लॅच उघडुनी घरामधे

लॅच उघडुनी घरामधे

Submitted by बेफ़िकीर on 23 August, 2018 - 07:32

लॅच उघडुनी घरामधे
==========

लॅच उघडुनी घरामधे
बाबा येऊ शकतीलच
आईला ना जमायचे
शरीर नाही आईला

रक्ताला सुचले तेव्हा
निळीच होती भरली मी
लाल अक्षरे का आली
आशय कळला शाईला?

कोणी कूर्मगती घेते
गोगलगाय कुणी बनते
माझ्यावीण कुणी नाही
साऱ्या जगात घाईला

तुला मिळो आराम म्हणुन
जागत बसली केव्हाची
अंगाई ऐकव आता
दमलेल्या अंगाईला

लिंगाइतका जीव तुझा
वेळेवर मोठा होतो
जीव कसा प्रसवावा हे
विचार एका बाईला

Subscribe to RSS - लॅच उघडुनी घरामधे