Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
उसने कहा था

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कथा old classics » उसने कहा था « Previous Next »

Sharmilaphadke
Wednesday, July 26, 2006 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उसने कहा था

अमृतसर येथे रहाणारा नंदू हा खट्याळ मुलगा. तिथल्या गल्ली बजारात हिंडताना कुणाचीही छेडछाड करणारा, गावातल्या मुलींच्या खोड्या काढणारा.
नाश्त्यासाठी दही आणायला नंदू मिठाईच्या दुकानात जातो. तिथे एक मुलगी दही आणायलाच आलेली असते. ते घेऊन घरी जात असताना एक टांगेवाला तिच्या अंगावर आपला टांगा घालतो व समोरच असलेला नंदू तिला वाचवतो. मग नंदूची व टांगेवाल्याची जुंपून प्रकरण हातघाईवर येते. शेजारून जाणारा खैराती चाचा या भांदणात पडतो. टांगेवाला त्यालाही चांगलाच चोप देतो. मुलगी दही सांडले म्हणून रडत असते तेव्हा नंदू तिला आपल्याकडचे पैसे व वाडगा देऊन मदत करतो.

नंदू दही न घेताच घरी परत येतो. व त्याची आई पारो त्याला दह्याबद्दल विचारते, तेव्हा काहीतरी थापा मारुन तो वेळ मारुन नेतो. दही आणण्यासाठी तो खैराती चाचाकडे येतो. ती मुलगी दह्याचा वाडगा परत करण्यासाठी नंदूच्या घरी आलेली असते. ती परत जाताना नंदू तिला गाठतो आणि खट्याळपणे विचारतो .. तुझं लग्न ठरलय? ती 'धत' म्हणून लाजते आणि पळत आपल्या मामाकडे येते.

त्या मुलीचे नाव कमली. सुट्टीसाठी ती मामाकडे आलेली असते. नंदू तिला भेटायला जातो त्यावेळी ती आपल्या गावी परत गेल्याचे त्याला कळते.

काळ पुढे सरकतो. लहानपणी खट्याळपणा करणारा नंदू मोठा झाल्यावरही बदलत नाही. बाजारात टांगा घेऊन तो एके ठिकाणी उभा असतो. मागचा टांगेवाला आपला टांगा पुढे नेऊ शकत नाही म्हणून तो नंदूला त्याचा टांगा बाजूला घ्यायला सांगतो. नंदू आडमुठेपणा करतो व ते पाहून मागच्या टांग्यात बसलेली स्त्री त्याला गुंड म्हणते.

नंदू घरी येऊन आपल्या आईला शाल आणी चष्मा देतो आणि गहाण टाकलेला तिचा हारही देतो. नंदूला गुंड म्हणणारी टांग्यातली ती स्त्री त्याची बालमैत्रीण असते. त्याच्या आईला भेटायला कमली नंदूच्या घरी येते पण नंदू तिला ओळख देत नाही. ती परत घरी जायला निघते तेव्हा खट्याळ नंदू तिला विचारतो - तुझं लग्न ठरलय? ती 'धत' म्हणून लाजून घरी पळते.

कमलीचे मामा रामलालबरोबर कमलीच्या विवाहाचा विषय काढतात. गावातल्या जत्रेत नंदू व कमली यांना एकत्र नाचताना रामलाल पहातो व तो मामाकडे चहाडी करतो. तिचे मामा तिला रागावतात.

नंदू धट्टाकट्टा असूनही काही काम करत नाही, नुसती गुंडगिरी करुन वेळ काढतो म्हणून कमलीचा व नंदूचा विवाह होणे शक्य नाही, असे कमलीचे मामा पारोला सांगतात आणि तसे ती नंदूला सांगते. तो नाराज होतो व घरातून बाहेर पडतो. घरी येतो व आपली बॅग भरु लागतो. वृद्ध झालेली त्याची आई पारो त्याला 'कुठं निघालास?' म्हणून विचारते. तो तिला नोकरीसाठी बाहेरगावी जात असल्याच सांगतो. ती त्याला अडवते, पण त्याचा निष्चय दृढ असतो. जात असताना कमलीची व त्याची दृष्टादष्ट होते. भेट होत नाही. कमलीचे त्याच्यावर प्रेम आहे याची जाणीव त्याला असते.

नंदू सैन्यात भरती होतो व त्याचे सैनिकी शिक्षण सुरु होते. लवकरच तो सार्‍या गोष्टीत तरबेज होतो. दरम्यानच्या काळात कमलीचे लग्न ठरते. तिचे मामा जे ठरव्टिल ते ऐकण्याशिवाय तिला पर्यायच नसतो. सहा महिन्यांचे शिक्षण पुरे झाल्यावर नंदू आपल्या घरी येतो व कमलीसाठी आणलेल्या बांगड्या देण्यासाठी तिच्याकडे जातो. ती बोलत नाही. मग तो तिला खट्याळपणे 'तुझं लग्न ठरलय का?' म्हणून विचारतो. पाणावलेल्या डोळ्यांनी ती 'होय' म्हणते. तो खिन्न होऊन आपल्या घरी परत येतो.

निराश झालेला नंदू परत आपल्या ड्यूटीवर हजर होतो. तिथे त्याचा बॉस लग्नासाठी रजा घेऊन तो निघालेला असतो.
दरम्यानच्या काळात नंदूच्या आईची तब्येत बिघडते आणि तो आईच्या सेवेत मग्न असतानाच युद्ध पेटते.

नंदू युद्धभूमीवर जाण्यासाठी अंबाला स्टेशनवर उभा असतो तेव्हा आपल्या नवर्‍याला निरोप देण्यासाठी आलेली कमली भेटते. तिच्या नवर्‍याला या दोघांची ओळख आहे हे माहीत नसते. तो दोघांची ओळख करुन देतो पण तेवढ्यातच त्याला कुणीतरी बोलावते म्हणून तो तिकडे जातो.

कमली व नंदू एकटेच असतात. ती त्याला स्वत्:ची व तिच्या नवर्‍याची काळजी घे एवढेच सांगते. सर्व गाडीत बसतात. कमली स्टेशनवर एकटीच उभी असते.

युद्धभूमीवर भारतीय सैनिक जपान्यांचा पाठलाग करतात. म्यावाडी या गावातल्या जंगलात निरिक्षण करत असताना नंदूला आणि त्याच्या बॉसला जपानी सैनिक घेरतात. बेछूटपणे गोळीबार करतात. त्यात कमलीचा नवरा जखमी होतो. नंदूही खूप जखमी होतो. पण आपल्या प्राणांची पर्वा न करता तो जखमी झालेल्या कमलीच्या नवर्‍याला खांद्यावर घेऊन आपल्या छावणीकडे परत येतो.

नंदूला गंभीर जखमा झालेल्या असतात. तो वाचण्याची शक्यताही कमी असते. बॉस त्याच्याकडे येतो आणि त्याला 'तू आपला जीव धोक्यात घालून माझे प्राण का वाचवलेस?' म्हणून विचारतो. नंदूला काहीतरी सांगायचे असते. बॉस 'काय' म्हणून त्याला विचारतो. मृत्युशय्येवर असलेला नंदू ' उसने कहा था! ' एवढेच शब्द कसेबसे उच्चारुन आपले प्राण सोडतो.

नंदूला मरणोत्तर परमवीरचक्र देण्यात येते. त्याची आई ते स्विकारते.

अतिशय साधी सरळ पण काळजाला भिडणारी पटकथा व त्याचे संवेदनशील चित्रीकरण. टिपिकल प्रेम व त्यागाची साठीच्या दशकाच्या सुरुवातीची ही कथा. बिमल दांचे दिग्दर्शन ह्याला लाभले नाही. ते केले त्यांचाच सहाय्यक मोनी भटाचार्य. अर्थात सूत्रे बिमलदांचीच होती व चित्रपटात ते प्रत्येक फ़्रेम मधे जाणवते.

कलाकार : सुनील दत्त, नंदा, तरुण बोस, दुर्गा खोटे, राजेन्द्रनाथ, असित सेन.
संगीत : सलील चौधरी
गीते : शैलेन्द्र


Pendhya
Saturday, January 13, 2007 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला, छान वर्णन केलं आहेस. प्रथम, हे वाचल्यावर, थोडं आश्चर्य वाटलं. कारण, हा चित्रपट, कुणाला आठवत असेल असे वाटलेही नव्हते.

चित्रपटाची पटकथा, ही typical , बिमल रॉय प्रॉडक्शन च्या बॅनर खाली येणार्‍या चित्रपटांच्या धर्ती वरची होती.
बिमलदांचे ह्याला दिग्दर्शन नसले तरी, त्यांच्या ईतर चित्रपटांसारखेच, ह्या चित्रपटात पण, " suttle " body language मधुन " बरच काही सांगून जाणं " , हे ह्या चित्रपटाला पण जमले आहे.

लताच्या आवाजातलं, माझं एक अतिशय आवडतं गाणं ह्या चित्रपटात होतं.......
मचलती आरजू, खडी बाहें पसारे,
ओ मेरे साजना रे, धडकता दिल पुकारे, आजा.



हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators