मी अभिजीत

मनात काही चलबिचल होते..

Submitted by मी अभिजीत on 19 May, 2012 - 09:33

मनात काही चलबिचल होते
त्याचीच मग पुढे गझल होते

कोडे सत्याचे सुटत नाही
कधी न स्वप्नांची उकल होते

तुझ्या मी सोबतीने चालता
जगणे श्वासांची सहल होते

निष्कर्ष काढणे कुठे जमले
कळले ते नुसतेच कल होते

खऱ्याचे धैर्य देण्याऐवजी
शपथेस गिता, बायबल होते

हवा तो रंग वेळेला दिला
असे झब्बे शुभ्रधवल होते

तुझा उंबऱ्याला स्पर्श होता
झोपडीही ताजमहल होते

तुला वगळून मी लिहितो तरी
गझल नेमकी मुसलसल होते

-- अभिजीत दाते

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

डोहाळा

Submitted by मी अभिजीत on 18 April, 2012 - 03:00

स्वप्नांचा कंटाळा आहे
सत्याचा घोटाळा आहे

व्याख्या नाही आनंदाची
ज्याचा त्याचा ताळा आहे

आयुष्याच्या या खोलीला
दु:खाचाही माळा आहे

अश्रूंना गांभीर्याने घे
मेंदूचा निर्वाळा आहे

थोडी मर्जी या दैवाची
थोडा माझा चाळा आहे

देणारा 'तो' कोठे पाही
तू गोरा की काळा आहे

आरंभाच्या इच्छेमागे
अंताचा डोहाळा आहे

-- अभिजीत दाते

गुलमोहर: 

पाहिजे..!

Submitted by मी अभिजीत on 8 April, 2012 - 08:03

येउदे शिशिर कशास खंत पाहिजे
आपुल्या मनामधे वसंत पाहिजे

भेसळीशिवाय सौख्य जर हवे तुला
कनवटीस दु:ख मूर्तिमंत पाहिजे

आग जीवनासही क्षणात लागते
तेवढा विषय तुझा ज्वलंत पाहिजे

पाहतो उगाच का तुला पुन्हा पुन्हा
ह्रुदय सांगते मला उसंत पाहिजे

जन्मठेप, शृंखला सुखावतीलही
सूर पण अनादि अन् अनंत पाहिजे

सागराकडून का तहान भागते
कातळातला झरा निरंत पाहिजे

आणशील स्वर्गही धरेवरी उद्या
बस तुझ्यातला कवी जिवंत पाहिजे

-- अभिजीत दाते

गुलमोहर: 

विदूषक

Submitted by मी अभिजीत on 8 April, 2012 - 07:58

काय माझ्या रेखिले आहे कपाळी
व्हायचे वटवृक्ष की साधी लव्हाळी

मागते आहेस का आषाढ श्रावण
वाट चुकला मेघ आहे मी उन्हाळी

स्पर्श, स्वप्ने, पाकळ्या, गझला नि माझ्या
काळजामध्ये किती जपशील जाळी

लागतो द्यावा सुखाला रोज पत्ता
दुःख येते प्रत्यही शोधीत आळी

आसवांवर तेवते आयुष्य माझे
वेदनांची साजरी करतो दिवाळी

फुंकरी घालू नका जखमांवरी या
मी विदूषक द्या मला निर्व्याज टाळी

-- अभिजीत दाते
(वाशी येथे झालेल्या मराठी - उर्दू गझल मुशायर्‍यात ही गझल सादर केली होती)

गुलमोहर: 
Subscribe to RSS - मी अभिजीत