Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गाईड

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कथा old classics » गाईड « Previous Next »

Sharmilaphadke
Saturday, January 06, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(ह्या क्लासिक चित्रपटाची कथा लिहिताना श्री. विजय पाडळकरांच्या लेखाचा आधार घेतला आहे. मधे मधे मूळ कादंबरीचेही संदर्भ आहेत.
)

गाईड

तुरुंगाचा दरवाजा उघडला आणि राजू बाहेर पडला.

जवळजवळ दोन वर्षानंतर तो मोकळ्या आकाशाखाली पुन्हा येत होता. खुल्या हवेचा छाती भरुन त्याने एक दीर्घ श्वास घेतला. मुक्त. अखेरीस मुक्त झालो खरे, त्याला वाटले. पण त्याला ठऊक नव्हते की भविष्यात एक वेगळा तुरुंग त्याची वाट पाहात आहे. राजूने आजूबाजूला पाहिले. त्याला भेटण्यासाठी कुणीच आले नव्हते. रोझी नाही किंवा आईही नाही. येऊनजाऊन या दोघींपैकीच तर कुणी एकजण येणार. त्याने मागे वळून पाहिले. तुरुंगाचे दार आता बंद झाले होते, भूतकाळाचेही. तो जेथून आला होता तेथे आता त्याचे काय राहिले होते? घराचे रस्ते तर आता बंदच होते. " परतून कुणीही घराकडे जाऊ शकत नाही."

काळ निघून जातो तशी जीवनाच्या प्रवासात मुक्कामाला नवीननवीन ठिकाणे मिळत जातात, पण जुनी ठिकाणे मात्र कायमची दूर झालेली असतात. घराकडे परतण्याचा विचार त्याने निग्रहाने मनातून झटकून टाकला. " वहां कौन है तेरा, मुसाफ़िर, जायेगा कहां..." राजूगाईडची अज्ञाताच्या दिशेने भटकंती सुरु होते.

सार्‍या दिशा आता त्याच्याच आहेत. पाय जिकडे नेतील तिकडे निरुद्देश भटकत तो दिवस काढत रहातो. पण असे किती दिवस? एके दिवशी त्याची थकलेली पावले एका मंदिरापाशी येऊन थांबतात. एका खेड्याच्या सीमेवर असलेल्या या मंदिरात फारसा कुणाचा वावर नसतो. राजू तात्पुरता निवारा म्हणून त्या मंदिराचा आश्रय घेतो. आता पुढे काय? जगायचे असेल तर काहीतरी केलेच पाहिजे. फारसे कष्ट न करता जेवढे जमेल तेवढे कमवायचे, त्यातच मजेने ऐश करत जगायचे ही सवय शरीराला लागलेली असते. लहानपणापासून त्याला कधी जगण्यासाठी कष्ट करावे लागलेच नाहीत. अगदी वडील वारल्यावर कुटुंबाची जिम्मेदारी त्याच्यावर येऊन पडली तेव्हा देखील.

राजूच्या वडिलांचे रेल्वे स्टेशनवर एक दुकान होते. कधी कधी त्यांच्या गैर्हजेरीत राजू त्या दुकानावर बसायचा. स्टेशनवरच्या सार्‍यांशी त्याची मैत्री झाली होती. राजस्थानमधील ते रेल्वे स्टेशन बाहेरुन येणार्‍या प्रवाशांनी नेहमी गजबजलेले असे. आजूबाजूला प्रेक्षणीय स्थळे होती. प्राचीन गुहा होत्या. ती लेणी, मंदिरे, राजवाडे, महाल पाहण्यासाठी लांबून लोक यायचे. त्यांना राजू वाहन मिळवून द्यायचा. कधीकधी त्यांच्याबरोबर जायचाही. या स्थलदर्शनात राजूला काही रस नव्हता, पण त्याच्या लक्षात आले की गाईड म्हणून काम करताना बर्‍यापैकी पैसा मिळतो. तो तरुण होता. त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. बोलणे आर्जवी आणि मिठास. त्याची इतरांवर चटकन छाप पडे.

एके दिवशी स्टेशनवर एक विचित्र जोडपे उतरले. उतरल्यापासून त्यांच्यात कुरबुरीला सुरुवात झाली होती. नवरा होता चाळीशीच्या पुढला. डोक्याला टक्कल, डोळ्यांवर चष्मा, अंगावर प्रवासी ड्रेस आणि चेहेर्‍यावर सतत त्रासिक भाव. उलट ती त्याच्यामानाने खूपच कमी वयाची. सुस्वरुप, अत्यंत आकर्षक सुडौल बांधा, लयबद्ध हालचाली, पण मनावर सतत कसला तरी ताण. नवर्‍याने आल्याआल्या राजू गाईडची चौकशी केली. स्टेशनपासून पन्नस एक मैल अंतरावर असलेल्या काही गुहांचा अभ्यास करण्यासाठी तो आला होता. या गुहांत अद्याप शोध न लागलेली काही लेणी दडून बसली असावीत असा त्याचा तर्क होता. त्या लेण्यांचा शोध लावावा अशी त्याची इच्छा होती, पण एक अदभुत लेणे आपल्या पत्नीच्या रुपाने अपल्या जवळच आहे याची मात्र त्याला जाण नव्हती. कशी कुणस ठाऊक, पण अं:तप्रेरणेने ती जाणीव राजूला झाली व त्याचे सारे जीवनच बदलून गेले.

या प्रवाशाच्या - मार्कोच्या - पत्नीचे नाव होते रोझी. ती देवदासींच्या घराण्यात जन्मलेली मुलगी. नृत्यकला तिच्या रक्तातच भिनलेली होती. या कलेचा विकास करावा, नर्तकी म्हणून नाव कमवावे, कीर्ती मिळवावी ही तिची इच्छा विवाहामुळे अधुरीच राहिली. मार्कोला नाचगाणे बिलकुल पसंत नव्हते. त्याच्याशी विवाह झाल्यापासून रोझीची नृत्यसाधना बंदच झाली होती. एका पिंजर्‍यात कोंडल्यासारखे तिला झाले होते. मार्कोचे तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते. त्यामुळेच पतीपत्नीत एक प्रकारचे अंतर निर्माण झाले होते. नव्हे त्यांच्यामधील अंतर कधी मिटले नव्हतेच. हे अंतर होते म्हणूनच राजूला त्या दोघांच्या जीवनात सहज प्रवेश करता आला.

मार्कोच्या इच्छेप्रमाणे राजू त्याला प्राचीन गुहा असलेल्या डोंगराकडे घेऊन गेला. इथे पुरातन कलेचा एखादा अनमोल खजिना नक्कीच दडला असेल हे मार्कोच्या अनुभवी नजरेने लगेच ताडले. त्याचे रोझीवरचे उरलेसुरले लक्षही उडाले. तो पूर्णपणे आपल्या अभ्यासात गढून गेला.

... continued..



Sharmilaphadke
Saturday, January 06, 2007 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

continued...

इकडे रोझी एकाकीच होती. एके दिवशी सहज तिने राजूला नागांचा नाच दाखवणार्‍या गारुड्यांविषयी विचारले. राजूने तिला गारुड्यांच्या वस्तीत नेले. बीनच्या तालावर, वाद्यांच्या लयीत आपोआप रोझीची पावले थिरकली. विसरुन चाललेली कला पुन्हा तिच्या शरीरात संचारली. पदर खोचून ती अंगणात उतरली व हा हा म्हणता नृत्य संगीताच्या धुंदीने तिचा ताबा घेतला. असंख्य दिवसांनंतर आज ती नाचत होती. सार्‍या दु:खांचा, ताणांचा विसर तिला केव्हाच पडला होता. तिच्यासमोर आता फक्त डोलणारा नाग होता. वाजणारी वाद्ये, थिरकते संगीत आणि त्या तालावर लवलवणारे शरीर. समाजाची, रुढीची बंधने गळून पडलेली होती. राजू तिचे हे नवे रुप आश्चर्याने पहातच राहिला. कालपर्यंत अकाली प्रौढ वाटणारी ही तरुणी, हिच्यात उद्याची एक श्रेष्ठ नर्तिका लपलेली आहे हे त्याने ओळखले. तिचे हे नवे रुप पहाता पहाता तो केव्हा तिच्या प्रेमात पडला हे त्याला सुद्धा कळले नाही.

आता रोझीचा जणू पुनर्जन्मच झालेला आहे. नृत्य, नृत्य आणि नृत्य. एक बेहोषी, तिच्या मनाला गुंगी आणणारी. या कैफ़ात ती राजूच्या अधिक निकट जाते. मोकळे आकाश, स्वच्छ मुक्त वार्‍याची झुळूक उपभोगताना हे ज्याच्यामुळे मिळाले त्याच्यासाठी तिच्या मनात एक हळुवार कोपरा निर्माण झाला आहे. हाळुहळू हा कोपरा तिचे सारे मन व्यापू लागतो. कालपर्यंत जीवनाविषयी कमालीची उदासीन असणारी रोझी "आज फ़िर जीनेकी तमन्ना है"- असे म्हणत पुन्हा जगाकडे वळते. राजू आणि तिच्यात निर्माण झालेले बंध सहवासाने अधिकाधिक दृढ होत जातात आणी त्यावेळीच रोझीच्या नवर्‍याचे तिच्याकडे दुर्लक्ष वाढत चाललेले असते. दुर्लक्षित गुहांचा अभ्यास करता करता त्याला प्राचीन लेण्यांचा शोध लागलेला असतो. त्यात एके दिवशी रोझी अचानक त्याच्याकडे गेलेली असता तो एका नाचणार्‍या स्त्रीच्या सहवासात मदिरापान करताना व प्रेमचेष्टांत दंग असा तिला दिसतो. हा शेवटचा घाव असतो. ती नवर्‍याला कायमचे सोडून राजूकडे निघून येते.

राजूकडे आल्यानंतर तिला हवे ते स्वातंत्र्य मिळते. नृत्याचे पद्धतशीर शिक्षण घ्यायला ती सुरुवात करते. राजूच्या घरी येऊन राहिल्यावर आजूबाजूचे लोक निंदानालस्ती करु लागतात. लोकांचा विरोध, घरी आईचा विरोध हे सारे पत्करुन राजू तिच्यासाठी सर्वांचा त्याग करतो. हळुहळू तिच्या नृत्याची ख्याती सर्वत्र पसरु लागते. आधी शहरत, मग आजूबाजूच्या भागात, मग सर्वदूर, पहतापहाता रोझी, रोझी न रहाता, नलिनी- भारतातील एक श्रेष्ठ नर्तिका बनून जाते. नृत्याच्या कार्यक्रमासाठी रोझी आपले नाव बदलून नलिनी हे नाव घेते. पण तिच्यातला हा बदल फक्त नावातल्या बदलापुरता मर्यादित नसतो. आता ती खरेच एक अंतर्बाह्य नवीन स्त्री बनलेली असते. आता ती अत्यंत यशस्वी नर्तिका आहे. एक नृत्य सोडल्यास तिच्यापाशी इतर गोष्टींसाठी वेळच नसतो. पाहातापाहाता रोझी कुठल्याकुठे जाऊन पोचलेली असते पण राजू मात्र तिथल्या तिथे राहिलेला असतो. तिच्या यशात त्याचाही वाटा असतो. पण तो किती अल्प आहे याची त्याला जाणीव असते. रोझीचे हळुहळू आपल्याकडे दुर्लक्ष होत चाललेले आहे हे त्याला जाणवते. मग पुरुषप्रधान संस्कृतीचे त्याच्यावरील सारे संस्कार उफाळून येतात. आपली निष्क्रियता, आपले सामान्यपण त्याला खूप लागते. तिच्यामुळे लोक आपल्याला ओळखतात, तिला मात्र स्वयंभू अस्तित्व आहे हे त्याच्या लक्षात येते. विचित्र हे की असे तो तिला बोलून दाखवूही शकत नाही. त्याचा एकाकीपणा वाढत जातो. मदिरापान वाढते. हलूहळू त्यांचे संबंध दुरावू लागतात आणि अशात एके दिवशी मार्कोचे ते पत्र येते.

मार्कोने तो व रोझी यांच्या संयुक्त नावावर बॅंकेत दागिने ठेवलेले असतात. हे दागिने रोझीला मिळण्यासाठी तिची सही कागद्पत्रांवर हवी असते. हे कागद मार्को रोझीला पाठवून देतो पण राजूच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. रोझीला आपल्यापासून पुन्हा हिरावून घेण्याचा मार्कोचा हा एखादा डाव असावा असे त्याला वाटते. तो हे पत्र रोझीपासून दडवून ठेवतो. बॅंकेच्या कागदपत्रंवर आपणच रोझीची बनावट सही करुन पाठवून देतो. दरम्यानच्या काळात त्यांचे संबंध अधिकच तुटक बनलेले असतात. ही खोटी सहीच शेवटी राजूच्या अंगाशी येते. त्याला दोन वर्षांची तुरुंगाची सजा होते.

तुरुंगातून परत आल्यावर त्याच्यासमोर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे रहाते. आता परत नलिनीकडे जाणे त्याला अपमानास्पद वाटते. त्यामुळे वाट दिसेल तिकडे तो प्रवास करत रहातो. या निरुद्देश प्रवासात तो ज्या खेडेगावी पोचलेला असतो तिकडे त्याच्या अंगावरील शाल पाहून हा कुणी सधू असावा असे लोक समजतात. त्याच्या एकंदर बोलण्याचालण्यावरुन त्यांचा हा ग्रह दृढ होतो. एकदोन अशा घटना घडतात की राजूने बोललेले शब्द खरे ठरतात. आता गावकर्‍यांची त्याच्यावर श्रद्धाच बसते. त्यालाही आयते बसून कुठे खायला मिळाले असते? चार निरर्थक तत्त्वज्ञानाचे तुकडे गावकर्‍यांच्या तोंडावर फेकून त्याच्या बदल्यात भरपूर खाय्-प्यायची सोय अनायासे झाली होती. गाईडची म्हणजे मार्गदर्शकची पूर्वायुष्यातील भूमिकाच पुन्हा त्याच्या वाट्याला आली आणि ही भूमिका तर त्याची पेटंट भूमिका होती. परंतू येथेही तो पहिलीच चूक पुन्हा करतो. गाईडने फक्त वाट दाखवायची. चालणार्‍याच्या सुखदु:खात सामील व्हायचे नाही, गुंतायचे नाही हे तो विसरतो. प्रथम एकदा तो गुंततो, त्याची परिणती तुरुंगवासात होते. आताही तो गावकर्‍यांत गुंततो. त्याची परिणती शेवटी मृत्यूत होते. मानवी जीवनातल्या दु:खाचे कारण हे गुंतणेच आहे हे त्याला अंती जाणवते. या गुंत्यातून तो मुक्त होतो आणि सारेच बंध तुटून जातात...

राजू आल्यावर काही दिवसांनी त्या भागात दुष्काळ पडतो. लोक पाण्यावाचून हवालदिल होतात. सर्वत्र भीषण दुष्काळ, मृत्यूची छाया पडते. अशावेळी एका भोळसट गावकर्‍याच्या बोलण्यामुळे गावकर्‍यांचा असा ग्रह होतो की, जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत राजू अन्नपाणी घेणार नाही. राजूवर बळजबरीचा उपवास लादला जातो. हे नकली संतपण आता चांगलेच अंगाशी येते. प्रथम तो चिडतो, तडफडतो, एकदोन दिवसांनी पळून जाण्याचाही प्रयत्न करतो. पण मग त्याच्या लक्षात येते की आता यातून सुटका नाही. मग जी भूमिका वाट्याला आली ती सच्चेपणाने का निभावू नये? आयुष्यात प्रथमच तो आपल्या स्वार्थापलीकडे विचार करु लागला होता. त्याच्या मनाभोवतीच्या भिंती हाळुहळू ढासळू लागल्या. गावकर्‍यांचा विश्वास होता की त्याच्या उपोषणामुळे पाऊस पडेल आणि आता त्यांच्या विश्वासावर त्याचा विश्वास बसू लागला. बारा दिवसांच्या उपवासानंतर त्याचे शरीर शेवटचा श्वास घेत असतानाच पाऊस आला. कोसळणार्‍या धारांचा आवाज कानात साठवून घेत त्याने प्राण सोडला.....

....The End ....


Sharmilaphadke
Saturday, January 06, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव आनंद निर्मीत आणि विजय आनंद दिग्दर्शित 'गाईड' हा चित्रपट 1965 साली प्रदर्शीत झाला आणि अफ़ाट गाजला. त्याच्या यशात सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती चित्रपटाच्या कथेने. आर. के. नारयण ह्या 'मालगुदी डेज' मुळे सुपरिचित असलेल्या भारतीय परंतू इंग्रजी भाषेत लिहिणार्‍या समर्थ लेखकाची ही मुळातली कादंबरी. एखाद्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारीत असा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होतो तेव्हा अपरिहार्यपणे उठणारे ' मुळ कादंबरी श्रेष्ठ की त्यावरचा चित्रपट' हा वाद ह्याही वेळी उठला आणि खूप वादळ निर्माण करुन गेला. आर. के नारायणांना कादंबरीचे चित्रपटात रुंपातर करताना घेतल्या गेलेल्या स्वातंत्र्यावर, केलेल्या बदलांवर खूप आक्षेप होता आणि ते बर्‍यापैकी नाराजही होते परंतू तरीही चित्रपट आल्यावरच कादंबरी जास्त चर्चेत आली हे सत्य ते ही नाकारु शकले नाहीत. मुळात ही कादंबरी पाश्चात्य वाचकांना डोळ्यांपुढे ठेवून लिहिली गेली होती तर देव आनंदने चित्रपट काढताना संपूर्णपणे भारतीय प्रेक्षकच नजरेसमोर ठेवला. गाईड चित्रपटाची इंग्रजी आवृत्तीही बनली होती आणि बहुतेक त्याचा शेवट कादंबरीप्रमाणे म्हणजे वेगळा केलेला होता.

वहिदाचे नृत्य कौशल्य व अभिनय इथे पूर्ण पणाला लागला आणि तिनेही भूमिकेला शंभर टक्के न्याय दिला. विशेष म्हणजे देव आनंदही तिच्या तोडीस तोड उतरला.

विजय आनंदचे संवादही जबरदस्त होते आणि अजूनही रसिकांच्या स्मरणात आहेत. song taking बाबतीत विजय आनंदचा हात कोणीही धरु शकत नाही आणि ह्या चित्रपटात गाण्यांच्या चित्रिकरणातला त्याचा ठसा स्पष्ट जाणवतो. उदा. सर्पनृत्याचा प्रसंग हा चित्रपटातील अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे हे ध्यानात घेऊन त्याने या प्रसंगाचे कमालीच्या कौशल्याने चित्रीकरण केलेले आहे. वेगवेगळ्या ऍंगल्सने टिपलेली गतीमान दृश्ये, बेभान संगीत, धुंद नाचणार्‍या वहिदाचे लॉंगशॉट्स व तिच्या चेहर्‍यावरील वेदनेचे व धुंदीचे दर्शन घडवणारे क्लोज अप्स बघण्यासारखे.

चित्रपटातली गाणी केवळ अविस्मरणीय आहेत. सचिनदेव बर्मनच्या त्याकाळात काहीशा मागे पडत चाललेल्या कारकिर्दीला ह्या चित्रपटाच्या यशाने नवसंजिवनी दिली. संगीतप्रधान चित्रपट ह्यापूर्वीही किंवा नंतरही अनेक येऊन गेले पण उत्कृष्ट कथा, तिची समर्थ सादरीकरण, गीतरचना, संगीत आणि अभिनय हे सगळे घटक इतके मिळून मिसळून गेलेले अपवादात्मकच म्हणायचे. लताचा आवाज, शैलेन्द्रची गीते आणि एसडीचे संगीत हा सुवर्णकांचन योग असल्यावर अप्रतिम सदाबहार गीते रसिकांसमोर पेश झाली नसती तरच नवल. नायकनायिकेची होत असलेली जवळीक व्यक्त करणारे " तेरे मेरे सपने अब एक रंग है.." . एकमेकांवरील प्रेमाची उत्कट साक्ष देणारे " गाता रहे मेरा दिल", परस्परांच्या मनातील दुराव्याने व्यथित झालेल्या राजूच्या मनातील एकाकी भाव, " दिन ढल जाये हाये, रात न जाये," संबंधातली कोवळीक संपून गेल्यानंतरचे " क्या से क्या हो गया बेवफ़ा तेरे प्यार मे" आणि रोझी ने बंधमुक्त होत गायलेले ' आज फ़िर जीनेकी तमन्ना है".. लता आणि रफ़ीच्या आवाजातली ही सारी केवळ चित्रपटगीते नव्हती, अस्सल काव्याचा स्पर्श झालेली, रसिकांच्या भावविश्वात अढळ स्थान पटकावून बसलेली ही गीतरत्ने होती ज्यांचा चित्रपटाच्या यशात सिंहाचा वाटा होता. आर. के नारायणच्या कथेला वेगळ्याच आणि लोभस मुशीत ओतण्याचे देव आनंदचे कौशल्य वादातीत आहे. मुख्य पात्रे आणि ठळक प्रसंग त्याने तसेच ठेवले परंतु त्यांच्या पोझिशन्स त्याने अशा बदलल्या की पडद्यावर वेगळेच चित्र निर्माण झाले. अर्थात रोखीचा नवरा मार्को ह्याचे कॅरॅक्टर आर. के. नारायणने जास्त अभ्यासू, धीरगंभीर रंगवले होते इथे देव आनंदने त्याचा टिपिकल हिंदी चित्रपटातला खलनायक का बनवला त्याचे कारण उमगत नाही.

जीवन आणि मृत्यू यांचे असे मनोरम दर्शन इतक्या उत्कटतेने पडद्यावर फारच क्वचित सादर झाले आहे. आजही 'गाईड' ची आठवण येताच नजरेसमोर येतो तो " न सच है न झूट है, न सुख है न दुख है, चारों तरफ़ मैं ही मै हू " असे म्हणत अनंतात विलीन होणारा राजू आणि डोक्यावरचा मातीचा घडा फेकून, फोडून टाकून मनधुंद मुक्त गाणे गाणारी जीवनोन्मुख रोझी: आज फ़िर जीनेकी तमन्ना है..."


Dineshvs
Sunday, January 07, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला, गाईडची कथा, त्या काळात खुपच वादग्रस्त ठरली होती. रोझीचे नवर्‍याला सोडुन राजुकडे येणे त्या काळी प्रेक्षकाना पटणे जडच होते.

सिनेमाची सुरवात एस्डीच्या, वहा कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहा, ने होते.
लताची मोसे छल किये जाय, हि झिंझोटी रागातले छान गाणे सिनेमात वेगळाच संदर्भ घेऊन येते.
आणि पिया तोसे नैना लागे रे, चे टेकिंग काय वर्णावे, या एकाच गाण्यात राजस्थानची होळी, महाराष्ट्रातली दिवाळी, बंगालातला बिहु, असे सगळे सण दिसतात.
शेवटचे अल्ला मेघ दे, हे त्या मानाने कमी गाजलेले गीत.
या सिनेमात आशाचे एकहि गाणे नव्हते, आणि हा सल आशाने कायम बाळगला.


Kshipra
Tuesday, January 09, 2007 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sharmila, chhan lihila aahes.

Dineshvs
Tuesday, January 09, 2007 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज फिर जीनेकि तमन्ना है, हे गाणे अंतर्‍यापासुन म्हणजे, काटोंसे खीचके, पासुन सुरु होते, हे एक वेगळेपण.
हेच गाणे कयामत नावाच्या एका सिनेमात जयाप्रदाने सादर केलेय.
त्यावेळची मजा म्हणजे, मराठीत गाईड हा शब्द त्याकाळी फक्त शालेय पुस्तकाच्या गाईडला उद्देशुन वापरला जात असे.
या गाईडलाहि त्याकाळी प्रतिष्ठा नव्हती. शांता शेळकेनी काहि गाईड लिहिली होती, आणि या लेखनाला त्या लेखनकामाठी, असा शब्द योजत.


Mbhure
Tuesday, January 09, 2007 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे ऐकले होते की " काटों से... " च्या Orchestration मध्ये आर. डी. मुख्य हात होता. चू. भू. द्या.घ्या.

त्यावेळी SD ची प्रकृती ठीक नव्हती. SD ने देव आनंदला दुसरा म्युझिक डायरेक्टर घेऊन चित्रपत पुर्ण करण्याची संमतीही दिली होती. पण देवानंद SD साठी अडुन बसला होता. दरम्यानच्या काळात मेहंदी हसनच्या तीन गज़लस् चित्रपटात घेऊन चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी Financers दबाव टाकू लागले. त्या गज़ल विजय आनंदला पसंत पडल्या नव्हत्या. न राहून एका संध्याकाळी आनंद बंधू शैलेंद्रबरोबर SD च्या घरी ठाण मांडुन बसले. त्यातुनच क्या से क्या हो गया, तेरे मेरे सपने अब एक रंग है आणि दिन ढल जाए हाए रात न जाय ही रत्न जन्मली.

विजय आनंद दिग्दर्शक म्हणुन महान असला तरी फार आळशी होता. गाईड न करण्यासाठी त्यानी अनेक कारणे दिली. पण देव आनंदला तोच दिग्दर्शनासाठी हवा होता. देव आनंदने त्याला पकडुन आणले.

---- चित्रपट पत्रकारीतेतील चालते बोलते कॉंप्युटर माननीय इसाक मुजावरांकडुन ऐकलेल्या गप्पामधुन.


Robeenhood
Wednesday, January 10, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय आनंद दिग्दर्शक म्हणुन महान असला तरी फार आळशी होता. गाईड न करण्यासाठी त्यानी अनेक कारणे दिली.>>>
विजय आनन्दने गाईड करायला नकार न देण्याचे खरे कारण होते,
स्क्रिप्ट पाहिल्यावर तो टरकलाच त्याला प्रामाणिक पणे वाटले या चित्रपटामुळे भारताची परदेशात विकृत इमेज होईल.. त्यामुळे त्याने दोनदा पिक्चर करण्याचे नाकारले. परन्तु देव आनन्दच्या अति आग्रहामुळे शेवटी तो तयार झाला...


Satishm27
Friday, January 12, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला,
सुंदर लिहलस!!!!!!!!
guide आता पुर्ण पहावाच लागेल!!!!:-)


Shendenaxatra
Saturday, January 13, 2007 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला काही हा पिक्चर झेपला नाही. गाणी छान आहेत. वहिदा रेहमानचे काम आवडले. नाचही चांगले आहेत. पहिल्या भागातली ष्टोरी माझ्यासारख्या सामान्यांना कळणारी असल्यामुळे बरी वाटली.

पण राजु साधू बनल्यावर जे काही होते ते अत्यंत कंटाळवाणे वाटले. देव आनंदचे एका सुरातले श्वास न घेता अनेक मिनिटे चालणारे असंख्य संवाद नको वाटतात. त्यातून मलातरी काही बोध झाला नाही. कित्येकदा तो काय बोलतोय हेच कळत नाही. शेवटी कधी एकदा तो पिक्चर संपतोय असे होते.
एकंदरीत देव आनंद ह्या माणसाचा अभिनय मला अत्यंत चमत्कारिक वाटतो. साठीतले (म्हणजे १९६०) सिनेमे जरा बरे आहेत पण सत्तरीच्या दशकातील त्याची कामे म्हणजे अगदीच येडपटासारखी होती.


Yuvrajshekhar
Monday, March 05, 2007 - 9:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाईडच्या संदर्भातली आणखीन एक गोष्ट या चित्रपटात सुरुवातीलाच गाणे आहे वहा कौन है तेरा मुसाफ़िर जायेगा कहा?या गाण्यात आणखीन एक कडवं होतं जे या चित्रपटाच्या कथेशी सूचक असं आहे पण ते चित्रपटात किंवा कॅसेटमध्ये कुठेच आढळत नाही
त्या ओळी पुढील प्रमाणे
तूने ही सबको राह दिखाई
तू अपनी मंझिल क्यूं भूला?
सुलझा के राजा औरों की उलझन
क्यूं कच्चे धागों में झूला?
क्यूं नाचे सपेरा?
मुसाफ़िर जायेगा कहा...
अर्थात या ओळी मूळ गाण्यातून का वगळण्यात आल्या ते माहित नाही,
पण शैलेंद्रने लिहीलेली गाणी निव्वळ अप्रतिम.


Raviupadhye
Monday, January 28, 2008 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी या ओळी क्यासेटमध्ये निश्चितपणे ऐकलेल्या आहेत

Ajjuka
Monday, January 28, 2008 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कॅसेटमधेही ऐकलय. माझ्याकडे आख्खा सिनेमा ऑडिओ कॅसेटवर टेप केलेला आहे. (टिव्ही वर लागलेला असताना जुन्या पद्धतीने. मेरा पुरा खानदान इस फिल्लमके पीछे पागल है. माझे बाबा आणि धाकटा काका आणि मी.) त्यातही ऐकलंय. सिएन्मा बघतानाही ह्या ओळी ऐकलेल्या आहेत. आणि सिनेमाची पारायणं कैक वेळेला केलीयेत. या ओळी सलग गाण्यात नसून वेगवेगळ्या montages च्या वेळेला वापरल्यात.

Uchapatee
Monday, January 28, 2008 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतर्‍यापासुन सुरू होणारे दुसरे गाणे म्हणजे "फुलोंके रंगसे". ते ही देवच्याच प्रेमपुजारी मधे आहे. संगीत एसडींचेच.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators