काव्यलेखन

मी केवळ माझ्यासाठी

Submitted by रसप on 18 November, 2014 - 23:40

मी दिले कधी जे काही
देण्याच्या आनंदाला भरभरून घेण्यासाठी
मी केवळ माझ्यासाठी

मी जेव्हा जेव्हा झिजलो
नवनिर्मित झालो कारण मी झिजलो घडण्यासाठी
मी केवळ माझ्यासाठी

दु:खाला सोसत होतो
ती आस सुखाची होती, मी रडलो हसण्यासाठी
मी केवळ माझ्यासाठी

मी माझा, केवळ माझा
ना संत कुणी ना साधू, मी झटतो जगण्यासाठी
मी केवळ माझ्यासाठी

मी केवळ माझ्यासाठी

....रसप....
१९ नोव्हेंबर २०१४
http://www.ranjeetparadkar.com/2014/11/blog-post.html

वळू आणि मी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 18 November, 2014 - 11:51

आज काल मला
फार हेवा वाटतो
तुझ्या हाताखाली
काम करणाऱ्या
त्या वळूचा..
काय नशीब
आहे लेकाचं
सारखा तुझ्याभवती
फिरत असतो
तसा मला त्याचा
फार रागही येतो
जेव्हा ,
तुझं लक्ष नसतांना
तुझ्यावरून तो
तशी नजर फिरवतो
तेव्हा..
तू म्हणतेस,
किती नजरांना
थोपवशील तू असा
अन मी पुन्हा
तपासून पाहू लागतो
माझी नजर
तुझ्यावरची

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मन आता

Submitted by जयदीप. on 18 November, 2014 - 11:37

मन आता हे कळल्यावरती उदास नाही..
रस्ता संपत आला आहे, प्रवास नाही!

फूल उमलले आहे..कुठले मनात त्याच्या
रंग जराही नाही...त्याला... सुवास नाही!

स्थान किती छोटेसे त्याला नभात आहे...
कळले सूर्यालाही आता..... मिजास नाही!

त्यांनी घोषित केले की तो पळून गेला! 
केला ज्यांनी थोडा सुद्धा तपास नाही

शहर तुझे हे बघता बघता कळून आले
बदल जरासा झाला आहे, विकास नाही

जयदीप

ये कॉफीला

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 18 November, 2014 - 10:25

येईल ती
येणार नाही
डोळ्यात वाट
अंथरलेली
खटखट कानी
धकधक मनी
प्रत्येक चाहूल
व्यर्थ गेली
कितीवेळा
मोबाईलवर
काढून नंबर
बंद केला
असेल का ती
येईल का ती
म्हणेल काय ती
प्रश्न पडला
आणि तरीही
फोन लावता
प्रश्न ऑफिसचा
काही काढला
ये कॉफीला
पण ओठातून
शब्द न आला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

म्हनुन आनंद आहे...

Submitted by सांज मन on 18 November, 2014 - 06:30

आज स्वताहुन दुर निघुन आलो
म्हनुन आनंद आहे
ज्या ह्रुदयात आपली जागाच नाही
ते ह्रुदय सोडुन आलो
म्हनुन आनंद आहे

तिथे गारवा असायचा फार
अन आपुलकी चा झरा सुकला पार
पण आज उन्हात सावली माझी आहे
म्हनुन आनंद आहे

आता चालताना हात बांधुन घेत असतो
जवळ कुणी येता अंग चोरुन घेत असतो
पण अंगात घायाळ मन जीवंत आहे
म्हनुन आनंद आहे

आज तिथे कुणी दुसरचं बसलय
मी पहिला तरी होतो काय
हे आज उलगलय
म्हनुन आनंद आहे
सांज मन

कातील जीवघेणा....

Submitted by भक्तिप्रणव on 17 November, 2014 - 02:08

कातील जीवघेणा ठरतो हा अबोला
जाणिव बोलण्याची जपतो हा अबोला

झडती मंडपात सनई चौघडे जिथे
अधीर पापण्यात लाजतो हा अबोला

चांदव्या रात्रीच्या रंगल्या मैफिलीत या
वीणेच्या झंकारात स्वरतो हा अबोला

सजली तलम फुलांनी काया ती मखमली
सुखासिन देहात रसरसतो हा अबोला

घेता निरोप प्रियेचा जावया दूर देशी
पाणावल्या पापणीत झरतो हा अबोला

काळीज कापणारी धार शब्दांना जरी
शब्द निशब्द होतो नि बोलतो हा अबोला

- संदीप मोघे

शब्दखुणा: 

आकांत ( भवानी वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 17 November, 2014 - 00:19

पेटली दिव्याची वात जाहली रात कधीची काळी
कानात गुंजते दूर अशी बेसूर कुणाची हाळी
पेरून थेंब डोळ्यात झोंबते रात रिकाम्या पोटी
हुंदके दाबुनी खोल जराशी ओल लागते ओठी...

झोपड्यात खुरटे श्वास खुळा विश्वास झोपला आहे
मोडक्या छतावर घास कुण्या देवास ठेवला आहे
आलीत वादळे जरी मनाने तरी दडपली भीती
घेऊन तनी आभाळ मनाचा जाळ पसरली माती....

सळसळ होता वार्‍यात थांबली रातकिड्यांची नांदी
ढेकळामधे रंगते कधी भंगते नभाची मेंदी
अंधार दाटला फ़ार वादळे गार धावली रानी
डोळ्यात असा आकांत नदीतुन शांत चालले पाणी.....

तळपेल सुर्य अंबरी कधी भूवरी तेज सांडावे
नाहीच मिळाला भाव रडीचे डाव तिथे मांडावे

डास चावता

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 16 November, 2014 - 12:28

मला चावून
रक्त पिवून
माझ्या हातून
मेला डास ||

जरी तो सुटला
चिंता मजला
देवून गेला
नको नको ती ||

टम्म फुगला
होता साला
नकळे आला
होता कुठूनी ||

हे रक्त माझे
का आणि कुणाचे
असतील कश्याचे
जंतू त्यात ||

रोग येतात
लोक मरतात
काय हातात
या लोकांच्या ||

मरणे आमुचे
जगणे आमुचे
चक्र जगाचे
राम भरोसे ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

"वृथा"

Submitted by अमेय२८०८०७ on 15 November, 2014 - 10:38

तृषार्त चातकापरी
तहान ही भिने उरी
कळे मनास वर्ज्य तू
तरी उगाच शिरशिरी!

लपून भेटणे असे
धुके पुढे खडे दिसे
चुकार पावले, खुळ्या
जिवास लागले पिसे

सदैव कैफ, स्वप्नही
विलुप्त भान प्रत्यही
जळे इथे दिव्यातळी
तशी नशा तुझ्यातही?

निसर्ग दान मागतो
अनाम बंध काचतो
सजून आस थांबते
रितेपणा दुखावतो

वृथा झुले झुलायचे
हसून शोक गायचे
समुद्र पापणीतला
पिऊन तृप्त व्हायचे

-- अमेय

वाळूचा कण

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 15 November, 2014 - 09:46

कधी वाटते
असेच एकट
जावे वनात
उगा भटकत

धुंद गारवा
देही भिनवत
सुनी कुठली
वाट तुडवत

धुके कोवळे
हळूच सारत
दवात ओल्या
जरा सावरत

मातीवर त्या
पाय टेकवत
जुने कुठले
नाते आठवत

वाळूवर अन
कुठल्या पहुडत
स्तब्ध निळाई
देही पांघरत

मागे दूरवर
मनास सोडत
वाळूचा कण
इवला होत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन