वैभव फाटक; मराठी गझल;पुन्हा तू भेटण्याचा वार ठरलेला

पुन्हा तू भेटण्याचा वार ठरलेला

Submitted by वैभव फाटक on 17 May, 2016 - 06:37

पुन्हा तू भेटण्याचा वार ठरलेला
पुन्हा हृदयात हाहाकार ठरलेला

करावी तू स्तुती माझी, तुझी मीही
तुझ्यामाझ्यात हा व्यवहार ठरलेला

किती साच्यात आयुष्यास ओतावे
तरी घेईच ते आकार ठरलेला

निघाला दूर लाचारी कराया तो
बिचारा एकटा लाचार ठरलेला

दिसू शकणार नाही सर्व डोळ्यांनी
दिव्याखाली सुधा अंधार ठरलेला

कितीवेळा पुढे मी ठेवले पेढे
विसरला देव भ्रष्टाचार ठरलेला

वैभव फाटक (१६-०५-२०१६)

Subscribe to RSS - वैभव फाटक; मराठी गझल;पुन्हा तू भेटण्याचा वार ठरलेला