बालमजूरी

बुद्धीचा कोंडमारा

Submitted by र।हुल on 15 September, 2017 - 15:15

जगण्याच्या लढाईत तुटला
कधी लुकलुकलेला तारा
पोटापाण्यासाठी झाला
माझ्या बुद्धीचा कोंडमारा ॥धृ॥

पाठीवरले ओझे सरस्वतीचे
खुंटीवरती जाऊनी विराजले
नाजूक कोवळे हात माझे
लोखंड उचलूनी जडावले ॥१॥

स्वप्नं निरागस आशेची
डोळ्यांदेखत कुस्करली
गालांवरती ओघळणारी
आसवं सुकूनी स्थिरावली ॥२॥

हात धरूनी चालणारे
जिवलग सोबती दुरावले
बोल लावती जळणारे
आप्त स्वकीय निर्ढावले ॥३॥

दु:खावेगाला भरती येई
दिसता शाळेत जाणारे
अस्वस्थ मनी हैराण होई
विचार येती 'पोखरणारे' ॥४॥

Subscribe to RSS - बालमजूरी