काव्यलेखन

संक्रांत शुभेच्छा !

Submitted by अनुराधा म्हापणकर on 14 January, 2013 - 05:36

कशाला हवा तीळगूळ
अन् काटेरी तो हलवा
नात्यांतच पेरावा
दृढ भावनेचा गोडवा

गोड बोलायाला
संक्रांतीची नको सोबत
सदैव गोडच बोलेन
या तीळगूळाची शपथ

अनुराधा

अजून रेंगाळतो कुणाचा सुवास येथे!

Submitted by सतीश देवपूरकर on 14 January, 2013 - 04:36

गझल
अजून रेंगाळतो कुणाचा सुवास येथे!
पुन्हा पुन्हा की, मलाच होतात भास येथे!!

तसेच डोळे अजून ओले कसे फुलांचे?
अखेरचा घेतला कुणी काल श्वास येथे!

मधेच दाटून मेघ येती तुझ्या स्मृतींचे....
मधेच घोंगावतात वारे उदास येथे!

हरेक वेळेस देव धावून येत नाही;
नकोस ऐशी करू कधीही मिजास येथे!

लुटून सारा सुगंध ते जाहले फरारी....
कुणीच उरले न सोबतीला फुलास येथे!

कधीच ती काळजात माझ्या हळूच शिरली;
अजून सजवीत बैसलो मी घरास येथे!

घरून तिज यायला जरासा उशीर झाला....
करीत मी काय काय बसलो कयास येथे!

अम्हास आले न ओळखाया कधीच मोती!
उगाच मोती म्हणून टिपले दवास येथे!!

सृजन वंशी

Submitted by उमेश वैद्य on 14 January, 2013 - 04:28

सृजन वंशी

या तरुंची आर्त पाने
सांगती काही मनीचे
ऐक तू संवेदनेने
गूज त्यांच्या अंतरीचे

पालख्या रात्री निघाल्या
सृजन काळाच्या मुहुर्ती
निखंळणा-या चांदण्यांची
करत भावे मंगलार्ती

पाकळ्यांच्या होत दासी
विमल गंधाच्या महाली
वंश वेळू बासरीचा
सूर सांगे मज खुशाली

जन्मल्याची फिरत द्वाही
पोचते जेंव्हा नभाला
सूर्य ही वंदील आता
स्फूर्तिच्या या काजव्याला

आर्त पर्णे शांत होती
सृजन वेणा संगतीने
केशरी ग्रंथी पहाटे
फुटत ऊर्ध्वाच्या दिशेने

उ. म्. वैद्य 2013

शब्दखुणा: 

आज आलो नेमका शुद्धीत मी ..तरही-हझल

Submitted by वैवकु रीटर्न्स on 14 January, 2013 - 04:24

जी तुझी खाल्लीय थोबाडीत मी
आज आलो नेमका शुद्धीत मी

मूगदाळीचीच तू केलीस होय्
साबुदाणा शोधतोय् खिचडीत मी

ऐकवत नाही तुझे हे घोरणे
म्हणुन म्हणतो झोपुका गच्चीत मी

"एकटा बेडर" म्हणवतो या जगी
फक्त माझ्या बायकोला भीत मी

शेर माझे ठेवतो चखणा म्हणुन
अन् तिचे प्रतिसाद बस्तो पीत मी

पाठ मॅट्रिकचा मला अभ्यासक्रम्
असुनि नसल्यासारखा नववीत मी
_____________________________

तुझ्या मागुती धावत येते..

Submitted by प्राजु on 14 January, 2013 - 02:58

तुझ्या मागुती धावत येते दिशातुनी या दाही
अनाहूत मी वाहत जाते काळाच्याच प्रवाही
सोडुन माझ्या सावलीस मी तुझी सावली होते
तुझ्याचसाठी जगते, झिजते नकोस मागू ग्वाही

हरेक वळणावरती उरल्या सयी तुझ्या ठसठसती
कधी नशील्या वरुणीसम फ़ेसाळून फ़सफ़सती
कधी दिलासा देती अन कधी नयनी गर्दी होते
मनातल्याही मनात त्या मग करती दाटुन वस्ती..

आकाशाची किनार जेव्हा तांबुस होऊन जाते
ओघळणार्‍या काळोखाची दाट सायही जमते
सायीखाली मनास येते उकळी गतकाळाची
उतू जाते, सांडून जाते, चरचर करपून जाते

कसा राहसी माझ्याविण तू सांग मनापासुनी
कि तू पुसल्या खुणाच माझ्या काळावर घासुनी??

लिहायचे कुणासाठी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 14 January, 2013 - 01:31

लिहायचे कुणासाठी
लिहायचे कश्यासाठी
शेवाळल्या तळ्याकाठी
जड जड झाली दिठी
सुकलेल्या पानावरी
उदासली सांज सारी
मनातली अक्षरे ही
मनाआड गेली सारी
वेदनांत मरतांना
वेदनांचे गाणे झाले
ऐकतांना दूर कुठे
कुणा डोळी पाणी आले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

ती वेळ मुर्ख होती...

Submitted by मुग्धमानसी on 14 January, 2013 - 01:30

ती वेळ मुर्ख होती, अन् काळ धूर्त होता
सर्वस्व संपण्याचा, तोची मुहूर्त होता!

अस्वस्थ फार होते, माझ्या मनात गाणे
सूर धीट होते मात्र, स्वर आर्त आर्त होता!

झाली अवेळ सांज, आला तुझा निरोप
झाले अबोल तोही, माझाच स्वार्थ होता!

निष्क्रीय वल्गना ही, वाटेल तुज तरीही
प्रत्येक अक्षराला, माझ्याच अर्थ होता!

ठावूक ना तुलाही, उरले असे न काही
प्रत्येक दडवण्याचा, तो यत्न व्यर्थ होता!

डोळ्यात पूर आला, स्वर कंप कंप झाला
तु आठवात येणे, हा अन्वयार्थ होता!

शब्दखुणा: 

आठवणींची कचरापेटी भरून वाहत आहे

Submitted by बेफ़िकीर on 14 January, 2013 - 01:22

आठवणींची कचरापेटी भरून वाहत आहे
घंटागाडी येतच नाही मुळी पुनर्जन्माची
दुर्गंधाने त्रस्त होत मी काडी लावत आहे
आणि धुराला कविता माने गर्दी प्रकाशकांची

धूर कसा पकडीत यायचा धूर कुठेही उडतो
आठवणी जेव्हाच्या, जिथल्या होत्या, तेथे जातो
इकडे माझा काळ संपतो, मीही धूरच बनतो
धुरामधे मिसळून धूर मग मी सर्वत्रच उरतो

विरळ धुराला सामावाया कोणी अधीर मिळते
जेथे घनता जास्त धुराची तेथे शरीर मिळते
तेथे होते नवीन कचरापेटी नावावरती
'बेफिकीर'च्या मुक्त रुपाला फिरुनी फिकीर मिळते

असे मला क्षण दे की ज्यांची स्मृतीच राहत नाही
अशी वाट दे ज्यावर कोणी मागे पाहत नाही

कितीही म्हटलं तरी ………. !!

Submitted by अनुराधा म्हापणकर on 14 January, 2013 - 01:02

कितीही आणलं उसनं अवसान जरी
कितीही ठेवलं मनानं अवधान तरी

कितीही जपली डोळ्यात तेल घालून
समजूत आपली घातली बोलून बोलून

कितीही सांगितल्या धीराच्या चार गोष्टी
कितीही म्हटलं ठेव चहुवार चौकस दृष्टी

कितीही जरी दिले युक्त्यांचे कानमंत्र
स्वरक्षणाचे कितीही शिकवले जरी तंत्र

कितीही म्हटलं, घाबरायचं काही कारण नाही
कितीही म्हटलं, कोणाला जायचं शरण नाही

कितीही मी म्हटलं तरी…
नाक्यावरच्या वाण्याकडेही आता
तुला पाठवायची वाटते भीती
काय सांगू, तुला कसं सांगू पोरी
सभोवार लांडगे कोण आणि किती

कुठवर तुला मी असं पदराआड जपणार
कुठवर अशी माझ्यापाठी पोरी तू लपणार

खोल खोल मनामध्ये....

Submitted by बागेश्री on 14 January, 2013 - 00:14

धुंद आठवांची रात, जेव्हा डोळ्यात निजेल
खोल खोल मनामध्ये तूच तूच दाटशील

एक एक पान माझे, सुटे सुटे रे होईल
हर एक अक्षराला, गंध तुझाच असेल

चंद्र खिडकीशी पुन्हा, रेंगाळेल, खोळंबेल
गळालेले रितेपण मुठी भरून घेईल

तुझ्या सयी सार्‍या स्निग्ध, सभोताली फुलतील
तुझ्या गालातले हसू, माझ्या ओठी उमलेल

हूरहूर, रूखरूख, चित्त बेभान करेल
जरा शहाणे झालेले, मन पुन्हा वेडावेल

तेच रूप ह्या जगाचं, पण नवीन भासेल
तेच काजळ डोळ्याचं, पण नव्याने हसेल

खुळ्या मनाच्या भ्रमांची, भूल मलाही पडेल
तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील

कंच बहर फुलांचा, जरी उद्या ओसरेल
ताजा आठव तुझाच, माझ्या ओंजळी असेल

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन