काव्यलेखन

सीझर

Submitted by अरिष्टनेमि on 15 August, 2020 - 16:19

सिंहासनात सीझरसुद्धा हसलाच असेल जरा
पाठीत जेंव्हा घुसला त्याच्या ब्रुट्सचा सुरा.
सवय फक्त व्हावी लागते.
मग सगळेच सुरे आपले
अन् सगळेच ब्रुट्स आपले होतात.
जीवनाच्या आसक्तीइतकाच
मृत्यूसुद्धा वाटतो छान.
चालतात मग सगळेच सुरे जरी
झाले आपल्याच उरात म्यान

शब्दखुणा: 

कुणी एवढाही

Submitted by अविनाश राजे on 15 August, 2020 - 04:30

कुणी एवढाही भोळा नसतो
कुणाचा सुखावर डोळा नसतो?

सोड रे चाकरी त्यांची दोस्ता
त्यांच्यात म्हणे कि पोळा नसतो

एखादीच कोणी अशी कि जिच्या
तोंडी पदराचा बोळा नसतो

कपडा इस्त्रीचा असला तर काय
जीव आत चोळामोळा नसतो?

कमीच पडते सारे तुला सदा
कधी मासा कधी तोळा नसतो

झाड एकाकी दारचे वठले
अंगणी हल्ली पाचोळा नसतो

मन म्हणते पळ पळ

Submitted by तो मी नव्हेच on 15 August, 2020 - 03:57

मन म्हणते पळ पळ
दाबून टाक जुनी कळ
थांबून करतोस माझा छळ
चल सरळ, तिथे वळ
दुसरी इच्छा कर जवळ
मन म्हणते पळ पळ

मन म्हणते पळ पळ
नवी इच्छा नवे फळ
तिथे सारे जग नितळ
तिथेही पायीं सळसळ
तिथेही फळावर गरळ
मन म्हणते पळ पळ

मन म्हणते पळ पळ
जहरी दंश पुन्हा कळ
वर्मी फटका अदृश्य वळ
जीर्ण श्वासास अश्रूंची खळ
गात्र म्हणते छळ छळ
मन म्हणते पळ पळ

विवेक म्हणे थोडं थांब
घे थोडा तू विराम
अशाच एका इच्छेपोटी
हरली सीता, शोधिती राम
माझ्या मना थोडं थांब
माझ्या मना थोडं थांब

शब्दखुणा: 

स्वतंत्र्याची पहाट--

Submitted by निशिकांत on 15 August, 2020 - 00:15

( स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. )

जोखड सुटले मानेवरचे
नवीन आला काळ असे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारतमाता मंद हसे

स्वातंत्र्याचे पाईक आम्ही
खूप झगडलो फिरंग्यासवे
संग्रामी स्वतःस झोकले
रक्त सांडले तिरंग्यासवे
खडतर सेवा फळास आली
चोहिकडे आनंद दिसे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारतमाता मंद हसे

मी भस्मसात झालो

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 14 August, 2020 - 07:39

सौंदर्य पाहुनिया, मी मंत्रमुग्ध झालो
ते अग्निकुंड होते, मी भस्मसात झालो

इश्कात मी बुडालो, बदनाम खूप झालो
बदनाम जाहलो पण, मी नामवंत झालो

जालिम तिच्या अदा अन् विभ्रम किती निराळे
घायाळ फक्त मी ना, सारेच लुब्ध झालो

अभिमान फेकुनी मी, आशाळभूत झालो
दारातला तिच्या मी, लाचार श्वान झालो

आयुष्य उधळले मी, सारे तिच्याच पायी
वणव्यात वासनेच्या, मी बेचिराख झालो

जयश्री अंबासकर

शब्दखुणा: 

कागदावर

Submitted by कविता क्षीरसागर on 14 August, 2020 - 04:38

स्वप्न ओले कागदावर
फार ओझे कागदावर

उत्तरे झाली शिळी पण
प्रश्न ताजे कागदावर

बोलण्यावर ना भरोसा
भिस्त आहे कागदावर

संपले केव्हाच नाते
फक्त उरले कागदावर

एवढे सोपे न असते
व्यक्त होणे कागदावर

ही कृपा त्या इश्वराची
उमटते जे कागदावर

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

उषःकाल

Submitted by दिलफ on 14 August, 2020 - 01:05

उषःकाल

चिरून छाती रात्रीची तांबडे फुटेल परत
दूर मग क्षितिजे उधळतील रंग गगनात

प्रभाव काळ्या निषेचा लुप्त होईल क्षणात
अनुपम सुंदर उषेचे रूप राहील मनात

परत एकदा आशेची हृदयात फुटेल पालवी
विश्वास होईल प्रबळ बदलेल सगळी स्थिती

मंतरलेल्या क्षणात तरी सावट कधी पडते
देखावा मोहक जरी वास्तव मग पछाडते

करते चिंता घर जादुचाच ठरेल प्रहर
वेगाने होईल क्षय उन्हे बोचतील परत

राहील तरी प्रतीक्षा उषेची मनातील सदैव
आशा राहील अतूट आणेल अभिप्रेत अर्थ

दिलीप फडके

शब्दखुणा: 

माझे काव्य!

Submitted by पराग र. लोणकर on 14 August, 2020 - 00:54

माझे काव्य

रुसलेल्या निद्रादेवीची आराधना
मी कधीच करत नाही
कारण या अवेळीच्या जागेपणीच
काव्य माझे जन्माला येत असते...

असह्य दु:खाने जगणे जेव्हा नकोसे होते
तेव्हाही मी जीव देत नाही
कारण हे नकोसे जगतानाच
काव्य माझे जन्माला येत असते...

आठवणी पुराण्या बेचैन करतात
चुकलेल्या निर्णयांना दोष देतात
तरीही मी मला शिक्षा देत नाही, कारण तेव्हाही,
काव्य माझे जन्माला येत असते...

असंख्य विचारांचा मनात गुंता
तो सोडवण्याचा माझा धंदा,
कारण हा गुंता सोडवतानाच
काव्य माझे जन्माला येत असते...

शब्दखुणा: 

बोलायचे आहे मला

Submitted by निशिकांत on 13 August, 2020 - 23:12

मुखवट्यांना निश्चये तोडायचे आहे मला
थांब ना! कांही तरी बोलायचे आहे मला

अल्प आयुष्यी तरी, कांही क्षणांसाठी सही
ब्रह्मकमळासारखे उमलायचे आहे मला

साचलेल्या परिमळाची काय ती उपयोगिता?
गंध पसरायास वारा व्हायचे आहे मला

स्वर्ग नरकाची कुणाला काळजी आहे इथे?
जे मना पटते तसे वागायचे आहे मला

मेणबत्त्या लावल्याने न्याय का मिळतो कधी?
रान उठवायास आक्रोशायचे आहे मला

धावलो मागे सुखाच्या, वश कधी ना जाहले
वेदनांच्या संगती नांदायचे आहे मला

स्वप्नपूर्तीचीच स्वप्ने दावली ज्यांनी जना
धींड त्यांची काढुनी, फिरवायचे आहे मला

अपलोड-वेणा

Submitted by अनन्त्_यात्री on 13 August, 2020 - 13:24

सिंग्युलॅरिटीच्या
या गोठल्या वर्तमानकाळात
संगणकेश्वराज्ञेनुसार
माझा सायबोर्गावतार
आटोपता घेण्यासाठी
अपलोडतोय महास्मृृतिकोषात
माझ्या जाणिवा, नेणिवा,
अन्
होलोग्राफिक अस्तित्वखुणा.

ई-जैवकचरा होऊन वितळेन मग
पुनर्घटनाच्या अखंड धगधगत्या यज्ञात

हजर होईल
माझा डिजिटलावतार
कधीही, कुठेही
संगणकेश्वराच्या मर्जीनुसार

सायबरअमरत्वाच्या
या दुर्धर अपलोड-वेणा
माझ्या एकेका सर्किटनसेतून
ठिबकतायत...

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन