काव्यलेखन

चिम्णुताई चिम्णुताई

Submitted by पुरंदरे शशांक on 12 January, 2014 - 00:46

चिम्णुताई चिम्णुताई
कुठेच कशा दिसत नाही ?
चिवचिव चिवचिव गोडशी
कानावरती येत नाही ??

या लवकर इकडे बाई
घर देईन मेणाचे
पाऊस येता जोराचा
गळ्णार नाही एवढुस्से

कंटाळलात भाताला ?
खाऊ देईन छानसा
टिपता येईल चिव्चिवताना
शेवचकली खमंगसा

ये जरा लवकर बाई
तुझ्याशिवाय करमत नाही
अंगणात जाऊन बस्लं तरी
बाळ आमचं जेवत नाही

चिवचिव चिवचिव ऐकल्यावर
बाळ धावेल अंगणभर
म्ममं म्ममं होईल मग
ही अशी भराभर .......

काय झाले ते कळेना

Submitted by अभिजित गलगलीकर on 11 January, 2014 - 20:17

काय झाले ते कळेना
काय व्हावे ते सुचेना

काय देऊ वादळाला
रिक्तहस्ते पाठवेना

सत्य सारे सांगताना
मौन आता सोडवेना

वेध घेतो स्पंदनांचा
मंद नाडी जाणवेना

यज्ञ होता ज़ीवनाचा
आहुतीला टाकवेना

सैन्य आले कौरवांचे
कृष्ण कोणी अवतरेना

( वृत्त - मनोरमा)

-- अभिजित गलगलीकर -- १२-०१-२०१४

बांध

Submitted by उमेश वैद्य on 11 January, 2014 - 08:41

बांधावरती दहिवरलेल्या सांज हिवाळी अलगद उतरे
शिरशिरणाऱ्या पात्यांवर ती पदर धुक्याचा हळूच पसरे
ओढ अनामिक दाटून येइ काय नकळे उगीच मानसी
किरकिरणाऱ्या रातकिड्यांचे स्वरहि जवळचे वाटत जाती
तळव्याखाली थंड ओलसर चिखलाचे थर अन् एकटाच मी
तुझ्या स्मृतिंची ये थोडीशी थंड मनाला धगधग कामी
गुढ हासूनी डाव टाकिते सांज मनावर अंधाराचा
सोडुन जाती दिशाही मला प्रवास माझा दिशाहिनाचा
शांतच सारे थंड भासते परी अंतरी खदखद काही
तुझ्या न माझ्या बांधावरल्या जुन्या क्षणांची होते लाही
कोण जवळचे दूर कोणते काही आता समजत नाही
तुझ्या विना हे परके सारे माझे कुणि का वाटत नाही
आनंदाने सांज पुन्हा का हासत आहे गोठवुनी मज

कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा (तरही)

Submitted by इस्रो on 11 January, 2014 - 07:19

तनी मनी एकदा पुन्हा तशीच तू दरवळून जा
कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा

"निघून जा!" बोललो असे तुला जरी रागवून मी
जरा थबक अडखळून अन हळूच मग तू वळून जा

कधी असे पाहिजे तुला कधी तसे पाहिजे तुला
खरी खरी नेमकी मला सखे जरा तू कळून जा

तुझी नि माझी भले असो दिशा निराळी अता जरी
घराजवळ रोज माझिया उगाच तू घुटमळून जा

नकोस 'नाहिद' जळू असा भले कुणाचे बघून तू
दिव्यापरी कर प्रकाश अन खुशाल मग तू जळून जा

-नाहिद नालबंद
[९९२१ १०४ ६३०]

इशारे

Submitted by सारंग भणगे on 11 January, 2014 - 05:26

जयंत कुलकर्णी काकांच्या ‘होते जरी पहारे, पण पोचले इशारे’ ह्या गझलेची जमीन घेऊन मी गझल लिहायचा केलेला प्रयत्न!

आले मिळून सारे
माझे तुझे किनारे

शब्दात काय सांगू,
वाचा न हे शहारे.

तुज चुंबणे जणू कि,
ओठांवरी निखारे.

देतेस माझिया तू,
स्वप्नावरी पहारे.

त्या लाघवी स्वरांनी,
वाजे मनी नगारे.

आली उषा कपोली,
हेही पूरे इशारे.

तुज पाहतो बनूनी
मी सूर्य चंद्र तारे
--------------------
सारंग भणगे. (डिसेंबर २०१३)

तुटण्यासाठी जुळलो होतो

Submitted by जयदीप. on 11 January, 2014 - 05:08

तुटण्याआधी तुटलो होतो
तुटण्यासाठी जुळलो होतो

तितका दोषी नव्हतो नक्की
जितका दोषी ठरलो होतो

कुठला होतो कुठला झालो
भलती वळणे वळलो होतो

जिकडे तिकडे तुटक्या काचा
अगणित वेळा फुटलो होतो

लढता येते, लढलो नाही
लढण्याआधी हरलो होतो

हळवेपण कोडगे बनवणे जीवन माझे

Submitted by बेफ़िकीर on 10 January, 2014 - 12:41

हळवेपण कोडगे बनवणे जीवन माझे
माझ्यासोबत बहरत आहे मीलन माझे

कृष्णाने पुरुषाचा जन्म दिलेला आहे
वस्त्र कसे फेडेल कुणी दु:शासन माझे

तोच चेहरा दुर्दैवाने ठरला माझा
वेळोवेळी होई जो आच्छादन माझे

मिटरप्रमाणे सुखे कुठे देतात कधी ती
ही दु:खे वापरती निव्वळ वाहन माझे

ज्यांना क्षणभरचा सहवास हवासा होता
त्यांना जीवनभर पुरले आश्वासन माझे

तुला नकोसे व्हावे मी चोरीला जाणे
तुझ्या रोमरोमात वसावे चंदन माझे

तुझे खुळे आयुष्य निमुळते......प्रसरू शकते
विचारांतुनी बघ करुनी उच्चाटन माझे

रोज ठोकतो टाळा रात्री अस्तित्वाला
रोज सकाळी करतो मी उद्घाटन माझे

उरली नाही खंत अता

Submitted by जयदीप. on 10 January, 2014 - 10:38

उरली नाही खंत अता
दिसतो आहे अंत अता

तुटण्यालाही 'अर्थ' म्हणे!
भलता मी श्रीमंत अता

शिकला चोरी करत कुणी
बनला आहे संत अता

तुटलो होतो सांग कुठे
जुळलो तंतोतंत अता

नसणे ही असणेच इथे....
इथले निष्ठावंत अता

हात दे सोडून माझा

Submitted by जयदीप. on 9 January, 2014 - 13:55

मी तुझ्या स्वप्नात नाही
मी तुझ्या गणितात नाही

तू मला दे हाक आता
कोण मी? लक्षात नाही!

बरळतो वाट्टेल ते मी
मी तुझ्या धाकात नाही

मी उन्हाचा यार झालो
चांदणे नशिबात नाही

विश्व तू आहेस माझे
मी तुझ्या विश्वात नाही

हात दे सोडून माझा
मी कुठेही जात नाही

टाळ तू उल्लेख माझा
मी मलाही ज्ञात नाही

तो जरी माझ्यात आहे
मी अता माझ्यात नाही

नेहमी ऐकून घेतो
भांडणे रक्तात नाही

तू नको देऊस पैसे..
आजही मी खात नाही

खेळणे हातात आहे
जिंकणे हातात नाही

- जयदीप

ग्रेस यांस ....

Submitted by गौरव पांडे on 9 January, 2014 - 12:34

‘कावळे उडाले स्वामी..’ म्हणत ,
तू कवितेच्या अनवट वाटेवर केलेली शब्द्फुलाची उधळण
डोळ्यांत साठून राहिली आहे अजून...
तू दु:खाचा महाकवी असशीलही,
पण तुझ्या कवितेत आत्मशोधाचा , कारुण्याचा
रक्तगंधाचा दिवा जागत राहिलाय अजून....
‘चर्चबेल’च्या निनादात ‘ओल्या वेळूच्या बासरी’चे सूर शोधणारा
तू एकटाच असशील..
महाकवीची मिजास जपत,
उभ्या आयुष्याचं एकटेपण साजरं करणारा
तू एकटाच असशील..
प्रतिभेच्या पूजेसाठी लौकिकाचे अस्तर झुगारणारा
तू...
दुर्बोधतेच्या वाळवंटात कवितेची बेसरबिंदी लपवणारा
तू...
संध्याकाळच्या कातरवेळांत, उडून गेलेल्या कावळ्यांत,
रुणझुणत्या नुपूरांत, वाहून जाणाऱ्या पाण्यात,

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन