काव्यलेखन

कवडसा

Submitted by मुग्धमानसी on 6 January, 2014 - 02:18

होय होता तोच माझ्या मन्मनीचा आरसा
पण अचानक जाहला होता जरा अंधारसा

कोण कुठले पिस हिरवे उमटूनी बसले तिथे
मी इथे रुतले तरिही उमटला नाही ठसा!

दिवस होते ओलसर अन रात्रही गंधाळशी
त्या ऋतूचा व्हायचा होताच मज आजारसा...

रे हसा भरपूर अन् थट्टा करा माझी अशी
फसवले मज निमिष तो होता सुगंधित धुंदसा!

बंद नेत्रांनी तुला मी शोधणे नाही खरे
डोळसांचा यापुढे घेणार आहे मी वसा...

कुंद ओले दमट नाते सडून जाण्याआत रे
सार पडदे उजळूदे अंतरात सुंदर कवडसा!

शब्दखुणा: 

''तितका तितका''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 5 January, 2014 - 22:55

जितका जितका रडतो आहे
तितका तितका घडतो आहे

हृदयाची तर राख जहाली
शब्दांतुन धडधडतो आहे

हुलकावत सुख पळते, लपते
दु:खाला सापडतो आहे

लांघत गेलो खड्डे ,खळगे
हमरस्त्यावर अडतो आहे

इच्छा गोठुन गेल्या,आता
थंडीने कुडकुडतो आहे

तुटले स्पंदन..तुटले बंधन
माझा मी हुंदडतो आहे

असला नसला तरिही ‘’कैलास’’
फरक कुणाला पडतो आहे?

--डॉ.कैलास गायकवाड

चांदण्यांनो ...

Submitted by Kiran P. Joshi on 5 January, 2014 - 03:34

भारली जणु तिच्या स्मृतींनी खेळणारी ही हवा
चांदण्यांनो प्रेरणांनी साजणीला जागवा.

मौनात गेले पक्षीगण सारे, नि:शब्द झाल्या दाही दिशा
थंडावली चाल पाना-फुलांची, सुस्तावली आज सारी निशा
कुणी न येथे निरोप सांगण्या, तुम्हीच माझे दूत व्हा...!

चांदण्यांनो प्रेरणांनी साजणीला जागवा.

सांगून टाका तिला एकदाचे, गुपीत सारे माझ्या मनाचे
भेटुनी गेली ती मला जे,उपकार सारे त्या त्या क्षणांचे
रोखुनी टाका पळ विरहाचे, छळ मनाचा थांबवा...!

चांदण्यांनो प्रेरणांनी साजणीला जागवा.

चढेल लाली गालावरती तिने हे सारे ऐकता
म्हणेल मजला ठाऊक सारे तुम्हे कशास हे सांगता?

फरक

Submitted by जयन्ता५२ on 5 January, 2014 - 01:55

इतकी वर्ष झालीत
पण तू काहीच बदलली नाहीस बघ..

अजूनही तुझं ते पत्रातलं तिरपं अक्षर तसंच आहे.
अगदी इ-मेलमध्ये सुद्धा
तू ती तिरपी 'इटालिक्स' अक्षरंच वापरतेस!

इतकी वर्ष झालीत बघ...
पण तुझ्या तिरकसपणात अगदी
अक्षराचाही फरक पडलेला नाही!

---- जयन्ता५२

शब्दखुणा: 

नव्या वर्षात केलेली प्रतिज्ञा मोडते आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 4 January, 2014 - 15:43

नव्या वर्षात केलेली प्रतिज्ञा मोडते आहे
सरावाने तुझ्याविषयी स्वतःशी बोलते आहे

तुला स्वप्नात बोलावू कि प्रत्यक्षात भेटूया ?
ठरविण्या हे उगाचच रात्र सारी जागते आहे

जरासे स्पष्ट कर संबंध नात्याचे तुझ्या-माझ्या
निखळ मैत्रीत सुध्दा प्रेम सच्चे शोधते आहे !

घरापासून आले लांबच्या सहलीस, येथेही...
जगापासून त्याचे लांब जाणे जाचते आहे

म्हणाले लोक, त्याच्यावर पुरे झाले सतत लिहिणे
म्हणाले दु:ख, येवू देत जे भंडावते आहे

अरे वेल्हाळ आयुष्या... जरा आटोपते घे ना !
कुठे उतरू, अखेरी गाव माझे कोणते आहे ?

-सुप्रिया.

दव बिंदू

Submitted by दवबिंदु on 4 January, 2014 - 03:30

दव बिंदू आहे मी हिरव्या ओल्या पानावरचा
मी प्रतीकच ठरलो आहे क्षणभंगुरतेचा

माझी क्षण भंगुरता आहे शाप कि वरदान
कोणाचे असावे का आयुष्य माझ्या समान

या इवल्या जीवनी चातकाची मी भागवतो तहान
आकर्षक वाटे हर एकास असुनी इतकास लहान

क्षणात रूजुनी उगवतो रोपातुनी कोठे ना कोठे
तुम्हीच ठरवा आयुष्य सुंदर असावे कि मोठे

पूर्व प्रकाशित : www.davbindu.com

श्वास माझे

Submitted by जयदीप. on 4 January, 2014 - 01:48

मिळवणारे श्वास माझे
खर्चणारे श्वास माझे

मी अता शोधीत नाही
हरवणारे श्वास माझे

बोलका एकांत माझा
ऎकणारे श्वास माझे

मी अता मोजून घेतो
संपणारे श्वास माझे

त्या तुझ्या स्पर्शास सामिल
थांबणारे श्वास माझे

का मला घेऊन गेले
परतणारे श्वास माझे

घाटावरचा नावाडी (नर्मदाकाठच्या कविता )

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 January, 2014 - 11:12

घाटावरचा नावाडी
होता नाव वल्हवित
नेक धंदा पिढीजात
आपला प्रेमे करीत

डोळ्यामध्ये पण त्याच्या
उद्याचे काहूर होते
गाव आणि घाट त्याचे
बुडून जाणार होते

बाप आजा पणजोबा
या घाटावर जगले
मी भाऊ अन ताईनी
इथेच जग जाणले

दुजे काम करू काही
पोटाची या चिंता नाही
माईची पण साथ ही
आता मिळणार नाही

उदास स्वरात त्याच्या
विरहाची आग होती
नाळ तुटल्या इवल्या
अर्भकाची हाक होती

शब्दखुणा: 

मरणे थोडे, जगणे थोडे

Submitted by जयदीप. on 3 January, 2014 - 07:37

रडणे थोडे, हसणे थोडे
मरणे थोडे, जगणे थोडे

पैसे, पैसे, पैसे, पैसे...
असणे थोडे, नसणे थोडे

नाते माझे-यांचे-त्यांचे
जुळणे थोडे, तुटणे थोडे

जगणे भलते सोप्पे आहे
विणणे थोडे, विरणे थोडे

संधीमधले फसवे सोने
मिळणे थोडे, मुकणे थोडे

माझे माझ्या वरती आहे
झुकणे थोडे, नमणे थोडे

छळतात ही उन्हे अन् छळतात सावल्याही

Submitted by मयुरेश साने on 3 January, 2014 - 05:44

छळतात ही उन्हे अन् छळतात सावल्याही
ठरवून टाकले की बरसायचेच नाही

ॠतु चक्र आठवांचे सोसायचे कसे रे
बदलायचा ॠतूंना सांगा उपाय काही

निवडून कोण येतो याची नकोच चिंता
या फाटक्या खिशाला लुटणार लोकशाही

बाकी बरीच आहे अश्रुंसवे उधारी
आणू कुठून हासू ओठावरी तुझ्याही

मृत्यू समीप असतो श्वासागणीक अपुल्या
तो भेटणार आहे कोठूनही कसाही

.......मयुरेश साने

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन