राजधानीच्या इतिहासाचा एक तटस्थ साक्षीदार

Submitted by प्रकाश काळेल on 1 August, 2009 - 10:33

आपण ज्या ठिकाणी राहतो, तिथली वा आसपासची प्रेक्षणीय स्थळे नेहमीच आपल्याकडून दुर्लक्षली जातात. हे म्हणजे 'घरकी मुर्गी दाल बराबर' यासारखंच काहीतरी असावं! "बघूया ना सवडीनं ", "कुठे जातंय ते पळून.. निवांत बघता येईल की! ", " इथल्याइथे तर आहे बघता येईल कधीही! " असे बऱ्याचजणांच्या बाबतीत होत असेल! नाही?
तर सांगायचा मुद्दा हा की, दिल्लीला येऊन जवळपास तीन वर्षे होत आली पण दिल्लीतला कुतुब मीनार मात्र बरेच दिवस दुर्लक्षला गेला! दरवेळी जुन्या दिल्लीहून महरौली मार्गे गुडगावला जाताना हा कुतुब मीनार इतक्यांदा पाहिलाय. दरवेळी हेच ठरवायचो की, अरे एकदा पाहायला पाहिजे! पण प्रवेशद्वाराच्या आत जाऊन, जवळून तो पाहायचा योग यायला मात्र बराच कालावधी गेला. खास उत्तर भारत ट्रीप साठी दिल्लीत उतरणार्‍या लोकांच्या लिस्टमध्ये काही महत्त्वाची बघणेबल ठिकाणे असतात. त्यात कुतुब मीनार, ईंडीयागेट, लाल किल्ला, छत्तरपुर, अक्षरधाम ही काही महत्त्वाची ठिकाणे. त्यात कुतुब मीनार हा लिस्टवर वरच्या स्थानावर असतो!
________________________________________________


_________________________________________________
UNESCO World Heritage Site च्या लिस्टमध्ये समाविष्ट असलेला हा मीनार दिल्लीला येणार्‍या लोकांचं आजही खास आकर्षण आहे. कुतुब मीनार हा जगातील सर्वांत उंचीचा ब्रिक कंस्ट्रक्शन मीनार म्हणून गणला जातो. मीनाराची उंची ७२. ५ मीटर्स असून त्याच्या वरच्या मजल्यापर्यंत जायला एकूण ३७९ पायर्‍या आहेत. पूर्वी मीनारावरून दिल्लीचे खूप छान दर्शन घेता यायचे म्हणे! पण सध्या कुतुब मीनार आतून पाहायला सर्वांसाठी खुला नाही. काही अपघातांच्या नोंदींमुळे आणि याची वयोपरत्वे पेलोड कपॅसिटी या बाबींमुळे प्रवेश बंद केला आहे. याचे फक्त बाह्यदर्शन घेऊन सर्व देशी-विदेशी पर्यटकांना समाधान मानावे लागते. कुतुब मीनारच्या काँप्लेक्स मध्ये अजूनही बर्‍याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. लोहस्तंभ, ईल्तुमिश कबर, कुव्वत-अल-इस्लाम आणि अलई मीनार हे खास.

कुतुब मीनार पूर्व इतिहास:
आताची दिल्ली म्हणजे आधीची धिल्लीका नगरी (त्याआधीचं पांडवांचं इंद्रप्रस्थ) ही रजपुतांच्या राज्याची राजधानी. सध्या ज्या ठिकाणी कुतुब मीनार आहे त्या जागी पूर्वी २७ विविध जैन धर्मीय मंदिरे अस्तित्वात होती. ती नष्ट करून त्यातल्या दगडांचा वापर करून हा कुतुब मीनार आणि शेजारची मशीद बनविले गेले. त्या जैन मंदिरांचे अवशेष तिथे आजही पाहायला मिळतात. त्या अवशेषांचा एक भाग म्हणजे, तिथे आजही अस्तित्वात असलेला लोहस्तंभ! जो धातुशास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा विषय आहे. तो त्या जैन मंदिरांचाच भाग होता.
_________________________________________________


(कुव्वत-अल-इस्लाम मशीदीचा काही भाग. हे खांब जुन्या मंदिराचे वापरले गेलेत. खांबांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक खांबावरची नक्षी वेगळी आहे आणि आकारही! )


(वरच्या तीनही फोटोही जुन्या जैन मंदिरांच्या अवशेषांचे आहेत. )


(लोहस्तंभ)
_________________________________________________
या लोहस्तंभामध्ये ९८% wrought Iron असूनही जवळजवळ १६०० वर्षे तो थोडाही गांजला नाही! काही जाणकार शास्त्रज्ञांनी अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षानुसार या लोहस्तंभाचे वय हे इतिहासातल्या नोंदींपेक्षाही जास्त आहे. त्यांनी प्रयोगांनी शोधलेली तारीख - इसवी सन पूर्व ९१२! बऱ्याच संशोधनाअंती असा निष्कर्ष काढण्यात आला की हा लोहस्तंभही मूळचा इथलाही नाही. तो ही मंदिरे बनविली गेली तेव्हा अजून कुठून तरी आणून बसवला गेला! हा लोहस्तंभ चंद्रगुप्त विक्रमदित्यांच्या काळात (375-413) भगवान विष्णूंच्या ध्वजाचे प्रतीक म्हणून उभारला गेला होता. सध्या मध्य प्रदेशात भोपाळच्या जवळ उदयगिरी(पुरातन नांव-विष्णुपदगिरी) नांवाचे एक छोटे गांव आहे. विष्णुपदगिरी म्हणजे भगवान विष्णूंच्या पावलांची खूण असलेला पर्वत. हे गांव कर्कवृत्तावर वसलेलं आहे. जे गुप्तकाळातले अंतरीक्ष अभ्यासाचे मुख्य ठिकाण होते. गुप्तकाळामध्ये अशा प्रकारची विविध विद्यापीठे अस्तित्वात होती आणि त्यांकाळी अंतरीक्ष निरीक्षणातले बरेच ज्ञान लोकांनी आत्मसात केलेलं होतं. या लोहस्तंभाचा मूळ उद्देश सूर्याची सद्यस्थिती ठरविणे हा होता. याची रचना अशी होती की, सकाळी सूर्य उगवल्यानंतर स्तंभाची सावली विष्णुमुर्तीच्या पायाजवळ पडेल. त्याप्रमाणे सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन कळायला मदत व्हायची! (A sundial system) हा लोहस्तंभ हा मूळचा इथला असावा, या अनुषंगाने संशोधन केले असता त्यांना या अंदाजाची पुष्टी जोडणारे बरेच पुरावे हाती लागले आहेत. ज्याआधारे तो मूळचा इथलाच असावा असे मानले जाते. यावर संशोधनांत मोलाची कामगिरी केली ती डॉ. बालसुब्रमन्यम(IIT,Kanpur) यांनी. लोहस्तंभ त्याचे मटेरियल काँपोझिशन व त्याचा इतिहास यावर त्यांनी बरेच संशोधन केलेलं आहे. तसेच त्यांनी या संशोधनातून व अभ्यासातून बरीच पुस्तके लिहिलेली आहेत.
चीनीकम या अशातच आलेल्या हिंदी चित्रपटात, या लोहस्तंभाबरोबर एक दृश्य बेतलेलं आहे. अमिताभ याला उलट्या हाताने मिठी मारून स्वतःची इच्छा व्यक्त करतो आणि ती इच्छा पूर्णं होते. तशी बऱ्याच वर्षापासून लोकांची श्रद्धा आहे की, हे असे उलट्या हाताने मिठी घातली व ती मिठी व्यवस्थित बसली (म्हणजे दोन्ही हात एकमेकांना जुळले) की, मनातली इच्छा पूर्णं होते. लोकांनी मिठ्या मारून मारून व दिल्लीच्या हवेतल्या प्रदूषणामुळे या लोहस्तंभाची अशात बरीच झीज झालीये आणि गंजही चढायला लागलाय. त्यामुळे सध्या तो उलटी मिठी हा प्रकार बंद केला आहे. लोहस्तंभ हात न लावता जवळून पाहता येतो!

कुतुब मीनाराचा इतिहास:
Jam-Minaret.jpg
अफगाणिस्तानात असलेल्या जामच्या मीनारावरून प्रेरणा घेऊन कुतबुद्दीन ऐबक (याला दिल्लीचा पहिला सुलतान असेही संबोधले जाते. )याने त्यापेक्षा उंच मीनार उभा करायचा चंग बांधला.
तर हा भव्य मीनार पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनांत हा प्रश्न आल्याशिवाय राहत नाही की " अबब! इतका उंच मीनार कशासाठी बरे बांधला गेला असेल? " या प्रश्नांची उत्तरही नेमके नाही! काहीजणांच्या मते हा विजयाची निशाणी (Victory Tower) असावा. तर काहींच्या मते हा शेजारच्या मशीदीत प्रार्थनेसाठी लोकांना आवाहन करायचा मनोरा (minaret) असावा असे मानले जाते. असे मनोरे बऱ्याच मशीदींच्या शेजारी बांधलेले असतात. ज्याला मुस्लिम धर्मामध्ये स्वर्गातून पृथ्वीशी जोडणारा रस्ता असे संबोधले जाते. काहीजणांच्या मते हा आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी मनोरा(Watch Tower) म्हणून बांधला गेला असेल. बांधण्याचा नेमका हेतू काहीही असो.... कुतुब मीनार आहे मात्र दिमाखदार आणि भव्य!

आज दिसणाऱ्या या मीनाराच्या बांधकामास मात्र बरीच वर्षे लागली. महोम्मद घोरीच्या आधिपत्याखाली कुतबुद्दीन या सरदाराने ११९३ साली रजपुतांकडून दिल्ली जिंकली. साधारण त्याचवेळी या मीनाराचे बांधकाम सुरू झाले असावे. त्याचबरोबर कुव्वत-अल-इस्लाम नांवाची मशीदही त्याचवेळी बांधली गेली. कुतबुद्दीन या सरदाराची कथाही फार रोमांचक आहे. कुतबुद्दीन हा मूळचा तुर्की... त्याला लहान असतानाच पकडून गुलाम म्हणून विकले गेले. त्याला विकत घेतलेल्या इराणियन व्यक्तीने त्याला स्वतःच्या मुलासारखे सांभाळले आणि चांगले शिक्षण दिले. पण त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या मुलांनी मत्सरापोटी त्याला परत एकदा विकून टाकले. आणि त्याला खरेदी केले ते गझनीचा सरदार महोम्मद घोरीने. ज्याला भारताच्या काळ्या इतिहासात गझनीचा महम्मद म्हणून ओळखतात. त्याने केलेल्या भारतावरच्या स्वाऱ्या आणि लूट हा इतिहास जवळजवळ सर्व भारतीयांसाठी सर्वश्रुत असेल. नाही?
असा हा कुतबुद्दीन ऐबक गुलामापासून महम्मद घोरीचा खास सरदार बनला. ज्याला घोरीने १२०६ मध्ये दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून नेमले. हा गुलाम खानदानातला(गुलाम खानदानालाच मामलुक असेही संबोधले जाते)दिल्लीच्या सल्तनत चा पहिला सुलतान. पण त्याचा १२१० मध्ये Horseback Polo खेळताना अपघाती मृत्यू झाला. त्याच्या कारकीर्दीत या मीनाराचा फक्त पायाच पूर्णं होऊ शकला!

कुतबुद्दीनच्या पश्चात आराम शहा या तूर्त उपलब्ध सरदाराला दिल्लीचा दुसरा सुलतान नेमण्यात आले. आराम शहा सुलतान म्हणून फारच अकार्यक्षम होता म्हणे! त्याच्या अल्पशा कारकीर्दीतच दिल्लीतली सल्तनत डगमगायला लागली. शेवटी त्याचा वर्षभरातच कुतबुद्दीनचा जावई समशुद्दीन याने सन १२११ मध्ये पराभव करून दिल्लीची गादी मिळविली. हा समशुद्दीन ईल्तुमिश, याची कहाणीही त्याच्या सासरेबोवासारखीच! त्यालाही लहान असतानाच्या त्याच्याच भावांनी गुलाम म्हणून विकले होते. त्याकाळी तिकडे तशी पद्धत होती. अशा गुलामांना कठोर शिक्षण देऊन खास युद्धासाठी तयार केले जाई. मग सैन्यातले सरदार अशा गुलामांना भारी भरकम रक्कम देऊन खरेदी करत. त्या गुलाम लढवय्यांना 'स्वर्गातले योद्धे' मानले जाई! समशुद्दीन यालाही असाच एक गुलाम सैनिक, म्हणून कुतबुद्दीनने भारी रक्कम मोजून खरेदी केले. नंतर त्याच्या कामावर खूश होवून स्वतःच्या मुलीशी त्याचे लग्न लावून दिले आणि ग्वाल्हेरचं सरदारपदपण दिले. तोच नंतर दिल्लीचा गुलाम खानदानातला तिसरा सुलतान बनला!
या समशुद्दीन इल्तुमिशच्या आधिपत्याखाली कुतुबमिनाराचे पहिले चार मजले पूर्णं झाले. ते बांधण्यासाठी अफगाणिस्तानातल्या फ़ारसी आणि मुस्लिम कारागिरांचा वापर करण्यात आला असे स्थापत्यतज्ञ मानतात. कारण बांधकामाचे आर्किटेक्चर हे तिकडच्या इमारतींशी जुळणारे आहे. पहिले चारही मजले बांधण्यासाठी लाल दगडांचा वापर केलेला आहे. जे दगड तिथल्याच जुन्या जैन मंदिराचे वापरलेले गेले.
मीनारावरचा या लाल दगडांवर सुंदर रेखीव नक्षीकाम केलेलं आहे. तसेच त्यावर कुरणातील काही वाक्ये कोरलेली आहेत. तसेच हा मीनार इल्तुमिशने पूर्णं केला असेही ठिकठिकाणी कोरलेलं आहे. (फारसी आणि नागरी लिपीत! ) कुतुब मीनारचं नांव पहिला सुलतान कुतबुद्दीन याच्या नांवावरून आहे की, इल्तुमिशच्या दरबारातल्या कुतबुद्दीन बख्तियार काकी या मुस्लिम संताच्या नावावरून.. याचा इतिहास स्पष्ट नाही!
_________________________________________________

मीनारावरील नक्षीकाम :

अलई दरवाजा आणि कुव्वत-अल-इस्लाम मशीदीवरचे नक्षीकाम:

अलई दरवाजा.

ईल्तुमिश कबर

_________________________________________________
सन १२९० नंतर गुलामांच्या हातातून दिल्लीचे तख्त गेले आणि खिलजी सत्तेवर आले. दिल्लीचा दुसरा खिलजी सुलतान अल्लाउद्दीन खिलजी. याने त्याच्या कारकीर्दीमध्ये मध्य आणि दक्षिण भारतातील बऱ्याच राज्यांवर स्वाऱ्या केल्या. माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र मधला बराच प्रदेश खिलजी साम्राज्यास जोडला. सन १३११ मध्ये दक्खनच्या लढायांमध्ये विजय मिळवून उत्तरेत परतल्यानंतर, त्या विजयांची निशाणी म्हणून अल्लाउद्दीनने कुतुबमिनारसारखाच अजून एक उंच मीनार बांधायचे ठरविले. त्याने तिथल्या कुव्वत-अल-इस्लाम मशीदीचा आकारही पूर्वीच्या आकाराच्या दुप्पट करवून घेतला. त्या आकाराला शोभेल असा हा नवीन 'अलई मीनार' कुतुब मीनाराच्या साधारण दुप्पट आकाराचा आणि उंचीचा बांधायचे ठरले होते. त्याचे बांधकामही सुरू करण्यात आले. पण सन १३१६ साली अल्लाउद्दीनचा अकस्मात मृत्यू झाल्यामुळे ते बांधकाम मध्येच थांबले. तोपर्यंत 'अलई मीनार' साधारण २४. ५ मीटर बांधून झाला होता.


आजही ते कच्चे बांधकाम जसेच्या तसे पडून आहे. नंतरच्या कोणत्याच राजांनी ते पुढे वाढवायचं मनावर घेतलं नाही!

खिलजींनी सन १३२० पर्यंत दिल्लीची सत्ता भूषविली आणि त्यानंतर दिल्ली सल्तनत तुगलकांच्याकडे आली. या तुगलक खानदानातला चौथा सुलतान फिरोज शहा तुगलक. हा कमालीचा Iconoclast(परधर्मीय धर्मक्षेत्रांचा विध्वंस करणारी व्यक्ती) होता.
त्याने ओरिसातले जगन्नाथ मंदिरही उध्वस्त केलं होतं! हरियाणामध्ये काही हिंदू लोकांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली तेव्हा त्यांना अटक करून त्यांना सामूहिक मृत्युदंड देण्यात आला!
मुस्लिम धर्मीयांसाठी मात्र त्याने फार मोलाची कामगिरी केली असं मानतात. त्याच्या कारकीर्दीत अनेक विश्रामभवने, थडगी, उद्याने, मदरसा, मोफत दवाखाने वगैरे बांधले गेले. जवळपास ३०० गांवे बांधली. शेतीला लागणाऱ्या पाण्यासाठी जवळपास ५ मोठे कालवे बनविले. त्याच्याकडे भरतातूनच इतर प्रांतातून पकडून आणलेल्या १, ८०, ००० गुलाम कारागिरांचा ताफा होता. तसेच त्याने बऱ्याच भारतीय संस्कृत ग्रंथांचे फारसीमध्ये भाषांतरही करवून घेतले होते!
सन १३६८ मध्ये भूकंपामुळे की इतर काही कारणांनी कुतुब मीनाराच्या वरच्या मजल्याची पडझड झाली. तेव्हा फिरोज शहाच्या आधिपत्याखाली कुतुब मीनारावर पडझड झालेल्या मजल्याच्या बदल्यात दोन मजले चढविले गेले. हे दोन मजले संगमरवरी दगडांचा वापर करून बांधलेले आहेत. जे आधीच्या लाल दगडांपासून वेगळे आहेत. तोपर्यंत साधारण दिडशेवर्षापेक्षा जास्त काळ कुतुबमिनाराला फक्त चारच मजले होते!

त्यानंतर १५०५ मध्येही सिकंदर लोढीच्या काळात भूकंपामुळे वरच्या काही मजल्यांची पडझड झाली. ज्याची त्याकाळात दुरुस्ती केली गेली. ब्रिटिशांच्या राजवटीतही १७९४ साली अजून एका भूकंपामुळे वरच्या मजल्याची दुरुस्ती करावी लागली. ते काम मेजर स्मिथ या इंग्रजी इंजिनियराने करवून घेतले. त्यावेळी अस्तित्वात असलेलं फिरोज शहाने बधलेलं वरचं पॅव्हेलियनही त्याने काढून टाकले आणि तिथे स्वतः डिझाइन केलेलं पॅव्हेलियन बसवले. पण ते कुतुब मीनारावर शोभेलसं नव्हते त्यामुळे १८४८ साली लॉर्ड हार्डींग यांनी ते तिथून काढून टाकले. ते सध्या खाली कुतुबमिनारच्या बागेत ठेवलेलं आहे!

_________________________________________________
गेल्या आठ शतकांचा इतिहास या कुतुबमिनाराने पाहिलेला आहे. (त्याच्या दगडांनी त्याही आधीच्या कित्येक शतकांचा! ) रजपुतांनंतर दिल्लीवर मामलुकांचे राज्य आले. त्यानंतर खिल्जी, तुगलक, सय्यद, लोढी आणि मुघल अशा मुस्लिम राजवटींनी दिल्लीवर राज्य केलं. मग त्यानंतर ब्रिटिशांनी!
आज स्वतंत्र भारताची राजधानी दिल्लीची तो शान आहे....... राजधानीच्या इतिहासाचा एक तटस्थ साक्षीदार म्हणून!

जर कधी दिल्लीला येणं झालं तर अवश्य भेट द्या. रोज सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत हा देशी-विदेशी पर्यटकांसाठी खुला असतो. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे याची तसेच आसपासच्या भागाची सध्या चांगली निगा राखलेली आहे! मी वर लिहिलेलं वाचून, कुतुबमिनार कुणी बांधला? कशासाठी बांधला? कसा बांधला? या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसतील तर यालाच येऊन विचारा!

तसे कुतुब मीनारावर एका दगडावर, कुण्या एका हिंदू कारागिराने लिहून ठेवलंय...
|| श्री विश्वकर्मा प्रसादे रचिता ||
(स्थापत्यदेवता श्री विश्वकर्मा यांच्या आशीर्वादाने ही वास्तू उभी राहिली! )

*****************************************************
संदर्भ:
१. "The world heritage complex of the Qutub" - Dr.R. Balasubramaniam(IIT,Kanpur)
२. "The History of India" - John McLeod
३. "World Heritage Monuments and Related Edifices in India"- Ali Javid,, Tabassum Javeed
४. www.wikipedia.com
________________________________________________

गुलमोहर: 

प्रकाश खुपच मस्त फोटो आणि माहीती दिली , मी एकदा जाउन आलो पण वर्णन वाचताना पहिल्यादाच बघतोय की काय असं वाटत होतं.

प्रकाशचित्रे फार सुरेख. माहितीहि चांगली आहे.
एव्हढा जुना आपला देश, काय काय पाहिले असेल तिथल्या वास्तूंनी, नि मुख्य म्हणजे पर्वत नि नद्यांनी!!

Happy Light 1

मस्त माहिती आणि फोटो..
फक्त काही फोटो जरा तिरके आलेत का? की ते माझ्या माशिन वर तिरके दिसतायत ?

बाकी "घरकी मुर्गी दाल बराबर" शी पूर्ण सहमत.. Happy

माहिती आणि फोटो मस्तचं.
बाकी वेगवेगळे देश, तिथली प्रेक्षणीय ठिकाणं आपण आवर्जून पहातो. आणि त्या तोडीच्या किंबहुना त्याहून सुंदर आपल्याचं देशातल्या कितीतरी गोष्टी, जवळच आहेत नंतर पाहू असा विचार करून राहून जातात Sad

अप्रतिम... मुग्ध करणारं चित्रण.

प्रकाशजी खुपच छान फोटो....शेवट्चा क्लास ! अन माहीती पण . मी पण हे सर्व पाहिले आहे पण तुम्ही लिहिलेली माहीती वाचुन वाट्ले ...कि पुन्हा एकदा जावुन पहायलाच हवे Happy धन्यवाद .
"घरकी मुर्गी दाल बराबर" हे पण अगदी खरच !

फोटोच पाहीले आधी..
आधीही सांगितले असेल मी, पण तुमचे फोटो असले की मी आवर्जून वॉटरमार्क कुठे असेल ते शोधायचा खेळ खेळते! जबरी असते त्यांची प्लेसमेंट!
आता माहीतीही नीट वाचते..

www.bhagyashree.co.cc/

केवळ अप्रतिम!!!

मस्तं फोटो, सही माहिती. आवडलं.
शेवटचा फोटो वाह!

कुतुबमिनारचे अश्या प्रकारचे फोटो (क्लोज अप्स) प्रथमच बघितले. केवळ अप्रतिम!
कुतुबमिनार जाऊन पहावा असं आज प्रथम वाटलं. Happy

चान्गले फोटो Happy
सद्यस्थितीत प्रचलित असलेली माहिती दिली ते ही चान्गले
(अर्थातच, (आजही) टोळीवाल्यान्चे जीवन जगणार्‍या त्याकाळच्या आक्रमकान्नी भारतात "स्वहस्ते" काही भरीव बान्धकाम निर्माण केले यावर माझा विश्वास नाही - त्यान्नी केली ती केवळ तोडफोड! विध्वंस!)

मस्त प्रकाशचित्रे आणि माहितीदेखील.. दोन वर्षांपुर्वी मी दिल्लीमध्ये ५-६ तास ह्या मिनाराशी व्यतीत केले होते. कॅमेरा नव्हता आणि असता तरी इतकी सुंदर चित्रे काढता आली नसती. माझ्या प्रकृतीनुसार (तब्येतवाली प्रकृती नाही, कॅरॅक्टरवाली प्रकृती Proud ) मला सगळ्यात जास्त लक्षात राहिला तो अर्धवट बांधून झालेला, ओबडधोबड मीनार.

@लिम्ब्या, पूर्व आशिया-उत्तर आफ्रिका (तुर्कस्तान, सिरीया वगैरे) इथे ह्या टोळीवाल्या लोकांनी बांधलेली भव्य चर्चेस/मशिदी आहेत. तेव्हा त्यांना स्थापत्यशास्त्राचा गंध नव्हता हे थोडे धाडसी विधान ठरेल.

मस्त, अप्रतिम फोटो आणि माहीती ही, खुप वर्षांपुर्वी गेलो होतो कुतुब मिनारला, उजळणी झाली एकदा Happy
पुर्वी आत जाऊ द्यायचे. आता देतात का ?

नेहेमीप्रमाणेच अप्रतिम चित्रमय आणि माहितीपूर्ण सफर! Happy
फोटो अप्रतिम आलेत.. सुरेख क्लॅरिटी. सर्वात आवडला तो कुतुबमिनार आणि अलईमिनारचा एकत्र फोटो! Happy

प्रकाश सुंदर फोटो व वर्णन..:) बरेच दिवस झाले जाऊन, तुझे फोटो बघुन परत एक चक्कर मारायची इच्छा होतेय. Happy
ते घरकी मुर्गी दाल बराबर, अगदी खरंय.

अप्रतिम!! मी हल्लीच काढलेले कुतुबमीनारचे फोटो परत पाहिले मुद्दाम हे इथे पाहिल्यावर आणि माहिती वाचल्यावर ( आणि आता ते इतके लाजीरवाणे दिसताहेत तुमच्या ह्या अप्रतिम चित्रणापुढे :फिदी:)

>> माझ्या प्रकृतीनुसार (तब्येतवाली प्रकृती नाही, कॅरॅक्टरवाली प्रकृती ) मला सगळ्यात जास्त लक्षात राहिला तो अर्धवट बांधून झालेला, ओबडधोबड मीनार.>> आणि आमच्या प्रकृतीनुसार तिथे गेल्यावर सगळ्यात आधी आठवलं ते देव आनंद्-नुतनचं कुतुबमीनारच्या आत चित्रीत झालेलं 'दिल का भंवर करे पुकार..' गाणंच. Proud

Pages