काव्यलेखन

जेंव्हा जेंव्हा तुला अशी मनसोक्त भेटले आहे...

Submitted by मुग्धमानसी on 27 June, 2013 - 06:42

जेंव्हा जेंव्हा तुला अशी मनसोक्त भेटले आहे
तेंव्हा तेंव्हा रात्रभर असेच धुके दाटले आहे

पाहिले आहे आभाळाला मी असे उतरताना
तेंव्हा कुठं माहित होतं...? त्याचेही जग फाटले आहे!

तुझे भास कुशीत जपत जागते बापडी निज माझी
तिच्या स्वप्नांत तुझे झाड कुणीतरी छाटले आहे.

कुणीतरी कधीतरी यावे खरेच ढगांमधून
खरं सांगू? मनातल्या मनात मी खूपदा बाटले आहे!

तुझे घरकूल दहा दिशांचे पसरेल तितके पसरू दे
मी तुझ्या या घरात माझे ईवले जग थाटले आहे.

शब्दखुणा: 

यमनियम

Submitted by भारती.. on 27 June, 2013 - 05:45

यमनियम

यमनियमांचा सक्त पहारा आयुष्यावर मीच लादला
आणि स्वत;वर आरोपांचा प्रदीर्घ खटलाही चालवला

किती आतली वीज जळाली सिद्धांतांची शोधत पाने
पापण्यांमधून नीज पळाली अंतरातली जळता राने
वर्तनातल्या आवर्तनांचा प्राणपणाने शोध घेतला

संघर्षाचे अटळपणाने क्षण जेव्हा सामोरे आले
मी जे घाव दुज्यांवर केले ते आधी माझ्यावर झाले
अन उरलेले घाव समोरून- असा दुहेरी लढा झेलला

अता जरा निवळली वादळे -संज्ञेमधले कंपन मिटले
शांतीभावना आली दाटून असे आपले मला वाटले
'काय संतुलन असेच असते ?' मी विचारले एकांताला

मौनातून ना उत्तर आले हसले कुणी की भासच होता

शब्दखुणा: 

सृजन....................!

Submitted by अनिल आठलेकर on 26 June, 2013 - 14:01

हे सृजन म्हणजे काय हो
मला तरी सांगा
कशासाठी प्रतिक्षेत या
लांबच्या लांब रांगा......?

मीही मागून घेईन म्हणतो
फक्त पोटापुरतं
बघू तरी कसं काय
कुठे कुठे स्फुरतं.....

आप्तांची याद, मायेची साद
कसा कळतो टाहो..
मनकवडेपण म्हणतात
ते हेच असतं का हो...?

जमल्यास सांगा हवतर थांबा
मला नाही घाई
फक्त एकदा मीही शब्दात
सांडीन म्हणतो शाई.....

~ अ.आ. ,
26/06/13

नक्कीच माणसाची बदलेल जात पैसा...

Submitted by सुशांत खुरसाले on 26 June, 2013 - 04:46

जैसा जमेल तैसा आणा घरात पैसा
काट्यात शोध पैसा , फुलवा फुलात पैसा!

जेव्हा मनात असतो तेव्हा करात नसतो
असतो करात तेव्हा नसतो मनात पैसा !

असतेच माणसाची पैसाच जात हल्ली
नक्कीच माणसाची बदलेल जात पैसा...

उशिरा मला कळाले-ती नाचणार तोवर
जोवर असेल माझ्या नाचत खिशात पैसा..

दु:खात माणसाला लोटून तोच देतो
आणिक हळूच नंतर हसतो मनात पैसा !

दररोज साजरी तो करतो पहा दिवाळी
दररोज काढतो अन् त्याची वरात पैसा

घेईल का विकत तो प्रेमास काय केव्हा..?
दररोज विकत घेतो जरी चांदरात पैसा ..

नाचणारी मुलगी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 26 June, 2013 - 03:27

एका पायावरती नाचत
लहानगी ती थबकत थबकत
चाले आपुल्या नादात
बे दुने चार बेत्रिक बेत्रिक
बोबड गाणं काही गात
एक वेणी सुटलेली
केसं हि होती विस्कटली
पाठीवरती दप्तर भरली
शाळा नुकती सुटलेली
होतो तिजला पाहत,हासत
मज पहिले तिने वळत
जरा थांबली ती क्षणभर
अन गोड हसली गालभर
मान आपुली तिरकी करत
अमुल्य स्मित मजला देत
मग पळाली वाऱ्यागत
ते स्मित इतके लोभस होत
कि बालपण मम हृदयात
अलगद उमलले झंकारत
स्मृती लहरीच्या कंपणात
मग मीही गेलो तसाच वाहत
एका पायावरती नाचत
तेच तिचे गाणे म्हणत ,
बे दुने चार बेत्रिक बेत्रिक

विक्रांत प्रभाकर

सुप्त

Submitted by अज्ञात on 26 June, 2013 - 03:18

सात स्वरांतिल सूर वाहिले दूर राहिले काही
सुप्त काहिली झाले त्यातिल उलगडले नच काही
गुच्छ बांधले जपले मार्दव अंगिकारले देही
विस्कटलेले तळी झाकले वर्ज्य न केले तेही

श्वासांची स्पंदने गोमटी कधी विकल अवरोही
आरोहात कथा वचनांच्या व्यथा गूढ संदेही
विरघळल्या न जळाल्या समिधा दिशा पेटल्या दाही
दाह जाहले प्रतिमा अंकित प्रियकर त्यात विदेही

खेळ क्षणांचे दीर्घ वेदना कंड सुखावह तरिही
तलम ओंजळी एकांताच्या जळ करतळ निर्मोही
मेघ पापणीआड बिंब प्रतिबिंब स्वप्नवत पाही
जीवन लयमय ऋतू आगळा चिन्मय पवन सदाही

ववि ववि ववि

Submitted by किरण कुमार on 26 June, 2013 - 03:01

पावसाळी माज, चढलाय आज,
सोडूनिया लाज , भटकाया .......

येरे येरे ववि,जाऊ जरा दूरी,
लावूनिया चावि,गाडीला त्या ......

जाउ मुरबाडी,करावया खोडी
भिजताना थोडी, पाण्यात या .......

मोरापरी नाच ,पोटालाही 'खा'च,
साफ करु काच,कॅमेराची............

माबोकर येती,ओलेचिंब होती
आठवण मोती.साठतसे..........

निघायाचे क्षण,जड जड मन
घराचेही भान ,ठेवताना ....

अशी ववि व्हावी,पावसाने नहावी
धाग्यांतूनी वहावी,मायबोली...........

सुटले कधी हात...

Submitted by रोहितगद्रे१ on 26 June, 2013 - 02:17

सुटले कधी हात कळलेच नाही
जडले कधी पाश कळलेच नाही

आवरून स्वत:ला तुझे निघणे जहाले
चालणे तुझे ते मी सावरावे म्हणाले

मोहरावे जसे झाड तो तुझा थाट होता
फुले वेचायला ती पण फुलोरा न होता

किती माळल्या त्या स्वप्नील माळा
तुटती तयांच्या त्या मलूल कळ्या

वळणावरी क्षण थांबशील का तू
चोरटा पहारा आज देशील का तू

वळली होतीस तू मी वळलोच नाही
तुटता तुझे पाश उरलोच नाही

होतो जिथे मी तिथे आज आहे
नसण्याची तुझ्या गं मला साथ आहे

राहिलो उभा मी असा मी तुझाच
दिसते येणे तुझे सांगे पारवा उगाच…

मी खुशाल आहे

Submitted by निशिकांत on 26 June, 2013 - 00:54

नकोस माझी करू काळजी जिथे जसा मी खुशाल आहे
तुझ्याविनाही जिवंत कैसा? मलाच माझा सवाल आहे

जाता जाता भेट दिली का भळभळणार्‍या जखमांची तू
रोज सोसतो तिव्र वेदना, उपाय त्याहुन जहाल आहे

वाट दाखऊ कशी कुणाला? मीच असा हा भरकटलेला
काय फायदा? हाती माझ्या अंधाराची मशाल आहे

पिऊन प्याल्यावरती प्याले रात्र रात्र मी जागत असतो
दिवाळखोरी घरात आली, अमीर झाला कलाल आहे

पैसे देउन तुझी ईश्वरा यथासांग मी पुजा बांधली
भटजीचे वागणे असे की जणू तझा तो दलाल आहे

जरी एकटा भणंग आहे, करू नको काळजी जराही
आई! तुझिया आठवणींची पांघरली मी दुशाल आहे

आज इथे तर तिथे उद्याला, स्थैर्य काय ते मला न ठावे

आडदांड पाऊस

Submitted by अभय आर्वीकर on 25 June, 2013 - 11:11

आडदांड पाऊस

अडदांड बेत ओला शिजवून पावसाने
केला शिवार खच्ची भिजवून पावसाने

गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने

आले मनात जेव्हा तेव्हाच निग्रहाने
केले सपाट डोंगर झिजवून पावसाने

खाण्या-पिण्यात झाला पाऊसही अधाशी
हंगाम फस्त केला निजवून पावसाने

नाही दिले कुणाला थोडे 'अभय' परंतू
खरडून दैव नेले थिजवून पावसाने

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन