काव्यलेखन

आयुष्याच्या वाटेवर....

Submitted by Sangeeta Kulkarni on 22 February, 2013 - 12:50

आयुष्याच्या वाटेवर भेटलास तु
निर्व्याज प्रेमाला साथ दिलीस तु II

तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
हा एकच ध्यास असेल II

तुझी खुप भरभराट होवो
ही एकच आस असेल II

तुझे दु:ख मला मिळो
सर्व सुखे तुला मिळोत II

परमेश्वराकडे ही एकच प्रार्थना करीन
निरंतर तुझ्यावर प्रेम करत राहीन II

फक्त तुझीच होउन जगत राहीन
फक्त तुझीच होउन जगत राहीन II

शब्दखुणा: 

कवीचे प्राक्तन

Submitted by उमेश वैद्य on 22 February, 2013 - 10:36

कवीचे प्राक्तन

तापले वास्तव खाली
पाउल मनाचे जाळी
कोरड्या ओठांवरती
चार कवितेच्या ओळी
मी कवी!

'भ्रमिष्ट' म्हणती जरा ते
भोवती कुजबुज चाले
काहीच त्याचे नाही
कवितेचे धुंद प्याले
मी कवी!

शिशिराचे गळता पान
जीवघेणी ह्रुदयी कळ
कविताच घेउन येते
पुष्पांची वसंत सळसळ
मी कवी!

अर्थ जहरी फुटताना
शब्दांची चिरते जीभ
ओळींच्या अपूर्णतेची
चालते अखंड तगमग
मी कवी!

वेचताना शब्दांचे
विखुरले कंच टपोरे
हात जोडूनच येती
काव्याची रांगत पोरे
मी कवी!

शब्दखुणा: 

निवडक शेर

Submitted by सतीश देवपूरकर on 22 February, 2013 - 10:34

निवडक शेर
अनाहताचा नाद घालतो एकसारखी साद मला!
सर्वांगाचे कान करोनी, देऊ दे तिज दाद मला!!
.......................................................................
निळ्या नभाच्या निळेपणाची ओढ लागली डोळ्यांना.....
अथांगतेचा जणू जाहला स्पर्श माझिया पंखांना!
.........................................................................
प्रकाशात नखशिखांत भिजता प्रकाश झालो मीच स्वत:!
क्षितिजांच्या पाठीस धावता ,मीच जाहलो क्षितिज स्वत:!!
.......................................................................
वा-याचा घेवून वेग मी लकेर झालो पाण्याची!

"अंश तुझा"

Submitted by अमेय२८०८०७ on 22 February, 2013 - 10:24

बीजांकुरी तू सत्व निर्मिले माझ्या सृजनासाठी
संस्कारांचे तत्व शिंपिले भुईत रुजण्यासाठी

आज उभा मी उंच जाहलो छायेपासून दूर
परि पानांमधुनी घुमती जुने हवेसे सूर

जरी वेगळी ओळख माझी असे तुझा मी अंश
तसाच वाढे माझ्यामधुनी पुढे आपुला वंश

तान्हे येतील अंकुर पुन्हा तरु-तनाच्या कुक्षी
ज्योत तेजवील नवारंभी गुण- सूत्रांची नक्षी

बंध लयाचा सजीव लक्षण, ना वयाचा दोष
सृष्टी करते जनन- मरण, दोहोंचा जल्लोष

कृतार्थतेने जाशील जेव्हा आलिंगण्या धरती
तुझे येतील पक्षी नांदण्या माझ्या शाखांवरती

विरह - तान्हूल्याचा

Submitted by देवू on 22 February, 2013 - 06:56

कंठ दाटून आला,
मन ही माझे भरुन आले,
पाऊले माझी जड झाली,
विरहाची ती.... वेळ जवळ आली

हुंकारानी एका तुझ्या
हॄद्याला माझ्या हात घातला
"नको जाऊ तू आई अशी लांब
तान्हुलगं मी तुझं.... तुझाच सहवास बघं हवा मला"

माझ्या डोळ्यांनी तुझ्यासाठी
खुप स्वप्ने अशी बघितलीत बाळा..
राहुदेत कर्तव्यात उभी मला..
सारुदे हा प्रितिचा भाव भोळा...

संध्याकाळ झाली... पाखरांनीही वाट धरली
ओढीची तुझ्या आस लागली...
..... दिसले माझे पाखरुं दारी
भरली प्रेमाने माझी झोळी

शब्दखुणा: 

जमेल का तुला...

Submitted by हर्षल_चव्हाण on 22 February, 2013 - 03:44

ह्या गझलेचा तिसरा शेर 'आनंदयात्री'च्या सल्ल्याने वृत्त सांभाळून, बदलून लिहिला, त्यामुळे त्याचे धन्यवाद Happy

निघायचे असेल ना? जपून जा,
घरात काय राहिले, बघून जा...

सुने तुझ्याविना असेल देवघर,
(सुगंधरूप त्यात तू भरून जा...)

छतास उंच राहिले करायचे,
इथून तू हळूच अन् लवून जा...

सुकेल बाग ही तुझ्या विना, जरा;
फुलांस स्पर्श एकदा करून जा...

जमेल का तुला फिरून पाहणे?
जमेल त्याक्षणी पुन्हा वळून जा...

पुरे मनात आसवांस ढाळणे,
इथेच यायचेय ना? हसून जा...
----------------------------------------------------------------
हर्षल (२२/२/१३ - सकाळी १०.३५)

शब्दखुणा: 

इथे वैशाख आला ना, शिशिरही गोठवत नाही

Submitted by प्राजु on 21 February, 2013 - 23:44

अताशा जीवनी माझ्या नवे काही घडत नाही
नवेसे स्वप्नंही आता मनाला भाळवत नाही

नव्या वाटा नको आता नवे काही नको वाटे
अता पाऊलही माझे नव्या साठी अडत नाही

तिथे श्रावण बरसलेला, कधी गोष्टी वसंताच्या
इथे वैशाख आला ना, शिशिरही गोठवत नाही

कुणी यावे, कुणी जावे.. सुतक नाही न सोयरही
पुरणपोळी नको वाटे, नि भाकर मोडवत नाही

मनाची बागही माझ्या जशी आहे तशी आहे
कुणीही नासवत नाही, कुणीही बागडत नाही

कशाचे दु:ख वाटावे, कशाने सौख्य नांदावे
असे काही कधी घडले, मला ते आठवत नाही

माणूस

Submitted by अज्ञात on 21 February, 2013 - 23:38

खगांचे थवे पाखरे ही निरागस
काय कसे रज कण संचिताचे
थकेनात पंख खळे ना भरारी
रिते मोकळे सोस निळ्या अंबराचे

न हेवे न दावे न साठे कशाचे
हवेसे नितळ पारदर्शी उसासे
ढळे दिवस कोरा रात्र आणि काळी
जगाची तमा ना असे खेळ सारे

माणूस मी भूक व्याधी उपाधी
मुळी मूढ ईर्षा अंध अंग जाळी
परा बुद्धि-मेधा असूनी उपाशी
अवकाळ मोठा सदा मोह पाशी

.........................अज्ञात

सहसा कुणास आम्ही काळीज देत नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 21 February, 2013 - 11:28

गझल
सहसा कुणास आम्ही काळीज देत नाही!
अगदी दिलेच तर ते मागून घेत नाही!!

कैफात कोण नाही? मज सांग तू कसाई!
कळते मला, अरे मी, इतका नशेत नाही!!

गेली गळून काही पाने तरी अम्हाला;
निष्पर्ण बनविण्याची ताकद हवेत नाही!

दिसतील फक्त काही तुज बेचिराख स्वप्ने.....
याहून अन्य काही माझ्या चितेत नाही!

गेला जळून अवघा, तो कापराप्रमाणे....
ज्याला तुम्ही हुडकता, तो ह्या सभेत नाही!

माझे नशीब आहे अगदी तुझ्याप्रमाणे!
मीही मजेत नाही, तूही मजेत नाही!!

माळून चांदणे ती, भेटावयास येते!
आहे तिच्यात काही, जे पौर्णिमेत नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर

साग्रसंगीत

Submitted by जयनीत on 21 February, 2013 - 09:55

' हॅप्पी न्यू इयर ' फार जल्लोषात म्हटले
आयुष्य सुरु झाले पुन्हा जुन्या क्रमाने

' हॅपी बर्थ डे ' मित्रांनी सुरात म्हटले
वागू लागले नंतर नेहमीच्या थंडपणाने

अंतरपाटा आड खूप आनंदी होती दोघे
सुप्तपणे सुरु झाले मग पति पत्नीचे गा-हाणे

पुत्र मित्र आप्तांची शोकसभा साजरी झाली
झाले सैल मोकळे श्वास स्मशानातच क्षणभराने

झाला अखेरचा शृंगार फोटोस लागला हार
संपले आयुष्य साग्रसंगीत परंपरे प्रमाणे

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन