काव्यलेखन

बरेच झाले !

Submitted by राजीव मासरूळकर on 27 February, 2013 - 13:49

बरेच झाले

दुःखाने मी कधी न चळलो बरेच झाले
माझा मी ही मलाच कळलो , बरेच झाले !

भरात होता गंधोत्सव तव वसंतवेडा
अवचित मनभर मी दरवळलो , बरेच झाले !

समोर होत्या सोप्या लंपट वाटा तरिही
काट्यांमधून मी भळभळलो , बरेच झाले !

पाउस येता झडून गेला मोरपिसारा
मी ही थेँबांसंगे ढळलो , बरेच झाले !

पश्चिम झाली लालबुंद कुंकवासारखी
आणि अचानक मी मावळलो , बरेच झाले !

- राजीव मासरूळकर
दि .२.६.१२
रात्री १०.१५ वाजता

खंत

Submitted by अनिल आठलेकर on 27 February, 2013 - 13:04

खंत

हृदयास रोज माझ्या
खंत फार वाटे...
स्वजनी पेरलेले
बोचतात काटे.....

झाले इथे किती हे
अपराध दानवांचे
तरीही सजेस दोषी
उपकार मानवाचे........

या क्षुद्र जीवनाचा
दोष कोणता तो
दुखावल्या मनाला
मारी लाथ जो तो...........

होते जरी मुखाशी
तृष्णा कधी न शमली.....
जयही नसे नशिबी
तडजोडही न जमली........

आशा तरी उराशी
भोळी असे सुखाची........
आता मनी न वाटे
भीती बुळ्या विषाची......!!

__अनिल आठलेकर, पुणे
२७ फेब्रुवारी २०१३

होता एक मित्र...माणुसकी नावाचा..!!!

Submitted by तनवीर सिद्दीकी on 27 February, 2013 - 05:32

''ये ना घरी कधीतरी '' एका मित्राची अपुरी मागणी होती
माणुसकी होते नाव त्याचे, भेटीच्छा लोचनी चाळवली होती

चटकन उठलो, सहृदय बांधिले, होती सोबतीला हास्याची पुरचुंडी
ओला आनंदाश्रूचा 'कृतज्ञ' सदरा, त्यावर जुनी आपुलकीची गुंडी

''आटपाट नगरात कोणालाही विचार'' अगदी सोप्पा पत्ता होता
कल्पकतेने बनेल रंगरंगोटीत झाकला विध्वंसी जरीपटका होता

अंती हवे असलेले छत्र गावले, थोडी शेजारी दांभिक घाण होती
मी मी करणारे जनावरच सर्व ,पण थोडी सुशिक्षित जाण होती

चव्हाट्यावरच पाय थबकला, विधिलिखिताचे भाग्यप्रताप बघून
''माणुसकी'' भिंतीवर दिसला, दिसले अस्पष्ट हंबरडे निर्माल्यातून

काजव्यांची दिवाळी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 27 February, 2013 - 05:18

तझ्या हाती काजवे ,
हळुवार देत होतो ;
हात तुझा हाती माझ्या ,
हलकेच घेत होतो ;

तो स्पर्श तुझा नवखा,
जणू की मागत होतो ;
चांदण्याच्या मोहराने,
देहात फुलत होतो ;

निरागस हासत तू ,
सारेच हाती घेतले ;
उजळल्या डोळी तुझ्या ,
मग मीच गात होतो;

घेवूनी क्षणात पुन्हा ,
तू तया सोडून दिले ;
काजव्यांची दिवाळी ती,
मीच उजळत होतो ;

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

घर

Submitted by समीर चव्हाण on 27 February, 2013 - 02:47

अधिक आयुष्य सुंदर होत आहे
तुझे माझे नवे घर होत आहे

करूदे काम बघण्याचे मनाला
तुझा शृंगार जोवर होत आहे

असेही चित्र डोळ्यांना दिसावे
उले पाऊल घरभर होत आहे

तुझे माझे जमेना लाख तरिही
तुझ्याविण जन्म दुर्धर होत आहे

मला सांभाळुनी घेशील ना तू
सुखाची जीर्ण चादर होत आहे

समीर चव्हाण

शब्दखुणा: 

सुखाच्या शोधात.....

Submitted by gajanan59 on 27 February, 2013 - 01:00

सुखाच्या शोधात.....

चालताना वाटेत
लागतो विसावा
आयुष्याच्या संघर्षातही
लागतो ओलावा,

नात्यांच्या या गर्दीत
कोण आपला नि कोण परका
मुखवट्या मागील जेव्हा
कळतो खरा चेहरा,

स्वतःचा शोध घेताना
संपते आयुष्यही
जगायचेच राहून जाते
सुखाच्या शोधापरी

गजानन....

शब्दखुणा: 

मान्यच आहे मला समजणे दुरापास्त आहे...

Submitted by मुग्धमानसी on 27 February, 2013 - 00:05

मान्यच आहे मला समजणे दुरापास्त आहे
आता तुझ्याच अकलेवर सगळी भिस्त आहे!

कठीण केवढी तुझी गणिते
मी बापुडी गिरवीते कित्ते
विश्वाचे तुज प्राप्त ज्ञान अन्
मलाच मी शोधण्यात व्यस्त आहे!

तुझे बोलणे किती शहाणे
माझे अल्लड वेडे गाणे
मम शब्दांसही नाही तितकी
तव विस्मरणांसही शिस्त आहे!

इथे तिथे भटकूनी थकले
कडे कपारी शोधून आले
बाजारी तुज भेटुन कळले
ज्ञान खरे एवढे स्वस्त आहे!

अथांग आकाश आणि धरती
अशी अंतरे कोण पार करती?
कुठेतरी क्षितिजावर भेटू
अशी अपेक्षा जरा रास्त आहे!

तुझे बहरणे घमघमणारे
तुला ऋतूंचा तोटा नाही
असेन फुल मी बिनवासाचे
परंतू अगदिच काटा नाही
असल्या चिंता तुला सोपवून

शब्दखुणा: 

राजं...परत फ़िरा...

Submitted by santosh watpade on 26 February, 2013 - 21:55

राजं यवु नगा...परत फ़िरा
राजं यवु नगा....
तुमच्या मावळ्यांनी मिशा कापल्यात कव्हाच,
डोस्क्याच्या पगड्या सुटल्यात कव्हाच...
मावळे निजलेत ढोरावाणी...राजं...
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...

तुमचा म्हाराष्ट्र इकलाय पहारेकर्‍यांनी,
किल्ले लुटले तुमचे किल्लेदारांनी....
सोवळी सुटलीत कस्पटावाणी....राजं..
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...

आमच्या तलवारी गंजलात समद्या,
भिताडाला लटकत्यात दांडपट्टे आता...
भगवा आता सरंजामांनी चोरला...राजं....
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...

राजं..आमचं रगात पाणी झालंय कव्हाच,
माणुसकीची सुंता झालीय राजं तव्हाच...

भाव सरणाचे वधारू लागले

Submitted by प्राजु on 26 February, 2013 - 12:48

वादळे येता थरारू लागले
कोणत्या काठास तारू लागले

सूर्य किरणांचा करूनी कुंचला
वाट मी माझी चितारू लागले

माळ घालुन चालले वारीस मी
वागणे माझे सुधारू लागले

पालवी, मोहोर पाने अन फ़ुले
का ऋतू-चक्रा झुगारू लागले?

नाव ज्यांनी टाकले माझे कधी
ते खुशालीही विचारू लागले

पाहुनी आभाळ मातीच्या उरी
बीज अंकुर बघ तरारु लागले..

देह ठेवू की नको मज ना कळे
भाव सरणाचे वधारू लागले

-प्राजु

आठवांचा पसारा....

Submitted by योगितापाटील on 26 February, 2013 - 10:53

आठवांचा पसारा....पुन्हा एकदा
वेदनांना धुमारा....पुन्हा एकदा

जाहला का तुझा स्पर्श मज सांग ना
कातळाला शहारा...पुन्हा एकदा

दे निखाऱ्यास फुंकर जराशी तुझी
गारठ्याला उबारा...पुन्हा एकदा

सांत्वने ती पुरे फक्त डोळ्यातली
काळजाला सहारा...पुन्हा एकदा

ध्वस्त आतून झालो कितीदा तरी
वादळाला निवारा...पुन्हा एकदा

दाटल्या खूप भरती तळाशी अता
आसवांना किनारा...पुन्हा एकदा

स्वैर गंधाळतो मोगरा तो म्हणे?
घातला मी पहारा...पुन्हा एकदा

-योगिता पाटील

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन