काव्यलेखन

भेट

Submitted by किरण कुमार on 6 March, 2023 - 11:12

(वृत्त - मालिनी , अक्षरगणवृत्त ,१५ अक्षरे , गण - न न म य य,
यती ८ व्या अक्षरावर )

सजल नयन झाले पाहताना तुला मी
अधर अधिर होते पत्कराया गुलामी
भरभर कर माझे चुंबताना जराशी
थरथर मन हे का खेटताना उराशी

प्रहर उलटला तो पांघरोनी नभाला
अवखळ रजनी ही येतसे स्वागताला
सहज हसत तेंव्हा तू मिठी मारताना
नितळ दगड झालो प्रेम हे पेलताना

बिलगुन बस आता मागणे फार नाही
वचन शपथ मिथ्या अंतरीचे बोल काही
शितल पवन येई प्रेम हे पेटवाया
सृजन समय आला आपुली भेट व्हाया

- किरण कुमार

अर्जुनविषाद ( वृत्त - मंदारमाला )

Submitted by किरण कुमार on 28 February, 2023 - 06:18

( वृत्त - मंदारमाला , अक्षरगणवृत्त लक्षण - त त त त त त त ग , अक्षरसंख्या २२ , यति १० व्या आणि १६ व्या अक्षारावर )

हातात गांडीव आहे तरी अर्जुनाच्या मनी दाट शंका किती
आज्ञा जरी देतसे श्रीहरी , संभ्रमी संभ्रमी कोणती ही भिती

हा कंप देहास का रे तुझ्या , नेमके दृष्य ते काय डोळा दिसे
योद्धा नसावा तुझ्यासारखा धोरणी या इथे काय झाले असे

तक्तास दावा कशाला करू, पार्थ आता रणी , सांगतो केशवा
हा कोणता धर्म आहे असा ,कोणते कर्म मी, हे करू माधवा

कुणासारखी तू कुणासारखी...

Submitted by deepak_pawar on 27 February, 2023 - 01:04

कुणासारखी तू, कुणासारखी
कधी वागते ना मनासारखी.

तू जळासारखी
तू पळासारखी
रंगीत गंधीत फुलासारखी.

तू परीसारखी
तू सरीसारखी
धुंदीत नेणाऱ्या तरीसारखी.

गोड स्वप्नापरी
कि तू स्वप्नपरी
निघून जाणाऱ्या पळासारखी.

पत्र

Submitted by अनन्त्_यात्री on 24 February, 2023 - 03:39

पत्र तुझे वाचत असताना
नटखट शब्दांपाशी अडतो
गाभुळलेल्या चिंचेचा मग
स्वाद जिभेवर उगा उतरतो

पत्र तुझे वाचत असताना
अडतो अनवट शब्दांपाशी
मग ओळींच्या अधली मधली
लड उलगडते जरा जराशी

तुझे पत्र वाचत असताना
अडतो शब्दांपाशी अवघड
शब्दांच्या घनदाटामध्ये
अर्थाची मग होते पडझड

हसता हसता या डोळ्यांतून का आले पाणी

Submitted by अतुल. on 23 February, 2023 - 03:27
नूतन

अभिनेत्री नूतन यांना जाऊन परवा (२१ फेब्रु) ३२ वर्षे झाली. त्यानिमित्ताने मनसोक्त गप्पा धाग्यावर रघु आचार्य यांची पोस्ट होती. ती वाचून ३२ वर्षापूर्वी रात्री रेडिओवर लावलेले त्यांचे गाणे "आज दिल पे कोई जोर चलता नही" आठवले. त्या गोष्टीला तब्बल बत्तीस वर्षे झाली यावर क्षणभर विश्वास बसला नाही.

शब्दखुणा: 

अंतरीची स्पंदने

Submitted by द्वैत on 22 February, 2023 - 10:16

सांजवेळी चालशी बांधून पायी पैंजणे
थांबशी तू त्या दिशेला जन्म घेई चांदणे

ही दंवानं भारलेली डोलती पानेफुले
सांगती स्पर्शून गेली ती बिलोरी कंकणे

रातराणीचा सुगंधी वाहतो वारा जिथे
पेरली होतीस का तू अंतरीची स्पंदने?

द्वैत

मायभाषा

Submitted by अरभाट on 20 February, 2023 - 23:41

(आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. त्यानिमित्ताने...)

माणसाला भाषा फुटते
मातीला कोंब फुटावा तशी
अनावर आवेगाने आपोआप
कधी हळुवार खुदकन
कधी सरसरत सटकन्
कडूगोड कानापुढून अन्
तिखट कानामागून येते
भाषा नक्की कुठे राहते?

माणसावर भाषा फुटते
जणू खडकावर समुद्री लाट
जणू वाटेवर फुटावी वाट
किंवा फुटावा चिन्हातून आवाज...
फुटत फुटत घट्ट होत जाय
भाषा नेमकी असते काय?

काळजाच्या या तळाशी राहशी तू.

Submitted by deepak_pawar on 20 February, 2023 - 10:31

काळजाच्या या तळाशी राहशी तू
सारखी स्वप्नात माझ्या नांदशी तू.

मागणे ते,"विसरुनी जावे मला तू!"
काय सांगू? प्राण माझा मागशी तू.

प्रेम ना माझे तुझ्यावर सांगताना
का गं आता? या टिपाना ढाळशी तू?

एवढी आता कशी ही बदलली तू
वेचुनी काटे, फुलांशी भांडशी तू.

आठवू मी का तुला? म्हणतेस आणिक
चांदण्या मोजीत का या जागशी तू.

पाचोळा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 18 February, 2023 - 02:11

कधी बहराचं अंग
आज झडून गेलंय
वा-याच्या झोतावर
तरी छान थिरकतयं

हिरवीगार सळसळ
उफानलं रानोमाळ
पेरापेरात दाटली
चांदण्यांची वर्दळ

अशी रंगली मैफील
सूर असे लागले
अन गात्रा गात्रात
गाणे हिरवे जागले

झुळूक थांबताना
भैरवी दाटे गळा
मिळाला मातीला
गात गात पाचोळा

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन