काव्यलेखन

अंथर

Submitted by अज्ञात on 29 December, 2013 - 01:17

धुके सभोवर चराचरावर दोघे कातर एकांतावर
गूढ वेदना हृदयी अनवट खोल कुठे निश्वास अनावर
काळ दाटला पडद्यापाठी स्मरण अडखळे प्रतिमा धूसर
शब्द स्तब्ध प्रतिबिंब आभासे; संरचना कांचेचे झुंबर

लोलक फिरवी तरंग गहिरे द्वैत विचारांचे मन संगर
ताल आडाणे अवघडलेले रान दुंदुभी वणवा मंथर
आहे नाही संभ्रम अवघे सहवासाचे दुर्लभ अंथर
उलाल रेषा अगतिक निष्फळ जुळवू पाहे समान अंतर

…………………………. अज्ञात

देहाच्या गाडीची मारू बेल डबल

Submitted by बेफ़िकीर on 28 December, 2013 - 13:39

मळमळवे दुर्गंध सुडाच्या वांत्यांचा
घुसमटवे सहवास चिकटत्या नात्यांचा
ईर्ष्येच्या पायावर वसलेली सख्ये
छुपा विषारी डंख मखमली पात्यांचा

चौकशीस एखादी खिडकीही नाही
वेळ घालवायाला टपरीही नाही
खिसा स्वभावाचा कापाया ही गर्दी
चोर सुखाचा पकडाया कोणी नाही

आठवणींचे स्थानक आहे गजबजले
ज्यामध्ये माझे हे माझेपण रुजले
मुळापासुनी उपटावे व्यक्तित्वाला
स्वप्न प्रवाही होण्याचे ज्याचे थिजले

थोडं कधी हसावं

Submitted by स्वाकु on 28 December, 2013 - 11:57

थोडं कधी हसावं
थोडं कधी रडावं

जर टाळले फुलांनी
काट्यांस का जपावं

मरण्यास वाव होता
मग वाटले जगावं

कोमेजताच कळले
थोडं अता फुलावं

मी हा असाच वेडा
सोसूनही खुलावं

स्वानंद यात होता
दु:खातही झुलावं

टिकले तुफान काही

Submitted by अभय आर्वीकर on 27 December, 2013 - 14:06

टिकले तुफान काही

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे

एकाकी मी सुखात आहे

Submitted by निशिकांत on 27 December, 2013 - 11:00

चार दिवारी अन् उंबरठा
कैद भोगते निवांत आहे
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

नजरेला नजरा भिडल्यावर
माझ्यामध्ये गुंतशील तू
देत मुद्रिका पाश रेशमी
विणून लिलया विसरशील तू
दुष्यंताच्या शंकुतलेची
भीती माझ्या मनात आहे
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

सुखास लाथाडून पकडली
वाट तुजसवे वनवासाची
एकच आशा मनी ठेवली
श्रीरामा ! तव सहवासाची
पुरुषोत्तम तू ! पण का माझ्या
अग्निदिव्य प्राक्तनात आहे?
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

उजेडात मज कुठे न दिसतो
एक कोपरा भय नसलेला
आश्रमात सत्संग कशाचा?
बाबा दिसला वखवखलेला
नजरा टाळत हिंस्त्र पशूंच्या

शेवटची कविता

Submitted by रसप on 27 December, 2013 - 03:56

कधी लिहिलं गंमत म्हणून
कधी लिहिलं सवय म्हणून
कधी लिहिलं गरज म्हणून
उद्या लिहिन ओळख म्हणून

कधी कधी वाटतं..
काय मागे राहतं?
चेहरा, आवाज की नाव?
माझ्या मागे राहतील
फक्त माझे शब्द
असेच.. उगाच.. सहज सुचलेले
वेळ होता म्हणून लिहिलेले
लिहिता लिहिता अजून सुचलेले
वेळ नव्हता, पण तरीही लिहिलेले

नसानसांत भिनली कविता
क्षणाक्षणात दिसते कविता
चार श्वास कमी दे मला
त्याच्या बदल्यात दे एक कविता

सूर्यप्रकाशाची शेवटची तिरीप
जेव्हा डोळे टिपतील
ओघळत्या चांदण्याचा शेवटचा थेंब
जेव्हा पापण्या तोलतील
तेव्हा थरथरत्या श्वासांनी मी
त्या सर्वव्यापी अंधारावर
दोन शब्द लिहून जाईन

ते ते भरून आले

Submitted by देवा on 26 December, 2013 - 23:28

त्या आतल्या सुराने सारे कळून आले
हरखेल शब्द नवखा इतके जुळून आले

मी मोकळा जरासा तू ही तशीच मुक्त
हे नाळ जोडलेले बंधन कुठून आले

चल रोजच्याप्रमाणे घेऊ हसून थोडे
बघ रोजच्याप्रमाणे सारे घडून आले

डोळ्यातल्या जळाला हलकेच साद आली
तू बाहले जयांना ते ते भरून आले

भाग्य

Submitted by राजेंद्र देवी on 25 December, 2013 - 22:57

भाग्य

क्षण एक सुखाचा येता
भाग्य हिरावून नेते
भाग्यालाही वाटतो हेवा
दुरावून नेते क्षणाचे नाते

क्षण एक दुःखाचा येता
डोळा पाणी येते
अशावेळी धावून येते
तुझे माझे मैत्रीचे नाते

क्षण एक भाग्याचा येता
मन माझे सुखावते
जुळून येते माझे तुझे
जन्मांतरीचे नाते

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

कर शिंपले तजेले...

Submitted by बागेश्री on 25 December, 2013 - 11:13

डोळ्याच्या शिंपल्यात, स्वप्नाची रेघ
रात्रभर घरावर, रेंगाळता मेघ..
कधीतरी अनावर झाल्यावर
रिता रिता झालेला,
गळक्या छपरावरून पाऊस
थेट घरात आलेला..

एक थेंब त्याचा मग
शुभ्र शुभ्र शिंपल्यात,
मोती फुलला स्वप्नांचा
गच्च मिटल्या डोळ्यात..

किती उतला मातला
नभ भावभोर झाला
त्याने जाग आली तुला
अन मोती निखळला

किती शोधशील त्याला
गेला वाहून जो गेला
त्याची साथ तेवढीशी
हेच सांग तू मनाला

घाल काजळ नव्याने
तुझ्या डबीतले ओले,
ओढ रेघ तू स्वप्नांची
कर शिंपले तजेले..

-बागेश्री

अनुप्रीती

Submitted by अज्ञात on 25 December, 2013 - 07:54

विलयखुणा जन्मावरती; मन उलगडते ती अनुप्रीती
चिरंजीव; खडकावरही असते प्रेमाची अनुभूती
काळ युगे हतबल शरणागत कली कळा निष्प्रभ भवती
हरित वाण अंकूर सदा; ऋतु वयातीत जणु वावरती

ओलांडे यातना पर्व वेदना पर्वतांच्या भिंती
खळे अवखळे फ़ेसाळे निर्झर निर्मळतम ध्येयगती
तमा ना कुणाची वा भीती लाघव सरिता ओघवती
काठ किनारे तृप्त; सुप्त समृद्ध क्षणांची ही भरती

…………………………. अज्ञात

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन