काव्यलेखन

माग मी काढीत गेलो

Submitted by निशिकांत on 1 July, 2013 - 02:15

आठवांचा माग मी काढीत गेलो
आसवांचे मी सडे टाकीत गेलो

कालच्या तंद्रीत आहे आज माझा
वर्तमानाला सदा हिणवीत गेलो

फाटक्या पदरी सखीच्या काय टाकू?
वंचनांची भीक मी वाढीत गेलो

ही मुकी श्रीमंत वस्ती सोडुनी मी
चार गप्पा मारण्या चाळीत गेलो

मी तुकोबाच्या कधी ज्ञानेश्वराच्या
पालखीसंगे सुखे वारीत गेलो

जीवनाचा चेहरा भेसूर इतका !
आरशाला नेहमी टाळीत गेलो

जे मिळाले, जीवनाचा साज होता
वेदना भाळावरी मढवीत गेलो

मित्र होते सर्व पण मज हे कळेना
मी कुणाच्या मारलो यारीत गेलो

प्राप्त "निशिकांता"स झाला अर्थ थोडा
जीवनाशी पैज मी लावीत गेलो

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

हे विहगांनो

Submitted by अज्ञात on 1 July, 2013 - 00:16

हे विहगांनो चला घेउनी मेघांपलिकडल्या द्वारी
खेळ मनस्वी शतरंगांचे फेर धराया गाभारी
उणे पुराणे जग वाटे हे कल्प नवा रुजवू देही
फुलवू या स्वप्नांचा चोळा दूर करू विवरे सारी

रंग बघू प्रमदेचे आणि तृप्त फिरू रत माघारी
पुन्हा एकदा तोच शहारा उमलवुनी मन दरबारी

........................अज्ञात

असफल कहाणी

Submitted by राजेंद्र देवी on 30 June, 2013 - 13:46

असफल कहाणी

उगाच का मी विव्हळावे
दुःखास का माझ्या कवळावे
नसे वेदना तुझीही थोडीसी
उगाच का कोणी कोणास सोडीसी

प्रेम आपुले हे दोघांचे
लक्ष मात्र साऱ्या जगाचे
करून लक्ष्य आपणास तोडीले
पुरावे पुराणाचे काढीले

तशीच आपली असफल कहाणी
जगाच्या दृष्टीने अगदीच पुराणी
गोष्ट सांगतो मी आता सर्वांना
विचार करा प्रेम करताना

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

पेटण्यास आतुरलेल्या नसानसांच्या वाती....

Submitted by सुप्रिया जाधव. on 30 June, 2013 - 12:45

झिर-मिर तुझ्या स्वप्नांची
रातीला सोबत ठरते
जणू पाते रोमांचांचे
गात्रांवर अलगद फिरते

तो चंद्र अनावर होतो
चांदण्या चित्त गुंगवती
ह्रुदयावर शिंपडलेल्या
स्मृती पुन्हा घमघमती

कल्लोळ तुझ्या श्वासांचा
दरवळतो मानेभवती
पेटण्यास आतुरलेल्या
नसानसांच्या वाती

झुळझुळतो पहाट्वारा
मन चिंब-चिंब पाझरते
थरथरत्या अधरांना या
दव अलगद चुंबून जाते

हे आवर्तन रात्रीचे
बघ असेच उलटून जाते
दिस सरता संपत नाही
होत्याची नव्हती होते

-सुप्रिया.

पेहराव

Submitted by महेश वेलणकर on 30 June, 2013 - 09:39

"पोहोचलोत स्वर्गी! " - त्यांचा ठराव आहे
(नंदनवनात असणे - त्यांना सराव आहे! )

"पेठेत कार आणा. - खड्डे न राहिलेले. "
गाडुन बिर्‍हाड माझे - केला भराव आहे

पाऊस रोज पडतो - त्यांना भिऊन नक्की
आवाज केवढा तो - त्यांचा 'डराव' आहे

छे! छे! निजाम, इंग्रज, - मोगल, टिपू कशाला!
नारायणास धरण्या - रघुनाथराव आहे!

'नउवार पैठणी' अन् - वर 'बेसबॉल टोपी'
संमेलनात त्यांचा - हा पेहराव आहे

पावसाचे.....

Submitted by आनंद पेंढारकर on 30 June, 2013 - 08:47

दूर कोणी नाव घ्यावे पावसाचे
त्या क्षणाला गाव व्हावे पावसाचे

गंध मातीचा शिरे श्वासांमधूनी
दरवळूनी गात्र गावे पावसाचे

तेच दाटे माझिया डोळ्यात पाणी
गोत्र माझेही असावे पावसाचे

ओंजळीने थेंब झेलावे असे की
अंतराला दान जावे पावसाचे

पाखरांचे पंख घ्यावे दूर जावे
चेहऱ्याला रंग ल्यावे पावसाचे

स्पर्श त्याचा माळराने धुंद सारी
हात माझे कां नसावे पावसाचे

ही कुणाच्या चाहुलीने जाग येई
अंगणी पाऊल यावे पावसाचे

ते दुसरे काहीही नव्हते....

Submitted by वैवकु on 30 June, 2013 - 07:36

सरत्या आयुष्यातुन गाठी उरलेला संचय होते
हा क्षण तू भलेपणाने जग ह्याचीच पुढे सय होते

तू मला दिलेल्या मिठ्या तुला निर्जीव वाटल्या असतिल
पण 'तशी' स्पंदने जपण्याचे कोठे माझे वय होते

मी ओळखले इथल्या देवांची सुटका झाली आहे
...त्या गावाच्या वेशीपाशी पडके देवालय होते

मी कवेमधे आकाश घ्यायला कधीच गेलो नाही
माहित होते असणे माझे अट्टल मातीमय होते

कार्यारंभीचा ऊर्जाभारित उरक विलक्षण असतो
थोड्यावेळानंतर हातुन सवयीने हयगय होते

विठ्ठल माझ्या गझलेमध्ये अन् ती त्याच्यात दिसावी
हे माझ्या आयुष्याचे निव्वळ दोनच आशय होते

मेल्यानंतर कळले जी हुरहुर श्वासांमधली सुटली

पुढे काही सुचलंच नाही :-(

Submitted by पल्ली on 30 June, 2013 - 05:10

मनाच्या अंगणी चाहूल हळूवार
ऊठले अंतरी काहूर मणभार
असा खेळ रंगे ऊन्हा-सावल्यांचा
कुठे दूर क्षितीजावरी अंधार.

वध

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 30 June, 2013 - 04:18

असून भरदुपार तेव्हा
सुनसान होती आळी
सुनसान होता रस्ता
टीव्हीवर चालू होती
महाभारताची कथा

सात वर्षाची चिमुरडी
गच्चीत उभी होती
कौतुक रित्या रस्त्याच
उगाच पाहत होती
बेसावध तो भेटून प्रियेला
कुठेतरी होता चालला

तोच अचानक यमदूत
बसलेले दबा धरून
सरसावले पुढे आपले
अमोघ शस्त्र घेवून
डावीकडून तीन अन
उजवीकडून तीन
उभे ठाकले तया घेरून

प्रतिकारा संधी न देत
फटकन फिरली बँट
बॉल झाले डोके त्याचे
धाडकन पडला रस्त्यात
वेळ मुळी न घालवता
कुणी सराईत त्यातला
शास्त्र कुठले विचित्र
घेवून पुढे सरसावला
विछिन्न झाले शिर
आला रक्ताचा पूर

भयचकित चिमुरडी ती

निसर्गराजा...

Submitted by Sangeeta Kulkarni on 29 June, 2013 - 14:57

निसर्गराजा...

जलधारांच्या वर्षावाने
आसमंत न्हाउन निघाला ..

हिरव्याकंच शालीने
सजून निघाला..

वृक्षांच्या फांद्यांवर पालवीचा
तजेलदार रंग खुलू लागला ..

दवबिंदूच्या चमकेने पालवीचा
टवटवितपणा द्विगुणीत केला..

डोंगरकुशीतून शुभ्र खळाळ
झेपावू लागला ..

कोवळी उन्हं – धुक्याचा खेळ
रंगू लागला..

सप्त – रंगांचा झळाळ घेउन
इन्द्रधनुष्य पडतं ..

धरणीच्या कुशीतून आभाळाकडं
रानफुल डोकावू लागतं..

लांबवर पसरलेले गालीचे
वा-याच्या झोतांवर डोलू लागतात..

सुंदर मनमोहक रानफुलांचे सम्मेलन
चिंब झालेल्या धरतीवर जमते ..

तेव्हा मात्र भान हरपते..

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन