पाऊस कविता

वेड्या पावसानं ...

Submitted by पुरंदरे शशांक on 12 July, 2016 - 02:03

वेड्या पावसानं ...

जीव वेडावला बाई कसा वेड्या पावसानं
अंग ओलावत जाई मन चिंब थरारून

असा भरारा पाऊस दिशा जाती काजळून
मना चाहूल कुणाची जरा जाते उजळून

टप टप पावसाची लय जातसे भिनून
एक शिरशिरी आंत नकळत खुणावून

येतो पाऊस माहेरा जरा थांबून थांबून
कळ आतली उगाच उठे दाटून दाटून

कुणा लुभावे पाऊस कुणा घेतो कवळून
डोळा लागला पाऊस कढ अंतरी पिऊन ....

शब्दखुणा: 

पाऊस

Submitted by समीर चव्हाण on 4 February, 2013 - 01:27

रानामधी सरी, श्रावणाच्या पोरी
धिंगाणा घालती का
गुजबोल्यासाठी आभाळाची नाती
वेलींशी बोलती का

पानांतून वाजे, मनांतून लाजे
नाचरा वारा कसा
ओथंबल्या राती, धरतीची नाती
बिलगती पावसा

वयाचेच भाले, काळजात गेले
मातला चांदवा का
चिंब पावसाने, झिंगली का पाने
पेटला गारवा का

(हौस संग्रहातून)

शब्दखुणा: 

युगलगीत: रंग हिरवा ओला ओला

Submitted by पाषाणभेद on 11 September, 2011 - 20:29

युगलगीत: रंग हिरवा ओला ओला

तो: रंग हिरवा ओला ओला आला निसर्गाला
ती: प्रित तुझी माझी यावी अशीच बहराला ||धृ||

तो: थेंब नभातून खाली झरती
तो: पडता त्यांना ओठांवरती
ती: चुंबून घ्यावे थोडे प्यावे
ती: एक होवूनी वेडे व्हावे ||१||

तो: कधी प्रकाशात दिसते
तो: इंद्रधनू ते सात रंगांचे
ती: हवेत तसले रंग धनूचे
ती: हाती भरल्या लग्नचुड्याचे ||२||

तो: मोहरलेला श्वास श्वासात
तो: हात गुंतले तुझ्या हातात
ती: निसर्गात या वेडे झाले
ती: दोन जीवांचे नाते जडले ||३||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुच माझा पाऊस

Submitted by अनिल७६ on 5 June, 2011 - 07:53

तुच माझा पाऊस ..

तसा तु आमच्याकडे आता खुप कमीवेळा येतो
तरीही मनाला नेहमीच भरपुर आनंद देऊन जातो

तु येताना नेहमीच खुप पाऊस आणावस अस मनाला वाटतं
पण कधी कधी तु तसा येऊनही फक्त निराश करुन जातो

तु कधी कधी अचानक येऊन असा अंगावर कोसळतो
मग पुढे न भरुन येणारं नुकसान देखील करतो

तु कधी कधी नको असताना अवेळीही येतो
सुरळित चाललेलं सगळं बिघडवुन जातो

तु कधी कधी जा म्हंटल्यावरही परत जात नाही
तरीही पुन्हा या जीवाला तु हवाहवासा वाटतो

आजकाल तु तसा पुर्वी सारखा जोराचा कुठे येतो
मीही मग त्या जुन्यां आठवणींवर दिवस काढतो

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अशा बरसल्या धारा

Submitted by छाया देसाई on 3 June, 2011 - 04:33

वीणा बासनी बांधली तरी तरसल्या तारा
पाश मोकळे सोडावे अशा बरसल्या धारा

कीती दिसामाजी आज नभ धरेला भेटले
कशा कोरड मातीला आज गवसल्या गारा

चकोराचे चांदण्याशी काय असावे मागणे?
नभ मेघानी दाटावे वाट हरवल्या तारा

पशू पक्षी भीजलेले आडोशाला थांबलेले
कशा घरोघरी माइ घालू विसरल्या चारा

कशी तरूणपणात पाने गळाया लागली
वाचा फुटेल का कधी त्यांच्या लपवल्या मारा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पाऊस कविता