भुजंग वृत्त

आर्जव

Submitted by संतोष वाटपाडे on 16 January, 2014 - 20:08

तिच्या पावलांच्या खुणा शोधतो मी कबर आठवांची जुनी खोदतो मी,
उरी गोठल्या हुंदक्यांना नव्याने पुन्हा लोचनातून बोलावतो मी..

जिथे भेटलो कैक वेळा तिथेही फ़िरायास जाता तिचा भास होतो,
नदिच्या किनार्‍यासवे बोलताना तिची बोलकी सावली पाहतो मी....

कधी हाक प्रेमात मारायची ती कधी घ्यायची नाव लाडातलेही,
पहाडात आवाज देताच काही जुनी हाक कानी पुन्हा ऐकतो मी.....

गुलाबास वेणीत लावायची ती नवे देत हाती जुने घ्यायचो मी,
घरी ठेवलेल्या वहीतील आता सुट्या पाकळ्या मस्तकी लावतो मी....

तिच्या पांढर्‍या लाजर्‍या ओढणीने कधी झाकले तोंड होते सुखाने,
नभी थांबल्या श्वेतमेघात एका तसा स्पर्श शोधायला लागतो मी....

Subscribe to RSS - भुजंग वृत्त