छंदोबद्ध कविता

बारव

Submitted by संतोष वाटपाडे on 21 February, 2017 - 03:13

काल बारवाच्या काठी
धुणं धुवायाला आली
भर दुपारी उन्हात
जुन्या चिंचेची सावली...

तिच्या पोपटी बांगड्या
हेल खावून वाजल्या
खोप्यातल्या सुगरणी
खोपा सोडुन धावल्या...

बारवाच्या पोटावर
वड पिंपळाची पोरं
आली बघाया सावली
काही पकडून दोरं..

पाण्यामधे चमकला
निळ्या आभाळाचा दिवा
सावलीला डिवचून
गेला पाखरांचा थवा...

दगडाच्या थारोळ्यात
सारी कापडं धुतली
बारवाच्या गारव्याने
वेडी सावली भिजली..

Subscribe to RSS - छंदोबद्ध कविता