काव्यलेखन

जहर जगण्याचे भिनाया लागले!

Submitted by सतीश देवपूरकर on 15 January, 2013 - 11:22

गझल
जहर जगण्याचे भिनाया लागले!
ओठ माझे गुणगुणाया लागले!!

जाहली खात्री वसंताची मला;
आज काटे दरवळाया लागले!

जाहले जागे जसे ज्वालामुखी....
वेगळे वारे वहाया लागले!

पार तू गेल्यावरी आता मला;
काय बोलावे....सुचाया लागले!

आरशांनी दाविल्या मज सुरकुत्या!
रक्त माझे सळसळाया लागले!!

सोसले भूकंप हृदयातील मी;
मन मला माझे कळाया लागले!

सद्गुरूंनी वाट दाखवली मला!
आणि जगणे झुळझुळाया लागले!

सर वळीवाची सुखाच्या संपली.....
ऊन्ह दु:खांचे पडाया लागले!

धूमकेतू प्रश्नचिन्हांचे पुन्हा;
अंतरंगी भिरभिराया लागले!

संयमाचा बांध एकांतामधे.....
भंगुनी डोळे झराया लागले!

कमतरता दिलदार स्वभावाची आहे

Submitted by बेफ़िकीर on 15 January, 2013 - 08:02

कमतरता दिलदार स्वभावाची आहे
जीवनशैली ताणतणावाची आहे

नवरा होता तेव्हा त्याची होती ती
आता पत्नी सार्‍या गावाची आहे

पेपरमध्ये फोटो आला की विखरू
हीच मागणी क्षुब्ध जमावाची आहे

भीती पाप्यालाही आहे लोकांची
फक्त गरज निर्भीड उठावाची आहे

बाप म्हणे पाहून बंगला पोराचा
ही प्रगती माझ्याच अभावाची आहे

मिळेल त्या हृदयात घेउनी ठेवावी
जागा सध्या चढत्या भावाची आहे

शाल नारळापलीकडे किंमत नाही
'बेफिकीर'ची कविता नावाची आहे

-'बेफिकीर'!

हौस

Submitted by समीर चव्हाण on 15 January, 2013 - 07:33

काहीतरी तुटल्याप्रमाणे वाटते
हातातुनी सुटल्याप्रमाणे वाटते

बोलायचे होते तुझ्याशी, राहिले
ही हौसही फिटल्याप्रमाणे वाटते

उरली न आता जिद्द जगण्याची, जणू
आयुष्य भरकटल्याप्रमाणे वाटते

लागे जिव्हारी बोल कोणाचा असा
काटा उरी तुटल्याप्रमाणे वाटते

आता स्मरेना नेमके माझे मला
काहीतरी म्हटल्याप्रमाणे वाटते

(हौस संग्रहातून)

शब्दखुणा: 

दुष्‍काळ

Submitted by मंदार खरे on 15 January, 2013 - 01:20

धरणं रिती झाली नदीत राहीली वाळु
शुष्क झाले अधर अश्रु पिऊन येथे

धरित्रीस पड्ल्या सर्व अंगावर खोल भेगा
सांगाडे फक्त उरले दुभत्या जनावरांचे येथे

बाया बापड्या चालती कोसे दूर अंतरे
गावच्या विहिरीने गाठलाय शिशिरातच तळ येथे

मातेवर आली कशी वेळ ही जिवघेणी
पोट्च्या पोरांस विकूनी भरतेय खळगी येथे

लागली झाडांना इथल्या पुरती आतुन वाळवी
यायचा फुलोरा ज्यांना ऋतुत सार्‍या येथे

राहिले झोपडीत इथल्या आशेवरी काही वृद्ध
सांभाळत गावाच्या उरलेल्या दुष्काळी खुणा येथे

शब्दखुणा: 

माझी कविता...

Submitted by सत्यजित on 14 January, 2013 - 23:21

माझी कविता
माझ्यावरती कधीच रुसत नाही
रुसते ती शब्दांवर
आणि उतरते कागदा वरती ... शब्दां शिवाय
फरक इतकाच की
ती तुम्हाला कळत नाही
पण माझी कविता माझ्यावर कधीच रुसत नाही...

-सत्यजित

निर्भया

Submitted by मंदार खरे on 14 January, 2013 - 07:51

"निर्भया"वर अत्यचार होताना नुसतं बघणं
देवा, कसं शोभतं तुला हे असं वागणं

ईतकी का ही निष्ठूर दिलीस शिक्षा तिज
केलस नरकाहूनी बत्तर तिच पृथ्विवरचं जिणं

असच रहाणार का चालु "निर्भयां"च आक्रंदण
अन डोळयावरती कातड ओढून तूझ झोपणं

बांधली मंदीरे सज्जनांनी पूजले तूज देवघरात
कसं जमलं देवळात त्यांच्याच असं उभं अलिप्त रहाणं

"द्रौपदी"ला वस्त्र पुरवणारा कुठे गेला तो हात
का निव्वळ होतं दंतकथांच मिथ्य पुराण?

"सत्यवाना"ला म्हणे होतेस दिले तू जिवनदान
का नाही फुंकलेस मग कुडीत त्या अबलेच्याही प्राण?

असेल खरा जर कणाकणात नृसिंहाचा तूझा अवतार
दुर्जनांचे पोट फाडूनी त्यांना वठणीवरती आण

शब्दखुणा: 

"बघ माझी आठवण येते का?..............कवि सौमित्र याच्या प्रेरणेने!!!

Submitted by मंदार खरे on 14 January, 2013 - 06:31

"Facebook" वर "Login" कर
बघ माझी आठवण येते का?

"Chat" वर "Click" कर
माझा "Green Dot" शोध
मी "Online" नसीनच
बघ माझी आठवण येते का?

"Message" टाकून ठेव
एखादा फोटो "Like" कर
किंवा अगदी वेगळी "Comment" टाक
बघ माझी आठवण येते का?

आता ""Facebook" बंद कर
"Book" मध्ये "face:" घाल
काही तरी वाचण्याचा प्रयत्‍न कर
झोप लागेल मन लागणार नाही
बघ माझी आठवण येते का?

mandar.khare@gmail.com

.© मंदार खरे!!!

शब्दखुणा: 

संक्रांत शुभेच्छा !

Submitted by अनुराधा म्हापणकर on 14 January, 2013 - 05:36

कशाला हवा तीळगूळ
अन् काटेरी तो हलवा
नात्यांतच पेरावा
दृढ भावनेचा गोडवा

गोड बोलायाला
संक्रांतीची नको सोबत
सदैव गोडच बोलेन
या तीळगूळाची शपथ

अनुराधा

अजून रेंगाळतो कुणाचा सुवास येथे!

Submitted by सतीश देवपूरकर on 14 January, 2013 - 04:36

गझल
अजून रेंगाळतो कुणाचा सुवास येथे!
पुन्हा पुन्हा की, मलाच होतात भास येथे!!

तसेच डोळे अजून ओले कसे फुलांचे?
अखेरचा घेतला कुणी काल श्वास येथे!

मधेच दाटून मेघ येती तुझ्या स्मृतींचे....
मधेच घोंगावतात वारे उदास येथे!

हरेक वेळेस देव धावून येत नाही;
नकोस ऐशी करू कधीही मिजास येथे!

लुटून सारा सुगंध ते जाहले फरारी....
कुणीच उरले न सोबतीला फुलास येथे!

कधीच ती काळजात माझ्या हळूच शिरली;
अजून सजवीत बैसलो मी घरास येथे!

घरून तिज यायला जरासा उशीर झाला....
करीत मी काय काय बसलो कयास येथे!

अम्हास आले न ओळखाया कधीच मोती!
उगाच मोती म्हणून टिपले दवास येथे!!

सृजन वंशी

Submitted by उमेश वैद्य on 14 January, 2013 - 04:28

सृजन वंशी

या तरुंची आर्त पाने
सांगती काही मनीचे
ऐक तू संवेदनेने
गूज त्यांच्या अंतरीचे

पालख्या रात्री निघाल्या
सृजन काळाच्या मुहुर्ती
निखंळणा-या चांदण्यांची
करत भावे मंगलार्ती

पाकळ्यांच्या होत दासी
विमल गंधाच्या महाली
वंश वेळू बासरीचा
सूर सांगे मज खुशाली

जन्मल्याची फिरत द्वाही
पोचते जेंव्हा नभाला
सूर्य ही वंदील आता
स्फूर्तिच्या या काजव्याला

आर्त पर्णे शांत होती
सृजन वेणा संगतीने
केशरी ग्रंथी पहाटे
फुटत ऊर्ध्वाच्या दिशेने

उ. म्. वैद्य 2013

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन