काव्यलेखन

"गाडी"

Submitted by -शाम on 9 January, 2013 - 23:33

आपल्यालाच उशीर झाला
की वाटतं
गाडी उशीरा यावी

किंवा
लवकर यावी वाटतं
जेंव्हा .... वेळेआधी
आपण पोहचतो स्टेशनवर..

पण गाडीला कुठं कळतात गणितं आपली
हवी तेंव्हा आली तर मग ती गाडी कसली
ती येते तिला यायचं तेंव्हाच...

सुखाच्या क्षणाचही असंच
पावसाळी घनाचही असंच

आणि

या मरणाचही असंच

..........................................शाम

व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिकडले......

Submitted by भुंगा on 9 January, 2013 - 22:24

मंगेश पाडगावकर (कवी), पु.ल. देशपांडे (संगीतकार) आणि पं जितेंद्र अभिषेकी (गायक) यांना स्मरून.....
(चु.भू.द्या.घ्या.)

शब्दावाचून कळले सारे
व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिकडले.....
प्रथम तुला पिंग केले आणि
घडू नये ते घडले,
व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिकडले.

छंद नवा बोटांस मिळाला
मेसेज नवे, स्टेटसही निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे
काम जरा गडबडले......
व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिकडले.

भर दिवसा अन मध्यान्ह राती
फोन सदा घेऊनी हाती
प्रोफाईलमध्ये तुझ्या स्टेटस पाहूनी
तिथेच मन घुटमळले.....
व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिकडले.

शब्दावाचून कळले सारे
व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिकडले.....

आज ना चंद्र नुसतेच तारे

Submitted by उमेश वैद्य on 9 January, 2013 - 10:41

आज ना चंद्र नुसतेच तारे
आवरू चांदण्यांचे पसारे

रात्र माझी अशी पेटलेली
अन तुला वाटते शांत सारे!

वेदनेच्या कुशी जन्म माझा
सांग काही मना तू कसा रे?

तू खरे बोल चालेल आता
कोण आहे इथे ऐकणारे

जाहले शून्य आयुष्य माझे
मोजसी आणि कसले घसारे

वेळ गेली अता बोलण्याची
ठेव दडवून तू आत सारे

थांबताना जणू जीव जातो
चालता वाट जळते निखारे

कालचे फूल निर्माल्या झाले
कोण आता तया वाहणारे

उ.म. २०१३

गुंता

Submitted by -शाम on 9 January, 2013 - 09:40

ना बाग, ना फुलं
ना समुद्र, ना किनारा
बस्स, हा माळ आपला होता
इथं नव्हतंच काही... सगळंच खडकाळ
पण तो काळ आपला होता..

आणि त्याच्या धुंद मिठीत.. आपण दोघे

हलकेच लाजायचीस
तेंव्हा लाट यायची अंगावर
अन् वाटायचं बसल्यासारखं
किनार्‍यावर घटकाभर
हसायचीस तेंव्हाही लाख फुलं फुलायची
खांद्यावर, छातीवर, या माळावर

फुलून यायचा भवताल
रेंगाळायचे ऋतू
प्रेम, रुसवा, मौन
सगळ्यातून उरायचीस तू
त्या क्षणांचे धागे
तेंव्हा शेला बनून यायचे स्वप्नात

पण स्वप्नच ती...

आता उरलाय केवळ त्या क्षणांचा गुंता
एखादा धागा सुटा करावा म्हंटलं
तर तास निघून जातात
मग कधी फुलं सांडत
नाहीतर व्यथा मांडत

तो मित्र...........नविन

Submitted by मंदार खरे on 9 January, 2013 - 06:40

भर रस्त्यात मोठ्याने "मित्रा" हाक मारुन बोलावतो
तो मित्र
पैसे मागितल्यावर आधी देतो आणि मग कशाला विचारतो
तो मित्र
घरच्यांजवळही जे सांगता येत नाही पण ज्याला सांगतो
तो मित्र
रात्री १२ वाजता फोन केला तरी चीड्चीड न करता फोन उचलतो
तो मित्र
काही चुकले तर आधी शिव्या देतो आणि मग गळ्यात गळा घालतो
तो मित्र
मुन्नाभाई सारखी "झप्पी" देउन दु:ख विसरायला लावतो
तो मित्र
कर्णा पेक्षा सुद्धा उदारपणे आपली आवडती वस्तू जो देतो
तो मित्र
रक्ताच्या नात्यां पलिकडे जाऊन जो जिवलग बनतो
तो मित्र

शब्दखुणा: 

एवढे मी टंकले की, वाचणेही शक्य नाही

Submitted by शायर पैलवान on 9 January, 2013 - 01:06

गझल विडंबन
----------------------------------------------------------------------------

एवढे मी टंकले की, वाचणेही शक्य नाही!
बेगडी आंतरजालावरी ह्या मज थांबणेही शक्य नाही!!

वैवकुंनी आजवर त्याच्या परीने खूप केले....
आज पर्यायी परंतू शेर देणेही शक्य नाही!

एकटे गाठून मजला घेरले सा-या वाचकांनी....
या बिचार्‍यांना तसे समजावणेही शक्य नाही!

जे तिन्हीत्रीकाळ असती चोवीशीत वेढलेले;
हुंदके ललितातले त्यांचे टाळणेही शक्य नाही!

वाचक नाहीत, मते पिंकणारे थुंकबंधू!
संकेतस्थळाबाहेर त्यांना गाठणेही शक्य नाही!!

एवढा मी धावलो की, चालणेही शक्य नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 8 January, 2013 - 22:19

गझल
एवढा मी धावलो की, चालणेही शक्य नाही!
बेगडी शहरात ह्या मज थांबणेही शक्य नाही!!

चेह-याने आजवर त्याच्या परीने खूप केले....
आज जखमांना परंतू झाकणेही शक्य नाही!

एकटे गाठून मजला घेरले सा-या स्मृतींनी....
या पिशाच्चांना तसे समजावणेही शक्य नाही!

जे तिन्हीत्रीकाळ असती वेदनांनी वेढलेले;
हुंदके गझलेत त्यांना टाळणेही शक्य नाही!

माणसे नाहीत सारे वर्तुळांचे केन्द्रबिन्दू!
वर्तुळाबाहेर त्यांना गाठणेही शक्य नाही!!

कोणतीही वाट नसते फक्त काट्यांची परंतू;
टाळुनी काटे, फुलांना वेचणेही शक्य नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर

कुणी सांगा ना कसे करावे...

Submitted by हर्षल_चव्हाण on 8 January, 2013 - 13:07

दुलईमध्ये बिलगून निजले,
गोड गोजीरे एक तान्हुले,
स्वप्नांच्या दुनियेत हरवले,
बघ ना आई तुझे सानुले...

करीसी माया अपार त्यावर,
दुखता नख; तुज अश्रू अनावर,
सदासर्वदा त्याजपाशी,
का गं आई इतका वावर?

आज तुझ्यावर रुसलो आहे,
इथे एकटा बसलो आहे,
असे वाटते मागून छोटा;
भाऊ मी तर फसलो आहे...

जा आई मी कट्टी फू,
भेदभाव जो केला तू,
काय करू मी कळेचना,
वेळ कसा मज देशील तू?

बाबांना हे सांगून द्यावे?
नकोच भाऊ असे म्हणावे;
की आईसच बदलून घ्यावे?
कुणी सांगा ना कसे करावे...
------------------------------------------------------------------------------
हर्षल (८/१/१३-रात्री ११.३०)

तुझ्या कृपेची किरणे, माझ्यावरती का रुसलेली?

Submitted by सतीश देवपूरकर on 8 January, 2013 - 10:58

गझल
तुझ्या कृपेची किरणे, माझ्यावरती का रुसलेली?
का वाट्याला माझ्या आली? वाट अशी चुकलेली!

मलाच मी देताना खांदा, हाय किती थकलेलो....
ऐन यौवनी सुद्धा माझी पाठ पहा झुकलेली!

हरेक दिवशी घरून निघतो, पुसून माझी पाटी....
घरी परतताना ती असते प्रचंड बरबटलेली!

चार दिवस बाहेर काय मी गावाला गेलेलो....
कळीकळीचा म्लान चेहरा...बाग पूर्ण सुकलेली!

कुणास आता नको तेवणे हे माझे नित्याचे!
मी म्हणजे कंदील जयाची काचच धुरकटलेली!!

रदीफ अन् काफिया छान, पण, चिंतन सखोल नाही!
म्हणून त्यांची गझल वाटते निव्वळ फरफटलेली!!

चुरगळलो मी, सुरकुतलो मी, फक्त चुकांनी काही....

आयुष्य गझल झाली

Submitted by उमेश वैद्य on 8 January, 2013 - 10:02

आयुष्य गझल झाली

आयुष्य गझल झाली मी आळवीत गेलो
मतला ठरीव होता मिसरे रचीत गेलो

जे घातलेस कोडे सुटलेच ना कधीही
तू शिकविले तसे मी ते सोडवीत गेलो

कोणीकडून आला पक्षी कुण्या दिशेचा
हासून क्षेम त्याचे तरिही पुशीत गेलो

आला असाच कोणी भेटीस आज माझ्या
म्हणतात काळ ज्याला, त्याच्या कुशीत गेलो

होते जिवंत त्यांनी मृत्यूस दान केले
यांच्या मुठीमधूनी त्या ओंजळीत गेलो

उ. म. वैद्य २०१२.

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन