झळा
Submitted by संतोष वाटपाडे on 28 April, 2014 - 00:26
खाटेवरती का म्हातारी पडल्या पडल्या कण्हते आहे
कुणीतरी या नरड्यामध्ये ओता पाणी म्हणते आहे...
ऊन असे कि काळ्या मातीनेही अगदी प्राण सोडले
बांधावरली बाभूळ वेडी तरी सावली विणते आहे
ढेकळातल्या आडव्या रेषा भाळावर दिसणारंच नक्की
झोळीमधल्या क्षीण मुलाचे नशीब यातून बनते आहे...
पिवळ्या खुरट्या गवतामध्ये गाय मारते असंख्य टोचा
भकास डोळ्यावरती माशी पिसाटशी भणभणते आहे...
कधीतरी या तप्त उन्हाने घाम फ़ुटावा आभाळाला
अंथरुणावर धरती व्याकूळ तापाने फ़णफ़णते आहे....
--- संतोष वाटपाडे
विषय: