निर्माते नमित मल्होत्रा, यश आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा "रामायण" (राईज ऑफ लिजेंड) हा चित्रपट पहिल्याच दिवशी बघितला. आता मुद्दाम 2D मध्ये पाहिला. नंतर चांगल्या क्वालिटीमध्ये 3D बघण्याचा विचार आहे. आधीच सांगून ठेवतो की, हे चित्रपट परीक्षण लांबलचक होणार आहे. वाचकांना थोडा पेशन्स ठेवावा लागेल. कारण, मी चित्रपट आणि संदर्भातील बऱ्याच इकडच्या तिकडच्या गोष्टींचा मी यात उहापोह केलेला आहे.
जसे ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी मी उत्सुक होतो तसाच हा चित्रपट बघण्यासाठी सुद्धा कधीपासून उत्सुक होतो. या चित्रपटाबद्दल आधीच सर्वच माध्यमांत खूप जास्त चर्चा झालेली आहे.
काही वर्षांपूर्वी सगळेजण रामायणावर आधारित "आदीपुरुष" चित्रपटावर प्रचंड टीका करत होते, म्हणून मी शेवटी तो ओटीटीवर आल्यावर नाईलाजाने पाहिला होता. त्यामुळे तेव्हा झालेल्या डोळे, मन, बुद्धी यांच्या अपचनाचा अजूनपर्यंत मेंदूत कुठेतरी त्रास होत होता, तो त्रास आता कुठे या नव्या रामायणामुळे बरा झाला! आदिपुरुष नुसार रावण हा आपल्या फावल्या वेळात लोहारकाम, वेल्डिंग करायचा.
तर, आपला नवा रामायण हा चित्रपट मला कसा वाटला, हे सांगण्याआधी यातील कलाकारांची नावे सांगतो. सर्वात प्रथम यातील मराठी कलाकार सांगतो. भरताची भूमिका आदिनाथ कोठारे आणि विश्वामित्रची भूमिका अजिंक्य देव यानी केली आहे.
बाकी मुख्य कलाकार पुढीलप्रमाणे आहेत: राम रणबीर कपूर, सीता साई पल्लवी, रावण यश, मंदोदरी काजल अग्रवाल, अगस्त्य ऋषी मुकेश तिवारी, इंद्र कुणाल कपूर, शूर्पंणखा रकुल प्रीत सिंह, मंथरा शिबा चढ्ढा, कैकयी लारा दत्ता, दशरथ अरुण गोविल, विद्युतजिव्हा विवेक ओबेरॉय, वगैरे. जटायूला अनुपम खेर यांनी आवाज दिला आहे, तसेच यशसाठी शरद केळकर या मराठी अभिनेत्याने हिंदी डबिंग केले आहे. विद्युतजिव्हाची (शूरपणखाचा पती) कथा स्टार प्लस वरच्या सिया के राम या सिरीयल मध्ये, चांगल्या पद्धतीने सविस्तर दाखवली होती. रावणाची लहानपणापासून कौटुंबिक आयुष्याबद्दल माहिती घ्यायची असल्यास इंद्रायणी सावकार यांचे रावणायन हे पुस्तक जरूर वाचा.
सर्वात जास्त चांगली ऍक्टिंग खालील पात्र साकारणाऱ्या ऍक्टर्सनी केलेली आहे (उतरत्या क्रमाने). दशरथ, मारिच, लक्ष्मण, कैकेयी, कैकसी, रावण, सीता, राम.
स्वतः अरुण गोविल यांना वयानुसार दशरथाची भूमिका या चित्रपटात दिली गेल्यामुळे ते या चित्रपटाला नावे ठेवणार नाही हे नक्की! पण मुकेश खन्नाची गॅरंटी देता येणार नाही. घुमर शक्तिमान आणि त्यांनी साकारलेली भीष्म याव्यतिरिक्त कोणत्याच इतर कलाकाराची कोणतीच भूमिका त्यांना आवडत नाही. कोणताही सुपरहिरो आणि कोणतीही पौराणिक व्यक्तिरेखा मुकेश खन्ना यांना वाटते फक्त मीच चांगली साकारू शकतो किंवा अशा चित्रपटांचा फक्त मीच चांगला डायरेक्टर होऊ शकतो. डोक्यावर टोपी घालून घालून ते मत व्यक्त करतच राहतात. असो.
तर हा चित्रपट अगदी पहिल्या फ्रेमपासून आपली पकड घेतो आणि नंतर जराही इकडे तिकडे बघायला आपल्याला उसंत मिळत नाही. VFX आणि CGI जागतिक दर्जाचे आहेत. नुसते स्पेशल इफेक्ट मदतीला असून उपयोग नाही तर एखादा सीन पडद्यावर कसा दिसायला हवा, त्याचे डिटेलिंग आणि त्याबद्दल आधी मनात ठोस कल्पना (envision) असल्याशिवाय त्या स्पेशल इफेक्टचा चांगला उपयोग करून घेता येऊ शकत नाही. ते व्हिजन डायरेक्टरच्या माईंडमध्ये आहे, असे जाणवते.
रावणाची आई कैकसी लढत असलेला देव असुर संग्राम इथून चित्रपटाला सुरुवात होते, त्यानंतर इंद्राची ऐरावत हत्तीवर बसून धडाकेबाज एंट्री होते आणि असुर लोकांचा पराजय होतो. इंद्र लंकेची जबाबदारी कुबेरला देतो. नंतर रसातळात राहायला भाग पडलेले सर्व असुर, त्यांचे झालेले हाल हे सगळे पडद्यावर इतके परफेक्ट "इमॅजिन" केले आहे की खरेच त्या स्पेशल इफेक्टसाठी (त्या कल्पिलेल्या रसातळासाठी) खूप कौतुक करावेसे वाटते. त्यानंतर लिहिलेला कैकसी आणि रावण यांच्यातील संवाद, आईमुळे प्रेरित झालेला कुमारवयीन रावण ब्रम्हाकडे वरदान मागायला जातो (तपश्चर्या) तो भाग खूपच छान जमून आलेला आहे.
चित्रपटात रावणाचे भगवान शिव यांच्याशी असलेले कनेक्शन फक्त एका तांडव नृत्य पुरते मर्यादित आहे. ब्रह्माकडून वरदान मिळवल्यानंतर रावण नंतर शिवभक्त का आणि कसा झाला याबद्दल थोडे जरी स्पष्टीकरण दिले असते तर बरे झाले असते!
ब्रह्माकडून वरदान मिळाल्यानंतर तो डायरेक्ट मोठा दाखवलेला आहे. मग युद्ध करून कुबेराकडून तो लंका हिसकावतो. इंद्राला पण हरवतो. ही सुरुवातीची युद्धे आणि नंतरची राम लक्ष्मण सीता यांची इतर राक्षसांशी झालेली युद्धे (ताडका, सुबाहू, खर, दूषण) तसेच रावण आणि शूरपणखाचा पती विद्युतजिव्हा यांच्यातील द्वंद्वयुद्ध या सर्व युद्धाची दृश्य अति भव्य दिव्य आहेत.
ग्रहांना मॅनेज करायचे एक दगडी उपकरण रावणाकडे असते ते पण बघण्यासारखे आहे. तसेच शूरपणखेचे नाक कापल्यामुळे रामाचा बदला घ्यायचा की नाही यावर दहा वेगवेगळ्या डोक्याने तो विचार करतो हा पण प्रसंग छान आहे. आऊट ऑफ द वर्ल्ड. भगवान विष्णूंचे क्षिरसागराचे निवासस्थान अगदीच वेगळ्या पद्धतीने दाखवले आहे.
तसेच पंचवटी मध्ये शूरपणखाचे नाक कापले जाते त्या आधीचा प्रसंग इथे थोडा वेगळा घेतला आहे. त्यातून पण आपल्याला नवीन काहीतरी कळते जे आधी माहिती नव्हते. तसेच हरिणाची मागणी सीता का करते, याचा एक वेगळाच अँगल आपल्याला यात बघायला मिळतो. आपण तसा कधी विचार केला नव्हता, परंतु चित्रपटातील दाखवले आहे ते अगदी आपल्याला पटते. अन्यथा सीतेसारखी समजूतदार स्त्री एरवी हरिणाचा हट्ट का करेल?
विद्युतजिव्हा सोबत रावणाचे युद्ध होते तेव्हा बऱ्याच काळानंतर जागी झालेल्या कुंभकर्णचे सेलिब्रेशन होत असते. विद्युतजिव्हा आणि रावणात नेमकं कशामुळे वादाची ठिणगी पडते, ही नवीन माहिती आपल्याला मिळते. कुंभकर्ण तर इतका क्यूट दाखवलेला आहे की बापरे!
सीतेला लक्ष्मणरेषा पार करायला भाग पडल्यानंतर पुष्पक विमानापर्यंत रावण तिला नेमका कसा नेतो म्हणजे, तिला स्पर्श करून नेतो की तिला स्पर्श न करता नेतो, याबद्दल वाल्मिकी आणि विविध इतर रामायणमध्ये वेगवेगळे वर्णन असल्यामुळे आणि तो भाग थोडा सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांनी हा भाग चित्रपटात दाखवलेलाच नाही.
पुष्पक विमानाचे इमॅजिनेशन आणि रावण जटायू युद्ध हा भाग अतिशय म्हणजे खूपच जास्त जबरदस्त झालेला आहे.
आतापर्यंत मला खर आणि दूषण हे शूरपणखेचे भाऊ कसे काय असा प्रश्न पडत होता. कारण या आधी इतर अनेक मालिकांच्या रामायणात तसंच पुस्तकांमध्ये ती त्यांना माझे दोन्ही भाऊ आहेत असे म्हणते. पण याचा खुलासा हा चित्रपट करतो. सुरुवातीला रावण जेव्हा लंका जिंकल्यावर इतर वेगवेगळी राज्ये जिंकत जातो तेव्हा नीट बारकाईने चित्रपट लक्ष देऊन पाहिला असेल तर तुम्हाला याचा उलगडा होईल.
रामायणाचे वेगवेगळे वर्जन्स आहेत. निर्मात्यांनी सुरुवातीला क्लिअर केलेले आहे की, प्रामुख्याने आम्ही वाल्मिकी रामायण आधार म्हणून वापरले आहे परंतु इतर रामायणांचा पण आधार घेतलेला आहे.
इंटरव्हल पर्यंत राम वनवास आणि दशरथ मृत्यू होतो. इंटरव्हल नंतर लगेच भव्य दिव्य दिपवून टाकणारी लंका, विविध राक्षसे, विद्युतजिव्हा आणि कुंभकर्ण दिसतात. हे सगळे अचानक आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जातात. असं वाटतं टेम्पल रन गेमचा थोडा थोडा सेटअप आहे की काय?
प्रसंगानुरूप काही ठिकाणी लक्ष्मणाने बोललेले वन लाइनर डायलॉग खूप कॉमेडी आहेत. असा प्रयोग बहुधा रामायणात पहिल्यांदा केला असावा आणि तो प्रयोग खूप छान जमून आलेला आहे.
लगान आणि जोधा अकबर यांना ज्या पद्धतीचे संगीत ए आर रहमान याने दिले होते तसे रामायणसाठी तो का देऊ शकला नाही याचे मला राहून राहून वाईट वाटते. त्यापेक्षा अजय अतुल, इस्माईल दरबार, किंवा संजय लीला भन्साळी यांना संगीतकार म्हणून घ्यायला हवे होते असे वाटते.
मात्र रामायणाचे जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे (हांस झिमर या परदेशी संगीतकाराने दिलेले) ते खूप छान. विशेष करून जेव्हा राम धुळीचे वादळ निर्माण करणारा बाण चालवतो त्या संपूर्ण प्रसंगातील BGM तुम्हाला अक्षरशः अंगावर शहारे आणेल.
आणि हो, यात हनुमान नाही आहे कारण जटायूच्या अंतिम संस्कारानंतर हा चित्रपट संपतो. हनुमान पुढच्या भागात असेल.
निमिष सोनार, पुणे
<<< कारण जटायूच्या अंतिम
<<< कारण जटायूच्या अंतिम संस्कारानंतर हा चित्रपट संपतो. हनुमान पुढच्या भागात असेल.
>>>
हायला म्हणजे दोनदा खर्चा करावा लागणार..
दोन हजार छापणार वाटते.
नावे ठेवणारे सुद्धा दिवाळीत रामायण बघून येणार असे वाटते तुमचे परीक्षण वाचल्यावर...