कविता - गझल

तिच्यासारखा दिसतो पाउस

Submitted by -शाम on 13 July, 2018 - 05:26

खूप लावतो वाट पहाया अखेरीस पण वळतो
तिच्यासारखा दिसतो पाउस छळतो मग कोसळतो

आधी आधी छान वाटते झुळझुळणारे पाणी
अपुली होडी बुडली की मग स्वभाव त्याचा कळतो

निर्मळतेला चिखल बनवते या दुनियेची माती
सहज वाटते तरिही पाउस सहज कुठे दरवळतो

हिला भेटतो तिला भेटतो तिला गाठुनी भिजवी
कोण म्हणाले पाउस केवळ धरतीवर पाघळतो

तो गेल्यावर तिने मनाला बंध घातला मोठा
तिला बिलगतो जेंव्हा पाउस चिरा चिरा ढासळतो

तुम्हीच सांगा आता त्याला कुठली छत्री द्यावी
डोळ्यांमधला पाउस ज्याच्या गालावर ओघळतो

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कविता - गझल