निर्झर

निर्झर

Submitted by दत्तात्रय साळुंके on 7 November, 2019 - 01:57

निर्झर
काळोखाची दुलई ओढून
झोपी गेला रात्री डोंगर
कलकल परि रव करीतो
उरात लपविलेला निर्झर

दरीदरीतून नाद घुमत
ऐकू येते‌ मधुर संगीत
निजले प्राणी अन पक्षीही
गातो निर्झर अंगाई गीत

जरी झोपले जग भोतीचे
निर्झर पहारा देत राही
मुखप्रक्षालन फेसाळ करुनी
रोज सकाळी ताजा होई

सुर्यदेवा तो करीतो नमन
सातरंगांचे लावून निरांजन
जागली झाडे, पक्षी, प्राणी
गातो डोंगर ईश स्तवन

पुजाअर्चा सरता निर्झर
भक्तीभावाने पुढे चालला
काठावरच्या तरु लतांना
फळाफुलांचा बहर आला

शब्दखुणा: 

निर्झर

Submitted by पाषाणभेद on 15 July, 2019 - 11:27


निर्झर

निर्झर होता एक बारीकसा; हिरव्या डोंगरातून वाहतसा
असुनी तो लहान छोटा; ठावूक नव्हत्या पुढल्या वाटा ||

धरतीवरच्या वर्षावाने; जीवन त्याचे सुरू जहाले
धरणी जाहली माता ती; अल्लड खट्याळ उदकाची ||

नित नवीन भरून जलाने; ठावूक त्याला भरभरून वाहणे
चंचल उत्कट उल्हासीत पाणी; घेवूनी जायी दो काठांनी ||

पुढेच मिळाली सरिता त्याला; सवे वाहण्या पुसे खळाळा
विचारही न करता तो मिळाला; निर्मळ नदीत एकरूप जाहला ||

- पाषाणभेद
१५/०७/२०१९

शब्दखुणा: 

एका रातीची ओढ

Submitted by भास्कराचार्य on 17 February, 2016 - 21:08

चांदण्याची माझी ओढ जुनीच आहे
सुगंधाची माझी खोड जुनीच आहे
फुलावे प्रीतिलतेचे फूल अन् अनुरागाला बहर यावा
जावी रात तुझ्याबरोबर अन् पहाटेचा प्रहर यावा

निराकाराची माझी ओढ जुनीच आहे
तन्मयतेची माझी खोड जुनीच आहे
वाजावी निर्झर-बासरी अन् शृंगाराला कहर यावा
जावे रान थरारून अन् आनंद झुळझुळावा

Subscribe to RSS - निर्झर