यायच अजब आहे! असो, थोडं विषयांतर होतंय, पण ते आवश्यक आहे. रौशनीचे हे व्यक्तिचित्र लेखन म्हणजे तात्याचा एक जीवनानुभव आहे. हे लेखन म्हणजे तात्याची एक भडास आहे. ओकू दे मला मनमोकळेपणाने!

तर कुठे होतो आपण?

मी निघालो होतो रौशनीला भेटायला. तिच्या वस्तीत, तिच्या चाळीत, रात्री दहाच्या सुमारास! मंडळी, खरं सांगायचं तर माझी क्षणभर जरा फाटलीच होती. 'कुठे चाललोय आपण? आणि का चाललोय? काय काम असेल आपल्याकडे या रौशनीचं?, च्यामारी यातून कुठल्या नवीन भानगडीत तर आपण अडकणार नाही ना?' अशा नाना शंकाकुशंका क्षणभर मनात येऊन गेल्या. पण साला आपला पण स्वभाव, 'जो होगा, वो देखा जाएगा भेंडी..!!', या टाईपचा असल्यामुळे मी त्या शंकाकुशंकांना माझ्या मनात फार वेळ थारा दिला नाही! ;)

मन्सूर अर्थातच माझ्यासोबत होता. आम्ही रौशनीच्या खोलीपर्यंत जात असतांना मन्सूर मात्र मोठ्या सराईतपणे आणि सफाईने त्या आजूबाजूच्या वेश्यांना, 'ए हटो सब एक साईड मे. तात्यासाब आ रहे है. साला गोवमेन्ट का आदमी है. लफडा नही मंगता है. नही तो बंद करेगा सबको!' अशा धमक्या देत मला घेऊन रौशनीच्या खोलीकडे निघाला होता! मी 'गव्हर्नमेन्ट का आदमी' केव्हा झालो हे माझं मलाही माहिती नाही! ;)

शेवटी एकदाचे आलो आम्ही रौशनीच्या खोलीपाशी. खोलीत समोरच सोफ्यावर रौशनी बसली होती! पन्नाशीच्या आसपासची, गोरी, आणि देखणी!!

(क्रमशः )

--तात्या अभ्यंकर.


Yogy
Wednesday, June 06, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही लिहिलं आहे तात्या.

Dhumketu
Wednesday, June 06, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडले लिखाण.. आपल्याला त्या गाण्यातले काही कळत नाही. (खुप प्रयत्न केला तरी)...त्यामुळे तुमचे आधीचे लेख जास्ती वाचले नाहीत.. पण हा वाचतो आहे मन लाऊन :-)

Dsirute
Wednesday, June 06, 2007 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या,
दुसरा ही भाग छान झाला आहे.माणसं यंत्रासारखी,आणि ती तशी का वागतात.?उपस्थित केलेले प्रश्न ?आणि त्या परिसराचे सुंदर चित्रण या लेखात आले आहे.लेखन उत्तमच शंकाच नाही.

Zakasrao
Wednesday, June 06, 2007 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्यानु फ़र्मास जमतय बरं. तुम्ही व्यक्तीचित्र छान लिहिताय. तुमच्या ब्लॉग वर वाचलेत मी काही.

Abhiyadav
Wednesday, June 06, 2007 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

taatyanu pudhchya lekhachi vat pahtoy.

Mrudu
Wednesday, June 06, 2007 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही भाग आत्ता वाचले. प्रवाही व प्रभावी झाले आहे लेखन. पुढच्या भागांची वाट पहाते आहे.

जनावर की माणूस हा प्रश्न वाचून या विषयावर आम्हा मैत्रिणींची झालेली चर्चा आठवली. त्यात एका इतिहासाच्या अभ्यासक मैत्रिणीने सांगितले होते की शरीरविक्रय हा जगातील सर्वात सुरुवातीच्या उद्योगांतील एक आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पुरुषांना मानसिक स्थैर्य मिळण्यासाठी आपला वंश पुढे चालतो आहे असे वाटणे आवश्यक असते. त्याचे एक रूप म्हणजे शरीरविक्रय उद्योग. आणि दुसरे रूप म्हणजे पुरुषांच्या असुरक्षिततेच्या भावनेतूनच निपजलेल्या नैतिकतेच्या कल्पना. असो.


Saee
Wednesday, June 06, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ करा, विषयांतर करतेय पण ओघानी एक विचार आला तो सांगते. नेहमी कोणत्याही बाबतीत (बहुतेकवेळा वाईट बाबतीतच) माणूस आणि जनावर यांची तुलना केली जाते. पण जनावरे फक्त निसर्गाच्या नियमांबरहुकुम वागतात. जनावरांच्या दुनियेतही काही रिवाज, नियम असतात, त्यांच्यावरही पिढ्यांपिढ्यांचे संस्कार असतात आणि त्यांच्याकडून कोणत्याही परिस्थितीत त्याचं उल्लंघन होत नाही. नेमकं या विरुध्द माणसाचं वर्तन असतं! मग सुसंस्कृत नक्की कोण? आपण सारखं असं म्हणुन जनावरांवर अन्याय करत नाही का? माणसाकडे बुध्दी आणि विचार करण्याची कुवत त्यांच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे त्याने त्यांच्यासारखे वागणे अभिप्रेत नाही, तरीही तो तसा वागतो हा जनावरांचा दोष आहे का? विषयांतरासाठी पुन्हा एकदा क्षमस्व.

पण फार परिणामकारक आहे तुमचं लिखाण.


Hems
Wednesday, June 06, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या, तुमची लेखनशैली थेट आणि अक्रुत्रिम आहे.. असा वास्तववादी अनुभव मांडण्यासाठी अगदी चपखल ! दोन्ही भाग सही उतरले आहेत !!

सई , खरंय ! माणसांकडून नियमांचं उल्लंघन होतं तेव्हा बरेचदा ते अनैसर्गिक हव्यासापोटीच असतं !


Yog
Wednesday, June 06, 2007 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्याशेठ लगे रहो.. ..

Varadakanitkar
Wednesday, June 06, 2007 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या एकदम touching आहे..फक्त एखाद्या movie मधे पाहिलेलं हे द्रुश्य तुम्ही solid वर्णन केलंय..सही एकदम..

Dhulekar
Thursday, June 07, 2007 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या:
अप्रतिम.
एकदम फ़र्मास लिहिले आहे तुम्ही.
एकदा सुरुवत केल्यावर दोघेही भाग वाचल्यावरच बाकी ठिकाणी लक्ष गेले.


Mankya
Thursday, June 07, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या .. जबरदस्तच ओ !
लिखाणशैली आवडली, एकदम स्पष्ट अन रोकठोक .. अगदी आरपार !

saee... तुझा मुद्दा वाचून व.पू. च एक वाक्य आठवलं
' जनावरं एका instinct वर जगतात उदा. बेदम खाल्ल म्हणून घार ऊडू शकली नाही किंवा एखाद्या माशाल्या पोहता आलं नाही अस कधी एकलं नाही, तसं माणसाच नाही !'
तसा तू मांडलेला मुद्दा एकदम पटला, एक प्रकारचा अन्यायच करतो आपण पशूंवर ! चांगली बाजू पाहणे जणू काही विसरूनच गेलोय आपण, फक्त चूका शोधायच्या अन मग ताशेरे ओढायचे, अगदी ओरबाडून टाकायचं करणार्‍याला. त्यामाग काय कारण किंवा संगती आहे याचा विचारच करण्याची दक्षताही घेतली जात नाही !
विषायांतराबद्दल मी ही क्षमस्व !

माणिक !


Ashwini
Thursday, June 07, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या, छान लिहीताय. इतका अवघड विषय कौशल्याने हाताळलाय. वास्तवाची तीव्र आच जाणवतेय पण कुठेही लिखाण vulgar वाटत नाही.

Maudee
Friday, June 08, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या छान लिहिताय पण रोशनीच्या व्यक्तीचित्रणापासून दूर जाते आहे असं वाटतय....
अर्थात हे माझं मत झालं


Manjud
Friday, June 08, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही विसोबा_खेचर ह्या नावाने लिहू नका हो.... ते लेखकाचे नाव आणि लेख (ललित) अगदीच जुळत नाही हो...Giriraj
Friday, June 08, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या,पुढची वाट पाहतोय.. नहेमी तुमचं ऐसपैस लिखाण खूपच आवडतं

Varadakanitkar
Friday, June 08, 2007 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या पुढचा भाग टाका ना...बाकी कसे आहात?

Yashwardhan
Friday, June 15, 2007 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या पुढचा भाग टाक ना...
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators
>