काव्यलेखन

देशाची तिजोरी

Submitted by शाबुत on 11 October, 2012 - 02:33

देशाचीच तिजोरी, जनतेचाच ठेवा।
खा तुम्ही मेवा आता, खा तुम्ही मेवा॥ धु॥

दारी आमच्या एकदाच, पाच वर्षांनी येता
सभा घेऊनी तुम्ही मारता, मोठ्या-मोठ्या बाता
जाहीरनामा निवडनुकीचा, नंतर खोटा का ठरावा ॥१॥

गरीब जनता रात्र-दिवस, करीतात कष्ट
तरी त्यांना खाण्यामिळते, उरलेले-उष्ट
हरामाचे खाऊन तुम्ही, शिरजोर का ठरावा ॥२॥

जनतेला लुटण्याचाच, करार तुम्ही केला
नोकरदार वर्ग झाला, महागाईने अर्धमेला
धोरणं ठरवुन श्रीमंताचाच, फायदा का करावा ॥३॥

गरीबांच्या गरजांचा कधी, विचार नाही केला
पिण्यास नाही पाणी, त्यांना देणार कोका-कोला
झोपडीत आला तो, झोपडीतच का मरावा ॥४॥

ज्ञानेशाच्या दरबारी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 10 October, 2012 - 12:54

ज्ञानेशाच्या दरबारी
लावियली हजेरी
शब्दातून वारी
केली पुनःपुन्हा

अर्थरूपी अबीर
उधळला अपार
त्याचे मनावर
जाहले मुद्रण

तृप्तीने गेलो
अवघा भरून
जाय समाधान
ओसंडून

चित शब्दकळा
नव्या नवतीची
तहान मनाची
दुणावली

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

शेवटची बस गेल्यावरचा उदास रस्ता

Submitted by बेफ़िकीर on 10 October, 2012 - 11:42

पाचोळ्याची अस्थिर सत्ता
बघत राहतो
शेवटची बस गेल्यावरचा उदास रस्ता

मग रस्त्यावर एक भिकारी
उपडे करतो
फुफ्फुस त्याचे अन उरलेले श्वास मोजतो

लुत भरलेले कुत्रे फिरते
हुंगत शोधत
काय चाटुनी टळेल ही वणवण कायमची

सकाळणारी रात्र यायच्या
अपेक्षेतुनी
अंग झटकुनी सर्व वेदना नाचनाचती

माझ्या त्या परवाच्या रात्री
सकाळण्याच्या
सर्व शक्यता जवळपास विरलेल्या होत्या

चुकून आली डेपोमध्ये
डिझेलसाठी
निराळ्याच मार्गावरची कुठलीशी गाडी

मी त्या गाडीमध्ये बसुनी
अजूनसुद्धा
मागे बघुनी हातच करतो आहे नुसता

निराळीच बस घेत पुढे मी
मागे आहे
शेवटची बस गेल्यावरचा उदास रस्ता

-'बेफिकीर'!

गेलेल्या आयुष्याची पाहिली राखरांगोळी!

Submitted by सतीश देवपूरकर on 10 October, 2012 - 11:28

गझल
गेलेल्या आयुष्याची पाहिली राखरांगोळी!
उरलेल्या आयुष्याची मीहून बांधली मोळी!!

मज हाय! लागले द्यावे, केवढे मोल जगण्याचे!
मी मिटून डोळे माझ्या स्वप्नांची केली होळी!!

हे हात स्वत:चे सुद्धा हाताशी नव्हते माझ्या;
मजवरती तुटून पडली दु:खांची अवघी टोळी!

देशात आमुच्या सद्ध्या, केवढी सुबत्ता आहे!
हातात भिका-यांच्याही भरजरी रेशमी झोळी!!

मी ताव तव्याचा, केव्हा, पोळपाट झालो होतो;
येणा-याजाणा-यांनी भाजून घेतली पोळी!

तोडून बंध नात्यांचे, सोयरे मोकळे झाले....
स्मरणांची एकेकाच्या वेढती मला वेटोळी!

प्रत्येक शेर लिहिताना, केवढ्या यातना झाल्या....

स्वस्त

Submitted by चाऊ on 10 October, 2012 - 09:29

दोन वेळ खाण्याची भ्रांत, त्यांना गॅस स्वस्तात
निपुत्रीकांच्या सगळ्या मुलांना शिक्षण स्वस्तात

आंधळ्यांना देऊ चांगली विजेरी स्वस्तात
पांगळ्यांना महागडी, धावायची पादत्राणे स्वस्तात

बेघरांना नक्कीच देऊ, भरपूर कौले स्वस्तात
बहीर्‍यांना उत्तमोत्तम, ध्वनीमुद्रीका स्वस्तात

अंगठाबहाद्दरांना पदव्योत्तर शिक्षण स्वस्तात
रोगी दगावला तर त्याला औषधे स्वस्तात

अकलेचा दुष्काळ अभावानेच वागणे सत्यात
देऊ म्हणत काहीच न देणारी आश्वासने स्वस्तात

द्विधेत कर्तव्याच्या अन प्रेमाच्या

Submitted by रसप on 9 October, 2012 - 23:57

आकाशातुन झाला होता एक वेगळा तारा
पापणीस चुकवून वाहिला जेव्हा चुकार पारा..
आरपार हृदयाच्या गेली एक वेदना हळवी
कुणास ठाउक गदगद झाला कसा कोरडा वारा

ह्याच दिशेला दूरवर तिथे माझे घर थरथरते
छताकडे बघतो बाबा आई केवळ गहिवरते
मी सापडलो द्विधेत कर्तव्याच्या अन प्रेमाच्या
भगवंता रे सावर आता मन माझे भिरभिरते

ह्या जन्मी मी मायभू तुझे सारे ऋण फेडावे
पुढील जन्मी हक्काचे डोक्यावर छत बांधावे
एक क्षण तरी बाप जगावा चिंता सोडुन साऱ्या
एकदाच आईने माझ्या आनंदाश्रू प्यावे

यमदेवा, तू चाल पुढे मी निरोप घेउन येतो
सहकाऱ्यांना विजयासाठी अभिष्टचिंतन देतो
जाता जाता घरी एकदा क्षणभर जावे म्हणतो

पाहीलेस का कधी तू, म्हशीस रेकताना? (विडंबन)

Submitted by A M I T on 9 October, 2012 - 23:40

सतीश देवपुरकर गाव सोडताना मला सुचलेलं काही..

प्रिये नकोस गाऊ, बेसुर ऐसे गाणे
पाहीलेस का कधी तू, म्हशीस रेकताना?

शेजारणीसवे मजला, पाहीलेस हसताना
जखमी कपाळ केलेस, पोळ्या तू लाटताना

दि'सेल' ( THE SALE ) तितुक्या केल्या, साड्या तुला खरेदी
थकलो दुकानदारांस, पैसे मी वाटताना

चिक्कार मिठ टाकू की गोळी जुलाबाची?
ऐसा विचार केला, मी डाळ रांधताना

परवा जो बरमुडा, चोरीस होता गेला
दिसला तो शेजारच्या, गच्चीत वाळताना !

वळण

Submitted by भारती.. on 9 October, 2012 - 12:29

वळण

वळण वयस्कर..जपून वळते
ठुसक्या चाफ्यावरती रेलत
वळण समंजस : दूरदूरचे
अचानकाचे ओझे पेलत

लवचिक वळणे-अवचित गाठी
अडखळत्या पावलात पारध
समाधिस्थ आत्मे रस्त्यांचे
वळणावरती रसिक नी सावध

वळणांमधुनी फक्त वाढते
बिंदूंमधले धोपट अंतर
सुकलेले विरहाचे आठव
वळणावरती पुनश्च कातर

वळणे : चिरसौंदर्ये रतीची
वळणे : स्थिरविभ्रमच गतीचे
पार्थिवातले सहज महोत्सव
दिशा बदलणार्‍या नियतीचे

वळण एकले अदृष्टातले
धुकाळ क्षितिजे छेदत जाते
चिरंतनाच्या प्रवासामध्ये
निरंतराचे जोडून नाते ..

तू भेटलीस मजला, मी गाव सोडताना!

Submitted by सतीश देवपूरकर on 9 October, 2012 - 07:37

गझल
तू भेटलीस मजला, मी गाव सोडताना!
जगण्यात रंग आला, आयुष्य संपताना!!

आता कुठे जगाच्या आल्या समोर गझला!
मज पाहिले न कोणी, आयुष्य वेचताना!!

भूकंप कैक झाले, कळले कुणास नाही;
आवाज होत नाही काळीज भंगताना!

अद्याप श्वास होते चालू उरात त्याच्या.....
संशय कुणा न आला प्रेतास जाळताना!

सत्ता असो सुबत्ता, किंवा असो प्रसिद्धी!
माणूस आज दिसतो मस्तीत झिंगताना!!

समजायच्या न कोणा, माझ्या मुक्या व्यथा या;
मीही अबोल होतो, मजलाच सोसताना!

नाही उगाच झाली माझी गझल मुलायम;
दिसलो न मी कुणाला काळीज पिंजतना!

आरक्त जाहलेले आकाश सर्व बघती!
सूर्यास कोण बघतो? आतून पेटताना!!

खबरदारी -

Submitted by विदेश on 9 October, 2012 - 00:55

तुला असे मुळूमुळू रडतांना पाहून,
मी थोडातरी विरघळेन,
असे वाटले असेल तुला -

माझ्या य:कश्चित जिवासाठी
तू तुझे हे अनमोल अश्रू ढाळतेस...

माझ्या रुक्ष चेहऱ्यावर जाऊ नकोस
माझ्या कठोर काळजातही
ते अश्रू जपून साठवताना -

माझी किती तारांबळ होत आहे
हे तुला न दिसण्याची मी
खबरदारी घेत आहे !

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन