वृत्तबद्ध कविता

अष्टमीचा चंद्र

Submitted by संतोष वाटपाडे on 29 January, 2016 - 01:49

अष्टमीचा चंद्र अर्धा रात्र अर्धी ..जवळ ये ना
गंध तुझिया कस्तुरीचा सोसवेना.. सोसवेना..

हा धुक्याचा पदर ओला रेशमी सरकून गेला
केतकीला भार चंदेरी मण्यांचा तोलवेना..

लाजुनी बघतेस हसुनी दूर बसुनी रात्र असुनी
का तुझ्या डोळ्यात तृष्णा, ओढ स्पर्शांची दिसेना..

चंद्र खिडकीतून डोकावेल आधी ओढ पडदा
चांदणे निजले मला छळतो दुरावा जीवघेणा..

प्रहर ओलांडून गेला चंद्रही बहरात आला
सागरी उन्मत्त लाटांना किनारा सापडेना...

रान ओले पान ओले चिंब झाल्या पायवाटा
पाय उचलावा कसा मी धुंद आहे.. चालवेना...

अष्टमीचा चंद्र अर्धा रात्र अर्धी जवळ ये ना
गंध तुझिया कस्तुरीचा सोसवेना सोसवेना..

सुगंधी

Submitted by संतोष वाटपाडे on 9 December, 2015 - 02:53

सुगंधीत फाया नशा केवड्याची
कळी मोगर्‍याची असावीस तू
नवी कोवळी पालवी पिंपळाची
जणू हंसिणीचे मऊ पीस तू..

स्पृहा जाणिवा सावली स्पर्श माया
नभी थांबला सावळा मेघ तू
धरा अंबराचा जिथे वेध घेते
क्षितिज व्यापुनी तांबडी रेघ तू..

धुके ऊन वारा सरी पावसाच्या
मऊशार मातीतला गंध तू
पुन्हा सांजवेळी मिठी मारणारी
जशी पश्चिमेची हवा मंद तू..

कधी काढला देह माझ्यातुनी मी
उरावीस बाकी असा प्राण तू
प्रवासात चालायला जीवनाच्या
असावीस पायातले त्राण तू..

एक अशीच सायंकाळ....

Submitted by संतोष वाटपाडे on 20 May, 2015 - 07:45

सायंकाळी लोळ धुळीचे क्षितिजावर तांबडे उसळले,
कैक खुरांनी रान डोंगरामधले अगदी पुर्ण ढवळले,
बघता बघता दिसू लागली गुरे वासरे पळताना अन,
गळ्यातली घुंगरे घोगरी हंबरण्याने भान हरपले...

टपटप टापा टाकत खडकावरुनी सारी धावत होती,
खुळी वासरे लाडाने आईला त्यांच्या खेटत होती,
कधी एकदा घरी जावुनी पान्हा सुटेल अलगद ओठी,
यासाठीच बिचारी माता गाव दूरचा पाहत होती...

धुंद पाखरे थव्याथव्यांनी झाडांवर बसताना दिसली,
सुर्याची पाण्यात पसरली नक्षी थरथणारी पुसली,
गजबजली पाने गवताची वार्‍याने बेभान जाहली,
चंद्रकोर प्रकटली तिलाही घाई झाली होती कसली..

थांबला कळप माथ्यावर दिसता धुरकटसा गाव चिमुकला,

तू झोप तान्हुल्या बाळा

Submitted by संतोष वाटपाडे on 26 April, 2015 - 00:31

मेढींतुन नाद किड्यांचा कानावर हलका येतो
दारावर वारा कातर का गीत उदासिन गातो
मातीत बुजवली स्वप्ने केलीत उशाशी गोळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा..

गवताच्या पाचोळ्याचे हे छप्पर हसते आहे
पेटली कधीची नाही ती चूल धुमसते आहे
मी पेज पिठाची देते तू नको करु कंटाळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा...

झोपडि ही माळावरची रात्रीत उगा थरथरते
तुटलेली जुनाट खिडकी लावली तरी करकरते
अंधार भयानक पडता टिटवीला सुचतो चाळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा....

बरडावर असेल नक्की जित्राब कुणाचे मेले
चवताळून पिसाट कुत्रे परसातुन भुंकत गेले
घाबरु नको थोडाही तू झाक अता रे डोळा

रात्र - शालिनी वृत्त

Submitted by संतोष वाटपाडे on 10 April, 2015 - 00:50

* रात्र*
रानामध्ये झोपली रात आहे
आभाळाची तेवते वात आहे
काळोखाची वेदना गारव्याने
झाडाखाली भैरवी गात आहे...

पानांमध्ये वाजली चालताना
ओढ्याकाठी पावले शार्दुलांची
एकांताने छेडता सूर कोठे
निद्रा सारी मोडली पाखरांची....

जागोजागी थांबल्या पायवाटा
झोपेसाठी शोधती का निवारा
अस्तित्वाची सावली शोधताना
सैरावैरा धावतो गार वारा...

डोळ्यांनाही वाटते मात्र जेव्हा
शून्यत्वाला देखणे रुप आहे
काही नाही भासते आपल्याला
ठायी ठायी चेतना खूप आहे...

आधार..

Submitted by संतोष वाटपाडे on 26 March, 2015 - 03:32

(मंदारमाला वृत्त)
आधार मागावया दुःख माझे उभे आज दारी पहा श्रीहरी,
कोठेच नाही असा भक्त वेडा नको दूर जाऊ रहा मंदिरी.....
आक्रोश केला जरी फार वेळा वृथा संकटे रोज आली घरी,
फ़ोडून टाहो तुझा जाप केला अशी वेळ का आज माझ्यावरी.....

आयुष्य माझे गरीबीत गेले तरी पंढरीला सदा धावलो,
शेतात आल्या किती टोळधाडी उपाशीच होतो तरी हासलो.....
वाळून गेली पिके फ़ार वेळा कधी पावसाने उभी जाळली,
बोलायला फार होते परंतू मुके राहुनी आण मी पाळली.....

पोथ्या पुराणे उरी घेत आलो हरीपाठ होता मुखी सर्वदा,
माळा गळ्यातील सांभाळल्या मी जिभेला तडे पाडले खूपदा....
आबाळ झाली घराचीच देवा कुणी धावले ना दशा पाहण्या,

भेट (गंगोदक वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 8 January, 2015 - 23:24

वाहणार्‍या नदीचे किनारे जसे हात हातात घेऊन चालायचे
आपले प्रेम तेव्हा मला साजने त्या जलासारखे धुंद वाटायचे...

यायची भेटण्या रोज घाटावरी जायची घेऊनी शब्द ओठातले
स्पर्श झाले जरी राहिलेही जरी दुःख माझ्या मनी मात्र दाटायचे...

सागरी लाट पायात रेंगाळते पावलांना कधी लाजुनी चुंबते
दूर गेल्यावरी ती मला सोडुनी सांग कोठे तिला रोज शोधायचे...

हे धुके रोज येते तुला स्पर्शण्या पांघराया जुनी आठवे घेत जा
मी कुणाला कुणाला बरे साजने लक्ष ठेवूनिया व्यर्थ टोकायचे..

सांज व्याकूळ होते मनासारखी थांबते चालते.. थांबते चालते
रात्र होते कधी एकदा वाटते स्पंदनांना किती काळ रोखायचे...

आपले प्रेम

Submitted by संतोष वाटपाडे on 6 January, 2015 - 01:20

वाहणार्‍या नदीचे किनारे जसे हात हातात घेऊन चालायचे
आपले प्रेम तेव्हा मला साजने त्या जलासारखे धुंद वाटायचे...

यायची भेटण्या रोज घाटावरी जायची घेऊनी शब्द ओठातले
स्पर्श झाले जरी राहिलेही जरी दुःख माझ्या मनी मात्र दाटायचे...

सागरी लाट पायात रेंगाळते पावलांना कधी लाजुनी चुंबते
दूर गेल्यावरी ती मला सोडुनी सांग कोठे तिला रोज शोधायचे...

हे धुके रोज येते तुला स्पर्शण्या पांघराया जुनी आठवे घेत जा
मी कुणाला कुणाला बरे साजने लक्ष ठेवूनिया व्यर्थ टोकायचे..

सांज व्याकूळ होते मनासारखी थांबते चालते.. थांबते चालते
रात्र होते कधी एकदा वाटते स्पंदनांना किती काळ रोखायचे...

ग्रीष्म

Submitted by संतोष वाटपाडे on 28 December, 2014 - 03:02

नाले नद्या थांबल्या वाहणार्‍या तळी आटली सर्व रानातली
जाळीप्रमाणे सभोवार नक्षी दिसू लागली गर्द पानांतली...
झाडे झळा खात होती उन्हाच्या तरी शांततेने उभे राहिली
खोडातुनी डिंक केवीलवाणा निघाला जसा झेलण्या काहिली..

भेगाडल्या पावट्या श्वापदांच्या नदीतीर ओसाड झाल्यावरी
गाळामध्ये झोपल्या रानगायी मऊ गाळ फ़ासून अंगावरी...
फ़ेर्‍या नभी घालती कैक घारी शिकारीस शोधावया धावती
निष्पर्ण झाडांतली पाखरेही घरातून हाका कुणा मारती..

घामेजली कातळे तापलेली किनार्‍य़ावरी शोधती सावल्या
टाळायला ऊन बेफाम त्यांनी शिराभोवती झावळ्या बांधल्या...
ओठावरी जीभ रेंगाळणारी हळूवार बाहेर डोकावली

क्षितिजावरचा संन्यासी

Submitted by संतोष वाटपाडे on 8 December, 2014 - 06:51

रानफ़ुलांचा तवंग आला भल्या पहाटे पाण्यावरती
धुंद गोठल्या पाचोळ्याची सळसळ झाली काठावरती
आणि अचानक पाण्यामधुनी एक बुडबुडा उंच उडाला
शांत तळ्यातिल गारठलेल्या थंड जलाच्या वाफ़ेवरती...

धुके पांढरे सरपटणारे अडखळले घनझाडांवरती
परतून आले तसेच मागे अरुंद पाऊलवाटांवरती
लक्ष चुंबने देत फ़ुलांना सरकत गेले पुढे पुढे अन
खुणा उमटल्या दाट धुक्याच्या हिरव्या हिरव्या पानांवरती....

तलम कोंदणे जागोजागी थरथरणारी चमचमणारी
फुsलपाखरे रंगीत त्यावर मुग्ध होऊनी भिरभिरणारी
तळ्यास खेटून उभ्या तरुंवर कैक पाखरे पटपट जमली
सुर्य उगवता निळ्या नभाशी घेण्यासाठी उंच भरारी...

Pages

Subscribe to RSS - वृत्तबद्ध कविता