काव्यलेखन

अलिखित करार

Submitted by निंबुडा on 20 November, 2012 - 01:56

तुझ्या-माझ्यात
आहेत काही अलिखित करार
काही अबोल नियम
तू ही पाळतोस कसोशीने
आणि मी ही असोशीने...

शब्दांशिवायच संमत झालेले काही ठराव
आणि मूक डोळ्यांनी स्वाक्षरी केलेले करार - मदार
उमगतात तुलाही – मलाही...

जगणं सोपं (की अवघड?) करून गेलेले क्षण
निभावतात मग मुक्या साक्षीदारांची भुमिका
त्या अलिखित करारपत्रांवरली
ही एकच गोष्ट फक्त लिखित स्वरुपातली!

ब्लॉगवर पूर्वप्रकाशित

शब्दखुणा: 

खळगा..

Submitted by बागेश्री on 20 November, 2012 - 01:06

एखाद्या आठवणीचे
पडसाद उमटण्याचे थांबले की
पडलेल्या खळग्याचे,
भकासपण जाणवते...!

खळग्याची ओल
डोळ्यांतही उरली नाही
की अलिप्तपणा काचतोच...

कोरडा उदास खळगा
मात्र टिकुन राहतो,
चिरे घट्ट करत..
आता उपयोगात नसलेला,
परंतू अस्तित्व टिकवून असलेला.....!

ब्लॉगवर पूर्वप्रकाशित: वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/

नाविन्याची साद

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 19 November, 2012 - 22:48

सुटला पहाट वारा
अंतरात सळसळ
मन सुगंधी सुगंधी
पसरला दरवळ

नको स्वप्नातून जाग
नको जाग इतक्यात
नीज हलके हलके
पुन्हा आली पापण्यात

कसा मुजोर हा वारा
रेंगाळला खिडकीशी
पावा मंजुळ मंजुळ
जणु कृष्णाचा कानाशी

मन सैरभैर झाले
वेडावले, खुळावले
कृष्ण रंगाने रंगाने
चिंब चिंब भिजवले

रेशमाच्या सोनसरी
आला सोबती घेऊन
ओला पाऊस पाऊस
ढगातून उतरून

सतरंगी झाले नभ
धरा पाचूने नटली
ऊन कोवळे कोवळे
पसरली गोड लाली

शब्दखुणा: 

जुनी कहाणी

Submitted by मिरिंडा on 19 November, 2012 - 12:11

जुनं झालय सगळं
अगदी पोतेरं.....
जुने घर, जुनी झाडे,
जुनीच फुले
जुन्या वासांची

वस्त्रांची सळसळ
जुन्यात जुनी
दागिन्यांनी लडलेले
जुनेच चेहेरे
नुसते सपाट
ओळख असून अनोळखी झालेले

मनातल्या विचारांचे कपटे
गोळा करता करता
वाकणारी जुनी पाठ
आता म्हणत नाही
"मोडेन पण वाकणार नाही"

नवीन कागद विकत घेणं
आताशा जमत नाही
पेन्शन मध्ये ते बसत नाही
नवीन कपटे तयार होत नाहीत
मग राहातं फक्त स्वच्छतेचं नाटक

समाजकार्य केल्याचं समाधान मिळतं
जमेल तेवढी कंबर
ताठ करीत
तोंडाचं बोळकं हालवीत
उद्गारतो
"समाजाची उन्नती हेच माझं कार्य"

टाळ्या वाजतात
कारण वाजवणाऱ्यांना

शब्दखुणा: 

कवी विरुद्ध कविता

Submitted by करकोचा on 19 November, 2012 - 11:39

स्वस्थता नाही जिवाला, षोक ठरला जीवघेणा
सोडुनी कवितेस सार्‍या संपवाव्या शब्दवेणा ||धृ||

सर्जनाने होत होतो वर्णनापल्याड पुलकित
होत गात्रे तृप्त अन्‌ सौदामिनीने देह उर्जित
सौख्य निमिषार्धात सरते, रिक्तता सरता सरेना ||१||

का असा छळवाद माझा मांडला आहेस, कविते?
दंश हा कसला तुझा, ज्याने विषाची झिंग येते?
पोखरे तनमन तरीही हे व्यसन सुटता सुटेना ||२||

मी किती घासू-पुसू, आकार देऊ कल्पनांना,
खेळवू दररोज ह्या न्हात्या-धुत्या पद्यांगनांना?
यापुढे उठणार नाही बाव्हळ्यांना काव्यमेणा ||३||

यापुढे, कविते, तुला शृंगारणे जमणार नाही
चंचले, दुसरा कवी बघ; मी तुला पुरणार नाही

हायकू -

Submitted by विदेश on 18 November, 2012 - 22:38

१.
उत्साही माळी
मोसम पावसाळी
रोपटी चूप ..

२.
झाडाचे पान
गळते अवसान
पाला पसार ..

३.
मेघ नभात
बरसात ढंगात
मोर रंगात ..
.

शब्दखुणा: 

शोधतो मी ज्यास तो हा चेहरा नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 18 November, 2012 - 22:27

गझल
शोधतो मी ज्यास तो हा चेहरा नाही!
लोचने करतात दावा तो खरा नाही!!

लागले डोळे तुझ्या वाटेकडे माझे....
एवढा माझ्यावरी रुसवा बरा नाही!

पाहिजे होते तुला जगणे चिरेबंदी;
सांधता आला मला साधा चरा नाही!

माळरानासारखी ही माणसे सारी!
एकही, हृदयात प्रेमाचा झरा नाही!!

हा सुखाचा कैफ माझ्या काय कामाचा?
कैद मी व्हावे असा हा पिंजरा नाही!

जिंदगीचा केवढा गोतावळा होता!
द्यायला खांदा कुणीही सोयरा नाही!!

फूल मी होतो तुझ्या वेलीस आलेले!
का म्हणावे मी?....मिळाला आसरा नाही!!

जीवनाचे सर्व दरवाजे खुले केले!
खाजगी कुठलाच आता कोपरा नाही!!

दाटते आहे निराशा (तरही)

Submitted by वैवकु on 18 November, 2012 - 11:31

वाटते आहे... "नको संसार" हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली

ती मला अन मी तिला काळीज हरतो
भावनांचा खेळतो व्यापार हल्ली

शेर माझे केवढे खपतात ! बहुधा ;
दुःख माझे लागते चवदार हल्ली

जिंदगी असतेच हे माहीत होते
मरणही दिसते मला दुश्वार हल्ली

आणखी काही नको एकांत दे रे
विठ्ठलाला मागतो जोहार हल्ली

सुगंधी गर्भ ज्याचा तोच दरवळणार गाभारा!

Submitted by सतीश देवपूरकर on 18 November, 2012 - 05:25

गझल
सुगंधी गर्भ ज्याचा तोच दरवळणार गाभारा!
न त्याला काळजी कसली....सुटो किंवा पडो वारा!!

असे जात्याच दरवळते हृदय वक्षामधे ज्याच्या......
नको त्याला तुझे अत्तर, नको कुठलाच फव्वारा!

जगाची रीत ही आहे, न ठेवावी अपेक्षा तू!
सुखाचे सोबती सारे, करी दु:खात पोबारा!!

अशी प्रात्यक्षिके असती महाविद्यालयामध्ये....
बिडीकाडी, चहा चालू; मुलांना देवुनी चारा!

जळावा धूप गाभारी, तसे आयुष्य पेटावे!
बनावे राख, पण व्हावे.....जगाला एक अंगारा!!

समुद्रासारखी दुनिया, दिशांचा ना कुठे पत्ता!
मला पण, हात तो देतो, तुझ्या गगनातला तारा!!

मदत ज्याला हवी त्याला करावी मुक्तहस्ताने!

बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 18 November, 2012 - 04:30

बाळ ठाकरे नावाच तुफान
आता शांत झाले आहे
त्या निरवतेत प्रत्येक मन
आज गहिवरून आले आहे
शब्दांच्या कडकडाटात उसळणारे
भावनांच्या झंझावातात गदगदणारे
प्रत्येक लढाऊ गलबत आज
सुन्न होऊन बसले आहे
तो आवाज चिंधड्या उडवणारा
तो स्वर मित्र मिळवणारा
तो स्पष्ट घट्ट रोकठोक
टणत्कार गांडीव धनुष्याचा
आता विराम पावला आहे
हे माझ्या विद्ध मराठी मना !
तुटला जरी दोर तरीही
लढणे तुला प्राप्त आहे
चल उचल तो भगवा
तख्त दिल्लीचे, जिंकायचे आहे

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन