Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
पॉलिटीकस्टायर

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » विनोदी साहित्य » पॉलिटीकस्टायर « Previous Next »

Yog
Thursday, July 20, 2006 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पॉलिटीकसटायर

अनेक छोट्या मोठ्या कम्पन्याना हाताशी धरून पॉलिटिकस्टायर या कम्पनीने गेले काही वर्षे मार्केट मधे मस्त धूम उडवली होती. तळागाळातील, उपो, कुपो, शो अशा सर्व षिताना अन इकडचे टायर तिकडे करण्यात उस्ताद असलेल्या मुरब्बी भूताना कामावर घेवून कम्पनीने आपले बस्तान बसवले होते. डाव्या, उजव्या, उभ्या, आडव्या, तिरप्या इत्यादी सर्व विचारसारणीचे अभियन्ते अन नोकरदार ठेवून देखिल कम्पनीचा टायर balanced असल्यागत सरळ रेषेत चालतो याच कौतूक करणारे अजी "सोनियाचा दिनु" म्हणून बागडत होते. सर्व कसे सुरळीत म्हणजे काळ्या खड्ड्यान्पासून ते हिरव्या गड्ड्यान्पर्यन्त, चालू असतानाच एक भयन्कर घटना घडली अन एरवी अशा इतर घटनानी नाकावरील माशी देखिल न उडू देणार्‍या कम्पनीच्या अधिकार्‍यान्ची झोप उडाली. या घटनेच्या निमिताने ही आजची तातडीची बैठक :
कम्पनीचा PR अधिकारी धावत मुख्ख्य दालनात येतो, तोन्डाला फ़ेस वगैरे...
अहो काय झाल काय...?
काय सान्गू साहेब, दहा मिनीटाच्या अन्तराने आपले आठ टायर फ़ुटले.
अरे मग त्यात एव्हड घाबरण्यासारख काय आहे?
साहेब अहो चिन्धड्या उडाल्यात..
टायरच्या? अरे अरे!
नाही हो, माणसान्च्या... लोकान्च्या
ऑ हे कसे काय झाले बुवा?
साहेब नेमकी गर्दीच्या वेळी अन गर्दीच्या ठिकाणी टायर फ़ुटले. आता तुम्हाला माहितच आहे, आपल्याकडे किती गर्दी असते, आपल्या घामाने दुसर्‍याला आन्घोळ घालणार्‍या गर्दीत जिथे हवेलाही शिरकाव नसतो अशा jam packed गर्दीत सगळे टायर फ़ुटले. शम्भर एक माणसे दगावली असावीत, जखमीन्ची सन्ख्या तर मोजताच येत नाही..
अस.. बरं! काही विशेष चिन्ता करायची गरज नाही आठच टायर फ़ुटलेत, आपल्याकडे भरपूर मोठा साठा आहे टायरसचा.
साहेब यावेळी प्रकरण मोठ आहे सर्व टिव्ही मिडीयावाले तुटून पडले आहेत, लोकही बोम्ब मारत आहेत.
आयला या मिडीया वाल्यानी काय फ़ुटलेले टायर कधी बघितले नाहीत काय? त्यात काय नविन आहे? उगाच का लोकाना भडकावत आहेत ते? लोकाना तर सवय आहे की टायर फ़ुटण्याची. उद्या आमचेच कम्पनीचे टायर पुन्हा ढुन्गणाखाली घेवून कामावर जातील. ते तरी कशाला बोम्ब मारत आहेत? एक काम करा इतके टायर्स (ढुन्गणाखाली) फ़ुटूनही लोक पुन्हा खम्बीरपणे उभेच आहेत यासाठी नेहेमीचे "शाबाशीचे स्टेटमेन्ट" इशू करा.
साहेब ते करून झाले पण यावेळी नुसत्या शाबाशीने काम भागणार नाही म्हणतायत ते.
आता हे काय नविन? अजून काय हवे आहे त्याना? आम्ही काय धर्मादाय संस्था उघडली आहे का? (बाजूला बसलेल्या कम्पनीच्या अर्थमन्त्र्याला विचारतात, काय हो आजचा भाव काय आहे मार्केटमधला? तो धडादड आकडे "exchange" करतो. साहेब आज एक का बीस रेट आहे). बर अस करा मृताना वीस हजार अन जखमीना दहा हजार घोषित करा.
साहेब रिवाजानुसार तेही घोषित करून झालय पण यावेळी भिक नको पण टायर आवर म्हणताहेत लोक...
शा! फ़ारच अडून बसलेत बुवा हे लोक. यामागे नक्की त्या "हिन्दू या" टायर कम्पनीचा हात असणार. ताबडतोब माणसे कामावर लावा अन त्यान्च्या कम्पनीतून आजवर फ़ुटलेल्या, पन्क्चर झालेल्या सर्वाची यादी घेवून या.
साहेब यादी टायर्सची का माणसान्ची?
दोघान्ची हो..
(आपल्या दूरसन्चार अधिकार्‍याकडे पहात),अहो सध्ध्या काही इतर प्रकरणं गाजवता येणार नाहीत का? कुठे भारत पाक क्रिकेट सामने, सचिनचा खान्दा, मरीआईच्या डोन्गरावरील जत्रा, सॅटेलाईट लॉन्च, मिका घ्या मिका चित्रपट, कौन बनेगा टायरपती, आखिर सलमा का पती कौन असा संवाद, झिदान चे निदान, काहीच नाही तर रॉकेल, तेलाची भाववाढ असे काही विषय लावून धरता येतील का? काय आहे टायरचा स्फ़ोट होवून त्यातली हवा शिल्लक नसली तरी लोकाना गुन्गवून ठेवायला अशी इतर प्रकरणं आवश्यक आहेत.

साहेब ते सर्व नन्तर करता येईल हो, तूर्तास सन्तप्त जमावाला शान्त करायचे मनावर घ्या नाहितर यावेळी आपली कम्पनी बुडीत निघेल, साहेब यामागे मोठा "कट" वगैरे असल्याच बोलल जातय.
काय कट कट आहे साली. बरं बसा आपण जरा नीट विचार करुया काहितरी मार्ग सापडेल आजच्या बैठकीतून. (कम्पनीच्या सुरक्षा मन्त्र्याशी सल्ला मसलत करतात, काय हो, तुमच्याकडे सूत्रानी काय पक्की खबर दिली आहे? तो हळूच कानात पुटपुटतो, साहेब सर्व "आपलेच" होते अशी खबर आहे.)
साहेब पुट्पुटतात, मटेरियल आपलच (नेहेमीचाच सप्लायर), टायर बनवणारे पण आपलेच लोक, बाजारात विकणारे पण आपलेच तेव्हा जरा कठीणच आहे तरिही तुम्ही एक स्टेटमेन्ट लिहून घ्या.
"टायर च्या उत्पादनात सर्व नियम अन क्वालिटी स्टॅन्डर्ड्स यान्चे काटेकोर पणे पालन केले जात असल्याने सबब टायर मधिल हवेने ऐनवेळी स्वताचे गुणधर्म बदलल्यानेच हे स्फ़ोट झाले आहेत. यात कम्पनी अन व्यवस्थापन कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही... आणि"..

इतक्यात अचानक पत्रकार अन मिडीया मन्डळी बैठकीत घुसतात...
(साहेब चरफ़डत द्वारपालाला विचारतात) काय रे, काय गडबड आहे? कुणालाही आत सोडू नको सान्गितल होत ना?
द्वारपाल घाबराघुबरा होत, काय करू साहेब हे ऐकतच नाहीत, बाईट घ्यायला आलेत, माझाही घेतला... तुम्हीच सम्भाळा याना म्हणत निघून जातो.

आपापली दान्डकी (या घटनेच्या निमित्ताने तरी)साहेबान्च्या घशात घुसवायचा प्रयत्न करत सर्वजण गोन्धळ घालतात. तितक्यात साहेबान्चे PR विनन्ती करतात. हे पहा एक एक करून पुढे या अन प्रश्ण विचारा असे गोन्धळ करू नका.
तेव्हड्यात एक क्लियरसीलधूत ललना आपली बट सम्भाळत शक्य तितक्या तारस्वरात प्रश्ण करते :
हे पहा इतके लोक मृत्त्युमुखी पडले, जखमी झाले, अहोरात्र टायरवर धावणारे सर्व शहर बन्द पडले आहे अन तुम्ही असे जबाबदारी झटकून कसे मोकळे होता?
साहेब आपले शत्रूघनसिन्हा स्टाईल चप्प बसवलेले केस उगाचच झटकल्यासारखे उत्तर देतात :
अहो, याही आधी टायर फ़ुटलेच होते. त्याच्या चौकशीतून अजून काहीच निष्पन्न झालेले नाही तेव्हा पुन्हा याहीवेळी तुम्ही आम्हाला कसे काय जबाबदार धरत आहात? मृत झालेल्या व्यक्तीन्मधे आमचेही कम्पनीत काम करणारे लोक आहेतच की. तेव्हा दुख्ख आम्हालाही आहेच.

तुमचे असे खराब टायर बाजारात आले आहेत अन ते कधिही कुठेही फ़ुटू शकतात अशी माहिती तुम्हाला गुप्तचर विभागाने दिली होती ना..?
अहो आता तुम्हीच सान्गा अशी माहिती मिळाली तरी रोज करोडोने पळणार्‍या या टायर्समधे कुठले खराब अन कुठे फ़ुटतील हे कुणी सान्गू शकते का? शिवाय फ़ुटलेल्या टायर्स मधिल हवा इथली नसून परकीय देशातील असली तर? यामागे घातपात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुम्हाला काय म्हणायचे आहे?
हेच की हा प्रश्ण खूप व्यापक आहे. परप्रान्तीय हवेचे येथे घुसणारे जत्थे, सीमापार भागातून देशाच्या अन्तर्गत वायूव्यवस्थेवर केलेले आक्रमण, गेले अनेक वर्शे धर्माच्या बुरख्याआड वाहणारी रन्गीत हवा, मिडीयाने बनवलेली हवा, असे एक ना दोन अनेक गुन्तागुन्तीचे हवेचे प्रश्ण यामागे आहेत. शिवाय कम्पनीच्या अधिकृत उत्तरात म्हटल्याप्रमाणे एरवी चारचौघात गुपचूप आपले कारभार उरकणार्‍या हवेचे मानसिक सन्तुलन बिघडून हा नैसर्गिक प्रकोप झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. एकन्दरीत सम्पूर्ण देशाचीच "अबुहवा" अशी बिघडलेली असताना केवळ आमच्या आठ टायर मधील हवेला दोष देणे हे सयुक्तिक वाटत नाही.

बरं मग अशा घटना पुन्हा वारंवार घडू नयेत म्हणून कम्पनी काही ठोस उपाय करणार आहे की नाही?
आता ठोस म्हणाल तर जिथे हवा आहे पण दिसत नाही अशी परिस्थिती आहे तिथे ठोस सबूत, पुरावे अन उपाय कसे काय करणार? तरिही कम्पनीपेक्षा देशहीत ध्यानात घेवून आम्ही काही उपाय सुचवू इच्छीतो :
लोकानी आपल्या अवतीभोवती फ़िरणार्‍या संशयास्पद टायर्सवर नजर ठेवावी. उघड्या गटारापासून ते थेट मुरुड जन्जीर्‍यावरील गुपित दरवाज्यामागील सर्व संशयीत चीजवस्तू वर नजर ठेवणे हे प्रत्त्येकाचे काम आहे. विशेष करून सणासुदिच्या दिवसात व उत्सव, महोत्सवाच्या वेळी असे बरेच नवनविन टायर्स बाजारात येत असल्याने त्याचा वापर करण्या आधी प्रत्त्येकाने आपापले टायर्स नीट तपासून घ्यावेत.
फ़क्त आपल्याच शहरात नव्हे तर जगभर सर्वत्र टायर्स फ़ुटत आहेत तेव्हा अशा टायरेरीस्ट सन्घटनान्विरुध्ध एकत्र येवून टायर न होता जीवन जगले पाहीजे

अहो पण हे सर्व लोकानी करायचे उपाय आहेत. कम्पनी काही करणार आहे की नाही?
जरूर सर्वप्रथम आम्ही सम्पूर्ण शहराची नाकाबन्दी केली आहे. असे खराब टायर्स कुठल्या ना कुठल्या नाक्यावर निश्चीत सापडतील अशी आम्हाला खात्री आहे.
या शहरात अन देशभर सर्वत्र एक कोम्बीन्ग ऑपरेशन राबविले जाईल ज्यात एकाही फ़ुगलेल्या वा सुस्तावलेल्या टायर्स ची गय केली जाणार नाही.
घटनास्थळावरील फ़ुटलेल्या टायर्सचे सर्व "शिल्लक" धागे दोरे हाती येताच त्या दिशेने कसून तपास केला जाईल, सुतावरून स्वर्ग गाठता येतो यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
या स्फ़ोटान्ची निःपक्षपाती चौकशी करण्यात येईल अन दुषित टायर निर्मितीमागे कम्पनितील कुठलाही अधिकारी, वा भूते "सापडलीच" तर त्यान्च्यावर कडक कारवाई केली जाईल.
आजपासून निदान पुढिल काही दिवस तरी प्रत्त्येक टायरवर कडक लक्ष ठेवले जाईल. टायर फ़ुटायचे बन्द झाले की मग पुन्हा नव्याने बाजारात विक्रीसाठी आणण्यात येतील.

साहेब घडल्या प्रकाराची जबाबदारी स्विकारून आपले अधिकारी व आपण राजिनामा देणार आहात का? विरोधी कम्पन्यान्ची तशी मागणी आहे.
आमच्या राजिनाम्यामूळे कुठेही कुठलाही टायर फ़ुटायचा बन्द होणार असेल किव्वा गेलेली हवा sorry मृत व्यक्ती परत येणार असेल तर राजिनामा द्यायला हरकत नाही पण आजकाल ज्याना स्वताच्या शरीरातील फ़ुगणार्‍या हवेवर नियन्त्रण ठेवता येत नाही त्यानी टायर मधिल हवेवर नियन्त्रण ठेवण्याचे आश्वासन देणे ही जनतेची दिशाभूल ठरेल. तेव्हा हा प्रश्ण एकाच कम्पनीचा नसून सर्वसमावेशक आहे. दुर्दैव की विरोधी कम्पन्या याचे पॉलिटीक्स करत आहेत.

साहेब लोकाना असे थर्ड क्लास दर्जाचे टायर देवून तुम्ही मात्र इम्पोर्टेड इटलीचे वगैरे टायर्स वापरता असा आरोप आहे?
छे छे! कुठली टायर्स वापरायची ते कम्पनी ठरवते. आमची सूनबाई ईटलीची असल्याने तिच्या हितचिन्तकान्नी देवू केलेली इटालियन टायर्स कधी कधी धूळ खात पडू नये म्हणून एखाद दोन दिवस चालवतो इतकच. आता अशी इम्पोर्टेड टायर्स चालवायला अजून आपल्याकडे तितके चान्गले रस्ते आहेत का तुम्हीच विचार करा पाहू. एरवी आम्हिही कम्पनिचीच टायर्स वापरतो. शेवटी आम्ही पण तुमच्यातलेच एक आहोत हे विसरून चालणार नाही. पण शहराचा सिन्गापूर वा शान्घाय होईल तेव्हा सर्वसामान्य नागरिकही असे इम्पोर्टेड टायर वापरू शकतील.

थोडक्यात, शम्भर टक्के safe असलेली टायर्स बनवण्याचे तन्त्रज्ञान अजूनही आपल्याकडे विकसित झालेले नाही असे समजायचे का? यासाठी काही परदेशी राष्ट्रान्ची मदत घेणार का?
मदत? का नाही? नुकताच आम्ही अमेरिकेबरोबर टायरकरार केला आहे. त्यानुसार कम्पनितील सर्व कच्चा माल, यन्त्रे तन्त्रे, ठिकाणे याचे अमेरिका सर्वेक्षण करून टायर्स safe आहेत असे आम्हाला प्रमाणपत्र देणार आहे.बदल्यात टायर्सचा राजा हापूस टायर याची अमेरिकेत पुन्हा निर्यात करण्याचे परवाने आम्हाला मिळतील. शेवटी त्यान्चिही अशा फ़ुटणार्‍या टायर्सविरुध्ध लढाई चालूच आहे. किम्बहुना सर्व राष्ट्रान्च्या सुरक्षा परिषदेत निदान आमच्या टायर ला तरी एक जागा द्यावी असा प्रस्ताव आम्ही मान्डला आहे.

साहेब, टायर्सच्या स्फ़ोटामागे फ़ार मोठा "रबरी" घोटाळा असल्याचा "छगनप्रस्ताव" तुमच्या विरोधकानी पुढील टायरसभेत चर्चेसाठी घ्यायचे सुतोवाच केले आहे. या सर्व परिस्थितीतून कम्पनी तग धरून राहिल असे तुम्हाला वाटते का? इतकी वर्षे यशस्वीपणे टायर बनवण्यामागे कम्पनीचा यशस्वी मूलमन्त्र कुठला?

कम्पनीला आपल्या पूर्वापार चालत आलेल्या मुल्य अन संस्कृतीचा आदर आहे. आजही आमच्या पूर्वजानी लिहून ठेवलेला "सन्तुलनाचा" मूलमन्त्र आम्ही आचरत आहोत. हवा, टायर, कम्पनी अन पर्यायाने देशाचे सन्तुलन राखणारा हाच तो मूलमन्त्र आहे :
PV=nRT
( P= पार्टी, V= वोट्स, R= रिझर्वेशन, T= टेररीस्ट, n= अनेक वर्षे.)


अशा रितीने बैठक सम्पते अन शेवटी साहेबान्च्या आग्रहाखातर जाहिरात झळकते,
"आज भी "करोडोन्की" की पेहचान पॉलिटिकस्टायर!".

-योग


Chinnu
Thursday, July 20, 2006 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, व्यंग बाण फार कसलेले आहेत रे तुझे! पण विचार करण्यासरखे पॉइंटस आहेत हे नक्किच.

Limbutimbu
Friday, July 21, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिल हेस!
काश, जीएसला अस लिहिता आल तर?


Soultrip
Friday, July 21, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Very well written satire!


Moodi
Saturday, July 22, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सद्य परीस्थितीला अगदी अचूक शोभणारे लिहीलेस रे.

Majhiduniya
Tuesday, July 25, 2006 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे सही झकास

Proffspider
Tuesday, July 25, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग अगदी मस्त लिहिला आहेस. एकदम fundoooo!!! :-)

Kmayuresh2002
Tuesday, July 25, 2006 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, सही लिहीलयस मित्रा :-)

Dineshvs
Tuesday, July 25, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, अगदी समर्पक लिखाण,
मी हल्ली बरीच वर्षे टिव्ही वैगरे बघणे सोडुन दिलेय, पण क्वचित कधी कधी असल्या मुलाखती डोळ्यासमोर येतात तेंव्हा सार्वजनिक विवेकबुद्धी किती नीच पातळीवर गेलीय, याचाच अचंबा वाटत राहतो.


Milya
Wednesday, July 26, 2006 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग सहीच रे!!! एकाहुन एक सही शेरे मारले आहेस रे!!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators