काव्यलेखन

गझल तरीही जमली नाही

Submitted by निशिकांत on 23 December, 2013 - 03:49

मोजत मात्रा वृत्त पाळले, गझल तरीही जमली नाही
वाचकांस ती आवडली पण विद्वानांना रुचली नाही

जरी कराग्रे वसे लक्ष्मी, खिशात केंव्हा दिसली नाही
तिचा राबता महालात ती झोपडीत वावरली नाही

तू दिल्यास त्या भळभळणार्‍या जखमांचीही तर्‍हा निराळी
काळाच्या मलमाने त्यांवर कधीच बसली खपली नाही

बेगम झाली जरी कुणाची, बेग़म(*) होणे अवघड आहे
जनानखाना विश्व तिचे पण कधी कशी गुदमरली नाही?

मूठ झाकली तोवर होते मुल्य जरी सव्वालाखाचे
उघडे पडले पितळ ज्या क्षणी, बजारी पत उरली नाही

किती निर्भया आल्या गेल्या, क्षणेक आक्रोशाच्या लाटा
जरी कायदे झाले, त्यांची फरपट कांही सरली नाही

लिलाव

Submitted by सारंग भणगे on 22 December, 2013 - 12:17

मैत्रीत भेटल्याचा जो हावभाव केला
घेता मिठीत त्यांनी पाठीत घाव केला

माझ्या घरात आले होऊन पाहुणे ते
मजलाच काढण्याचा त्यांनी ठराव केला

मी जिंकलो तरीही राहून शल्य गेले
माझेच दोस्त ते हो ज्यांनी उठाव केला

आमंत्रणे कशाला देता कलेवराला
'गेल्या'वरी प्रितीचा खोटा बनाव केला

मागावयास आले माझेहि देत गेलो
सारे लुटून आता माझाहि भाव केला

माझ्या विरोधकांचा त्यांनी विरोध केला
राहीन एकटा हे जाणून डाव केला

झुळुक वादळी

Submitted by अज्ञात on 22 December, 2013 - 01:11

युगे जाहली जळून पण अंगारा अजून दाही
कलेवरे उरली स्वप्नांची डोळा भरून कांही
काजळ वाटा धूळ फ़ुफ़ाटा दिशा व्यापल्या दाही
सुकलेला पाचोळा भिरभिर उडवत वारा वाही

अंध मोहरे काळे गहिरे पोत मानवत नाही
वठलेल्या रेषांचे व्रण अवशेष वाहती भोई
पराधीन मायामय जीवन झुळुक वादळे तीही
ओहटीत कवने वचनांची जगणे लाट सदाही

उलगडणे वाळूसम काठावर लोटांगण घेई
खोल तळातिल दडलेले सागर पृष्ठावर येई
फेस दुधी विरघळे उफाळे फुटे अंगभर लाही
श्वासांचे दळणे आदळणे चिर अंदोलत राही

…………………. अज्ञात

जरी शांत वाटे, ताठ आहे माझा

Submitted by किरण कुमार on 21 December, 2013 - 06:29

किती थंड आहे गोल माठ तुझा
जरी शांत वाटे ताठ आहे माझा

कशाला पाहिली तू मुर्दाड माती
नदीलाच ओला काठ आहे माझा

का उगी झूरावे अल्याड पल्याड
जंगलात अंधार दाट आहे माझा

ये तू निघोनी सैल पावलांनी
जरी वळणाचा घाट आहे माझा

जरा बिलगोनी बसशील जेव्हा
कळेल कसा थाट आहे माझा

- किकु

एक भाल्याखालचे अन...

Submitted by ह.बा. on 21 December, 2013 - 02:09

एक भाल्याखालचे अन...

अपयशाचा अर्थ कळतो यश मिळाल्यावर
एक भाल्याखालचे अन एक भाल्यावर

व्यंग, रंगाला, रुपाला अर्थ नाही रे...
हेच कळते संत अथवा प्रेम झाल्यावर

केवढी आंदोलने केलीस सामाजिक
घे जरासा ज्यूस घे सत्तेत आल्यावर

ते तिचे ते जेवढे कळले पुरे आहे
वेदना कळतात सार्‍या मन कळाल्यावर

द्यायची तर रंगमंचावर वहावा दे
मी खरा नसतो कधी मेकप निघाल्यावर

सावलीचे झाड नेले वादळाने अन
का हबा ठेऊन बसला हात पाल्यावर?

- ह. बा. शिंदे

रक्ता...

Submitted by जयदीप. on 20 December, 2013 - 08:35

ती गाज सागराची आहे लपून रक्ता
बघ एकदा नव्याने तू सळसळून रक्ता

पाणावतोस डोळे का तू तुझे अताही
जखमा नकोत ओल्या घे साकळून रक्ता

धर्मांध हा जमाना, जातीय वाद येथे
निर्भेद वाहशी तू...दे दाखवून रक्ता

तुटतात रोज येथे नाती तुझी नव्याने
येतोस तू कशाला नाती मढून रक्ता

माझे तुझ्या प्रमाणे वाहून फार झाले
थांबायचे मला ना जमले कळून रक्ता

हिशोब

Submitted by मुग्धमानसी on 20 December, 2013 - 04:50

मी जन्माला येता येता
एक करामत करून बसले
टाहो फोडून रडण्याआधी
उगाच गाली हळूच हसले

कितीक मोठा गोंधळ तेंव्हा
देव-ऋषींच्या दारी झाला
गर्भवास सोसूनही सगळा
कसा जीव आनंदी उरला?

विज्ञानाला अन् शास्त्रांना
फार खटकले माझे हसणे
कुणी औषधे, कुणी अंगारे,
कुणी सुचवले वैद्य गाठणे

कोणालाही तेंव्हासुद्धा
सुचले नाही... कमाल आहे!
विचारले जर मलाच असते
म्हटले असते, ’धमाल आहे!’

विस्मरणाचा मंत्र मला तो
देणे राहून गेले होते
घाई घाईत गेल्या जन्मी
सगळे ठेऊन मेले होते

आता उरलेल्या श्वासांचा
हिशोब माझा तयार होता
कुठवर आले, कुठून पुढे
जायचे, तो रस्ता ठाऊक होता.

शब्दखुणा: 

चिर अनंत

Submitted by अज्ञात on 19 December, 2013 - 23:45

पुन्हा सुखे परतून न येती पानांवर जैसे दंव मोती
ओघळल्या स्वप्नांचे अंती व्रण कांचेचे उरती

परा शरांचे ढंग निराळे छटा उमलुनिया वावरती
विमल कोवळे पराग गंधित माल्य फुलांवर लाघवती
परम अलौकिक सण नियतीचे दरवळती वाटेवरती
क्षणभंगुर वैभव हे पण अस्वाद कुणी घेती ना घेती

पसा असू दे याचकसम आमंत्रक सदा नयन भरती
आसपास चिर अनंत कोटी अमृतमय कण भिरभिरती
धुंद सरोवर कुंद सभोवर शकुनांचे मेणे अवती
माया ईश वराची अवघी चराचरावर ओघवती

……………… अज्ञात

मन माझी जागा असुनी

Submitted by बागेश्री on 19 December, 2013 - 20:41

मी मिटून डोळे घेता
ह्या मनात उन अवतरते,
तावदान मनभितींचे
रंगांनी उजळुन जाते

मनि छप्पा पाणी चाले
कवडसे लुकलूकणारे
जे हाती आले काही
ते निसटुन जाई सारे

रमणार कितीसा येथे
वेड्याश्या खेळामध्ये
अनवाणी चालू लागे
मी मूकाट उन्हामध्ये

हा मंद मंदसा वारा
मज उगा आवडू पाहे,
गुलमोहर रस्त्यावरचा
ह्या पायाखालुन वाहे...
का अशी शांतता मजला
कोठेही गवसत नाही
मन माझी जागा असुनी
नित परकी भासत राही

पस्तावणेच आले काटून एक रस्ता ......

Submitted by वैवकु on 19 December, 2013 - 14:19

संपादित केली आहे आत्ता मी वाचत होतो तर मलाच फालतू वाटू लागली ही गझल म्हणून बाकी काही नाही

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन