प्रेम वेडं असतं -२

Submitted by सुमेधा आदवडे on 3 August, 2009 - 04:45

मंडळी, माझा मित्र म्हणजे अगदी भक्कम लढवय्या आहे. आणि त्याला झुंजण्यासाठी कुठलं न कुठलं निमीत्त सापडतच असतं. ह्या कथेचं शिर्षक तो वारंवार सिद्ध करत आलाय. ऐका आणखी एक घटना त्याच्या बरोबर घडलेली.
खरंतर खालील कथेला ह्या http://www.maayboli.com/node/2966 कथेचा पुढचा भाग नाही म्हणता येणार...पण नवीन लोकं पहीली कथा वर दिलेल्या लिंक वर वाचु शकतील.
**************************************************
मागच्या एक महीन्यापासुन आमच्या मॅडम पुण्याला येऊन राहील्या होत्या, कुठल्याश्या क्लासेस साठी. क्लासेसचं फक्त निमीत्त हो. मुंबई-पुणे अंतर ते कितीसं...दर वीकेन्डला भेटता येणार होतं आता आम्हाला. दोघेही फार खुश होतो. पहिल्या तीन वीकेन्ड्सला तर आमचे सगळे प्लान्स ठरवल्याप्रमाणे सफल संपुर्ण झाले होते. बघता बघता एक महीना संपुन गेला होता. आता शेवटचा वीकेन्ड आला. आम्ही हा वीकेन्डही खुप धमाल करुन आठवणीत राहील असा करायचा ठरवला. पण ते ठरवलं नसतं तरी तसं होणारच होतं बहुदा. चांगलाच आठवणीत राहीला हा वीकेन्ड.

नेहमीप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधला "फुकट आणि पौष्टिक" नाश्ता करुन मी निघालो पुण्याला जायला. आम्ही दोघांनी रात्रीचं जेवण एकत्र करायचं ठरवलं होतं. ऑफिसच्या बाहेर पाऊण तास उभा राहीलो ठाणे-पुणे बससाठी. नको तेव्हा एका मागोमाग एक अश्या किती बसेस जातात रांगेत. आणि आज मला जायचं आहे तर...छ्या! मग ट्रेनने वाशीला आलो. म्हटलं तिथे हायवे वरुन बर्‍याच बसेस मिळतात पुण्यासाठी. पोचु आपण दोन तासात पुण्याला. पण आमचं नशीब जरा जास्तच बलवत्तर होतं आज. तिथेही अर्धा-पाऊण तास थांबुनसुद्धा बस मिळाली नाही.

शेवटी एवढा द्राविडी प्रणायम केल्यानंतर एक पिंपरी-चिंचवड मार्गे पुणे अशी बस समोर आली. ड्रायव्हरला विचारलं चांदणी चौकला जाते का गाडी तर नाही म्हणाला. मग म्हटलं निदान वाकडला तरी जाते का, तर हो म्हणाला. त्याने नीट ऐकलं की नुसताच हो म्हणाला देव जाणे. पण मग मी गाडीत बसलो. म्हटलं चला, एकदाचा प्रवास तरी चालु झाला. साडेनऊ-पावणेदहा तिथेच झाले. कंडक्टरला तिकीट मागितलं वाकडचं तर म्हणतो गाडी वाकडला थाबंत नाही!धन्य! आता काय करायचं? पिंपरी किंवा चिंचवडवरुन एवढ्या रात्री चांदणी चौकला येणं म्हणजे कुठलं वाहन मिळेल की नाही याची शंका होती. आधीच उशीर झाला होता. मग मी पनवेलला उतरुन तिथुन दुसर्‍या बसने जायचं ठरवलं. आमच्या मॅडमशी बोलणं झालं तर ती म्हणाली तू भेट फक्त, तेवढंच पुरे आहे माझ्यासाठी.

सव्वादहाच्या दरम्यान पनवेलला उतरलो. तिथुन बेळगावची बस मिळाली, आणि यावेळेस पटकन मिळाली. १ वाजेपर्यंत पुण्याला पोचलो. तेव्हाच तिला भेटायचं होतं मला. पण एवढ्या रात्री तिला होस्टेलमधे जाऊन भेटणं बरोबर नव्हतं. चांदणी चौकला माझा एक मित्र आला होता मला घ्यायला. आम्ही तर निशाचरच तसेही.....रात्री दीडला पुणे स्टेशनला कमसम हॉटेलमधे चना मसाल्यावर ताव मारताना माझी "घेऊ किती दो कराने" अशी परिस्थिती झाली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी आमचं भेटायचं ठरलंच होतं. सकाळी ११ च्या दरम्यान माझ्या मित्राची बाईक घेऊन मी निघालो तिला भेटायला होस्टेलजवळ. अर्ध्या रस्त्यावर पोचतो तोच मॅडमचा फोन "माझे वडील येत आहेत इथे. आपण थोड्या वेळाने भेटुया." मॅडम उद्या मुंबईला जाणार होत्या आणि तिथुन परवा सुरतला, मागच्यासारखंच. तिचे वडील अनासये मुंबईला चालले होते तर तिला म्हणाले की तुझं सामान पोचवतो मुंबईला. बापुने पार बट्ट्याबोळ केला आमच्या प्लानचा. पण म्हटलं हे शत्रु तर आपल्यावर सारखे चालुन येणारच आहेत. उगाच मूड नको खराब करायला. थोड्या वेळाने तर थोड्या वेळाने...भेट होणं महत्वाचं.

थोडा वेळ, थोडा वेळ करता करता बापुजी शत्रू ३.३० ला तिला भेटले. आणि मग तिचं सामान घेऊन गेले. मग आमचं भेटणं नक्की झालं. ४.३० च्या नंतर एकदाची भेटली ती मला. पहीले मंदीरात गेलो, एवढा जीवाचा आटापीटा करुन भेट झाली तरी. देवाचे आभार मानलेच पाहीजे. मग थोडा वेळ फिरलो, भरपुर गप्पा मारल्या, मजेत वेळ घालवला. रात्री तिला हॉस्टेलला सोडलं आणि मी माझ्या एका नातेवाईकाच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलो. ११-११.३० च्या दरम्यान पार्टी संपली. म्हटलं पुन्हा भेटुया का हिला. मॅडम काय, भेटायचं म्हटल्यावर एका पायावर तयार. मग थोडंसं तिथल्या तिथे हिंडलो आणि तिला पुन्हा होस्टेलला सोडलं.

दुसर्‍या दिवशी ती मुंबईला जायला निघणार होती. मला ती तिच्याचसोबत निघायला सांगत होती. म्हटलं जायचच आहे मुंबईला, तर एकत्रच जाऊ. नंतर कधी भेट होईल कुणास ठाऊक. बहुदा मी काही दिवसांसाठी चेन्नईला जाणार होतो नंतर. मग तर आमची भेट होणं कठीणच होतं. माझे मित्रही म्हणाले मला जा म्हणुन, तेवढंच तीन एक तास सोबत काढता येतील. पण ती किती वाजता निघणार हे नक्की नव्हतं.करंट बूकींगने दुपारी १-२ च्या वेळेस जी बस असेल तिने जाऊ असं ठरलं शेवटी.

आता ह्याच वेळेस नेमक्या कुठल्या बसचं तिकीट तिला मिळेल हे कळणं कठीण होतं. त्यात दुष्काळात तेरावा महीना...तिचा पुण्यातला भाऊ तिला सोडायला येणार होता. तो सोबत असताना मी तिच्या जवळही फिरकु शकत नव्हतो, कारण तो मला ओळखत होता. तिने निघताना मला पुन्हा फोन केला. पुणे स्टेशनला पोचल्यावर मी माझ्या मित्राला पुढे होऊन आधी तिला शोधुन मग त्याच बसचं तिकीट काढायला सांगितलं. तिकीटे मिळाल्यावर तो मला फोन करणार होता. माझा मित्र तिकीटच्या रांगेजवळ पोचला. पण ती त्याला दिसलीच नाही. ह्याचा मला फोन.... ती दिसत नाही आहे, आता काय करु. तेवढ्यात त्याच्या समोरची एक बस चालु झाली आणि निघाली. त्या बसच्या आड असलेली "ती" आता त्याच्या नजरेस पडली. त्याने हात दाखवला तिला. तिने नजरेनेच भाऊ असल्याचे खुणवलं आणि हसली. खुश झाल्या मॅडम आम्ही आल्याचं कळल्यावर. माझा मित्र आता रांगेत उभा राहिला. एका वॉल्वोमधे ४५ सीट असतात. ह्याच्या पुढे कितीतरी माणसं होती. कुणास ठाऊक ह्याला त्याच बसचं तिकीट मिळतंय की नाही ते. तिच्या भावाने तिला लेडीज सीटचं तिकीट काढायला पैसे दिले आणि तो बाजुला थांबला. बराच वेळ झाला, माझ्या मित्राचा फोन नाही. कुणास ठाऊक ह्याला तिकीटे मिळालीत की नाही ते. शेवटी मीच फोन केला.

तो म्हणाला, "नशीबाने शेवटची दोन तिकीटे मिळाली आहेत. मला तर कुठल्या मिशनवर असल्यासारखं वाटतंय आता!" मी म्हटलं चला, देवच पावला म्हणायचं. आता पुढे काय? तिच्या भावासमोर त्याच बसमधे चढणं मला जमणार नव्हतं. म्हणुन मी पुण्यापासुन दहा किलोमीटर वर असलेल्या औंध परिहार चौकच्या थांब्यावर बसमधे चढायचं ठरवलं. सीट तर अडवायच्या होत्याच. माझ्या मित्राला म्हटलं तू जा बसमधे तिथपर्यंत. ती बसमधे चढली आणि माझा मित्रही. बस एकदाची सुटली. मला मित्राच्या बाईकवरच बसच्या मागे जावं लागणार होतं. कीक मारली आणि निघालो मीही मागे. बस ७०-८० च्या वेगात पुढे पळत होती आणि मागे मी मित्राची बाईक धावडवत होतो. मी हेडफोन लावुन मित्राशी बोलत होतोच. ती त्याच्या पुढच्याच सीटवर होती.

मधे काही व्हायला नको देवा, मला बसमधे पोचुदे असा सारखा थैमान चालु होता. पण ही इमानी बाईक शोले मधल्या धन्नो सारखी मला वेगात घेऊन गेली आणि मला पोचवलं एकदाचं औंध परिहार चौकला! मी बस मधे चढलो, मित्राच्या हातात बाइकची चावी टाकली, तो उतरला..आणि बस सुटली! हुश्श! मला बघुन ती एकदम खुश झाली. शेवटच्या दोन रिकाम्या सीट्स आमची वाट बघत होत्या. मग काय...पुढचे तीन तास गप्पा टप्पा धमाSSSSSSSSSSSSल!
***************************************************************
पटलं ना पुन्हा, प्रेम वेडं असतं ?

गुलमोहर: 

भाग १ ची लिन्क दिल्याबद्दल धन्यवाद्. आमचा बुवा प्रेमावर एवढा विश्वास नव्हता. तुम्हाला वाचुन तो येत आहे! सुरेख वर्णन आहे.

<<<<थोड्या वेळाने तर थोड्या वेळाने...भेट होणं महत्वाचं>>>>>>> ह्याला म्हण्तात प्रेम!!
भारी आहे ह कथा!! बाकी तुमचा मित्र तुम्हाला ईतकी डिटेल्स सान्गतो याचे नवल वाटले.

धन्यवाद मंडळी...माझा मित्र माझ्याच ऑफिसमधे काम करतो. आम्ही खुप क्लो़ज असल्यामुळे तो माझ्याशी सगळं शेअर करतो. आणि ती अजुन शिकत आहे, इंजीनीएरिंगच्या तिसर्‍या वर्षाला आहे लातुरला.
बाकी पुन्हा एकदा आभार सगळ्यांचे Happy

सर्वांच्या प्रतिक्रिया आणि शुभेच्छा दोन्ही प्रेमवीरांपर्यंत पोचल्या आहेत आणि दोघांनीही मनापासुन आभार कळवले आहेत दोन्ही कथांसाठी Happy