पल्ली

देव

Submitted by पल्ली on 15 July, 2016 - 04:02

मूर्तीत देव पहाणारे,
भंगलेल्या मूर्तीतही देव पहाणारे,
मंदिरात येऊन सुद्धा भरकटलेले,
मंदिराबाहेर असूनही स्थिर असलेले,
किती सारे भक्त आहेत इथे,
पण देव कुठे आहे?
द सुप्रीम पॉवर.
आहे, देव आहे,
त्याला कुठल्या एका रुपात
रंगात आकारांत बांधायचं नाही,
तो तुझ्यात आहे, माझ्यात आहे,
साऱ्यांत आहे, ताऱ्यात आहे,
वाऱ्यात आहे, हीऱ्यात आहे,
जाणला तर देव नाहीतर...
नुसतंच कर्म कांडाचं पेव....

शब्दखुणा: 

दिवसाशी ओळ्ख

Submitted by पल्ली on 15 July, 2016 - 04:01

चार चौघांसारखा दिसणारा
एक साधा सुधा सरळ दिवस..
कोरे करकरीत कपडे घालून आला,
मन्द सुगंध मानेजवळ शिंपडलेला...
काय काय स्वप्नं पडली रात्री?
असं विचारुन माझ्या रूटीनवर
हक्कानं स्थिरावला.
कालच्या दिवसासारखाच्
हाही माझाच आहे,
असं समजून मीही त्याला बसू दिला.
कालच्या दिवसाची जाताना जी तऱ्हा झाली,
ती तेवढी लपवून ठेवली समंजसपणानं...
कालच्या दिवसाची फुलं हरवली होती,
शर्ट फाटून गेला होता कुंपणात अडकून..
डोळे धुळीने भरले होते,
उपाशीपोटीच गेला बिचारा...
माझाच असला तरी
काही करू नाही शकले त्याच्यासाठी,
आता आज हां आलाय...
सळसळत्या उत्साहात.
ह्याची तरी आज नीट ओळख करून घेऊ,

शब्दखुणा: 

श्रीमंत.....

Submitted by पल्ली on 15 July, 2016 - 03:57

खुप सारे श्रीमंत भेटले आज
नेहमीच्या चालण्याच्या रस्त्यावर.. ,
तरुणाईनं उधाणलेली बोगन वेल,
झाडाच्या सोनेरी आठवणी,
बदामाची रक्तवर्णी पानं,
कालचा सुगंधी अनुभव
मिटून घेत असलेली रातराणी,
मोहरु पाहत असलेल्या शुभ्र कळ्या,
असंख्य क्षणांनी सुरकुत्यांचं
शहर वसलेले एक आजोबा,
त्यांच्या सोबत त्याना गाठू पहाणारी
त्यांची बायको नावाची प्रेयसी...
उन्हाचं सांडलेलं केशर...
केयर टेकरला फिरायला नेणारा
हस्की देखणा कुत्रा 'मुकी'
दिवसभर बॉसचं ऐकणारा
आत्ता बायकोला ऐकवणारा एक,
"अगं काय सांगू तुला!"
असं म्हणून बरंच काही मैत्रिणीला सांगू पहाणारी
एक कथा भंडार,
काही विसावु पहात असलेल्या सावल्या....

शब्दखुणा: 

हायकु

Submitted by पल्ली on 15 July, 2016 - 03:55

हायकु

मरणानंतर जे जळते
ते निव्वळ सरण
इथे चटके नाहीत

रंग लाल गालावर
श्वास श्वास तालावर
कुठला ऋतु आला वर?

बोलावंसं वाटुनही
शब्द जुळत नाहीत,
नुसतं घुटमळणं अर्थापाशी...

कुणीच् ऐकत नसलं
तरी आपण बोलत रहावं,
मौनाच्या कोलाहलात

खोल तळं पाणी निळं
हिरवी झाडी गार सावली
फार गर्दी झाली

जुनाट शहर घामट चेहरे
तापलेली घरं आणि वारे
दिलासा एवढाच की अजुन गारवा आहे....

भरलेलं ओलं आभाळ
बरसणार बहुतेक
खिड़क्या कुणी बंद केल्या?

शब्दखुणा: 

संवेदनाशील झाड

Submitted by पल्ली on 15 July, 2016 - 03:50

इतकं कसं हे झाड़ संवेदनाशील?
आजुबाजुला तापलेलं असताना
हे मात्र गार सावली करुन
वाट बघतंय पांथस्थाची,
गुलाबी मखमली फुलं
अशी अंगा खांद्यावर फुलवून
लाजत बिचकत उभंय,,,
त्यात मंद गंधाच्या हजारो कुपी,,
कहरच झाला!
पण, चुकलंच ज़रा झाडाचं...
इतक्या वैयक्तिक गुलाबी आठवणी
अश्या रस्त्यावर नको होत्या पसरायला,
येणारा जाणारा विचार न करता
निर्दयी पणानं त्या एकेका
सुकत चाललेल्या आठवणीला
पायदळी तुडवून जातोय....
मन मोकळं असं कुणाजवळही करू नये,
एवढा व्यवहार नाही कळला तुला?
ठेवल्या असत्यास त्या आठवणी जवळ,
सुकल्या असत्या, तरल झाल्या असत्या,
दूर उडाल्या असत्या, रुजल्या असत्या.
चुकलंच तुझं.
असो,

शब्दखुणा: 

लाजरी सखी

Submitted by पल्ली on 19 January, 2015 - 07:23

लाजून झाकते ती
झाकुन लाजताना
दूर दूर का करते राणी
तुझेच आहे म्हणताना...
गळून पडावी लाज सखीची
प्राजक्ताच्या फुलांपरी
दरवळावे माझे अंगण
अन उरावी नशा ऊरी...
सलज्ज धरती भिजवी श्रावण
झरझर झरत्या धारांनी
तसाच अवखळ मीही झालो
होशिल माझी हरित धरी?...
वाटे मजला हवेहवेसे
नकारातले अर्थ खुळे
नाही नाही म्हणताना
मिठीत अलगद सखी शिरे.....

शब्दखुणा: 

प्रश्नोत्तर

Submitted by पल्ली on 11 January, 2015 - 03:25

अपूर्णतेच्या प्रश्न चिन्हात
आयुष्याचं विधान अडकुन बसतं..
आधीच्या सर्व आशयाचा
गर्भार्थ ढवळुन निघतो..
अनिश्चितता, अज्ञान, निरागसता
यातुन अतार्किक संदर्भ लावण्याचं
मन प्रयत्न करतं..
वेगवेगळे दाखले आजमावुन
उत्तर कुठे सापडेल म्हणुन सगळे
विश्वकोश पालथे घालतं...

शब्दखुणा: 

मन बाळ

Submitted by पल्ली on 11 January, 2015 - 03:20

संध्याकाळ झाली
कि मन उदास होतं
हिरमुसून बिचारं
कोपर्‍यात बसतं...
किती खुणावलं
किती दाखवल्या आशा
निराशेच्या अंधारात
खुळं हरवुन बसतं..
दिवे लावले तर
डोळे मिचकावतं
उजेड सलतोय
म्हणुन मिटून घेतं..
संध्याकाळचा वारा
ओळखीच्या धून तारा
थोडंसं हसून
मान वळवुन बघतं..
आता सूर्य लपेल
सारं अंधारून जाईल
तारे अजून यायचेत
बिचारं घाबरुन जातं...
एक चांदणी येते
चंद्राची चाहूल देते
मन आनंद्न
कोपर्‍यातुन उठतं
घरभर उगाच
छमछम नाचून घेतं...

शब्दखुणा: 

मनातले निसर्गदृश्य

Submitted by पल्ली on 11 January, 2015 - 02:45

आज वेगळे वेगळे
माझे आकाश आकाश
झाला निळा जांभळा
माझ्या मनात प्रकाश..
गेले हाकारुन कोणी
लावुनिया हूरहूर
हात हलविते कोणी
ओळखीचे पण दूर..
माझ्या निळ्याश्या आकाशी
शुभ्र पांढरा तो पक्षी
सापडेना बिचार्‍याला
त्याचे ओळखीचे झाड..
तपस्वी व्रतस्थ
एक निळासा पहाड
वाट हरवली कुठे
गाव राहिला पल्याड...
माझ्या निळ्या आभाळात
सूर्य जांभळा जांभळा
निजवुन किरणांना
हळु अस्ताला चालला......

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - पल्ली