Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
भाषा आणि मराठी भाषा

Hitguj » Language and Literature » भाषा » भाषा आणि मराठी भाषा « Previous Next »

Eksamanyamanus
Thursday, June 28, 2007 - 11:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिप्राचीन काळी मनुष्यप्राण्याच्या शरीरातल्या इतर संस्थांसमवेत मज्जासंस्था, श्रवणसंस्था,कंठ, ओठ,जीभ,दात,नाक ह्या अवयवांची अतिआश्चर्याची उत्क्रांती झाली, आणि त्यायोगे तोंडाने तर्हेतर्हेचे आवाज करणे आणि दुसर्या प्राण्यांनी/मनुष्यांनी केलेले आवाज ऐकणे ह्या गोष्टी मनुष्यप्राण्याला शक्य झाल्या. त्या उत्क्रांतीच्या आणखी पलिकडे माणसाच्या मेंदूची उत्क्रांती अशी की विशिष्ट आवाजांना विशिष्ट मूर्त/अमूर्त गोष्टींची प्रतीके करण्याची कल्पना माणसाला सुचली. त्यानंतरचा माणसाच्या बुद्धीचा टप्पा म्हणजे वेगवेगळ्या मूर्त/अमूर्त गोष्टींची प्रतीकेे ठरलेल्या शब्दांना विशिष्ट रीत्या वाक्यांच्या साखळ्यांमधे बांधून सभोवतीच्या माणसांशी विचारांची देवाणघेवाण करण्याची माणसाला सुचलेली कल्पना. मुख्य म्हणजे विशिष्ट आवाजांच्या साखळ्यांच्या प्रतीकांद्वारे विचारांची देवाणघेवाण करण्याकरता माणसांच्या "टोळ्यां"मधे प्रतीकांसंबंधात सर्वसंमतता अनिवार्यतः असावी लागणार होती आणि असावी लागते!

वर म्हटलेली "टोळ्यां"मधली शब्द आणि भाषेचे व्याकरण ह्यांबाबतची सर्वसंमतता गरजेपायी हळूहळू कशी तयार झाली असावी ही कल्पना खूप मनोरंजक आहे. कारण कुठल्याही "टोळी"मधली ती सर्वसंमतता कुठल्याही काळी टोळीतल्या अग्रणींच्या सभा भरवून टोळ्यांनी ठरवल्या नव्हत्या! कालौघात वेगवेगळ्या भाषांमधले व्याकरण हळूहळू ठरत गेले, वेगवेगळे शब्द प्रचारात आले, काही शब्दांचे अर्थ बदलले, काही प्रचलित शब्द अप्रचलित झाले. भाषांमधले शब्द आणि व्याकरणसुद्धा, दोन्ही गोष्टी कालौघात अनिवार्यतः हळूहळू बदलत असतात.

उदाहरणार्थ, शिवाजींनी बाळाजी आवजी चिटणीसांना लिहून घेण्याकरता कथन केलेल्या एका पत्राच्या सुरवातीतली भाषा अशी:

मशरूल अनाम जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुनांनी दिमत पायगो मुक्काम मौजे दलवटणे ता॥
चिपळूण मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजी राजे. सु॥ अबी सबैन व अलफ. कसबे चिपळूणीं साहेबी लष्कराची विल्हे केली आणि याउपरी घाटावर कटक जावें ऐसा मान नाही...

(त्याउलट शिवाजींच्या आधी तब्बल चारशे वर्षे आयुष्य कंठून गेलेल्या संत जनाबाईंच्या नावे जे सुमारे ३०० अभंग प्रसिद्ध आहेत त्या सगळ्या अभंगांमधली भाषा अगदी सद्यःच्या मराठीसारखी आहे हे मोठे कोडे आहे. उदाहरणार्थ संत जनाबाईंच्या नावे प्रसिद्ध असलेला एक अभंग असा:

उदक भरलें नेत्रीं । पुशितसे आपुले पदरीं ॥
जीवीच्या जीवना । श्रमूं नको नारायणा ॥
प्रेमें दाटलीसे कंठीं । गळां घातलीसे मिठी ॥
नको कष्टी होऊं देवा । जनी दासी रे केशवा ॥

चोखा मेळा,नामदेव, वगैरे इतर प्राचीन संतांच्या नावे प्रसिद्ध असलेल्या अभंगांमधली भाषासुद्धा अगदी सद्यःच्या मराठीसारखी आहे. संत ज्ञानेश्वर,संत नामदेव, आणि संत जनाबाई हे तिघेही समकालीन होते. असे असून फक्त ज्ञानेश्वरीतली भाषा जुन्या साच्यातली --प्राकृत-- आहे.)

काही भाषा फक्त "बोलभाषा" आहेत, म्हणजे बोललेल्या विचारांच्या शब्दप्रतीकांशी सुसंगत अशी लेखी चिह्ने/प्रतीके त्या भाषांमधे नाहीत. शब्दप्रतीकांशी सुसंगत लेखी चिह्ने/प्रतीके--म्हणजे भाषांच्या लिप्या-- तयार करण्याची कल्पना पुरातन काळी कोणत्या तरी कल्पक माणसाला ज्या दिवशी प्रथम सुचली तो दिवस चाक तयार करण्याची कल्पना माणसाला सुचलेल्या दिवसाइतकाच महत्त्वाचा खास आहे. अर्थात आपले विचार शाश्वतरीत्या प्रकट करून ठेवण्याकरता माणसाला खूप मर्यादी अशी चित्रलिपी प्रथम सुचली होती.

भाषांमधल्या शब्दप्रतीकांसंबंधात वेगवेगळ्या समाजांमधे बरीच सर्वसंमतता असते हे खरे, पण बर्याच वेळा समाजातल्या वेगवेगळ्या माणसांच्या मनात काहीकाही शब्दांचा वेगवेगळा "अर्थ" -प्रतीक-- असतो. ही वस्तुस्थिती काही वेळा खूप अनर्थ निर्माण करू शकते, त्याचे कारण एकमेकांशी बोलणार्या दोन्ही माणसांना त्या वस्तुस्थितीची सुतराम कल्पना नसते. दुसर्याशी बोलताना कुठल्या तरी शब्दासंबंधी त्या वस्तुस्थितीची पुसट कल्पना जर एकाद्याच्या मनात डोकावली तरच त्याबाबत स्पष्टीकरण होऊन त्या दोघा माणासांच्या विचारांच्या देवाणघेवाणीत लहानमोठा अनर्थ टळू शकतो. उलट काही वेळा विशेषतः राजकारणी मंडळी आपल्या वक्तव्यात काहीकाही सन्दिग्ध शब्द ते ऐकणार्यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून वापरत असतात!

काही शब्दांचे सूचितार्थ वेगवेगळ्या माणसांच्या मनात भिन्न असतात ही एक गोष्ट; त्याच्या जोडीला कितीतरी शब्दांना अगदी भिन्न असे तीन-पाच-दहा-पंधरा सर्वसंमत अर्थ असतात. ह्या गोष्टीचा उपयोग करून --शब्दश्लेष किंवा अर्थश्लेष योजून-- विनोद निर्माण करण्याची कल्पना जगातल्या सगळ्या समाजांमधे शेकडो वर्षे अस्तित्वात आहे. त्या विनोदांमधली अनपेक्षितता श्रोत्यांचे/वाचकांचे मनोरंजन करण्याला कारणीभूत होत असते. तशा तर्हेचे विनोद करून मूळ गंभीर विषयाला पार बगल देण्याचे कामही काही वेळा विशेषतः राजकारणी मंडळी करत असतात.

तात्त्विक दृष्ट्या कोणत्याही भाषेतले शब्द ही केवळ कशी ना कशी सर्वसंमत झालेली प्रतीके आहेत. तेव्हा "नावात काय आहे? ज्या गोष्टीला आपण 'गुलाब' म्हणतो तिला आपण दुसरे कोणतेही नाव दिले --किंवा वाच्यार्थाने नाव 'ठेवले'-- तरी ती आपणा माणसाना सुगंधाची अनुभूती तितकीच सुखद देणार" अशा साधारण भाषांतराचे एक वाक्य शेक्सपिअर ह्या इंग्रजी श्रेष्ठ लेखकाने "रोमिओ ऍंड जूलिएट" ह्या आपल्या नाटकातल्या दुसर्या अंकात जूलिएटच्या तोंडी घातले आहे. पण ते विधान करणार्या जूलिएटला माणसाच्या मनोरचनेचे संबंधित ज्ञान उघडपणे बरेच कमी होते. पूर्वी प्रचारात असलेल्या कुठल्याही अप्रिय गोष्टीच्या संज्ञेशी काही संबंध किंवा उच्चाराचे साम्य असलेली किंवा कानाला कर्कश भासणार्या अक्षरक्रमाची एकादी संज्ञा जर कोणी कुठल्या गोष्टीला नव्याने दिली तर ती संज्ञा समाजात हळूहळू सर्वसंमत होण्याची शक्यता माणसाच्या मनोरचनेपायी सुतराम नाही. "'गु', 'ला', आणि 'ब' ह्या तीन क्रमवार अक्षरांनी मराठीभाषिकात सर्वसंमत झालेली संज्ञा असलेल्या गोष्टीला जर कोणी "ठुळाफ" किंवा "ठठठ" अशी वैकल्पिक संज्ञा सुचवली तर ती कोणी वापरेल का?" अशा आशयाचा जूलिएटला लगेच विचारलेला इंग्रजीतला पश्न शेक्सपिअरने रोमिओच्या तोंडी घालायला हवा होता! पण नाटकातल्या त्या प्रसंगी जूलिएट आणि रोमिओ हे दोघेही मदनवशावस्थेत रममाण होते!

आपली मातृभाषा ही एकच भाषा माणसाला अवगत असली तर विशेषतः त्या परिस्थितीत त्या कुठल्याही मातृभाषेचे व्याकरण आणि तिच्यातल्या शब्दभांडाराची जी काही असेल ती मर्यादा, ह्या दोन्ही बाबींचा माणसाच्या विचारशक्तीवर, वैचारिक देवाणघेवाणीवर, आणि मग आयुष्याच्या एकूण अनुभवावर अगदी मोठा प्रभाव असतो. कुठल्याही भाषेतले शब्दभांडार जितके व्यापक तितकी ती भाषा नेमाने वापरणार्या माणसाची विचारक्षमता अधिक असण्याची शक्यता जास्त. (अर्थात माणसाने आपल्या भाषेच्या संपन्नतेचा फायदा मुळात घेतला पाहिजे हे उघड आहे.) इंग्रजी भाषेतले शब्दभांडार जगातल्या सर्व भाषांमधे सर्वात अधिक व्यापक असल्याचे तज्ञ मानतात. असे असूनही माणसांच्या आयुष्यात ज्या 'अनंत" सूक्ष्मरीत्या भिन्न घटना घडत असतात त्यांचे शब्दांनी नीट वर्णन करायला इंग्रजी भाषेतलीही नामे, क्रियापदे, विशेषणे, आणि क्रियाविशेषणे तोकडी ठरतात. मग माणसे नाइलाजाने "किंचित", "जराशी", "काही वेळा" अशा तर्हांची विशेषणे/क्रियाविशेषणे विशेषणांना/क्रियाविशेषणांना जोडून वेळ भागवून नेत असतात.

भाषांच्या वर लिहिलेल्या वेगवेगळ्या मर्यादा अस्तित्वात असूनही आपण माणसे करू शकतो तितके विचार आणि इतरांशी विचारांच्या देवाणीघेवाणी करू शकतो हे एक खूप मोठे आश्चर्य आहे.

आजच्या जगात लोक ६,८००हून अधिक भाषांद्वारे आणि ४१,०००हून अधिक बोलभाषांद्वारे विचारांची देवाणघेवाण करतात!

परिशिष्टे

कोणत्याही समाजात जन्मलेली मुल-मातृभाषेतल्या चेंडूसारख्या शेकडो मूर्त गोष्टींच्या, "चेंडू" वगैरे संज्ञाच नव्हे तर पाहणे, विचार करणे ह्यांसारख्या शेकडो अमूर्त गोष्टीं निदर्शविणारे "पाहणे", "विचार करणे" वगैरे शब्द किंवा शब्दसमुच्चय; मातृभाषेचे गुंतागुंतीचे व्याकरण; मातृभाषेतले वाक्प्रचार/म्हणी; आणि शब्दांचे अचूक उच्चार ह्या सगळ्या गोष्टी- अवतीभोवतीच्या मोठ्या माणसांची बोली ऐकत राहून हळूहळू विनासायास आत्मसात करू शकतात ह्या बाबीत प्रकट होणारी मनुष्यप्राण्याच्या मेंदूची उत्क्रांती हे निसर्गातले एक महदाश्चर्य निःसंशय आहे.
कुठलीही परकी भाषा मोठेपणी बोलायला शिकले असता ती मातृभाषा असलेल्या लोकांप्रमाणे "अचूक" उच्चार करून बोलणे मोठ्या माणसांना बहुतेक कधीच जमत नाही, उलट लहान मुलांना ती गोष्ट सहज जमत असते हे माणसाच्या मेंदूचे गंमतीचे वैशिष्ट्य आहे.

मराठी (देवनागरी) लिपी बरीचशी उच्च्चारानुसारी (phonetic) आहे; म्हणजे मराठी शब्दोच्चार आणि लिखाण ह्यांच्यात नाते पुष्कळच असंदिग्ध आहे.त्यामुळे मराठी (आणि संस्कृत, हिंदी,गुजराती) लिखाण शिकताना इंग्रजीप्रमाणे शब्दांमधला अक्षरक्रम( (spelling) शिकावा लागत नाही.


Cool
Friday, June 29, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


माहितीपुर्ण लेख आहे, अजुन महिती मिळाली तर उत्तम


Hkumar
Sunday, February 24, 2008 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यंदाचे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भाषा व.' आहे. UNESCO चे ब्रीदवाक्य ' languages matter ' आहे. तेव्हा आपण सर्व मायबोलीचा जास्तीत जास्त वापर व विकास करूयात.

Bee
Sunday, February 24, 2008 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

spelling mistake ला तंतोतंत मराठी शब्द आहे का? मला लगेच हवा आहे :-)
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators