« | »

संपादकीय
दीपावली...ज्याने त्याने आपापल्या परीने साजरा करावा आणि वर्षभराचा आनंदाचा ठेवा जतन करून ठेवावा असा हा प्रसन्न सण!

दीपावली म्हणजे आनंदाचं उधाण! लखलखत्या दिव्यांची रोषणाई, पंचपक्वान्न, जल्लोष.. पण हा आनंद खराच असतो की संसर्गजन्य? साजरा केला जाणारा सण हा आपल्या सुखी, समाधानी मनाचा सहजपणाने घडणारा आविष्कार आहे की 'करायला हवं' म्हणून केलं जाणारं कर्तव्य? काळवंडलेल्या मनावर पांघरूण घालण्यासाठी तर आपल्याला दिवाळीच्या कृत्रिम झगमगाटाची गरज भासत नाही ना? अस्वस्थ करणार्‍या अंतर्मनाचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून तर आपण कानठळ्या बसवणारे फटाके उडवत नाही ना?

दीपावली म्हणजे दीपप्रज्वलन, लखलखता प्रकाश, उजेडाची पहाट. पण नक्की कुठले दिवे पेटवायचे? कुठला अंधकार दूर करायचा? आजकाल झालेलं बाजारू स्वरूप हाच खरा सण? ह्या भौतिक गोष्टींना आपण किती महत्व द्यावं? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न झाला तर त्यातलं मूल्यवान असं जे काही आहे ते गवसेल आणि या सणाचं रूपांतर सहजगत्या दीपोत्सवात होऊ शकेल....

दीपावली सोबतच 'नेमेचि येतो मग पावसाळा' तसाच आपला दिवाळी अंक. पण नेमाने येत असला तरी त्या पावसाचं अप्रूप असतंच, तसंच दिवाळी अंकाचं... या वर्षी गणेश चतुर्थीला मायबोलीला १० वर्षे पूर्ण झाली. 'हितगुज' चा हा दशकपूर्ती दिवाळी विशेषांक प्रकाशित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या निमित्तानं "मी आणि मायबोली" सारखी एक अभिनव स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यातील विजेत्यांचे अभिनंदन! या अंकासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत करणार्‍यांचे, पाठीशी असलेल्या सर्व मायबोलीकरांचे आणि वाचकांचे जितके आभार मानावेत तितके थोडेच आहेत.

दीपावली आणि येणारे नवीन वर्ष आपल्याकरता सुबत्ता घेऊन येवो. येणार्‍या आर्थिक सुबत्तेबरोबरच, मनात उभे राहणारे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी लागणारे वैचारिक बळ आपल्याला लाभो आणि आपणां सर्वांना ही दीपावली सुखा - समाधानाची आणि आनंदाची जावो ही सदिच्छा!!

- संपादक मंडळ.