वरती खूप दिखावे होते

वरती खूप दिखावे होते

Submitted by बेफ़िकीर on 21 September, 2014 - 04:02

वरती खूप दिखावे होते
खाली हेवेदावे होते

स्वप्नांच्या खुरट्या वाढीवर
झोपेचे शिडकावे होते

होड्या सागर ढवळत नव्हत्या
लाटांचे कांगावे होते

कुठेच त्याचे नसणे हेही
असण्याचेच पुरावे होते

श्वासाश्वासामार्फत आले
मृत्यूचे सांगावे होते

खुनी कुणाला नकोच होता
हाती सर्व सुगावे होते

अघळपघळ गप्पा नव्हत्या त्या
तुझे विषारी कावे होते

तेथे मी ढुंकतही नाही
जेथे उजवे डावे होते

ही नाती टिकण्याचे कारण'
नात्यातील दुरावे होते

खूपजणांच्या मनात येथे
'बेफिकीर मी व्हावे' होते

Subscribe to RSS - वरती खूप दिखावे होते